Wednesday, August 28, 2019

पड्या -२

              "आठ रुपये मिळतील का?  सुट्टे नसतील तर दहा पण चालतील. आयला नेमका काल पास काढायचा राहिला अन पाकिटात दोन पाचचं नाणं ठेवलं होतं. कुठं पडलं कोणास ठाऊक" - सायंकाळी कॉलेज संपल्यावर फ्रेश होऊन होस्टेलच्या रूमवर नुकताच येत होतो तर दारातच पड्या भेटला. "नाही रे. माझ्याकडे नाहीत. कडकी चालू आहे. अजून बँकेत पैसे आले नाहीत" असे काहीबाही सांगून मी पड्याला कटवला. हॉस्टेलवर राहिला लागल्यावर ज्या अनेक दुनियादारी च्या गोष्टी तुम्ही शिकता त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे आपले पैसे जपून ठेवणे. अर्थात अडी-अडचणीवेळी मित्रच उदार होऊन मित्रांची मदत करतात हा भाग वेगळा. परंतु पड्याला कटविण्यामागचा हेतू फक्त पैसे वाचविण्याचा नव्हता. शिवाय माझी मनी ऑर्डर आठवड्यापूर्वीच आली होती. त्यामुळे तूर्त तरी कडकी नव्हती . तो मेस मध्ये फुकटचे जेवून गेल्याचा माझ्या मनात राग होता. त्या दिवसानंतर मी त्याला फार जवळ केले नव्हते. येता जाता स्मितहास्य एवढेच. तो राग निवळायच्या आताच हा बहाद्दर परत दहा रुपये मागायला दारात ! "ओक्के" म्हणत पड्या निघून गेला. रात्री मलाच माझे वाईट वाटले. खरेच हा पैसे विसरला असेल तर ? मान्य कि मेस मध्ये फुकट जेवला. परंतु बोलावलं तर मीच होतं ना ? कसा गेला असेल घरी? कि थांबला असेल होस्टेलवर कोणाच्यातरी खोलीत ? घरी कळविले असेल का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन गेले . कॉलेज सुरु होऊन दोन एक महिने झाले होते. त्यामुळे मन अजून कोवळे होते. निगरगट्ट झाले नव्हते. शिवाय मी खोटे बोलल्यामुळे अपराधीपणाची भावना मनात होती. कितीही आव आणला तरी माणूस मूळ स्वभावापासून फारकत घेऊन फार काळ नाही राहू शकत. या अपराधीपणाच्या भावनेमुळेच कदाचित दुसऱ्या दिवशी मी पड्याला शॉर्ट ब्रेक वेळी चहाचे आमंत्रण दिले. तो रागावला आहे का हे हि पडताळून पहायचे होते. लगेच तयार झाला. " अण्णा एक फुल -दो मे देना ". ऑर्डर त्यानेच दिली आणि पैसे ही. "अरे हं - तुझी कडकी चालू आहे ना ? हे घे म्हणत पन्नास ची नोट माझ्या हातात सरकावली. मला अजूनच ओशाळल्यासारखे झाले. माझे रिडींग चुकले होते तर. चहा दरम्यान पड्याबद्दल आणखी माहिती मिळाली. मूळचा सांगली जिल्ह्यातील विट्याचा. अकरावीपासून सांगलीत शिकायला. बुधगावला आत्याकडे राहतो. हा आणि आप्पा ( अरुण पाटील ) दोघे विट्याचे. अप्पाने होस्टेलला रहायचे ठरविले आणि पड्यापण नॉन रेसिडेंट होस्टेलवासी झाला. सकाळी कॉलेजला बस ने येणार. आणि संध्याकाळी उशिरा बुधगव ला परत. असा याचा दिनक्रम . शनिवारी विट्याला घरी. बोलण्याने गैरसमज दूर झाले आणि आमची मैत्री झाली-म्हणजे माझ्या दृष्टीने. पड्या तर आधीच हक्काने जेवायला आला होता माझ्यासोबत! शिवाय माझ्या बाबांचे मूळ गाव विटा तालुक्यातील. त्यामुळे का कोण जाणे पड्याबद्दल आणखीच थोडी आपुलकी वाटली. दसरा रविवारी होता. पड्या आग्रहाने घरी घेऊन गेला. श्रीखंड, पुरी बटाट्याची भाजी , भजी ,मसालेभात असे भरलेले ताट पाहून मी भारावलो. होस्टेलवासीयांना घरचे जेवण मिळाल्यावर जो आनंद होतो तो आजकालच्या लहान मुलांना पिझ्झा मिळाल्यापेक्षा कैक पटींनी अधिक असतो. यावेळी दुप्पट जेवणाची पाळी माझी होती.
                जुनिअर कॉलेजातील पुर्वश्रमीची दुश्मनी, मुलीच्या प्रेमापोटी स्पर्धा किंवा चोरीचा आरोप असली काही करणे सोडली तर इंजिनिअरिंग कॉलेजात दुश्मन कोणीच नसते. होस्टेलवरतर नाहीच नाही. सगळेच मित्र असतात. रूम पार्टनर, गावाकडचे मित्र ,वर्गातील मित्र, खास मित्र, कट्ट्यावरचे मित्र ,पैसेवाले मित्र ,निवडक मैत्रीणी,असाइनमेंट वाले मित्र. प्रॉक्सी लावणारे मित्र अशी मित्रांची विविध वर्तुळं असतात. जो तो आपापल्या वर्तुळात फिक्स असतो. न्यूटन च्या नियमाप्रमाणे काही बाह्यघटनेमुळे वर्तुळं बदलली तरच. पड्या माझ्या अशाच एका वर्तुळाचा भाग झाला. तो इलेक्ट्रॉनिक्सचा आणि मी कॉम्प्युटर्स. त्यामुळे वर्ग एक नव्हता. परंतु तो वारंवार होस्टेलवर येत असल्याकारणाने भेट व्हायचचीच. मैत्री झाली असली तरी खरे सांगायचे झाले तर पड्या मला विचित्रच वाटत-नव्हे तो होताच. त्याला काही गंभीरताच नव्हती. मनात आले तर हा लेक्चरला दांडी मारणार. तेवढेच नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा बुडवणार. कधी कॉलेज ला येणारच नाही तर कधी माझ्या किंवा अण्णाच्या रूमवर बसून रात्री उशिरापर्यंत असाइनमेंट संपवूनच घरी जाणार. मनाचा राजा. बरं निष्काळजी किंवा विसराळू म्हणाल  तर , माझ्या अप्लाइड मेकॅनिक्स च्या नोट्स हरविल्या तर आठवणीने दुसऱ्या दिवशी गावातून आणून मला दिल्या. परंतु स्वतः ड्रॉईंग शीट विसरणार हमखास. पी एल सुरु झाली तसा पड्या होस्टेलवरच पडीक असायचा. का कोणास ठाऊक. कदाचित घरी काही अभ्यास करीत नाही म्हणून घरचे जबरदस्तीने स्टडी लायब्ररीत पाठवीत असतील. परंतु काही उपयोग झाला नाही. हा पठ्ठया चार वेळा कॅन्टीन ला जाणार, क्रिकेट खेळणार,गाणी ऐकणार, मॅच बघणार टीव्हीवर आणि हे सगळे करून मनात आले तर अभ्यास. बाकीचे विद्यार्थी टेन्शन मध्ये असताना हा मात्र मनमौजीपणे वागणार. जणू याला परीक्षेचा नियम लागूच नाही. आणि कधी मूड आला तर नाईट मारून एखादे पुस्तक संपवून टाकणार. आम्ही बाकीचे मित्र त्याला 'टॉम मूडी' चिडवायला लागलो. पहिल्या सहामाही परीक्षेचा निकाल लागला. मी तर सुटलो.आश्चर्याची गोष्ट म्हणजे पड्याचा निकाल पण काही वाईट नव्हता.मेकॅनिक्स, ड्रॉईंग , गणित असे महत्वाचे विषय याने प्रथम-द्वितीय श्रेणीत सोडविले होते. पण मामेभावाच्या लग्नाला जायच्या नादात पठ्या सिव्हिल ची ओरलच विसरला होता. ती राहिली. पड्या हुशार होता तर. म्हणावा तर निष्काळजी पण नव्हता. परंतु बाकीच्यांसारखे टेन्शन घेऊन जगणारा नव्हता. मनात येईल तसे करणार. आऊट कास्ट नव्हता अगर आऊटस्टँडिंग पण नव्हता - रँचो सारखा. वर वर पाहिले तर अगदी चार चौघांसारखा. पण खोलवर पाहिले तर एक स्वछंदी पक्षी होता.आपल्या पंखांची क्षमता माहित असल्यामुळे आतातायीपणा टाळणारा परंतु जे जमेल त्यात मनमुराद आनंद लुटणारा.
                कॉलेजातील पुढील ३ वर्षे आमची मैत्री अबाधित राहिली. फार घनिष्ठ नाही. पण भेटणे व्हायचे.पड्याच्या घरी अनेकदा जाणे झाले. काकुंशी चांगलीच ओळख झाली. त्यांनाही याच्या मनमौजी स्वभावाची काळजी वाटत. "हुषार आहे. समजूतदार आहे. पण लहरी आहे. पुढे जाऊन कसे होणार काय माहित" असे त्या नेहेमी बोलून दाखवत. होस्टेलवर असला कि मुक्काम बऱ्याचदा माझ्या खोलीवर असत. स्वतः अभ्यास करीत नसला तरी दुसऱ्यांना अक्कल शिकविणे किंवा टिंगल करणे असले त्याच्या स्वभावात नव्हते. आपण कधी सिरीयस होण्याबद्दल लेक्चर दिले तर शांतपणे ऐकून घेणार. परत -ये रे माझ्या मागल्या. त्याला ना काल केलेल्या (अथवा न केलेल्या) गोष्टींबद्दल भीती होती ना उद्याची काळजी. फार काही तत्वज्ञान वगैरे पाळत नव्हता. चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेत पिणे एवढेच त्याला माहित होते. परंतु परीक्षा, फर्स्ट क्लास ,ऑल क्लिअर ,कॅम्पस ,जी आर ई  असल्या जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रित असल्यामुळे पड्या समजून घ्यायला ना कोणाला सवड होती ना इच्छा. शेवटच्या वर्षी काहींना कॅम्पस जॉब मिळाला तर काही मुकले. पड्या दोन कंपनींना कॅम्पस करिता पात्र झाला. बॉर्डर चित्रपट पाहून यायला उशीर झाला ( कॉलेज बुडवून गेला होता ) म्हणून एक इंटरव्यू हुकला आणि दुसऱ्यात मुंबईच्या कंपनीला म्हणाला कि तुमची पुण्यात शाखा असेल तर येतो नाही तर नाय ! कॉलेज संपले आणि मित्रांचा संपर्कही तुटला. आयुष्यभर संपर्कात राहण्याच्या आणाभाका वर्षभरात विरल्या. आमच्या पिढीसाठी २०१० पर्यंतचा काळ हा 'डार्क एजेस ' होता. नंतर फेसबुक आले आणि चित्र बदलले. त्याआधी नाही म्हणायला काही लोक ऑर्कुटवर होते. परंतु तुरळकच. याहू ग्रुप नावाचा प्रकार पण अस्तित्वात होता. परंतु  अति फॉर्वर्डस मुळे तोही निष्काम झाला. माझा कॉलेज संपल्यावर एखाद डिड वर्ष पड्या आणि त्याच्या घरच्यांशी मोघम संपर्क होता. एकदा सांगलीला गेलो असता त्याला भेटायलाही गेलो होतो. तेंव्हा पड्या 'सी डॅक' च्या परीक्षेची तयारी करीत होता. तेंव्हा जी भेट झाली त्यानंतर आज थेट  अमेरिकेत भेटलो होतो पड्याला.
क्रमश:

No comments:

Post a Comment