Saturday, July 18, 2020

दोन (भयंकर ) प्रश्न


परवाची गोष्ट. आता तुम्ही म्हणाल ,हा नेहेमी 'परवाच्या' गोष्टी का सांगतो बरे ? तर कारण सरळ आहे ( हॅ , आपण नाही घाबरत सत्य सांगायला !) फार खोल इतिहासाच्या गोष्टी सांगायच्या म्हंटले तर तेवढा अभ्यास नाही आणि उद्याच्या गोष्टी सांगायची दूरदृष्टी आणि कुवत नाही. त्यामुळे काल-परवाच्या गोष्टींवर भगताय तोवर भागवायचे ! तर नुकताच बाहेरून आलो होतो. आजकाल बाहेरून आलो कि आम्हाला 'कोरोना तर घेऊन नाही ना आलो ?' अशी भीती असते. त्यात लॉकडाऊन जेवढा कडक , कोरोना झालाय ही भीती तेवढीच जास्त ! म्हणजे एखाद्या  भुताच्या चित्रपटात खुट्ट अंधार ,धो धो पडणारा पाऊस , किर्रर्र किर्रर्र वाजणारा दरवाजा जसे 'माहौल ' बनवतात तसेच काहीतरी लॉकडाऊन कोरोनाच्याबाबतीत करतो असे आम्हाला वाटते.  भूत असण्याचा त्या पावसाशी किंवा दरवाजाशी काहीही संबंध नसतो पण उगाच भीती निर्माण होते. तसेच - रस्त्यावर लोक जितके कमी , घरी आल्यावर आपण तेवढेच जास्त घाबरतो ! असो - तर बाहेरून आल्यावर हात-पाय वगैरे स्वच्छ धुतले (आम्ही कोरोनाला तेवढीच किंमत देतो. अंघोळ वगैरे म्हणजे सलमानचा चित्रपट मुलतीप्लेक्समध्ये जाऊन पाहण्यासारखे आहे ). टीव्हीवर राहुलच्या (आपला गांधींचा हो - महाजन ला कोण विचारात नाही आणि द्रविड बाप आहे -त्याची काय टवाळी करतोय आम्ही ) कुठल्यातरी नवीन 'ट्विट' वरून चर्चा चालू होती - निर्बुद्ध ट्विट आणि निर्बुद्ध चर्चा -दोन्ही नेहेमीप्रमाणे. आणि त्यावेळी मनात दोन भयावहः विचार एकत्र आले -आपल्याला उद्या कोरोना झाला तर? राहुल गांधी उद्या देशाचा पंतप्रधान झाला तर ?
अर्थातच दोन्ही विचार भयंकर होते. परंतु नाकारण्यासारखे नव्हते .म्हणजे  शक्यतांचा विचार केला -आणि अगदी गणिती फॉर्मुले वगैरे लावले तरीही दोन्हीची 'स्टॅटिस्टिकल'  शक्यता होती. रात्रभर झोप नाही लागली. नक्की कुठली धास्ती जास्त घेतली होती हे अजून ठरायचं आहे. दुसऱ्या दिवशी उठून ठरवलं - ते काहीं नाही . भिडायचे आणि आपल्या भीतीवर मात करायची. कोरोना सोप्पे होते. वाचन केले. जपान पासून उगांडापर्यंतचे 'जाणकार' जे जे सांगतायत ते सगळे करायचे ठरविले. आपले रामदेव बाबा पण आलेच हो त्यात ! त्यामुळे उठून गरम पाण्याच्या गुळण्या, वाफ घेणे ,दूध हळद , जलनेती , भस्त्रिका प्राणायाम, , , ,  जीवनसत्वाच्या गोळ्या , अमृतवेल ,अश्वगंधा-गुळवेल ,आर्सेनिक अल्बम असे आणि इतर उपाय एका दिवसात उरकून आम्ही -आपल्याला पुढील हजार वर्ष काही कोरोना होत नाही या विश्वासाने निश्चिन्त झालो. भीती ही मनातून सुरु होते आणि मनातच संपते. उपाय हे आपल्या अंतर्मनात डोकाविण्याचा मार्ग असतो. अशाप्रकारे कोरोनावर 'मात' केल्यावर आम्ही दुसऱ्या संकटाशी सामना( म्हणजे द्वंद्व. नाहीतर भलताच 'सामना' समजून बसाल . ते सध्या फक्त मुलाखती घेतात. शस्त्र टाकलीत त्यांनी ) करायला मोकळे झालो.
राहुल गांधी पंतप्रधान झाले तर काय? या प्रश्नाचे बहुतेक जण (अगदी कट्टर मोदी विरोधकही ) निसंदिग्धपणे उत्तर देतील - ते शक्यच नाही. जाणकार ,विश्लेषक (आजकाल हे पीक खूप जोरात आहे ) आणि सामान्य जण -सगळ्यांचे याबाबतीत एकमत नसले तरी बहुमत निश्चित आहे. परंतु आम्हाला तो 'चान्स' घ्यायचा नव्हता. मणी शंकर अय्यर यांचे उदाहरण होतेच डोळ्यासमोर ! त्यामुळे राहुल पंतप्रधान होणे शक्य नाही हे पुराव्यानिशी सिद्ध करायचे आम्ही ठरविले .आता सिद्धांत मांडायचा तर थोडा अभ्यास तर हवा ना ? म्हणून इतिहास धुंडाळून काढला . वाईट वाटले हो ! बालवयात अज्जी ची हत्या झाली. कुमार वयात वडिलांची (या वाक्यात कोणताही विनोद शोधू नये अगर आमचा काही कुटील हेतू सुद्धा नाही. दोन्ही घटना देशाच्या आणि गांधी कुटुंबाच्या दृष्टीने दुर्दैवी होत्या). बिन बापाची पोरं- एकटी अबला आई सांभाळत होती . तिकडे नरसिम्ह मामाने छळ सुरु केला. त्यातून आई सावरली पण धंदा (राजकारणाचा) चालविण्याच्या व्यापात पोरांकडे दुर्लक्ष झाले. ते पास झाले -नापास झाले -कशा कशा कडे लक्ष नाही बघा. बरं बहीण पण स्वार्थी निघाली. स्वतः चे तेवढे 'सेटिंग' करून लग्न लावून घेतले. बिचाऱ्या भावाचे काय ? त्याला काय करावे  कोणी सांगत नव्हते आणि उमगत तर त्याहून नव्हते. मग काय? कुत्रा पाळणे , कुंगफू का काहीतरी शिकणे, हवापालटासाठी देशोदेशी भटकणे असले उद्योग केले त्या बिचाऱ्याने. बरं त्यात मन रमतंय असे वाटू लागताच आई चे  फर्मान - कौटुंबिक व्यवसायाकडे लक्ष घालण्याचे. आता तीची तरी काय चूक? अंबानींनी नाही का मुलांना धंद्यात उतरविले ? अमिताभचा मुलगा अभिनेताच झाला ना? परंतु राहुलचा मुकेश अंबानी होता रोहन गावस्कर झाला यात त्याची काय चूक हो ? नाही जमत एकेकाला.
असो तर घरगुती व्यवसाय हाती घ्यायचा कि नाही -असे क्या करे के ना करे बरेच दिवस चालले होते बिचाऱ्याचे. दोन चार निवडणुकांची सूत्र हाती घेऊन पहिली. परंतु यश काही हाती लागले नाही. तिकडे मनमोहन काका मात्र व्ययस्थित सी   ची जबाबदारी सांभाळत होते. परंतु आपला व्यवसाय आपणच सांभाळावा ही कुठल्याही व्यावसायिकाची इच्छा असणारच. तसेच काहीतरी मम्मा ला वाटत होते. परंतु मुलगा काही तयार होईना. इकडे वय उलटून चालले होते. मुलगी मिळेना .सगळीच पंचाईत. या पोराचे काही खरे नाही  म्हणत मम्मा वैफल्यग्रस्त झाली आणि तिकडे चमत्कार झाला. मोदी नामक राक्षस येऊन देशावर राज्य करू लागला. बरं नुसता राज्य नव्हता करत तर या माँ -बेटा ला चिडवून चिडवून हैराण करून सोडले त्याने. कहर म्हणजे तो राक्षस एकदा नव्हे तर तब्बल दोनदा निवडून आला .बिचाऱ्या राहुल ने आधी दुर्लक्ष केले मग सन्यास घ्यायचे ठरविले. परंतु आई सोडत नव्हती आणि मोदी जगू देत नव्हता. काय करावे कळेना.
एके दिवशी राहुलने "बस बहुत हो गया " म्हणत कौटुंबिक व्यायसायाकडे पूर्णवेळ लक्ष देण्याचे ठरविले. आता धंदा करण्याचे ठरविले खरे परंतु काय करावे याचा ना अनुभव ना कुशलता. मग काय ? मम्मा ने एक काम सोपविले - मोदी जे करेल त्याला विरोध करायचा. जास्त विचार करायचा नाही.तेंव्हा पासून राहुलचे -लगे राहो पप्पूभाई सुरु आहे. त्याच्या जीवनाचे ध्येय मोदींना विरोध करणे आहे. निवडणुका जिंकणे ,सत्ता उपभोगणे,पक्ष सांभाळणे,वाढविणे या गोष्टी त्याच्या दृष्टीने अर्थहीन आहेत . मोदींच्या प्रत्येक वक्तव्याचा किंवा कृतीचा उपहास करणे आणि विरोध करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय .तर हा सगळा इतिहास वाचून   ऐकून आम्ही राहुल ची बाजू नीटशी समजू शकलो. बिचाऱ्याला मोदीविरोधी करण्याला पर्याय नाही (आणि दुसरे काही येत पण नाही ). आता तुम्ही म्हणाल याचा -राहुल पंतप्रधान होणार याच्याशी काय संबंध ? तर ऐका - त्या राक्षसाच्या गोष्टीत त्याचा जीव पोपटात असतो. इथे पोपटाचा जीव राक्षसात आहे. त्यामुळे , मोदी असे तो पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत आणि मोदी गेल्यावर राहुलला करण्यासारखे काही राहणार नाही !आणि तोपर्यंत त्यांचा कौटुंबिक व्यवसाय बुडीत निघाला असे हे वेगळेच . अशा प्रकारे राहुल काही पंतप्रधान होणार नाही
हेन्स प्रुव्हड !
काल रात्री शांत झोप लागली. शेवटी भीती ही मनात उत्पन्न होते आणि मनातच नष्ट होते -नाही का ?

No comments:

Post a Comment