Saturday, April 18, 2020

मूर्ख

            जुलै २००७- डॅलस ,टेक्सास  येथे रोजप्रमाणे हापिसात काम करीत असतांना अचानक मला एक घोळका आमच्या मजल्यावरच्या कॅफेटेरियात जातांना दिसला. दुपारचे चार वाजत आले होते. जेवायची वेळ केंव्हाच टळून गेली होती. बरं वाढदिवस साजरा करतायत म्हंटलं तरी एवढी लोकं ? यांचा उत्साह असा कि जणू स्वतःचाच वाढदिवस साजरा करायला निघालेत! इकडे तिकडे पहिले तर माझे सहकारी आणि टीम मधील इतर पण त्या घोळक्यात हळूच सामील झालेले. राहिलो होतो ते फक्त मी आणि बॉस. त्याला काही घेणं देणं नव्हतं आणि मला काय चाललंय काही कळत नव्हतं. तसेही इकडतिकडच्या बातम्या गोळा करणे, गॉसिपिंग वगैरे गोष्टी आपल्याला झेपत नाहीत. म्हणजे सपशेल नापास. आपलं काम भलं आणि आपण भलं  हा आमचा स्वभाव( जमत नसल्यामुळे उगाच - आपल्याला नाही आवडत वगैरेचा आव आणायचा ). दोवालांच्या टीम मध्ये असतो तर त्यांनी एका महिन्यात घरी पाठविले असते. तर ही काय भानगड आहे हे कळेना. रहावुन मी पण त्या घोळक्याच्या दिशेने चालत सुटलो. कॅफेटेरियात पोहोचलो तर अतुल बर्वे  नामक आमचे क्लायंट मॅनेजर नवं बाळंतिणी प्रमाणे हातात काहीतरी घेऊन गोंजारत होते आणि सगळी जनता वेडी पिशी होऊन त्या 'अर्भका' ला न्याहाळत होती. विचारणा केली (करावीच लागली ) तर कळले कि बर्वे साहेबांनी आय फोन का काय ते पाच सहा तास रांगेत उभे राहून विकत घेतला होता आणि उत्साहाने तो हापिसात दाखवायला आणला होता. आमच्या त्या क्लायंट ऑफिसातील तो पहिला आय फोन ! लाँच झाल्यावर लगेच आणि तेही टेक्सास सारख्या खेड्यात ( नो ऑफेन्स मेन्ट ) तो आला याचे विशेष कौतुक होते सगळ्यांना. हे सगळे पाहून मला हसावे की रडावे कळेना ! तसेही तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आमचा शेवटून दुसरा वगैरे नंबर लागेल ( दोवालांनी हाकलण्याचे हे पण एक कारण निश्चित असते -ती वेळ आली असती तर). आमच्या कॅन्टीन मधील पोऱ्याजवळ मोबाईल पाहिल्यावर मला ओशाळल्यासारखे झाले आणि पहिला मोबाईल विकत घेण्याचा निर्णय घेतला होता . कितीतरी वर्षे नोकिया ३३१०,३३१५ वगैरे वर आमचा गुजारा चालला होता. त्यातील सॉलिटियर आणि स्नेक गेम आमच्या मनोरंजनापुरते पुरेशे होते. या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार म्हणजे आम्हाला " मय कहाँ हूँ " टाईप अनुभव देणारा होता .त्या पार्टीतून परततांना एकाने विचारले - "तुला माहित नव्हते आय फोन 'लाँच' झाला ?". नाही म्हणून मोघम उत्तर दिले. च्यामायला आय फोन कशाला खातात हे माहित नव्हते .तो लाँच वगैरे तर दूरची बात ! नंतर चौकशी केली या आय फोन बद्दल. त्यात घड्याळ ,गाणी ,टच स्क्रीन वगैरे बरेच काही असल्याचे मला सांगण्यात आले. खरं सांगतो -त्याची किंमत सहाशे डॉलर आहे या व्यतिरिक्त बाकी काहीही कळले नाही. अतुल बर्वेंना अति पैसेवाला मूर्ख ठरवत मी मोकळा झालो.
त्या घटनेला १३ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान आय फोनच्या दहा बारा पिढ्या होऊन गेल्यात. त्यांची इतरही औरस आणि अनौरस अपत्ये, चुलते ,पुतणे ,भाचे इत्यादी मंडळी आज जगावर राज्य करीत आहेत.स्टिव्ह जॉब्स ने आचमन करत सोडलेल्या त्या चार थेंबांचे आज महासागरात रूपांतर झाले आहे. टेक्सास हापिसातील त्या घटनेमुळे ( किंवा झालेल्या फजेतीमुळे म्हणा ) आणि आपल्याला तसले काही नको या अतिआत्मविश्वासामुळे आम्ही कित्येक वर्षे स्मार्ट फोन घेण्याचे टाळले.हे सगळे आठविण्याचे कारण म्हणजे - सध्या लॉकडाउन दरम्यान स्मार्टफोन्सचा प्रचंड उपयोग होतोय. माहिती संपादन असू कि मनोरंजन ,विरंगुळा असू अगर आप्तेष्टांशी संपर्कात राहणे असू अथवा मुलांचे ' -शिक्षण' असू  - स्मार्ट फोन आणि त्या प्रजातीतील प्रत्येक जण अगदी हनुमानासारखा आपल्या मदतीला धावून येतोय . कोरोना बद्दल माहिती देणाराही तोच आणि त्यापासून विचार विचलित करण्यास मदत करणाराही तोच ! रहावुन म्हणावेसे वाटते -"हाऊ रॉंग आय वॉज ". मूर्ख जॉब्स किंवा बर्वे नव्हते तर मी होतो. नाही म्हणायला स्मार्टफोन्स चे दुष्परिणाम पण आहेतच. परंतु टीव्ही लाही  "इडियट बॉक्स " म्हणून हिणवले जायचेच की . नव्वद च्या दशकात खासगी दूरचित्रवाहिन्या आल्या खास करून परदेशी (एम -टीव्ही ,एफ -टीव्ही  वगैरे ) तेंव्हाही गदारोळ माजला होताच. एवढे कशाला? १८६० च्या दशकात नाशिकरांनी ( तेथील अति शहाण्या मंडळींनी) रेल्वेला विरोध केला. म्हणून स्थानक गावापासून १० मैल दूर उभारण्यात आले. त्याची किंमत आजही भोगतोय .
आलेले बदल पारखून आत्मसात करणे गरजेचे असते. मग ते तंत्रज्ञानातील असोत किंवा आयुष्यातील.बरोबर ना ? कोरोना ने अनेक बदल घडविलेत. पश्च्यातच्या काळात वैश्विक बदल पहायला मिळतील. या आणि आधीच्या पिढ्यांनी कधी विचारही केला नसेल असे. काही चांगल्या गोष्टी घेऊन येतील ,काही नावडत्या. यावेळी मात्र मूर्ख बनायचे नाही असे मी ठरविले आहे.

सुशांत गोसावी

No comments:

Post a Comment