"बाबा मला बड्डे ला दुर्बिण पाहिजे" - एके दिवस सकाळी सकाळी
चिरंजीवांनी फर्मान काढले. आमच्या लहानपणी प्रत्येक वर्षी कालिकेच्या जत्रेत बाबा
मला खेळण्यातील दुर्बिण घेऊन द्यायचे. दुर्बिण आणि डमरू -ठरलेले आयटम. ते आठवले
आणि मी लगेच आनंदाने होकार देऊन टाकला.थोड्या वेळाने (त्याने गूगलवर माहिती
दाखविल्यावर) याची दुर्बिण म्हणजे 'टेलिस्कोप' हा बोध झाला.बरं
खेळण्यातील नव्हे तर खरा-खुरा ! किंमत पाहून मात्र डोळे पांढरे झाले. वास्तवतः गेले दोन एक वर्ष
याचा वाढदिवस जवळ आला की आमच्या पोटात गोळा येतो. आता काय मागतो या भीतीने. शालेय
परीक्षांत बऱ्यापैकी प्रगती दाखविल्यामुळे एक बाप म्हणून त्याचे कौतुक करावेसे
वाटते खरे. परंतु हल्ली त्याच्या मागण्या
बऱ्याच महागड्या होत चालल्या होत्या. म्हणजे बघा -निवडणुकीत लहान पक्ष भा ज पा
च्या प्रचारात धडाडीने सहभागी होतात.आपली
पूर्ण ताकद लावतात. परंतु
नंतर काय मागतील या भीतीने अमित शहांच्या पोटात असाच गोळा येत असणार ! असो तर ती
अति महागडी दुर्बिण घेऊन देणे किंवा परावृत्त करणे हे दोनच पर्याय होते. त्यासाठी
व्यूहरचना करू लागलो
याला मुळात
दुर्बिण हवीच कशाला असा आमचा पहिला युक्तिवाद.आमच्या शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकात
गॅलेलिओ चे टेलिस्कोप सोबतचे चित्र होते. तोच काय तो आमचा त्या यंत्राशी संबंध.
तेवढ्यावर आम्ही बोर्डात भूगोलात पैकी च्या पैकी गुण
मिळवले(इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्राचे वेगवेगळे गुण कळवीत नसल्याकारणाने आमच्या या
दाव्याला खोटे ठरिवले जाऊच शकत नाही .शिवाय आमच्या १० वीची गुणपत्रिका आम्हालाच
सापडत नाही -हा भाग वेगळा). तर अभ्यासाकरिता पुस्तक पुरे असे आमचे ठाम मत होते.
अगदी फारच आवड आहे असे म्हंटले तरी त्यासाठी असली महागडी उपकरणे हवीत कशाला ?
त्या
वॉटसन ने वाफेच्या शक्तीचा शोध चहा च्या किटलीवर लावला. त्याने थोडीच रेल्वेचे
इंजिन मागितले होते बड्डे ला ? न्यूटन
ने गुरुत्वाकर्षणाचा शोध केम्ब्रिज विद्यापीठात लावला. तिथलेच ते सफरचंदाचे झाड.
महागडे सफरचंद आणून घरी फर्शीवर टाकणे परवडणारे होत काय त्याच्या पिताश्रींना ? आणि
गॅलेलिओ-कोपर्निकस च्या आधी कुठे होती असली थेरं ? ऍरिस्टोटल
वगैरेंनी तर असेच उघड्या डोंळ्यानी आकाशाकडे बघून आपले सिद्धांत मांडले( ठोकून दिले) होते.
इतकेच कशाला ? भारतात
तर -दुर्बिण सोडा ,साध्या काचेचाही शोध लागला नसतांना पूर्वीच्या तत्त्वज्ञांनी पृथ्वी
सूर्याभोवती फिरते हे सांगितलेच, वर बाकी ग्रहांचाही शोध लावला.(
विमानाचा ,अणु -रेणू इत्यादींचा पण शोध लावला तो वेगळा ). असो- तर भूगोलात निष्णात होण्याकरिता आणि अगदी ते 'सायंटिफिक
टेम्परामेंट' का काय ते विकसित करायला त्या महागड्या दुर्बिणची अजिबात गरज नाही या
निष्कर्षाला आम्ही पोहोचलो.
विज्ञानापलीकडे
पहायचे झाले तर आपल्याकडे चंद्र,सूर्य तारे यांच्या संदर्भातील
साहित्याचा समृद्ध वारसा आहे. अगदी चांदोबा-चांदोबा भागलास का पासून पासून 'चंदा
मामा सो गये सूरज चाचू जागे' पर्यंत
प्रत्येक वयोगटाला साजेसे असे गीतप्रकर आहेत. एवढेच काय आपण चंद्राला कधी
साक्षीदार बनवितो तर कधी 'रूक जाना तू ठहर जा रे चंदा ' म्हणत
आदेश पण देतो. मराठी हिंदी चित्रपटातील चंद्र आणि सितारे यांवर आधारित गीत एकत्रित
केले तर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी छोटी पडायची. हे कमी म्हणून कि काय अनेक रहस्य
कथा आहेत ,पुराणकथा आहेत ,बुध -शुक्र -गुरूच्या गोष्टी आहे. एवढे
सगळे असतांना त्या दुर्बिणीच्या छिद्रातून जेमतेम दिसणारे ग्रह तारे का बघायचे ?
शिवाय
गणपतीने श्राप दिल्यामुळे चंद्र तास नाराज असणार. उगाच कशाला छेडायचं त्याला ?
आधीच
आर्मस्ट्राँग वगैरेंनी पायदळी तुडवून अपमान केलाय.
तर या सर्व तर्कांसकट मी चिरंजिवांशी दोन-हात करायला सज्ज झालो.
रविवारी उठला तर निराळाच सूर होता. मी बोलण्याआधीच म्हणाला - " You
know I was asking for the telescope?" म्हंटलं त्याचे काय ?
"मला नकोय तो "! मी उडालोच! हे म्हणजे १२ आमदारांनी काँग्रेस- जे डी यु ला सोडचिट्ठी
देऊन सुद्धा येदुरीअप्पांनी साळसूदपणे "आम्ही सरकार नाही बनविणार " म्हंटल्यासारखे
होते ! मला तसा आनंदच व्हायला हवा होता. परंतु
आपले तर्क न ऐकता त्याने माघार घेतली हे काही रुचे ना . दोन दिवस जी तयारी करीत
होतो ते सगळे वाया जाणार होते. म्हणून उगाच त्याला डिवचायला म्हणालो - का रे ?
घे
ना ? तुला आवडते ना ? दुधाचा कप घटा -घटा पीत म्हणाला- मला
आवडते. I certainly would like it. But it’s very expensive. Probably not
worth it! थोडक्यात माझी ऐपत नाही आणि मी नाही म्हणणार हे त्याने ओळखले होते.
ते काही ही असो. मुलगा भूगोलासोबत थोडे अर्थशास्त्र पण शिकत होता. बिना दुर्बिणचे तो लांब चे पहायला
लागला होता याचा आनंद झाला.
वाढदिवसाला त्याच्या आवडीचे (आणि माझ्या बजेटमधले ) खेळणे घेतले. शिवाय
जवळच येल विद्यापीठ आहे . तिथल्या ऑब्सर्व्हेटोरी ला घेऊन जाण्याचे ठरले आहे.
त्याच्यापेक्षा जास्त आतुरतेने मी वाट पाहतोय. ते काय प्रकार आहे हे तरी कळेल !
No comments:
Post a Comment