Sunday, October 6, 2019

डबेपुराण -२

                 आमच्या 'डबेबुडवीमुळे' घरात कधी कधी कटु प्रसंगांना सामोरे जावे लागते खरे, परंतु डबेसंस्कृतीचे जतन करायचे म्हंटल्यावर अशा अडचणी येणारच याची आम्हाला कल्पना आहे. अर्थात इतर अनेक गोष्टींप्रमाणे हि संस्कृती प्रामुख्याने भारतात किंवा दक्षिण आशियाई मूळच्या लोकांमध्ये टिकून आहे. इतर ठिकाणी दुर्दैवाने तिचा ऱ्हास झालेला दिसतो. अमेरिकी लोकांनी तर डबेबुडवी मुळे डोकेदुखी ही समस्याच नाहीशी करून टाकली आहे. ते डबाच नेत नाहीत. म्हणजे ना रहेगा डबा ना होंगे झगडे म्हणत बाकीच्या गोष्टींवर भांडायला हे रिकामे ! असो- तर ज्या संस्कृतीचे आपण इतक्या हिरहिरीने रक्षण करतो असे म्हणतोय तीच्या मुळाशी जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. विषय अत्यंत क्लिष्ट असा आहे. इतिहासात धर्म,अर्थ ,काम ,मोक्ष, अस्त्र ,शस्त्र ,शास्त्र, पाककला इत्यादी  संदर्भात अनेक ग्रंथ आणि महाकाव्ये आहेत .परंतु डबा या विषयावर अगदी नगण्य स्वरुपात माहिती उपलब्ध आहे. हडप्पा किंवा मोहंजोदाडो येथे उत्खादानात सगळ्या गोष्टी मिळाल्या परंतु डबा काही गावला नाही. वेद पुराणांमध्येही डबेसंस्कृतीबद्दल काही ठोस माहिती आढळत नाही. शिवाय अति प्राचीन काळी लोक 'सिम्पल लिव्हिन्ग' वर विश्वास ठेवत असल्यामुळे दूध ,दही ,लोणी ताक असाच त्यांचा आहार असावा. त्याअनुषंगाने डब्यापेक्षा सोबत गायच घेऊन जाणे सोयीचे पडत असावे कदाचित असा आमचा कयास आहे. पुढे रामायणातपण डब्याचा उल्लेख नाही. पुत्रकामेष्टी यज्ञावेळी वशिष्ठांनी पायसम सोबत आणले कि तिथेच बनविले हा पुढील संशोधनाचा विषय असू शकतो. परंतु वशिष्ठांनी तीन कप्प्याच्या डब्यातून पायसम आणले असा स्पष्ट उल्लेख कुठल्याही रामायणात आढळत नाही. भरतभेटी च्या प्रसंगावेळीही रडारड ,गळाभेट, प्रभू रामचंद्रांचे जोडे भरत घेऊन जातो इत्यादी घटनांचे विस्तृत वर्णन आहे. परंतु आयोध्येतून भरताने, वांग्याचे भरीत आणि भाकरी चा डबा आणला आणि तो सगळ्यांनी मिळून खाल्ला असा उल्लेख कोठेही नाही. शबरी पण बोरं घेऊन जाण्याऐवजी प्रभू रामचंद्र येण्याची वाट बघत राहिली. यावरून तिला डब्याबद्दल माहिती नसावी असेच दिसते. मारुती अशोकवनातील फळे खात असल्यामुळे त्याला पकडून रावणापुढे हजर करण्यात आले. म्हणजे मारुतीला वानरसेनेने डबा भरून दिला नव्हता हे सिद्ध होते. एकूण काय तर हाती असलेल्या माहिती-पुराव्यानुसार रामायणकाळी डबा संस्कृती अस्तित्वात नव्हती असेच दिसते. पुष्पक विमान आणि ब्रह्मास्त्र निर्माण करणाऱ्या लोकांना डब्याचे ज्ञान अवगत नसावे हे आश्चर्यजनकच म्हणावे लगेल.
                महाभारताच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा डबासंस्कृती फार प्रगत नसावी. नाहीतर कृष्ण आणि त्याचे मित्र घरोघरी लोण्याची चोरी करीत फिरले नसते.यशोदेने भाकरी आणि वर मस्त लोणी असा डबा भरून दिला नसता का कान्ह्याला ?  भारतीय इतिहासात डबा किंवा तत्सम संस्कृतीविषयी पहिला संदर्भ आढळतो तो सुदाम्याच्या पोह्यांच्या स्वरुपात. सुद्यमाने पोहे डब्यात आणले असे कोठेही लिहिले नसले तरी एक नाशवंत पदार्थ शिदोरीच्या स्वरुपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हि कृती 'डब्याच्या व्याख्येत बसत असल्यामुळे सुदामा हा डबेसंस्कृतीचा आद्यगुरू ठरला ! अर्थात आपल्या मागण्या मान्य करण्याहेतू समोरच्याला खायला घालून तृप्त करणे याचीही सुरुवात सुदामा प्रकरणातून झाली असण्याची शक्यता आहे. पुढे कुंतीने आणि तत्पश्चात द्रौपदीने आहे ते वाटून खाण्याचे धडे दिले आणि डबे संस्कृती बहरण्यास हातभार लावला. बौद्धकालीन इतिहासात भिक्कू भिक्षा मागून आपल्या विहारात घेऊन जात व अंगत पंगत करीत खात. या काळात डबेसंस्कृती हि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये पसरली. हा प्राचीन भारतातील डबे संस्कृतीचा सुवर्णकाळ म्हणता येईल ! पुढील काळात मात्र डबा या विषयावर फारसे संशोधन किंवा विकास झाल्याचे दिसत नाही. गुप्त, पल्लव काळात प्रवासासाठी शिदोरी घेऊन जाण्याखेरीस दुसरा कुठला उपयोग झाल्याचे दिसत नाही. अर्थात जैन व्यापाऱ्यांनी डबेसंस्कृती च्या वृद्धीस बराच हातभार लावला.
                पुढे मुसलमान राज्यकर्त्यांनी 'एकत्र बसून खाणे' या संस्कृती चे अनुसरण केले. रोजा सोडतांना याची प्रामुख्याने जाणीव होते. परंतु डबा किंवा शिदोरी संस्कृतीबद्दल मुसलमान राज्यकर्त्यांची उदासीनताच दिसून येते. मध्ययुगात व्यापारी आणि दुपारच्या जेवणासाठी शिदोरी घेऊन जाणारा शेतकरी हेच काय ते डब्याचे तारणहार राहिले. बरं या दरम्यान जगभरात काय चित्र होते ? अलक्षेन्द्र आल्यामुळे भारतीय आणि ग्रीक संस्कृती एकमेकांच्या खूप जवळ आल्या. याच दरम्यान डबेसंस्कृती युरोपात गेली असण्याची शक्यता आहे. येसू ख्रिस्त म्हणे काश्मिरात येऊन शिकून गेला. त्याने डबा हि संकल्पना मध्यपूर्वेत रुजवली असे म्हणण्यास खूप वाव आहे. ख्रिस्ती इतिहासात डबा समदृश्य गोष्टींचा उल्लेख आढळतो. लास्ट सपर वेळी सगळे डबा घेऊन आले होते का हाटेलात बसले होते हे काही आम्हास उमगले नाही अजून. असो तर भारतात निर्मलेल्या डबा या संकल्पनेचा ग्रीक काळात आणि पुढे येशू ख्रिस्तांमुळे पश्चिमेत प्रसार झाला आणि तिथेच त्याची वृद्धीही झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या चीन मध्ये डबेसंस्कृती फार बहरली नाही. कदाचित " समोर जे जिवंत दिसेल ते मारून खाणे ' या त्यांच्या स्थायी संस्कृतीपुढे डबा फिका पडला असावा. या दोन प्राचीन संस्कृतीचा मेळ आजही आपल्याला दक्षिणपूर्व आशियात बघायला मिळतो. सिंगापुरात लोक चपात्या डब्यात घेऊन जातात आणि भाजी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये मागवतात !
                अनेक शतके जुलमी राजवटीखाली दबलेल्या डब्याचा तारणहार ठरले ते म्हणजे इंग्रज! आधुनिक भारतात खऱ्याअर्थाने डबेसंस्कृती रुजली म्हणजे ब्रिटिश काळी. सायबाला प्रवास करायचा असायचा. आणि तिखट जेवण काही झेपायचे नाही! त्यामुळे इंग्रज डबा घेऊन जायचे. अलुमिनियम, पितळ असल्या धातूचे डबे घेऊन जाण्याची प्रथा तेंव्हापासून पडली. पुढे इंग्रज अधिकारी कार्यालयातपण डबे घेऊन जायला लागले. हळू हळू भारतीय चाकरमान्यांनी त्याचे अनुसरण करण्यास सुरुवात केली आणि चार कप्प्यांच्या स्टिलच्या डब्यांचा उदय झाला ! ब्रिटिश काळात मुंबई , कलकत्ता येथील सरकारी दप्तरी दिसणारा हा डबा हळू हळू संपुर्ण भारतात पसरला आणि खूप कमी वेळात जन सामान्यांच्या आयुष्याचा एक अभिन्न अंग बनला. सरकारी कार्यालयांबरोबरच शाळा,इस्पितळे, खासगी व्यवसाय, बांधकाम क्षेत्र, कारखाने अशा सर्व ठिकाणी डबे दिमाखाने मिरवू लागले. डबे इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांच्या उदय झाला आणि हळू हळू एक संस्था बनली. या सर्व काळात डब्यांच्या स्वरपटपण बदल होत गेला. इंग्रजांकडून वारसा हक्काने घेतलेल्या चार कप्प्यांच्या डब्याची काटछाट होऊन तीन कप्प्यांचे झाले. मग दोन कप्प्यांचे. मग सेलो चे डबे आले. आज काल मिक्रोवेव्ह च्या डब्यांचा सुळसुळाट आहे.
आजही जेंव्हा मी डबा घेऊन ऑफिसला जायला निघतो तेंव्हा कधी कधी मला द्वारकेकडे पोह्याची शिदोरी घेऊन निघालेल्या सुदाम्याची आठवण येते आणि मी नतमस्तक होतो. तो नसता तर आज आम्हाला ब्रेड चे तुकडे तोडावे लागले असते दुपारच्या जेवणात!

क्रमश:

No comments:

Post a Comment