बरेच दिवसांनी
काहीतरी लिहीत आहे. त्याने कोणाला काही फरक पडला नाही म्हणा. मोदी पंतप्रधान
व्हायचे ते झालेच. राहुल
रुसून बसलेत आणि तिकडे रोहित शर्मा भस्मरोग झाल्यासारखा धावा जमावतोय.सूर्य
आपल्याठिकाणी उगवितो आणि मावळतो. पाऊस नाही नाही म्हणता येतो आणि धुवून टाकतो.
लोकल ठप्प व्हायच्या त्या होतातच वीज जायची ती जातेच. आणि बघता बघता मुलांच्या
चाचणी परीक्षा जवळ येतात!
इतके दिवस न
लिहिण्याचे कारण म्हणजे (तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी मी सांगणारच) मी काहीही
लिहिताना खूप पाल्हाळ लावतो असे बायको चे म्हणणे. तिच्या या सकारात्मक टीकेने मी
इतका घायाळ झालो की यापुढे न लिहिण्याचा चंग बांधला. चक्क निवडणूक निकालांचे
विश्लेषण सुद्धा केले नाही ! एका ब्लॉगरसाठी निवडणुकीदरम्यान न लिहिणे म्हणजे
क्रिकेटपटूने विश्वचषकापासून दूर राहण्यासारखे आहे. किंवा एखाद्या साधूने
कुंभमेळ्यापासून.अगदी सोप्या शब्दांत -मोदींनी निवडणुकीपासून दूर राहण्यासारखे आहे
ते. तरी हृदयावर
दगड ठेवून आम्ही आपली प्रतिज्ञा पळत होतो. इतक्या महिन्यांत आम्ही कलाम,पेन
,कीबोर्ड कशा कशा ला हात लावला नाही. आमच्या या 'संपामुळे'
असंख्य
( संख्या सांगता न येण्यासारखी असल्याकारणाने ) वाचक बहुमूल्य अशा ज्ञानसंपदेपासून
वंचित राहिले याचा आम्हाला खेद आहे . दत्ताभाऊ तर बिचारे एव्हाना दुसरा जन्म घेऊन
शाळेत जात असतील कुठेतरी.परंतु आता ( पुन्यांदा )
मरगळ झटकावून आमचे प्रेरणादायी विचार बहुजनांसमोर मांडायला आम्ही सज्ज झालो
आहोत. रुसल्यामुळे जबाबदाऱ्या झटकून द्यायला आम्ही काय राहुल गांधी आहोत ?
राहुल गांधींचे बोलायचे झाले तर - तो
तेजा-रॉबर्ट च्या 'लिक्विड ऑक्सिजन' विनोद आहे ना ? 'लिक्विड असे
जीने नाही देगा और ऑक्सिजन असे मरने नाही देगा'. तसे राहुलचे
झाले आहे. मोदी असे जीने नाही देता और काँग्रेस असे मरने नाही देती. बाकी मोदींनी
निवडून आल्यावर लगेचच राहिलेले देश आणि शहरे हिंडण्याचा धडाका लावला आहे. यावेळी
जपानला 'डिओड्रंट' न्यायाचे विसरले होते बहुतेक.गळाभेट दिसली नाही. किंवा यांच्या
गळेपडू स्वभावाची कल्पना असल्याकारणाने बाकी देशांनी आधीच हरकत घेतली असेल कदाचित.
अर्थात असल्या हरकतींना भीक घालण्याची गरज अमित शहांना अजिबात नाही. निवडणुका
जिंकताच ते आपल्या 'आमदार खासदार संकलन' उद्योगाकडे जातीने लक्ष देऊ लागले
आहेत. उद्या निवडणुका न होता केरळ किंवा तामिळनाडूत भा.ज .पा चे सरकार आले तरी
आश्चर्य वाटायला नको. दरम्यान महाराष्ट्रात (दुसरीकडे कुठे विचारत नाहीत यांन) सार्वजनिकरित्या चित्रफिती
(व्हीडीओ ) पाहण्याचे उद्योग बंद झाले असल्याची बातमी आहे. त्यामुळे 'ए लाव
रे तो विडिओ' अशा आरोळ्यांना महाराष्ट्राची जनता यापुढे मुकणार आहे. साक्षात
काकांनी (पुन्हा एकदा) डोक्यावरचा हात काढून घेतल्याची बातमी आमच्या गुप्तचराने
दिली आहे. या सगळ्या गडबडीत पाकिस्तानवर मात्र नामुष्कीची वेळ आली आहे.
अभिनंदनच्या उष्ट्या कपावर समाधान
मानण्याची वेळ त्यांच्यावर अली आहे. आता इम्रान खान अमेरिकेत जाऊन नवीन कप-बशांचे
सेट आणतात का ते पहायचे.
असो.इथेच
थांबतो आता. काय ना -बायको म्हणते उगाच पाल्हाळ लावतो.
No comments:
Post a Comment