Saturday, June 26, 2021

समाज माध्यमांतील वर्गभेद - एक ( अनावश्यक ) प्रबंध

             "काय बरेच दिवस काही पोस्ट नाही ? फेसबुक अकाऊंट बंद केले कि काय ? नाही म्हणजे आज काल बरेच जण बंद करतायत म्हणून विचारले "- एक मित्र- हो म्हणजे मित्रच म्हणायचे आता त्याला , विचारत होता .याला माझ्या पोस्ट लिहिण्याने अथवा लिहिण्याने काहीही फरक पडत नसणार. परंतु समोर भेटलेल्याला आपण सहज "काय झाले का जेवण " म्हणून विचारतो ना ? तसलाच प्रकार. समोरचा नाही म्हणाला तर लगेच "हो का ?अरेरे ! चला आमच्या घरी .जेवायला वाढतो " असे म्हणणारा अजून आम्हाला तरी भेटायचा आहे. बाकी एक गोष्ट मात्र तो बरोबर बोलला .आजकाल फेसबुक खाते बंद करायचे किंवा निष्क्रिय राहण्याचे नवीनच फॅड निघाले आहे. फेसबुकवर ऍक्टिव्ह असणे डाउन मार्केट समजले जाऊ लागले आहे. सोशल मीडियावरील "क्लास वॉर " मध्ये फेसबुक कधीही अव्वल नव्हतेच खरे. फेसबुक म्हणजे बॉलीवूड चा बी ग्रेड  गल्लेभरू चित्रपट. त्याला ना  कपूर चोप्रा ,खान नावांचे वलय आणि ना सत्यजित रे ,गोविंद निहलानी वगैरेंचे कर्तृत्व. फेसबुक म्हणजे चितळेंच्या पुण्यातील गल्लीतला कोणी भायल स्वीट्स. कितीही चांगला माल विकला तरी कायम तिसऱ्या नंबरवर. फेसबुक म्हणजे तुळशीबाग. व्हॅल्यू फॉर मनी तिथेच मिळते हे सगळेच जाणतात. परंतु तिथून खरेदी केली हे सांगायला कमीपणा वाटतो. तर इतर गोष्टींप्रमाणे सोशल मीडियावरही वर्ग भेद असतात बरं का ? म्हणजे मानवी स्वभावात असलेले भेद सोशल मीडियावर झळकतात असे म्हणू.

या सोशल क्लास वॉर्स मध्ये सर्वोच पदावर असतो तो लिंकडीन वापरणारा- किंबहुना लिंकडीन वरील सक्रिय गट. निव्वळ पेठेत राहण्याने जसा पुणेकरांना माज दाखविण्याचा मूलभूत अधिकार मिळतो, किंवा केवळ भारतीय असल्याकारणाने फूटभर ढेरीवाले सुद्धा  'योगा' वर आपला अधिकार सांगतात तसेच लिंकडीन वर साधा लाईक ठोकणारा सुद्धा पौरोहित्याचे अधिकार मिळवतो आणि "ऑल अदर सोशल मीडिया ईझ युझलेस" म्हणायला पात्र ठरतो. बरं नोकरी धंद्यासंदर्भात असल्याकारणाने लिंकडीन तसेही वलयांकित असणार यात शंका नाही. त्यात ( काही अपवाद वगळता ) कोणालाही कळणारे - निबंध टाकले ? कि तुम्ही जग जिंकलेच म्हणून समजा ! एखाद-दुसऱ्या उच्चपदावरील साहेबाचे  'कनेक्षन ' असेल आणि अनुमोदन मिळाले असेल तर विचारूच नका !  अर्थात केवळ आवड म्हणून त्या विषयांत रुची घेणारा असा एक अल्पसंख्य वर्ग आहे आणि त्यांचे विचार रंजक असतात. परंतु केवळ लिंकडीन वर वावरण्याने चार फूट हवेत चालणारे ( आणि इतरांना तुच्छ लेखणारे) "विद्वान" बरेच आहेत. हे हवेत चालत असल्याकारणाने भूतलावरील इतर माध्यमांशी स्पर्धा करण्याचा -किंबहुना विचारही करण्याचा काही संबंधच येत नाही. फेसबुक वगैरे म्हणजे तर यांच्यासाठी कुंटणखाना आहे. अर्थात यांच्या चोरून केलेल्या हरकती पाहून " हमको जो ताने देते हैं हम खोये हैं इन रंगरलियों मेंहमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियों में " या किशोरदांच्या ओळी आठवतात तो भाग वेगळा !

भूतलावरील माध्यमांचा विचार केला तर निर्विवाद वर्चस्व हे whatsapp  चे. यालाही पाण्यात पाहणारा वर्ग आहेच . परंतु whatsapp सगळ्यांच्याच आयुष्याचा आवश्यक घटक झाल्याकारणाने सरसकट बंद करण्याची हिम्मत दाखवणारा कोणी भेटला नाही ( म्हणजे whatsapp सोडून सिग्नल , टेलिग्राम वगैरे वापरणारे  तो वर्ग वेगळा. ते म्हणजे  रेड लेबल सोडून शिवाज रिगल घेणारे ). परंतु गम्मत बघा - गुणात्मक दृष्ट्या whatsapp आणि फेसबुक वरील "साहित्यात' ( आता साहित्यच म्हणायचे त्याला -दुसरे काय ?) काहीही फरक नसला तरी whatsapp वाले पण फेसबुक वाल्यांना पाण्यात बघतात बरं का ! दोघांचा मय बाप एकचं आहे हे माहित असून सुद्धा !  सच इझ क्लास कन्सेप्ट दीप रूटेड इन सोसायटी - काय सांगू तुम्हाला ! या नंतर येतात ते  ट्विटर वाले. यांचा फेसबुक वाल्यांशी तसा संघर्ष नसतो. म्हणजे ते वर्गभेद करीत नाहीत. परंतु ऋग्वेदी आणि यजुर्वेदींमध्ये जसा कर्मकांडाचा भेद असतो तसा ट्विटर आणि फेसबुकवाल्यांमध्ये असतो. दिवसातून १० वेळा चर चर करणारे  - 'अनलिमिटेड थाळी' लोक कशी खाऊ शकतात हे समजूच शकत नाहीत. आणि फेसबुक वाले  " फुल्ल थाळी का मज्जा तुम क्या जानो बाबूजी" करीत यांची मज्जा घेतात. परंतु केवळ  राजकीय दृष्ट्या वजनदार आणि संवेदनशील असल्याकारणाने ट्विटर वरच्या वर्गात स्थान मिळवते. या नंतर येतो तो इंस्टाग्राम. हे म्हणजे बाप से बेटा सवाई असा प्रकार आहे. परंतु नवीन पिढीला ते भावले आणि फोटो बघायला मिळत असल्याकारणाने अनेकांनी पार्टी बदलली . नव्या पिढतील तर गेलेच परंतु त्यांना पाहण्यासाठी म्हातारी धोंड पण मागोमाग पळाली . बाकी पिनारेस्ट ,कोरा वगैरे म्हणजे आपल्या प्रादेशिक पक्षांसारखे आहेत . ठरविक वर्गाला भावतात. परंतु फेसबुकला कमी लेखायला मागे पुढे पहात नाहीत.

असो तर थोडक्यात काय ( थोडक्यात काय ते सांगत जा हा फिडबॅक आज काल वारंवार मिळत चाललाय ) तर या वर्गीकरणात फेसबुक अगदी खालच्या तळाला आहे. बरं फेसबुक वापरणाऱ्यांच्यात  एकजूट असली तर नवल ! त्यांच्यात हजार पोटजाती! वर सांगितल्याप्रमाणे निष्क्रिय राहणारा एक मोठा गट आहे. यांना फेसबुक वापरणे म्हणजे डाउन मार्केट वाटते. परंतु इतरांच्या घरात काय चाललंय हे हळूचकन बघण्याची इच्छा जात नाही. त्यामुळे ते बघत सगळे असतात. प्रक्रिया मात्र देत नाहीत. त्यांच्या खालोखाल येतात ते फक्त लाईक्स ठोकणारे. मग फक्त आणि फक्त " हैप्पी बर्थडे " च्या शुभेच्छा देणारे. मग रोज उठून गुड मॉर्निंग म्हणणारे. देवी देवतांच्या फोटोला नमस्कार ठोकणारे, फेसबुक वरील राष्ट्रप्रेमी वगैरेंचा त्यानंतरचा क्रमांक.  कधीतरी उठून आठवले कि आपण फसेबूकवरही आहोत म्हणून  प्रोफाइल फोटो बदलणारे किंवा कोणालातरी उगाच " कसा आहेस लॉन्ग टाईम नो सी " वगैरे संदेश पाठविणारे मध्येच घुसतात. सरतेशेवटी उरतात ते प्रकारातील लोक . मोदीभक्त. हे सगळीकडेच असतात. परंतु ट्विटरवर मोजकेच शब्द लिहिता येतात! त्यामुळे फेसबुक हे यांचे हक्काचे स्थान. आणि प्रोटॉन असला कि इलेक्ट्रॉन हवाच ! या सिद्धांताप्रमाणे जेथे भक्त तेथे विरोधक आलेच ! त्यानंतर येतात ते -साहित्यिक. यांना त्यांच्या लिखाणाबद्दल फारच भाबड्या आशा असतात. त्यामुळे ते " मेरे करण अर्जुन आयेंगे " प्रमाणे कधीतरी मान आणि मान्यता मिळेल या आशेने झुंझ देत असतात. सर्वात खालचा नंबर लागतो तो फेसबुक पेज चा. हे पेजेस का आणि कोणासाठी बनलेली असतात कोण जाणे. परंतु उगाच वातावरण प्रदूषित करीत असतात. किंबहुना फेसबुकच्या अधःपतनात यांचा सर्वात मोठा वाटा आहे.  एवढे सगळे असूनही फेसबुक म्हणजे एस टी  सारखे आहे. आजही त्याच्या जीवावर प्रवास करणारे असंख्य " निष्ठावंत" आहेत !

परवा ही म्हणत होती- तुझा इंस्टग्राम प्रोफाइल बनव. मी म्हणालो नको मला. मी आपला फेसबुक वाल्या ओल्डीस मध्येच शोभतो. पूर्वी पत्र असायची मग फोन,-मेल आले. उद्या आणखी काही येईल. शेवटी काय ? लिंकडीन असो अगर इंस्टाग्राम माणसं जोडलेली असणे  महत्वाचं. नाही का ?