Sunday, May 3, 2020

गर्वहरण


"पाच-सात टक्के मूर्खांमुळे बाकी नव्वद टक्के लोकांना त्रास सहन करावा लागतोय" -परवा एक मित्र उद्वेगाने आपली भावना व्यक्त करीत होता.अगदी बरोबर बोललास मित्रा -मी पण अनुमोदन दिलं त्याला. खरंच माझीही भावना काही प्रमाणात तशीच झाली होती. चाळीस दिवसांच्या लॉकडाउन मध्ये सकारात्मक राहणे महाकठीण. म्हणजे दिवसाच्या ८०-९० टक्के वेळा आपण जरी सकारात्मक रहायचे म्हंटले तरी काही प्रमाणात तोल ढासळतोच. आणि मग 'त्या' पाच-दहा टक्के लोकांवर राग निघतो. अनेकांशी फोनवर बोलताना त्याच भावना व्यक्त होत आहेत सध्या. बरं सगळ्यांच्या बोलण्यात पाच-दहा टक्के असे येत असले तरीही त्या पाच -दहा टक्क्यांची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. कोणी विशिष्ट धर्माला संबोधून बोलत असतात तर कोणी एका सामाजिक वर्गाला. कोणाच्या बोलण्यात भाजी,मांस घेण्यासाठी गर्दी करणार्यांबद्दल द्वेष असतो तर बाकीचे परप्रांतीयांबद्दल राग व्यक्त करतात. या सगळ्यात प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करणे ओघाने आलेच. एकंदरित काय ?तर आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाचा दोष (चीन सह) कोणाच्या तरी माथी मारायचा आणि मन शांत करायचे प्रयत्न.
बरं, या नव्वद टक्के 'लॉक डाउन' पाळणाऱ्या तताकथित वर्गाच्यापण बऱ्याच पोटजाती असतात. "तुला सांगतो मी २२ मार्च पासून घर बाहेर पाऊल ठेवलेले नाही " असा एक कर्मठ वर्ग असतो . मग त्या खालोखाल " आम्ही आपल्या लगबगीने दोन चकरा मारतो खाली. तेवढ्यात वॉचमन येतोच शिट्ट्या मारत .किती घरी बसणार.  शेवटी हेअल्थ इज अल्सो इम्पॉर्टन्ट ना ? " म्हणत छोट्या 'चोऱ्या ' करणारे असतात  किंवा "आठवड्यातून दोन एक वेळा जातो बाहेर. खाणार काय नाहीतर ?" म्हणत  'कायद्यात' राहून गैर फायदा घेणारे सुद्धा असतात. कारणे काढून ट्रान्सीट पास मिळवणारे, झुगाड करून दारूची व्यवस्था करणारे , पोलिसांबरोबर सेटिंग लावणारे हे सगळे सुद्धा या नव्वद टक्क्यांमधले सुशिक्षित बरं का ! एक ओळखीच्या सांगत होत्या- मी रोज भाजी किंवा सामान आल्यावर नीट धुवून घेते आणि मगच ते रचून ठेवते. त्यात माझा रोजचा अर्धा पाऊण तास जातो. परंतु तुमच्या तीन माणसांच्या कुटुंबाला रोज मागवण्यासारखे एवढे असते तरी काय ? तुम्ही सामान भले धुवून घेत असाल ,परंतु तो आणणारा माणूस गेट उघडून लिफ्टने आलेला असतो आणि तेवढे संसर्ग पसरविण्यासाठी पुरेसे नाही का ? असले प्रश्न या नव्वद टक्के वाल्यांना कोणी विचारायचे नसतात. कारण गुन्हेगार नेहेमी ते पाच-सात टक्के वाले. आणि सगळ्यांच्या दृष्टीने ते स्वतः नव्वद टक्क्यांत मोडतात हे विशेष . दोष कायम  'त्या' ज्ञात अथवा अज्ञात पाच सात टक्केवाल्यांचा आणि  दुर्दैवाने कोरोनाचा फैलाव बहुतांश प्रमाणात समाजातील दुबळ्यावर्गांवर जास्त होतोय म्हणून या नव्वद -दहा  थिअरी ला बळ मिळत चाललंय.
असो. तर दोन एक दिवस असाच 'डाउन' होतो. मनातल्या मनात मी पण त्या 'पाच -सात' टक्केवाल्यांना शिव्या घालत होतो. रोजप्रमाणे  टीव्ही वर रामायण ( उत्तर रामायण ) चालले होते आणि अयोध्येतील सर्व धुरंधरांचा पराभव झाल्यावर स्वतः श्री राम त्या कुमारांशी युद्ध करण्यास येतात असा प्रसंग होता. सीता पवित्र आहे हे माहित असून सुद्धा तुम्ही तीचा त्याग का केला ? असा प्रश्न कुश (आपला स्वप्नील हो ) रामचंद्रांना विचारतो. "राजधर्म पाळण्यासाठी" -श्री राम उत्तरतात. मनात विचार आला- रामाचे 'देवपण' बाजूला ठेवू. एक मनुष्य म्हणून ते त्याकाळी सुद्धा यशाच्या अत्युच्य शिखरावर पोहोचले होते. एका परिटाच्या बोलण्यावरून जिच्यासाठी परमप्रतापी रावणाशी युद्ध केले ,तिचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. त्या परिटाचा बंदोबस्त करून असल्या वाचाळ गप्पांचा ते सहजरित्या समाचार घेऊ शकत होते. बरं रामायणाला इतिहास म्हणून बघता एक उच्च कोटीचे साहित्य म्हणून जरी पहायचे म्हटले तरी ,सीता त्याग करवून त्यातील नायकाची ( रामाची ) प्रतिमा कोठेच उजळली नाही. किंबहूत किंचित मलिनच झाली. एक काव्य म्हणून अथवा इतिहास म्हणून उत्तर रामायण ही एक शोकांतिकाच आहे. मग असे असतांना देखील श्री रामाने ( किंवा कवीने )तो निर्णय का घेतला ? तर राजधर्मासाठी. तो धर्म योग्य होता कि अयोग्य हा विषय तूर्त बाजूला ठेवू. परंतु धर्माचरणासाठी केलेला त्याग रामाला ना त्त्या काळी जनतेची सहानभूती देऊ शकला ना नंतरच्या काळात निंदेपासून वाचवू शकला . योग्य अथवा अयोग्य - श्री रामाने परिणामांची चिंता करता आणि येणाऱ्या पिढ्या आपल्याला कसे स्मरातील  याची तमा बाळगता ,आपल्या प्रियतमेचा त्याग केला हेच खरे.
२०११ च्या विश्वचषक सामन्यात सचिन पंचांच्या निर्णयाची वाट बघता चालत सुटला. ४५० सामन्यानंतर त्याला अजून सिद्ध करण्यासारखे काहीच राहिले नव्हते. परंतु त्याचे नैतिक अधिष्ठान त्याच्या कर्तृत्वापेक्षा श्रेष्ठ होते आणि त्यामुळे तो क्षणार्धात निर्णय घेऊ शकला. अजचेच पहा ना ? कर्नल आशुतोष शर्मा - २१ राष्ट्रीय रायफल्स चे कंमान्डींग ऑफिसर. हजारोंचा फौजफाटा. अतिरेकी किती - दोन,चार ,पाच फार फार तर. त्या पलीकडे यांची मजल नसते. (कदाचित) काहीच गरज नव्हती स्वतः समोरून लढण्याची. एक नाही तर दोन चार दिवसात घेरा घालून मारलेच असते. शिवाय एक सोडून दोन वेळा सेवा मेडल बहाल करण्यात आले होते त्यांना. अजून काय सिद्ध करायचे होते ? परंतु कर्तव्य आड आले. स्वतः पेक्षा सैन्य आणि सैन्यापेक्षा राष्ट्र महत्वाचे ही सैन्य अधिकाऱ्याला दिलेली शिकवण प्रत्यक्ष उतरविण्याचा निर्णय क्षणात घेऊन मोकळे झाले असतील ते. परिणामांची तमा अर्थातच बाळगता.
हा लेख लिहायला घेतला तेंव्हा शीर्षक ठरले नव्हते. परंतु धर्म,नीति आणि कर्तव्य परमोच्च मानून परिणामांची पर्वा करता कर्म करणाऱ्या या महामानवांची कथा स्मरून माझे नव्वद टक्के असल्याबद्दलचे गर्वहरण निश्चित झाले .आणि पाच सात टक्के वाल्यांबद्दलचा राग पण विरला.आपल्या सुदैवाने आपल्याला सुबत्ता ,बुद्धी आणि संस्कार मिळाले आहेत. त्यांचा योग्य तो उपयोग करण्याची हीच संधी आहे. जगात सगळेच एवढे सुदैवी नसतात. कोरोनाचे थैमान आज ना उद्या संपेल हे निश्चित. दरम्यान मनात आणि समाजात विद्वेष पसरवता आणि दुसऱ्यांची निंदानालस्ती करता आपण आपापल्या परीने लॉक डाउनचे पालन सुरु ठेवू . तेच आपले राष्ट्रीय (आणि वैश्विक ) कर्तव्य समजावे. बाकी निभावून घ्यायला प्रभू राम आहेतच !

No comments:

Post a Comment