Saturday, January 6, 2018

७०० पैकी ४०

                शाळेत असताना इतिहास माझ्या आवडत्या विषयांमधील एक. तशी माझी 'हुशार' विद्यार्थ्यांमध्ये गणना होत. हुशार म्हणजे जे पुस्तकात छापलेले उत्कृष्टरित्या पेपरात उतरविण्याच्या कलेत वाकबगार अशा विधार्थ्यांमध्ये ! तर हुशार विध्यार्थ्यांना सगळ्याच विषयात चांगले गुण मिळणे अपेक्षित असत-नव्हे ते त्यांचे कर्तव्यच होते. मग आवडता विषय तो कसा? तर ज्याचा अभ्यास करतांना आंतरिक आनंद होत तो आवडता.हडप्पा संस्कृती पासून ते दुसरे महायुद्ध ,भारताचा स्वातंत्र्यसंग्राम असा प्रवास मी अत्यंत आवडीने शिकलो. महाराष्ट्राचा इतिहास वाचताना,शिकताना तर वेळ कसा जात ते कळत नसे.देवगिरीच्या रामचंद्रांपासून ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव,रामदास,शिवाजी महाराज,बाजीराव पेशवे,महात्मा फुले,डॉ. आंबेडकर,आगरकर ,रानडे ,स्वातंत्र्यवीर सावरकर असे एक ना अनेक दिग्गज या मातीत जन्माला आले हे वाचून अभिमान वाटे. पुढे आठवीत नववीत माझे इतिहास प्रेम पाहून माझा मित्र अल्केश मला चिडवत-"अरे तू उगाच इतिहासावर इतका वेळ घालवतोस. १०वी  बोर्डाच्या दृष्टीने इतिहासाची किंमत ७०० पैकी ४०". परंतु मी दुर्लक्ष करीत. जो इतिहास विसरला त्याचे भविष्य अंधारात आहे असे काहीतरी मी वाचले होते. शिवाय आमचे गरिबांचे एस एस सी बोर्ड. त्यामुळे सी बी एस ई  सारखे कोणी आक्षेप घेतल्यामुळे अभ्यासक्रम बदलण्याचे प्रकार आमच्याकडे होत नसत (खास करून इतिहासावर डोळा असतो यांचा.आजपर्यंत शास्त्रावर आक्षेप घेऊन नवीन संशोधन घेऊन पुढे आल्याचे मला तरी आठवत नाही .असो ). परिणाम असा झाला कि आपण शिकलो ते १००% खरे ही धारणा झाली. शंका घ्यायला कारणच नव्हते. १०वी संपली आणि इतर 'हुशार ' मुलांप्रमाणे माझा पण इतिहासाशी संबंध संपला.
                महाविद्यालयात असताना काही समाजवादी विद्वानांनी 'खरा'(कम्युनिस्ट) इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु विज्ञान,संगणकशास्त्र आणि 'सेक्स' अशा फालतू विषयात व्यस्त असल्यामुळे माझ्यावर तुरळक परिणाम झाला ! इतिहासाशी पुन्हा गाठ पडली ती 'मिथ ऑफ आर्यन इन्वेजन इन इंडिया' वाचताना. आपण शिकलेला इतिहास किती खोटा होता याची जाणीव झाली.नैसर्गिक आवडीमुळे मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके वाचली,'विद्वानांचे' लेख व संशोधने वाचून काढली. अखबर कसा क्रूर होता हे कळले. औरंगझेब किती 'समंजस' सम्राट होता हे ही कळले. शिवाजी महाराजांवर तर भरपूर वाचन केले. कोणी त्यांना शिव अवतार बनविले होते तर काहींच्या मते ते  बिजापूर दरबारातील इतर सरदारांपेक्षा वेगळे नव्हते ! बाबासाहेब  वाचल्यावर आपण ज्यांना वंदनीय मानत होतो ते किती दुष्ट होते याची जाणीव झाली. दादोजी कोंडदेव,समर्थ रामदास यांनी शिवकालीन इतिहासत काहीही योगदान दिले नाही हे पण पचविले ! जग सोडा आपल्या देशाचा इतिहास आपल्याला काहीच माहित नसल्याकारणाने मन उद्विग्न झाले. महात्मा गांधी हिंदुविरोधी होते ,सावरकरांनी चक्क इंग्रजांची 'माफी' मागितली ,जिन्ना 'सेकुलर' होते ,नेहरूंचे 'लफडे' होते ,त्यांनी देशाची वाट लावली , इंग्रज अत्यंत सहिष्णू राजकारणी होते असे एक ना अनेक दाखले वाचल्यावर आपल्या ज्ञानाची आणि  दहावीत ६० पैकी ५९ ( इतिहास व नागरिक शास्त्र एकत्र ) मिळालेल्या गुणांची लाज वाटायला लागली.
                आपल्या ज्ञानाची (अज्ञानाची ) कीव करताना जगातील लोक किती ज्ञानी आणि आपल्या इतिहासाबद्दल 'जागरूक व सक्रिय' आहेत हे ही अनुभवत होतो मी. एका (कदाचित काल्पनिक) वंशाचे श्रेष्ठत्व सिद्ध करायला एका एकाधिकारशहा ने नरसंहार घडविला होता. आपण एकेकाळी देशाचे राज्यकर्ते होतो आणि आता होऊ शकत नाही या ग्लानीपोटी काहींनी देशाचे तुकडे केले होते. आपल्या धर्माचे व देशाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करून काही जण राजकीय सत्ता संपादित करीत होते. हजारो वर्षांचे दाखले देऊन मध्यपूर्वेत रक्तरंजित 'इतिहास' घडविला जात होता. दुसऱ्यांचे अस्तित्व नाकारून आपल्या जातीचे श्रेष्ठत्व सिद्द करण्यासाठी 'नवीन' इतिहास रचला जात होता. फक्त प्रस्थिपितांचा विरोध करायचा म्हणून अनेक ऐतिहासिक घटनांची 'पुनर्रचना' केली जात होती ! आपल्या गौरवाचे रक्ष्णप्रीत्यर्थ लोक सिनेमांचे विरोध करीत होते. या आणि अशा अनेक घटनांमध्ये ज्ञानी समाज आपल्या  इतिहासासाचे 'संवर्धन' करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता. त्यांची इतिहासनिष्ठा पाहून मी हात टेकलेत. देशात ,जगात जिथे कुठे संघर्ष झालाय ,होतोय त्याला इतिहासाची 'किनार' आहेच .त्यामुळेच कदाचित ,इतिहास रचण्याची सोडा वाचण्याची देखिल आपली लायकी नाही याची मला खात्री पटली आहे.
                दरम्यान काही दुर्बुध्द मानव समाजाचे इतिहासापासून लक्ष विचिलित करण्याचा प्रयत्न करीत आलेत. त्यांनी यंत्र बनवली ,विमाने ,जहाज ,गाड्या बनवल्या , समाजाला जोडावे म्हणून रेडिओ ,दूरदर्शन ,इंटरनेट अशी संपर्कमाध्यमे निर्माण केली, औषधे बनवली, एवढेच काय चंद्रावर पण जाऊन आले. आज ही हे लोक कुटील हेतू ठेवून शास्त्र शिकतायत ,गणितात प्रगती करतायत ,रोग-राई वर उपाय शोधत आहेत. संगीत व कलेच्या माध्यमातून लोकांचे लक्ष्य विचिलित करू पाहत आहेत.
खरं सांगू ? इतिहासातील माझी अशी दुर्गती पाहून मी पण या दुर्बुध्द मानवांच्या संगतीला जायचे ठरविले आहे.
अल्केश म्हणत होता तेच खरे. इतिहासाचे महत्व ७०० पैकी ४० गुणांचे. तेवढेच बरे !
तुम्ही येणार माझ्यासोबत ?


सुशांत गोसावी