Sunday, September 13, 2020

एक आठवण

            परवा  आई-बाबांच्या घरी साफ-सफाई करीत होतो. अडगळीतले बरेच रद्दी सामान बघून बघून रद्दीत टाकण्याच्या तयारीत होतो. बरेच जुने पत्र ,ग्रीटिंग्स सापडले.त्यात एक पत्र सापडले आणि जुनी आठवण ताजी झाली. आजकाल फेसबुकमुळे आठवणी लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. आपोआप आपल्यासमोर येतात. त्याआधी गूगल काही प्रमाणात हे काम करायचे. परंतु गूगल पूर्व काळाच्या आठवणी या मनात संचलेल्या असतात. किंवा अशाच काही पात्रांत. वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रोजेक्ट निमित्त जपानला जाणे झाले. आमच्या क्लायंट चे ऑफिस ( कारखानाच होता तो ) एका निमशहरी भागात होता. टोकियो पासून शंभर किलोमीटर दूर. आपल्याकडे कुरकुंभ,तुर्भे  किंवा तळेगावला कारखाने असतात ना ? तसेच .मी आणि समीर असे आम्ही दोघे नियुक्त होतो. निमशहरी भाग असल्यामुळे करण्यासारखे काहीही नव्हते. रहायला एक परिपूर्ण असे अपार्टमेंट होते. ऑफिसला जायला सायकल. ऑफिसला जाणे-येणे,जवळच्या व्हिडिओ लायब्ररीतुन चित्रपटांच्या कॅसेट आणणे, कधी क्वचित रेस्टॉरंट ला जाणे  आणि वीकेंडला ट्रेन (जपान म्हणून सगळीकडेच बुलेट ट्रेन नसतात काही ) पकडून टोकियो किंवा अन्य प्रेक्षणीय ठिकाणी जाणे असे सामान्य बॅचलरांना साजेसे आमचे रुटीन होते. ऑफिसात ताकीदा सान( मुलगा )आणि योकोशी सान ( मुलगी ) यांची ओळख झाली. सान हे जपान मध्ये आदरार्थी वापरले जाते. आपल्याकडच्या "जी" सारखे. ते दोघे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड होते हे कालांतराने कळले. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि आम्ही विविध विषयांवर चर्चा करायला लागलो. त्यात एक लॉन्ग वीकएंड आला. आमचा काय प्लॅन म्हणून ताकीदा सान ने विचारले आणि काहीही नाही म्हंटल्यावर त्याच्यासोबत जाण्याचा प्रस्ताव मांडला. तो आणि योशिदा सान त्याच्या गावाकडल्या घरी जाणार होते तीन दिवस. आम्ही तसेही कंटाळलो होतो. व्हेज जेवण मिळेल का याची खात्री केली आणि देऊन टाकला होकार!

            होकार तर दिला. परंतु ताकीदा सान आणि योकोशी सान या प्रेमीयुगुलांमध्ये आपण काय करणार असा विचार माझ्या आणि समीर दोघ्यांचाही मनात आला. परंतु होकार दिला म्हंटल्यावर जाणे भाग होते. जायचा दिवस उजाडला. ताकीदा सानच्या गाडीतून आम्ही जाणार होतो. त्याने आम्हाला घेतले आणि रेल्वे स्थानकाकडे गाडी वळवली. आम्हाला काही कळेना. थोड्या वेळात दोन लहान मुली आणि (कदाचित) त्यांची आई आमच्या गाडीपाशी आल्या आणि त्या मुली गाडीत बसल्या. ती बाई तशीच निघून गेली. थोड्या वेळाने झालेला प्रकार माझ्या आणि समीरच्या लक्षात आला. ती बाई म्हणजे ताकीदा सानची थोरली बहीण. या मुली - मिसाका सान-वय सात आणि रिकु सान-वय तीन  (आयला जपानमध्ये जन्मलेल्या बाळाला पण 'सान' लावणे गरजेचे असते राव.  आपल्यासारखा  मुन्नी,चिंटू,बबड्या ,मनू ,बाळा असा प्रकार नाही ) त्याच्या भाच्या. आजोळी जायचे म्हणून त्या मुली पण उत्साहित झाल्या आणि मामासोबत जाण्याचा आग्रह धरला. मग आईने टोकियोहून रेल्वेने त्यांना आमच्याठिकाणी सोडले. मी ,समीर,ते दोघे प्रेमीयुगुल आणि त्या लहान मुली असा सहाजणांचा आमचा काफिला अयाझू या गावाकडे जाण्यास निघाला. 

           प्रवासात त्या मुली कायम " कोण हे परदेशी" या नजरेने आमच्याकडे बघत होत्या. सुरुवीतला फारसे बोलणे नव्हते. त्यांच्या मामाने आम्ही कोण ,कुठले सांगितल्यावर थोड्या बोलत्या झाल्या. बोलत्या म्हणजे काय ? तर निदान कुतूहलमिश्रित स्मितहास्य करायला लागल्या. या लैला -मजनू बरोबर या लहान मुली आणि आम्ही दोघे "छडे ". एकंदरीत सहल कशी होणार याबद्दलच माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी आणि समीर विशीतले. आपली(ही ) गर्लफ्रेंड असावी ही  स्वाभाविक भावना. अजूनही वाटते. म्हणजे तेंव्हा असायला हवी होती असे वाटते. नाहीतर उगाच गैरसमज करून घ्याल ! असो. तर प्रवासाच्या सुरुवातीलाच माझ्या मनात शंका निर्माण झाली होती -आपले कसे होणार याची. हळू हळू त्या मुली आमच्याशी बोलायला लागल्या. म्हणजे प्रयत्न करू लागल्या. भाषा हा मुख्य अडसर होता. आम्हाला मोजकेच जपानी शब्द माहित होते. आणि त्यांना इंग्रजीचा गंधही नव्हता. परंतु नजरेतून आणि हतवाऱ्यांनी आम्ही एकमेकांशी संवाद साधू लागलो होतो. खरं सांगायचं तर मी सुरुवातीला थोडा थोडा त्रयस्ताच होतो (आखडू - सोप्या शब्दात ). परंतु केंव्हा त्या मुलींकडे ओढलो गेलो ते माझे मलाच कळले नाही! जपानी मुलं गोंडस असतात. मुली मोठ्या झाल्यावरही 'स्वीट' वाटतात. मुलं  बदलतात! खासकरून तुमचे क्लायंट असतील तर !

             अयाझू गावात आम्ही ताकीदा सानच्या घरी मुक्कामी होतो. गावाकडचे घर ते. सुविधा तशा कमीच. परंतु खाण्या-पिण्याची आणि झोपण्याची सोय होती. पहिल्या दिवशी आम्ही एकत्र भरपूर गम्मत केली. परंतु पुढे ताकीदा सान काही कामात व्यस्त झाला आणि उरलेला वेळ ते प्रेमीयुगुल एकमेकांसोबत घालवत. आम्हीपण त्यांना डिस्टर्ब न करण्याचे ठरविले ! मग राहता राहिलो मी ,समीर आणि त्या दोन मुली. मिसका मोठी होती आणि ती या आधी त्या गावी अली होती बहुतेक . तीनेच आम्हाला गाव हिंडविले आणि सगळ्या ठिकाणांची नावे सांगितली. अर्थ समजायला त्यावेळी गूगल  प्रचलित नव्हते. परंतु आम्ही अंदाज लावला. दोन दिवस आम्ही सलग मिसाका आणि रिका यांच्या सोबत होतो. त्या जपानी भाषेत बोलत आणि आम्ही इंग्रजी ! गम्मत होती मोठी. नंतर नंतर आम्ही त्यांना वस्तूंकडे बोट दाखवून इंग्रजी शब्द शिकवायला सुरुवात केली आणि त्यांनी आम्हाला जपानी. दोन दिवस कसे गेले कळलेच नाहीत. वीस -पंचवीस वर्षांचे तराणे ताठे आम्ही लहान मुलींमध्ये रमून गेलो होतो. त्यांनाही आमचा लळा लागला होता. आमच्या सोबतच झोपणार असा आग्रह धरत होत्या. आणि आमच्या कुशीत येऊन झोपल्या पण ! 

           






आणि परतीचा दिवस उजाडला. मुलींची बडबड चालूच होती. प्रवासात त्यांनी आम्हाला जादूचे प्रयोग, गोष्टी वगैरे सांगितल्या. योकोशी सान अनुवाद करीत होती. आम्ही जमेल तेवढे समजण्याचा प्रयत्न करीत होतो. आमचे गाव आले आणि ताकीदा सानने रेल्वे स्थानकाकडे गाडी नेली. तिकीट काढून आणि गार्ड शी बोलून मुलींना गाडीत बसविले. ( एवढ्या लहान मुलींना एकटा प्रवास करू देणे  या बद्दल त्या आई बापाचें कौतुक आणि जपानी व्यवस्थेबद्दल आदर माझ्या मनात कितीतरी वर्षे घर करून होता ). जाताना मात्र त्या मुली आम्हाला बिलगून ढसा -ढसा रडू लागल्या. मलाही अश्रू आवरेनासे झाले. विशीतले तरुण आम्ही, आपल्या गर्लफ्रेंड वगैरे पासून नव्हे तर दोन चिमुकल्यांपासून दूर जाणार म्हणून रडत होतो ! निर्मळ आणि निस्सीम प्रेम होते ते.  जातांना मिसाका  " आपण पुन्हा पुढल्या सुट्ट्यांमध्ये भेटू " म्हणाली आणि गाडी सुटली. भेट होणार नाही हे आम्हाला माहित होते. सुदैवाने त्या चिमुरड्यांना माहित नव्हते . गाडी सुटली आणि अश्रू तसेच डोळ्यांत राहिले. ते पुसायला पुढे बरेच दिवस गेले. काही दिवसांनी आमच्या पत्त्यावर एक पत्र आले. मूळ जपानी पत्र आणि आईने केलेला त्रोटक इंग्रजी अनुवाद. शब्द त्रोटक असले तरी भावना असीम होत्या. 

रद्दी देतांना  हे पत्र जपून ठेवले. आयुष्यात अशी रत्ने सहजा-सहजी मिळत नसतात. 

No comments:

Post a Comment