"आप कहाँ रहते है? वो
प्लेसन्ट हिल अपार्टमेंट मे क्या?. हम लॉन्ग हिल रोड पर रहते है. मेरे बेटे का ४ बेडरूम का घर है. घर मे एकूण ११ कमरे
है. आप के बेटे का व्हिसा आया क्या ? होगा होगा -भगवान के आशीर्वाद से उसका
भी सभ अच्छा होगा ". जुलै च्या एका सायंकाळी आजोबा कोणाशीतरी मराठमोळ्या
हिंदीत गप्पा मारित बसलेले असतात. संध्याकाळ म्हणजे ८. ३० वाजून गेलेले असतात. परंतु अजूनही उजेड असतो.
बागेत लहान मुले खेळत असतात. त्यांच्या आया गप्पा मारत -कदाचित तुझी सासू जास्त
चांगली कि माझी हे ठरवत. आजींचा एक वेगळा ग्रुप -कदाचित तुझा जावई जास्त हेकट कि
माझा हे ठरवत आणि पप्पा लोक्स तिकडे टेनिस किंवा तत्सम काहीतरी खेळत किंवा आपल्या
बॉस बद्दल गप्पा
मारत उभे असतात . प्रथमदर्शनी पुणे ,नोएडा
किंवा बेंगळुरू च्या कुठल्याशा उपनगराचे वाटणारे हे दृश्य असते अमेरिकेतील एका
छोटयाशा शहरातील एका सार्वजनिक बागेचे. उन्हाळा म्हंटल्यावर दिवस मोठा ,मुलांना
सुट्या आणि एकंदरीतच उल्हासदायक वातावरण. आजी आजोबांचा एक मस्त ग्रुप जमलेला असतो.
रोज फिरायला जाणे ,बागेत गप्पा झाडत बसणे. कधीतरी -कोणाचा मुलगा किंवा मुलगी गाडीतून
सोडत असेल तर डिनरला जाणे , कधी बस किंवा मेट्रो ने सहज म्हणून
फिरायला जाणे असली मौज मजा चालू असते . येऊन दोन चार महिने झाल्यामुळे थोडा
आत्मविश्वास येतो. आपण हरविणार नाही याची खात्री पटते. आणि हरवलो तर पत्ता सांगून
परत घरी येऊ हा विश्वास .मुलांनी 'प्रीपेड' फोन घेऊन दिलेला
असतोच .
भारतातून येताना
हाफ शर्ट आणि शिवलेली पॅन्ट असला पेहेराव केलेले आजोबा एव्हाना टी शर्ट आणि शॉर्ट
घालायला लागेलेले असतात. पंजाबी ड्रेस म्हणजे आपल्या आधुनिकतेचा परमोच्च बिंदू मानणाऱ्या
आजी सुनेच्या आग्रहाखातर जीन्स 'ट्राय' करतात. अगदी
लॉन्ग स्कर्ट सुद्धा ! परंतु हे बदल फक्त पेहरावातील नसतात तर विचारांचे सुद्धा
असतात. गेल्या तीन चार महिन्यात त्यांनी अमेरिकेतील समाजाचा अभ्यास केलेला असतो.
आपल्याच वयाचे एरिक आणि जॉईस कसे एकटे राहतात , सारखे हिंडत
असतात आणि नातवांबरोबर वेळ घालवण्यात आनंद मिळूनही त्यात अडकून न राहणे पसंद करतात.
डी सी ला भेटलेले ते जोडपे ८० वर्षांचे होते. परंतु नॉर्वेहुन
फिरायला आले होते. का तर म्हणे एकदा तरी अमेरिका पहायचीच! सर्वात कहर म्हणजे शेजारी राहणारा ‘जो’ .पासष्टाव्या वर्षी हाल्फ मॅरेथॉन पळतोय पठ्ठया ! या आणि असल्या अनुभवांचा
परिणाम आजी आजोबांच्यावर नकळतपणे होतोच. या उलट आपण कसे रिटायर होताच 'सिनियर
सिटीझन' झालो आणि नातू होताच त्याला सांभाळणे आणि खेळवणे यात सर्वस्वी वाहून घेतले याची जाणीव व्हायला
लागते. आपण केले ते चुकीचे नाहीच परंतु आयुष्याच्या या पाडावावर पण बरेच काही करण्यासारखे
आहे याची जाणीव होते. थोडक्यात
- 'Age is just a number' हि
जाणीव होते आणि नकळत बदल व्हायला लागतात . “आता
उशीर झालाय- पास्ताच करू. मी भाज्या चिरून देते”. ९. १५ ला घरी आल्यावर आजी सुनेला सांगत असतात . करायला सोपी म्हणून खिचडीची जागा
अलगदरीत्या पास्त्याने घेतलेली असते ! या सगळ्याबरोबरच आपल्या मुलांच्या इथल्या एकंदरीत राहणीमानाचा पण
त्यांना चांगला अंदाज आलेला असतो. व्हिसा आणि ग्रीनकार्ड च्या खाचा खुणा समजतात.
आपली मुले इकडे नक्की काय काम करतात याचा अंदाज येतो. आपली सामाजिक गरज
भागविण्याकरिता मुलांनी जो 'ग्रुप
'बनविलेला असतो
त्यात आजी आजोबा सहज मिसळून जातात.
श्रावणमासी
अमेरिकेत 'हर्ष
मानसी' नसता कडक
उन्हाळा असतो. परंतु नाग नसलेल्या प्रदेशात नागपंचमी साजरी होतेच आणि नजीकच्या 'इस्कॉन' मंदिरात कृष्णजन्माष्टमी जोरदार साजरी होते. फ्रिज मध्ये बटर आहे हे
माहित असलेला नातू ,आजीकडून
दहीहंडीची गोष्ट ऐकल्यावर थोडा गोंधळतो खरा. पण 'ओल्ड टाइम्स ' ला
काही वेगळे नियम असावेत म्हणून सोडून देतो. एखादा वीकएंड पकडून सत्यनारायणाची पूजा
घातली जाते. अर्थातच ऑनलाईन. १५ ऑगस्ट रोजी स्टेट हाऊस समोरच्या झेंडा वंदनाला
हजेरी लावल्यामुळे अगदी 'भारतात
असल्यासारखे वाटते'. परंतु
त्याच बरोबर आपल्या नातवाला भारताच्या स्वान्त्र्य संघर्षाबद्दल काहीच माहित नाही
हे पाहून आजोबांना थोडे दुःख होतेच. 'कॅच अप’ करण्याच्या उद्देशातून ते एकाच दिवसात
राणी लक्ष्मीबाई पासून सावरकरांपर्यंत सगळे किस्से सांगून टाकतात.एव्हाना शाळा
सुरु होण्याचे पडघाम वाजलेले असतात. शाळेकडून नवीन वर्गासंदर्भात माहिती आणि
लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची यादी आलेली असते. नातवांना पुस्तकेच नाहीत हा मात्र आजी-आजोबांना
मोठा धक्का असतो. "बाबांच्या एक डझन वह्यांना कव्हर घालत होते मी " हा आजीचा ठरलेला किस्सा
नातवाला ऐकवला जातो. असेच एका रात्री जेवण झाल्यावर आजोबा "तात्याकाकांचे
मोतीबिंदू चे ऑपेरेशन होणार होते -झाले का माहीत नाही " किंवा "साराची (भारतातील
दुसरी नात) चाचणी परीक्षा सुरु होईल पुढील आठवड्यात " असला काहीतरी विषय
काढतात. आपली परतीची वेळ जवळ आली याची ती जाणीव असते.
नातवाची शाळा
सुरु होते. गणपती येतात.अमेरिकेत राहून गणेश चतुर्थी किती चांगल्या रीतीने साजरी करतात याचे आजी
आजोबांना कौतुक वाटतेच .अर्थात आतापर्यंत ती सवय झालेली असते. काही आजी आजोबा
गणपतीसाठी म्हणून परततात तर काही थांबतात. परंतु एव्हाना आलेले सवंगडी हळू हळू परतायला लागलेले
असतात. आजी आजोबा पण आपली तयारी सुरु करतात. पुढचे दोन वीकएंड शॉपिंग साठी आरक्षित
ठेवण्यात येतात. " काय करायचंय ते घेऊन ? आज काल सगळं मिळतं आपल्याकडे". " असू दे हो !
अमेरिकेतून आणले याचे कौतुक " असले संवाद मॉल्स मधून ऐकू येतात. भारतातल्या
नातवांसाठी भरभरून खरेदी केली जाते. इतर आप्तेष्टांसाठी छोटे मोठे उपहार.
स्वतःसाठी मात्र काही घेण्यास धजावत नाहीत.ती वृत्ती काही बदललेली नसते. मग मुलं
जबरदस्तीच –फिट-बिट
किंवा एखादी पर्स वगैरे घेऊन देतात आपल्या आई बाबांना. बॅगा भरल्या जातात. दोन
वेळा वजन केले जाते. ग्रँड पॅरेंटस जाणार म्हणून नातू पण थोडा रडवेला होतो. गेले
चार पाच महिने मायेची उब त्याने उपभोगलेली असते. इतक्यात रात्री जोरदार पाऊस पडतो.
अचानक वातावरण थंड होते. आता अशीच थंडी वाढणार. पाच महिन्यांपूर्वी पालवी फुटलेली
झाडे आता रंग सोडायला सुरुवात करणार. मग पानगळ आणि मग एक मोठ्ठा अंधार.
विमान सुटण्याची
वेळ दुपारची असते. परंतु सकाळीच निघणे भाग असते. बॅगा गाडी मध्ये टाकल्या जातात.
देवाचा आशीर्वाद घेऊन ,आई
बाबा /आजी आजोबांच्या पाया पडून मंडळी प्रस्थान करतात. दाटून सगळ्यांनाच आलेले
असते. शांतता भंग व्हावी म्हणून मुलगा विषय काढतो . " चेकअप वेळेवर करत जावा.
पैश्याचा विचार करू नका . काय करायचंय साठवून ?" . “तू पण काळजी घे रे पोरा. तुझ्या बॉस ला सांग -कशाला उगाच रात्रीचे
कॉल ठेवतो म्हणून ? तब्बेत
महत्वाची " आजी न राहावून आपल्या मुला बद्दलची काळजी व्यक्त करतेच. "अनय - आता तू 'इंडिया ' ला कधी येणार ?" प्रश्न अनय ला विचारलेला असतो परंतु
रोख त्याच्या आईबाबांकडे असतो. विमानतळावर पोहोचल्यावर चेकइन पटकन उरकते. घरून
आणलेले थालीपीठ सगळे मिळून खातात. निघायची वेळ येते. सुनेला अश्रू अनावर होतात.
"काही चुकले असेल तर क्षमा करा " म्हणत ती सासूला मिठी मारते . "
हे काय वेडे " म्हणत सासू पण तिला कवेत घेते. सासू ला हे नवीन नसते. पंचवीस
तीस वर्षांपूर्वी ती या प्रसंगातून गेलेली असते. फक्त तेंव्हा ती बस स्थानकावर सासूला सोडायला आलेली असते आणि
लाल पांढऱ्या विमानाच्या जागी लाल पिवळी 'एस टी ' असते.
भावनांना जनरेशन गॅप नसतो. अशातच मुलाची आणि बापाची नजरानजर होते.बापाच्या
डोळ्यातून घळा घळा वाहणारे अदृश्य अश्रू मुलाला दिसतात. प्रत्येक थेंब एकंच प्रश्न
विचारत असतो "पोरा -येशील ना रे ". मुलाला अर्थ कळलेला असतो. आत्ता
बाबांचे बोट पकडून त्यांच्यासोबत जावे असे वाटत असूनही तो हतबल असतो.या क्षणी काळ पण थांबलेला असतो -कारण
प्रश्नाचे उत्तर त्याचेकडे पण नसते. “काळजी घ्या ","फोन
करा पोहोचल्यावर “असले
काहीतरी बोलून प्रसंग हलका केला जातो आणि आजी आजोबा सेक्युरिटी चेक कडे प्रस्थान
करतात.
या पूर्वी कितीही वेळा अमेरिकेला आले असले तरी हा प्रवास जड जाणार हे
निश्चित असते.
समाप्त
No comments:
Post a Comment