Monday, July 22, 2019

प्रवास - भाग १


               "अनय ची कॅप आणली का? त्या ग्रे सॅक मध्ये होती" .एके दुपारी न्यू यॉर्क च्या गजबजलेल्या सेंट्रल पार्ककडे जात असताना मागून आवाज आला. सहज वळून पाहिले तर बाबांचे बोट धरून टोपी न घातलेला 'अनय ', मागे टोपी -गॉगल घातलेली त्याची आई, स्ट्रॉलरमध्ये अनायचा भाऊ (किंवा बहिण) आणि त्यांच्या मागून टी शर्ट आणि जीन्स घातलेले एक सत्तर वर्षांचे गृहस्थ. सोबत पंजाबी ड्रेस ,व्हिक्टोरिया हॅट आणि गॉगल घातलेल्या त्यांच्या सौ असा काफिला येताना दिसला. ते वयस्कर जोडपे अर्थातच अनय चे इकडचे किंवा तिकडचे आजी आजोबा होते. ओळख करवून घेतली तर कळले कि करंजकर कुटुंबीय मूळचे नगरचे. मुलगा समीर ओहायो ला असतो. आजी आजोबा त्याच्याकडे आले होते. न्यू यॉर्क किंवा अन्य कुठल्याही पर्यटन स्थळी असले दृश्य नवीन नाही. मराठी माणूस भेटणे हे अप्रूप राहिलेले नाही. " अरे दीड वाजता चे आपले बुकिंग आहे  लवकर चला"  किंवा  " अरे अनिरुद्ध आई चे पाय दुखतायेत. जरा बसून घेऊ. सबवे बघ कुठे आहे का " , " बाबा ते विमान येऊन या बिल्डिंग ला धडकलं तर हि पडली कशी नाही " ? असे एक ना अनेक आवाज येता जाता ऐकू येत असतात. त्यात विशेष लक्षात राहतात ते म्हणजे नवरा-बायको , आई-वडील किंवा सासू-सासरे आणि नातवंडं  असे 'कंप्लिट पॅकेज'.
                उत्तर अमेरिकेत मे महिन्याच्या मध्यास थंडी ओसरायला सुरुवात होते आणि गेली अनेक महिने 'हायबरनेशन" मध्ये असलेले मनुष्य आणि इतर प्राणी सक्रिय होतात. हिम वर्षांव होणे थांबले ,बर्फ वितळला आणि खारुताई झाडावर दिसायला लागली कि समजायचं कि "मौसम बदल रहा है ". काहीच दिवसात रुक्ष दिसणाऱ्या झाडांना पालवी फुटते आणि सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसते. बालकवी इकडे जन्मले असते तर त्यांनी " स्प्रिंग" वर एखादी अजरामर कविता निश्चित केली असती. आपल्याकडे जसे जून उजाडला कि रेनकोट ,छत्र्या बाहेर काढल्या जातात. किंवा दिवाळी संपली कि लोकरी चे कपडे काढून ऊन दिले जाते, तसेच इकडे पण झाडांना पालवी फुटली कि लोक उन्हाळ्याच्या आगमनाच्या तयारीला लागतात. आणि उन्हाळ्याबरोबरच चाहूल लागते ती आजी -आजोबांच्या येण्याची. आम्ही तर मे ते सेप्टेंबर हा 'दादा-दादी ' किंवा 'नाना-नानी ' सिझन असेच गमतीने म्हणतो.  मे -जून दरम्यान अनेक जण आपल्या आई-वडिलांना इकडे बोलावून घेतात. कोणी पहिल्यांदा येणार असते तर काही रतीब घातल्यासारखे दर वर्षी येतात. काही मुली/सुनेच्या बाळंतपणासाठी तर कोणी उन्हाळ्याच्या सुट्टीत नातवांना सांभाळायला. काही जण सहज विरंगुळा म्हणून  तर काही जण इच्छा नसताना देखील मुलं-नातवांच्या ओढीने येतात ." तेवढे अलास्का फिरायचे राहिले आहे .यंदा जायचे म्हणतो "- गेल्या वर्षी एक आजोबा सांगत होते मला.
                या सगळ्याची सुरुवात मात्र बऱ्याच आधी झालेली असते. मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत स्थिरावले कि ते आई वडिलांच्या अमेरिकावारी ची तयारी सुरु करतात. कागदपत्रांची जुळवाजुळव, एखाद्या एजन्ट ला गाठणे , स्टॅम्पिंग ची तारीख मिळवणे इत्यादी गोष्टी झाल्या कि धाक-धुक लागते ती व्हिसा मिळतो का याची. व्हिसा मिळताच विमानाचे तिकीट बुक केले जाते. तिकडे आई वडील पण तयारी ला लागतात. कपडे शिवून /विकत घेणे, मोठ्या बॅगा विकत घेणे असल्या प्राथमिक गोष्टी सुरु होतात. व्हिसा मिळण्यापूर्वी अगदी खासगी असलेली ही बातमी नंतर सार्वजनिक होते. "हात मोजे घेऊन जा - तिथला उन्हाळा तो कुठला ? आपल्याला थंडीच वाजते " किंवा " खाण्या-पिण्यचे काही घेऊन जाऊ नका. कस्टम वाले फेकून देतात .शिवाय तिकडे सगळे मिळतेच " , " बाळाला घुटीचे सामान आणि सान तेवढी घेऊन जा " असे आवश्यक आणि अनावश्यक सल्ले दिले जातात. इकडे मुलाने आणि सुनेने काय आणा आणि काय आणू नये याची विस्तारित यादी पाठविलेली असते. आजीबाई अमेरिकेत जायचे म्हणून खास पंजाबी ड्रेस शिवायला टाकतात. आजोबा पण कधी नव्हे ते 'प्युमा' चे बूट घेतात .थोडा गोंधळ होईल असते दिसताच -"चार वेळा जाऊन आलेल्या " कोणा शेजाऱ्याची मदत घेतली जाते.
                प्रवासाचा दिवस जवळ येतो. आई उत्साहीत असते. बाबा थोडे नर्वस. बॅगा भरलेल्या असतात , चिवडा, चकली ,मेतकुट , भाजण्याचे पीठ, गुलकंद,मोरावळा यांचे सीलबंद पॅकिंग झालेले असते. तरीही - फेकून देतात कि काय हि धाकधूक असतेच. डॉक्टरांकडे जाऊन चेकअप ,आगाऊ औषधे इ औपचार उरकले जातात. मुलगा ( किंवा जावई ) मुंबई ला पोहोचल्यापासून कसे काय करायचे याची इतंभूत सूचना लिहून पाठवितो. जायचा दिवस उजाडतो – पाहुणे-रावळे , मित्र मंडळी जमतात. कोणी परदेशातील आपल्या भाच्या/पुतण्यांसाठी भेटवस्तू देतात तर कोणी नुसतेच आशीर्वाद. सल्ले देणाऱ्यांची तर अजिबात उणीव नसते. "बिंदास रहायचे -खायचे प्यायचे मजा करायची " , " जातोस आहेस तर नातवंडांना मराठी शिकव -आपली मातृभाषा आहे " असे प्रोत्सहनात्मक सल्ले मिळतातच सोबतच " चला आता चार-पाच महिने केशव ला घरचं चांगलं -चुंगलं खायला मिळेल " असे खोचक संवादही ऐकायला मिळतात. आजी आजोबा मात्र भयंकर भांबवलेले असतात. आपण काही विसरलो तर नाही ना ? पासपोर्ट , पत्ता , फोन नंबर , डॉलर  इ गोष्टी घेतल्या याची चार चार वेळा खात्री केली जाते. अमेरिकेत वैदकीय खर्च खूप महाग आहेत. आपल्याला काही होणार तर नाही ना ? ही धाकधूक कायम असतेच.
                बघता बघता तो क्षण उजाडतो. पुढच्या मागच्या दारांना कुलुपं लावून , नळ ,गॅस बंद आहेत याची खात्री करून, लाईट चा मुख्य स्विच बंद करून मंडळी विमानतळाकडे प्रस्थान करतात. विमानतळावर पोहोचताच गोष्टी इतक्या झपाट्याने घडतात कि दोघांनाही कळत नाही. बघता बघता सोडायला आलेल्या पाहुण्यांना निरोप दिला जातो. मुलाने अमेरिकेहून " चेक इन " केले असते .त्यामुळे ती प्रक्रिया पण पटकन उरकते. थोड्याच वेळात आजी आजोबा विमानाची वाट पाहत बसलेले असतात. आता मात्र वेळ जाता जात नाही. "कॉफी मिळते का बघू " म्हणत आजोबा उठतात. एवढीशी कॉफी शंभर रुपयाला”? असे म्हणत आयुष्यात 'सी सी डी ' कडे कधीही ना फिरकलेले दोघे ती महागडी कॉफी घेतात मात्र. आज बऱ्याच दिवसांनी उसंत मिळालेली असते. खरे तर बऱ्याच वर्षांनी. आपल्या "प्रवीण " किंवा "वीणा " चे आयुष्य मार्गी लागावे म्हणून दोघांनी आयुष्य खर्ची केलेले असते. आपल्या इच्छा आकांशांना बगल देत मुलांच्या शिक्षणासाठी पै पै एकत्र करण्यात त्यांच्ये तारुण्य वार्धक्यात कधी परिवर्तित झाले हे त्यांचे त्यांनाच कळलेले नसते. इंजिनिअरिंग झाल्यावर आपल्या "प्रवीण " किंवा "वीणाला " पुण्य-मुंबईत एक चांगली नोकरी ,एक चांगले स्थळ , एक फ्लॅट आणि एक गोंडस नातू असे स्वप्न बघितलेले ते दोघे आज स्वप्नातही कल्पना न केलेल्या प्रवासाला निघालेले असतात ....
क्रमश :

No comments:

Post a Comment