गेल्या संसद अधिवेशनात सरकारने वक्फ संशोधन विधेयक आणले. तडपश्चात ते संयुक्त संसदीय समितीकडे सुपूर्द करण्यात आले. या समितीचे काम काय? साधारणपणे म्हणायचे तर एखाद्या विधेयकाचे , त्यातील प्रत्येक उपघटकाचे बारकाईने अध्ययन करणे, काही त्रुटी असल्यास किंवा काही बदल हवे असल्यास ते सुचवणे आणि सरतेशेवटी आपला अवहाल लोकसभा सभापतींना सुपूर्द करणे. या प्रक्रियेत समिती देशातील विविध सामाजिक संघटना, कायदेतज्ञ आणि सामान्य नागरिकांचे सल्ले मागवते. आवश्यक असल्यास कोणाला पाचारण करून चौकशी करण्याचेही अधिकार अशा समित्यांना असतात. काही गोष्टी ध्यानात घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक म्हणजे अवहाल समितीच्या बहुमताच्या निर्णयाने संमत होत असतो. त्यात कुठला ही हस्तक्षेप नसतो. त्या मुळे, नागरिकांचे सल्ले बंधनकारक नसतात. आणि मुळात हा अवहाल सरकारला स्वीकारणे बंधनकारक नसते. परंतु या प्रक्रियेत, सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त अन्य पक्षांनाही सामील होण्याची संधी मिळते आणि सामान्य नागरिकांना आपली बाजू मांडण्याची. बरेच वेळा अशा समित्यांकडे विधेयक पाठवणे म्हणजे ते बासनात गुंडाळणे किंवा वेळकाढूपणा करणे असे बघितले जाते.
तर या प्रस्तावनेचे कारण असे की संयुक्त संसदीय समितीने या विधेयकावर जनतेच्या सूचना मागवल्या आहेत. त्या संदर्भात काही व्हॉट्सॲप मेसेज फॉरवर्ड होत आहेत. त्यात असे म्हंटले जाते की मुसलमानांच्या वतीने एवढे कोटी उत्तरे गेली आहेत हिंदू फार कमी आहेत. तर खालील लिंक उघडा आणि मेल पाठवा. ती मेल तयार असते. लोक आपले लिंक उघडतात. मजकूर तयारच असतो , आपले नाव टाकतात आणि पाठवून देतात. एका मिनिटात आपण हिंदू म्हणून कर्तव्य बजावल्याचे समाधान चेहेऱ्यावर झळकते.
आता तुम्ही म्हणाल - तो क्या? त्यात काय चूक आहे? चायला त्या वक्फ बिफ...आपल्या देशात हिंदूच..blah blah. आणि तुझ्या पोटात काय दुखतयं रे? तुला सगळ्यात काहीतरी खुपत्तेच का ? करू दे ना लोकांना मेल. तुझ्या बा चं काय जातं? तर - येस माय लॉर्ड..माझ्या बा च काहीच जात नाही. आणि हिंदू हीता साठी काही गोष्टी होत असतील तर गैर काय ना? पण देवाने मानवाला बुद्धिमत्ता प्रदान केली आहे. त्याचा थोडा तरी उपयोग व्हावा असे वाटते म्हणून हा घाट.
तर
1. या समितीने सूचना देणाऱ्या संदर्भात गुप्तता बाळगण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नऊ कोटी मुसलमानांनी सूचना पाठवल्या आहेत वगैरे आकडे कुठून आले माहीत नाही. आणि जरी त्या गुप्ततेचा भंग झाला असे गृहीत धरले, तरी ईमेल चे हिंदू, मुसलमान असे वर्गीकरण कसे केले हे समजून घेणे रोचक ठरेल. आय एम शूअर मोसाद आणि सी आय ए ला शिकण्यासारखे बरेच असेल यातून. आणि सूचना जर कागदी असतील तर अजूनच खतरनाक. कारण असे कुठले सॉफ्टवेअर आहे जे पत्र वाचून त्यातून नाव ओळखून हिंदू मुसलमान वर्गीकरण करते. असो..तर त्या आकड्यांच्या दाव्यांबद्दल हे असे आहे. बाय द वे नऊ कोटी मुसलमानांनी सूचना पाठवल्या असतील तर मुसलमानां मध्ये साक्षरतेची टक्केवारी शंभर पेक्षा जास्त असायला हवी !
2. समितीने सूचना मागवल्या आहेत. हे मतदान नव्हे. एकाने पाठवा अगर पांढरा कोटी लोकांनी. काय सूचना आहे ती महत्त्वाची. किती लोकांनी पाठवली हा मुद्दा गौण आहे
3. सूचना समितीला बंधनकारक नाहीत. त्यामुळे कितीही सूचना आल्या तरी त्या वर विचार विनिमय करायचा की नाही, हा समितीचा अधिकार आहे. उलट त्याच त्याच सूचना वाचून चांगल्या सूचनेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
4. तुम्हाला जर स्पॅम येत असेल तर तुम्ही काय करता? जर त्या सरकारी ईमेल सर्व्हर वर त्याच त्याच ईमेल वेग वेगळ्या आय डी वरून गेल्या तर सर्व्हर काय करणार? तुम समजदार हो.
5. समितीने दोन प्रती ( अर्थातच हार्ड कॉपी) आणि ईमेल द्वारे असे उत्तराचे स्वरूप ठेवले होते. त्यामुळे फक्त ईमेल चलती का माहित नाही. हा मुद्दा थोडा कोड्यात टाकणारा आहे. फक्त ईमेल चालत नसेल तर गयी भैंस पानी में.
6. सरते शेवटी, वर नमूद केल्या प्रमाणे समितीचे निष्कर्ष सरकार वर बंधनकारक नाहीत.
हा सगळा झाला मेटा डेटा बरं का! आता मूळ मुद्द्यात हात घालू
तर त्या मेल च्या मसुद्यात अनेक सूचना आणि अपेक्षा आहेत.मुळात मेटा डेटा तोच ठेवून दोन चार वेग वेगळ्या मसुद्याचा अशा वन क्लिक ईमेल माझ्या वाचनात आल्या. काही समान घटक आहेत त्या बद्दल बोलतो. समितीचा दायारा हा फक्त या विधेयकावर आपले मत व्यक्त करणे एवढंच आहे. बाकी हिंदूंवरील अत्याचार, मुघल बिघल वगैरे मेल मध्ये जे लिहिले आहे त्याच्याशी समितीचा काहीही संबंध नाही. वक्फ बोर्ड बरखास्त करणे हा समितीच्या कक्षेच्या बाहेरचा विषय आहे. अशा अनेक खाचा खुणा काढता येतील. पण आधीच बोर मारले आहे. तर थोडक्यात समती म्हणजे वर देणारे ब्रह्मदेव नाहीत की काहीही मागा आणि देतील.
सांगण्याचा मुद्दा असा की आपण वन क्लिक हिंदू झालो असलो तरी दुर्दैवाने त्याचा उपयोग किती माहित नाही. माझ्या मते तरी " ओम नमः शिवाय" हा व्हॉट्सॲप मेसेज 10 लोकांना फॉरवर्ड करा ...देव पावतील..या स्वरूपाची ही शृंखला आहे. त्या पेक्षा तुम्ही जर खरंच या विषयाबद्दल चिंतित आणि जागरूक असाल तर मग स्वतः का काही नाही करत. तुम्ही तुमच्या सूचना स्वतंत्र पणे पाठवू शकता ना? कशाला पाहिजे प्री छापलेल्या मेल्स. अरे रे रे. पण आम्ही कसे काही लिहिणार. आम्हाला तर काही माहीतच नाही. वक्फ कायदा काय ते माहीत नाही, नवीन विधेयक काय माहित नाही आणि समिती काय करणार ते ही माहित नाही. श्या ...तू लई नालायक माणूस आहेस. आमचं वन क्लिक हिंदू..ओम नमः शिवाय तू टेन पीपल..तेच बरं होता. बाकी गोष्टींना वेळ कुठाय . मरुदे ते वक्फ बीफ.
सुशांत गोसावी
No comments:
Post a Comment