Sunday, August 9, 2020

पळीव प्राणी - बिर्याणीवाला

              'मॅन इज अ सोशल ऍनिमल' असे कोणीतरी म्हणून गेल्याकारणाने इच्छा असली अथवा नसली तरी लोक भेटतातच! ओळखी -अनोळखी लोकांच्या अशाच भेटीतून कधी कधी गमतीदार प्रसंग निर्माण होतात . 'पु लं ' चे पारायण केलेल्या मराठीजनांना हे वेगळे सांगणे नको ! दैनंदिन जीवनातील अशाच काही भेटी आणि घडलेल्या प्रसंगांशी निगडित 'पळीव प्राणी' नामक नवीन लेखमाला घेऊन येत आहोत. आलेल्या अनुभवांमुळे ज्या लोकांपासून आपण लांब राहू इच्छितो असे हे 'पळीव प्राणी'! कोणत्याही व्यक्ती ,समूह,धर्म विचारसरणी अथवा व्यवसायाची अवमानाना करण्याचा हेतू नाही. ही लेखमाला सर्वस्वी मनोरंजनाकरिता आहे. तरीही अनावधानाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व.

_____________________________________________________________________________________--____________-

            गेल्या आठवड्यात चप्पल घेण्यासाठी बाहेर पडलो. आहे तो जोड अक्षरशः झिजला होता .चालताना पायाला खडे लागत .अर्थात मी तो जपून ठेवणार आहे. पुढे मागे मुलाला दाखवायला कामी येईल -बघा आम्ही तुझ्यासाठी कशा चपला झिजवल्या ते . म्हणजे त्याने आयुष्यात काही मिळवले अथवा नाही -दोन्ही परिस्थितीत वापरण्यासारखे हे 'वाइल्ड कार्ड' आहे ! तर चप्पल घेणे महा कठीण झालंय या कोरोनामुळे. म्हणजे बघा - किराणा दुकानात गेलात कि त्याला यादी द्यायची -काम झाले. दर्जाचा जास्त विचार करायचा नाही. जे मिळेल ते मुकाट्याने खायचे. अगदी रिलायन्स किंवा डी-मार्टला जरी गेलात तरी -जे उपलब्ध ते उचलायचे आणि बिलिंगच्या रांगेत लागायचे. भाजीचेही तसेच. एकेकाळी आमच्या मातोश्री भाजी मंडईत पूर्ण फेरफटका मारायच्या आणि मग भाजी घ्यायला सुरुवात. त्यात घासाघीस आलीच. आता तशी सोयच राहिलेली नाही. सोसायटीच्या दारात जी भाजी मिळेल ती उचलायची आणि चालायला लागायचे. मागे एकदा उशिरा गेलो तर फक्त वांगी आणि कारले शिल्लक होती. मग काय ? एक एक किलो उचलली आणि आणली घरी. पुढे आठवडाभर दोन्हीचे विविध प्रकार खात होतो. सोसायटीच्या दिसेल त्या माणसाचा (आणि खास करून बायकांचा) राग यायला लागला होता. आठवड्यानंतर शेपू पण आवडीने खाल्ला ! असो. तर चप्पल च्या दुकानासमोर ४ फूट पुढे त्याने फेंसिन्ग करून ठेवले होते. आपली 'चॉईस' सांगायची ,नंबर सांगायचा मग हा त्याला उमगेल तशी चप्पल अथवा सॅंडल माडीवरून काढून दाखविणार. ती नाही आवडली तर  'व्हईल लूप' प्रमाणे सर्व प्रक्रिया पुनः सुरु. चार पाच राऊंड झाल्यावर नको झाले होते. अनवाणी फिरेन पण चप्पल घेणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणार इतक्यात मुलाला तरुणपणी मारायचा डायलॉग आठवला आणि शांत झालो. बरं ट्राय करणे अजूनच जिकरीचे. नुकताच पाऊस झाल्यामुळे फूटपाथवर पाणी साचले होते. त्याजवळ उभे राहून तोल सांभाळत एक पाय उचलून (चप्पल घाण होता कामा नये अशी सक्त ताकीद होती) ती चप्पल ट्राय करायची असे प्रयोग चालले होते. असे उघड्यावर ट्राय वगैरे करण्याची सवय राहिली नव्हती आता. "नशीब हा चड्ड्या बनियान नाही विकत. नाहीतर रस्त्यावरच.. " मी बायकोच्या कानात पुटपुटलो. ती मला कमरेवर जोरात चिमटा काढणार इतक्यात मागून आवाज आला " तुम्ही इथेच राहता का?"

क्षणभर मी घाबरलोच. म्हणजे लॉकडाउन सुरु झाल्यापासून बाहेर पडलो कि पोलीस येणार अशी कायम भीती वाटत राहते. हा आवाज पोलिसाचा असणार. मी अरबट चरबट बोलल्यामुळे तो विचारायला आला असणार असे समजून माझी टरकली. परंतु हिने मागे वळून पाहिले आणि त्या व्यक्तीने मी अमुक तमुक म्हणून ओळख करून दिली. माझा जीव भांड्यात पडला. कारण पोलीस स्वतःची ओळख सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत.तर हा अमुक तमुक चप्पलच्या दुकानासमोर "तुम्ही इथे राहता का?" म्हणून विचारणा करीत होता. "शनिवारात राहतो. वेळ जात नाही म्हणून इथे बोंबलत चप्पल घ्यायला आलोय" असे टिपिकल पुणेरी उत्तर मनात तयार झाले होते (वाण नाही तर गुण लागतोच म्हणतात ना?) परंतु तेवढ्यात एक बर्मुडा घातलेली अर्धे टक्कल पडलेली व्यक्ती समोर आली आणि माझा राग निवळला. होतकरू टकल्या लोकांबद्दल मला 'सॉफ्ट कॉर्नर' आहे. बाकी समजून घ्यावे! "तुम्ही इथे राहता का" या प्रश्नाला जुजबी "हो" असे उत्तर देऊन मी पुढची चप्पल ट्राय करू लागलो तर "मी पण इथेच साई रंग सोसायटीत राहतो" अशी अनाहूत माहिती पुरविली.तेवढ्यावरच न थांबता "तुमच्या सोसायटीतील अमक्या तमक्या ला चांगले ओळखतो" वगैरे सांगू लागला. हा कोणीतरी विक्रेता (सेल्समन) आहे हे एव्हाना आमच्या चाणाक्ष नजरेत आले होते. टाळण्याच्या हेतूने "भय्या और कुछ दिखावो ना" असे मी त्या चप्पल दुकानदारावर खेकसलो.परंतु असल्या अल्पशा कटू अनुभवांमुळे पाठ फिरवेल तो सच्चा सेल्समन कसला? पुढे सरकून त्याने हिच्या हातात कार्ड दिले आणि आपले काम चालू ठेवले. 'अमुक-तमुक' केटरिंग सर्विसेस चा हा बहुदा मालक होता. आणि अर्थातच त्याने मोर्चा आमच्या सौं कडे वळविला. किंबहुना तीच 'टार्गेट' होती. मी उगाच उड्या मारीत होतो हे नंतर लक्षात आले ! " मॅडम आमच्याकडे बेस्ट बिर्याणी मिळते. अमके तमके आमच्याकडून बिर्याणी मागवितात. व्हेज मध्ये पण भरपूर चॉइसेस आहेत. पनीर,कॅश्यु वगैरे वगैरे". घरी  वरण-भात लावून, भाजी करून " चप्पल घेऊन आल्यावर पोळ्या करते " म्हणत माझ्यासोबत आलेल्या हीला काय करावे कळेना. 

मोदींच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आपल्या गरजा सोडल्या तर दुसर्यांबाबत आम्ही नेहेमीच 'लोकल' बद्दल 'व्होकल' असतो. परंतु समोर उभा असलेला इसम हा कोणी गरजू आचारी नसता 'मिड लाईफ क्रायसिस ' झालेला आणि 'आय टी ' मध्ये पोट भरल्यावर 'वेगळे काहीतरी करावे' म्हणून बिर्याणी विकणारा वाटत होता.बरं त्यातही काही गैर नाही (हे म्हणणे भाग आहे. नाहीतर असे 'मिड लाईफ क्रायसिस ' झालेले चाळिशीतले सगळे मित्र जीव घेतील) , पण चप्पलच्या दुकानात बिर्याणीचे 'क्रॉस सेलिंग' म्हणजे जरा जास्तच झाले! फुगे,खेळणी, टिकल्या,छत्र्या इतपत ठीक होते. परंतु हे म्हणजे आमदार घेण्यासाठी आलेल्या शहांना कोणीतरी तत्वज्ञानाचा 'क्रॅश कोर्स' विकण्यासारखे होते! या अमुक तमुक बिर्याणीवाल्याचा राग येण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे -बिर्याणी. बिर्याणी हा पदार्थ मुळात व्हेज असूच शकत नाही असे एका 'कधीतरी व्हेज खाणाऱ्या' मित्राने सांगितले होते. तेंव्हापासून आम्ही शक्यतो बिर्याणीपासून लांबच राहतो. पुलाव ,मसाले भात ,वांगे भात ,मूगडाळीची खिचडी इतकेच काय पण फोडणीचा भात अशा त्या कुटुंबातील इतर अनेक जिन्नसांवर आम्ही ताव मारतो. परंतु बिर्याणी म्हणजे अगदी कंटेनमेंट झोन नसला तरी आमच्यासाठी रेड झोन जरूर आहे. आजकाल तर गल्लो गल्ली बिर्याणीच्या टपऱ्या उघडल्यात. नुकतेच तळलेले गरम गरम बटाटेवडे पार्सल घेऊन येतांना (व्हॉट डू यू मिन ? महाग्रू खाऊ शकतात तर आम्ही का नाही ?) आम्हाला अशी टपरी दिसली ? कि " काय जंक खातात हे लोक कोणास ठाऊक" म्हणत नाक मुरुडत आम्ही पुढे निघून जातो. नाही म्हणायला 'चांगल्या हॉटेलात' एक दोन वेळा व्हेज बिर्याणी मागविली पण होती. परंतु 'शुगर फ्री आईसक्रिम','नॉन स्पायसी मिसळ','ब्लॅक कॉफी', डाएट कोक,नॉन अल्कोहोलिक बिअर अशा प्रकारात मोडते हे लक्षात आल्याकारणाने नाद सोडून दिला.

एव्हाना त्या अमुक तमुक बिर्याणीवाल्याने बिर्याणीचे विविध प्रकार, कशी बनविली जाते, हॉटेल वाले कसे फसवितात आणि आम्ही कशी ओरिजिनल देतो, बिर्याणी खाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने फायदे,कॅलोरीस ,प्रोटीन, त्याची 'क्लायंट लिस्ट',ऑनलाईन ऑर्डर, पाच किलोमीटर पर्यंत फुकट डिलिव्हरी वगैरे सगळे सांगून झाले होते. आता पोळ्या करण्यास उशीर झाल्यामुळे हि लगेचच बिर्याणीची ऑर्डर देती कि काय अशी धडकी मला भरली. या सगळ्यात दोन तीन गिऱ्हाईकांना चपला ,बूट विकून तो दुकानदार माझ्याकडे आशेभूतपणे पहात उभा होता. माझी विवंचना त्याच्याही लक्षात आली आणि "दुकान बंद करने का टाईम हो गया" म्हणत तो आवराआवार  करू लागला.तिथून निसटण्याचा नादात मी पण हातात असलेली चप्पल 'पॅक' करायला सांगितली आणि पैसे भरून जाऊ लागलो. त्या अमुक तमुक बिर्याणीवाल्यानेपण मग आटोपते घेतले. परंतु जाण्याआधी आमचा दूरध्वनी क्रमांक मिळविण्यात तो यशस्वी झाला.

"सर आज पनीर विथ सीताफळ दम व्हेज बिर्याणी बनली आहे. किती प्लेट पाठवू " असा फोन येईल या धास्तीने मी गेले कितीतरी दिवस संध्याकाळ झाली कि फोन बंदच ठेवतो.

No comments:

Post a Comment