Friday, October 7, 2022

दाढीपुरुष

             गेले काही दिवस आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझर वरून घमासान सुरु आहे. खरं सांगतो हा वाद झाला नसता तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आम्हाला कळलं असतं. आणि आमचे नशीब बलवत्तर असले तर चित्रपट येऊन पडून गेल्यावरही आम्हाला कळले नसते. परंतु राऊतांच्या आणि आमच्या नशिबात तेवढे सुख नव्हते. डेस्टिनी यू नो !  तर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. आय साऊंड स्टुपिड -पण टीझर आणि ट्रेलर मध्ये काय फरक असतो ते ही आम्हाला माहित नाही. पण चित्रपटाचं काहीतरी बाहेर आले हे कळले. लोकांनी बोंबाबोंब सुरु केली तेंव्हा तो टीझर पाहिला. लोकं उगाच ओरडतात राव. काय तर म्हणे रावणाला दाढी कशी ? आता रावण काय मोदी आहे का - कायम दाढी ठेवायला ? इथे वाचक वर्गाने सूक्ष्म भेद जाणून घ्यावा - आम्ही रावणाला मोदींची अलंकारिक उपमा देत आहोत. मोदींना रावणाची नव्हे ( नाहीतर आमचे जिणे अवघड व्हायचे !). रावण हा राहुल गांधींप्रमाणेही असू शकतो ना ? कधी दाढी कधी गुळगुळीत ! मुळात त्या काळात वस्तरा होता का ? न्हावी होते का ? असले तर कोणत्या दिवशी दाढी करायचे . टीझर चा दिवस हा दाढी करायला त्याज्य दिवस होता कि नाही ? आणि हो -एका तोंडाची केली आणि बाकी नऊ तोंडे तशीच ठेवली बिना दाढी करता तर काय म्हणाल - हे काही काही समझून ना घेता आरडा ओरड सुरु !

दुसरा आक्षेप काय तर रावणाच्या डोळ्यात काजळ -सुरमा कसा काय ? तो अगदी खिलजी सारखा दिसतो. इथेही  लोकांचे इतिहासाबद्दलचे घोर अज्ञान प्रकट होते. कसे ? सांगतो - तर दक्षिण भारतात काजळ घालण्याची प्रथा आहे बरोबर? आता ती श्रीलंकेत गेली असल्यास नवल नको वाटायला. काही अज्ञात इतिहासतज्ञांच्या मते रावणाच्या मृत्यूनंतर शूर्पणखेने मध्यपूर्वेत बस्तान बसविले आणि मोजक्या राक्षसांना घेऊन राज्यकारभार सुरु केला.  आता खुद्द राक्षस जमात श्रीलंकेहून मध्यपूर्वेस गेली तर काजळ घालण्याची परंपराही पाळली जाऊ शकते होय ना ? म्हणजे रावणाच्या डोळ्यात सुरमा घालणे हे दिग्दर्शकाने खिलजीवरून कॉपी नाही केले -तर खुद्द खिलजी सुरमा घालायला लागला याला रावण कारणीभूत आहे.समदते नाही लोग !  राहता राहिली गोष्ट रावण त्या ड्रॅगॉनवरून उडतोय याची. भाई - जर जटायू असू शकतो तर रावण चीनवरून ड्रॅगन नाही मागवू शकत ? कैलासावर गेलाच होता ना ? येता येता आला असेल ड्रॅगन घेऊन ! तुम्ही बघायला गेलात ?

लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती ? त्यांना  वाल्मिकींनी लिहिलंय तशीच पात्र हवीत. आता वाल्मिकी अंतर्यामी असावेत. परंतु म्हणून काय ते कोण केंव्हा दाढी करतो आणि काजळ घालतो हे लिहीत बसणार का? ही हॅड बेटर थिंग्स टू राईट  यू नो. रामाने वनवासाला जातांना कपड्यांचा त्याग केला. तो काय रेझर आणि आफ्टर शेव घेऊन जाणार का ? आणि समजा नेले जरी -तर काय रोज दाढी करणार का ? चायला वर्क फ्रॉम होम असतांना आम्हाला दिवसांनी करायला कंटाळा येतो. राम थोडी वनवासात रोज करत असणार ? तीच गत रावणाची. एवढे भीषण युद्ध सुरु असतांना तो काय रोज दाढी करत बसणार ?लोकांचा किती तो इंटॉलरन्स म्हणायचा ! सुदैवाने  बाकी वानरांबद्दल आणि राक्षसांबद्दल हा प्रॉब्लेम नव्हता.

असो. हे झाले वैचारिक वादविवाद. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. म्हणजे आमच्या आतली ! दिग्दर्शकाच्या आतली ओळखायला आमचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. तर झाले असे कि - सैफला रावण करायचे हे राऊतांनी तान्हाजी नंतरच ठरविले होते. कदाचित त्यांच्या बजेट मध्ये तोच बसत असावा. त्यांना तर अजय आणि काजोलला राम -सीता कास्ट करायचे होते म्हणे. परंतु ते दशरथ आणि कौशल्याच्या रोलसाठीच  यौग्य होते. अर्थातच त्यांनी नकार दिला . आता गुळगुळीत दाढी केलेला सैफ रावण काय -मंदोदरी शोभला असता. म्हणून मग दाढी. आणि दिग्दर्शकाला वाटले कि काजळ घालून खिलजी लूक देऊन थोडा हिंदू समाजाची सहानभूती ( आणि पैसा ) मिळवता येईल. परंतु प्लॅन फसला. ते यांच्यावरच उलटले ! भरवशाच्या म्हशीला टोणगा अशातला प्रकार झाला. दिग्दर्शक किती प्रतिभावान आहे हे -जेंव्हा मरणासन्न तान्हाजी शिवरायांच्या मांडीवर प्राण त्यागतो हे दाखविले तेंव्हाच ओळखायला हवे होते. परंतु तेंव्हा 'बहेती गंगा 'मध्ये हात धुतले गेले आणि चित्रपटाने तीनशे कोटींची कमाई केली. परंतु रावण मुसलमान रूपात हे मात्र कुछ ज्यादाही हो गया. त्या क्रिएटिव्ह लिबर्टी ला काही हाड ?

पुढे काय होणार सांगतो - रावण दाढी करणार. रामही करणार -ओघाने आलेच. आणि आताच्या टीझरचे जे टुकार प्रसंग आहेत ते कुठल्यातरी गाण्यात किंवा स्वप्नात घडतायत असे प्रत्येक्ष चित्रपटात दाखवण्यात येईल. मग निर्माते दिग्दर्शक म्हणायला रिकामे - टीझर वरून चित्रपट ओळखू नये ! अहो पण आम्ही मरणासन्न तान्हाजी वरून ओळखलाय त्याचे काय ?

सुशांत गोसावी 

No comments:

Post a Comment