“अहो! प्रवीण
येईल ना वेळेवर घ्यायला? नाही म्हणजे तुम्ही वेळ बरोबर सांगितली
आहे ना त्याला ?" दबक्या आवाजात आजी विचारतात. गेल्या अनेक तासांची 'विमान' शांतता भंग
करायला तो आवाज पुरेसा असतो. "हो गं ! सांगितलंय सगळं व्यवस्थित .आणि तो काय
आता कुकूल बाळ आहे का ? तू शांतपणे झोप". झोप मोड झाल्याची नाराजी स्पष्ट करीत आजोबा
किंचित मोठ्या आवाजात उत्तरतात. आवाज आणखी वाढायला नको म्हणून आजी संभाषण तिथेच
थांबवितात आणि टीव्ही वर काय बघायला मिळतंय ते शोधू लागतात.अमेरिकेत मुला/मुलीकडे निघालेल्या आजी आजोबांचे विमान
टेक ऑफ करून तब्बल सात तास
झालेले असतात. मधल्या
काळात अवेळी जेवणा खाण्याचे प्रयत्न , विमानातील स्वच्छतागृह वापरण्याचा प्रयास, समोरील स्क्रीनवरील पर्याय तपासणे हे
प्रयोग करून झालेले असतात.
अजून बराच प्रवास बाकी असतो. मुला/मुली
ने सगळे पर्याय पालथे घालून शेवटी एअर इंडिया चे बुकिंग केलेले असते.सगळे जण नावे
ठेवतात परंतु शेवटी एअर इंडियाचेच
बुकिंग का करतात याची प्रचिती त्यांनाही येते. अर्थात त्यामुळे आजी आजोबांना
ऍडजस्ट होण्यास फार वेळ लागत नाही. शिवाय बोर्डिंग पूर्वी आपल्यावरख्याच इतर २-४
जोडप्यांची ओळख झाल्यामुळे ताण थोडा कमी झालेला असतो. खाणे पिणे , शेजारच्यांशी
थोड्या गप्पा आणि झोप हे सगळे उरकल्यावर आता मात्र पुढचा प्रवास थोडा रटाळ वाटायला
लागतो. खऱ्या अर्थाने अमेरिकेत पोहोचायची ओढ लागते. एखाद जुना चित्रपट बघत,
समोरच्या
स्क्रिनवर आपण कसे अफगाणिस्तान ,उजबेकिस्तान , ग्रीनलँड ,कॅनडा
करीत न्यू यॉर्क जवळ येतोय हे बघण्यात वेळ घालवतात,नातवाला भेटल्यावर कशी गंमत येईल या स्वप्नविलासात रमतात आणि एक
छोटीशी डुलकी काढतात. डोळा उघडतो तर विमान खाली उतरत असते. चित्रपटात दाखवितात तसे
लँडिंग करताना 'स्टॅच्यु
ऑफ लिबर्टी' बघण्यास
उत्सुक असलेल्या आजोबांना तो खरंच दिसला कि नाही हे कळतच नाही. अर्थात आपला मुलगा
तो स्टॅच्यु प्रत्यक्ष पहायला घेऊन जाईल याची खात्री असते.
इमिग्रेशन चे
सोपस्कार पूर्ण करीत ते कस्टम कडे वाटचाल करतात. "डू यू हॅव एनी थिंग टू
डिकलेयर " या प्रश्नाचे उत्तर देतांना आजोबा थोडे चाचपडतात.पण आधीच मुलाने
पठविल्याप्रमाणे 'नो ' असे
देतात आणि कस्टम ऑफिसर स्मितहास्य करीत एक डोळा मिचकावित त्यांना सोडून
देतो.पन्नास किलो सोने स्मगल केल्याच्या अविर्भावात दोघे अत्यानंदित होतात आणि
चिवडा,चकली ,मेतकूट इत्यादीत बहुमूल्य गोष्टी सुटल्याचा निःश्वास सोडतात.
विमानतळावर मुलगी,जावई
नातवंड सगळेच स्वागतास हजर असतात. गळाभेटी होतात, प्रवास सुखरूप
झाल्याची चौकशी होते आणि आजी आजोबांचा अमेरिका दौरा खऱ्या अर्थाने सुरु होतो. विमानतळावरून
घरचा प्रवास रस्ते आणि सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात जातो. झोप आलेली असते पण जे
दिसेल ते आजी आजोबा आपल्या डोळ्यात साठवून घेत असतात. आतापर्यंत फार फार तर चित्रपटात
दिसलेल्या गोष्टी ते प्रत्यक्ष बघत असतात. शिवाय नातवंडं अति उत्साहित असल्यामुळे नको नको त्या गोष्टी सांगून
भेडसावून सोडतात. "तन्वी जरा शांत बसा. आजी आजोबा लांबच्या प्रवासावरून आलेत
त्यांना आराम करू द्या " या आई च्या दटावण्याला लगेच आजी चा मलम असतोच "
राहू दे ग. आम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार ? हो ना पिलू ?". विमानतळावरून
घरच्या प्रवासात हमखास चर्चा होते ती परदेशातील स्वच्छतेची, भव्य रस्त्यांची आणि आपल्याकडे काय
करायला पाहिजे याची.सोबतच आणि साहजिकच 'मोदी' या विषयात
पण हात घातला जातो. परंतु तो पर्यंत एक्सिट घेऊन गाडी आपल्या शहरात वळलेली असते
आणि आणि विषय तिथेच थांबतो . या
सगळ्यात 'रिटर्न जर्नी ' वाल्यांचा किस्साच वेगळा असतो. आपला
जन्मच इथला या अविर्भावात ते वावरत असतात. गाडीत बसताच ते लगेच त्यांच्या
अमेरिकेतील सवंगड्यांबद्दल चौकशी करायला लागतात. कोण आले -कोण नाही याचा अंदाज
घेतला जातो. नातवंडांकडे त्याच्या मित्र मैत्रीणींबद्दल चौकशी होते. परंतु एव्हाना
नातवंडं मोठी झालेली असतात
आणि त्याचे मित्र-मैत्रीण सुद्धा बदललेले असतात. आपण
नेहेमी येतो परंतु रोज इथे रहात नाही. मधल्या काळात इथलं पण विश्व बदलते याची हलकी
का होईना पण जाणीव त्यांना होते.
आल्यावर दोन तीन
दिवस 'जेट लॅग' मध्ये जातात.आपली मुले -सुना जेंव्हा भारतात येतात तेंव्हा त्यांची
काय गत होते हे आजी आजोबांना अनुभवायला मिळते. "तुम्ही कसे रे एक-दोन आठवड्याकरिता येता आणि
जाता?" असे कौतुकोदगार पण ऐकायला मिळतात. हळू हळू गाडी रुळावर येते. दिवस
दिवस वाटतो आणि रात्री झोप लागते. एव्हाना नातवंडाने आपल्या सगळ्या मित्रांची ओळख
करून ,सगळी खेळणी दाखवून , कराटे चे नवीन शिकलेले डाव , नवीन
ऐकलेल्या भुताच्या किंवा एलियन च्या गोष्टी सांगून भांबावून सोडलेले असते. आजी
आजोबा शांत पणे या नवीन विश्वाच्या चाली रीती समजावून घेत असतात. आपण
इथले नाही पण होऊयात -हा आत्मविश्वास एकमेकांना देत बदल आत्मसात करीत असतात. साधारण चौथ्या दिवशी आजी "काही
मदत हवी का ?" म्हणून स्वयंपाकघरात प्रवेश करतात आणि आजोबा फिरायला म्हणून बाहेर
पडतात. संध्याकाळी
सगळे एकत्र जेवायला बसतात आणि पहिला घास घेताच प्रवीण उदगारतो - " पडवळाची
भाजी छानच झाली आहे! आई ने केली वाटते ". त्या माऊली ला कृतकृत्य झाल्यासारखे
वाटते. आपल्या आई च्या हातचे जेवल्याचा आनंद आणि मुलाला इतक्या वर्षानंतर खाऊ
घातल्याचे समाधान दोघांच्याही चेहेऱ्यावर ओसंडून वहात असते.
या क्षणाची तो कितीतरी वर्ष वाट बघत असतो. 'आय टी’ त जॉब मिळाल्याबरोबर “मी
पण आई बाबांना परदेशात घेऊन जाणार" या दुरापास्त वाटणाऱ्या स्वप्नाची पूर्ती
झालेली असते.
क्रमश:
No comments:
Post a Comment