Sunday, October 20, 2019

डबेपुराण -भाग ३

             आमचा डब्याशी तसा  बराच जुना संबंध. यूं समझो होश सांभाळतेही डबा लेके जाना सिख गये ! आम्ही दोन -तीन वर्षांचे असताना म्हणे पोत्यात पाटी आणि खडू घेऊन शेजारच्या धावडा काकूंकडे अभ्यासाला जायचो. तेंव्हा शाळेत जातो याचे कौतुक म्हणून आई डबा द्यायची - एक क्रिम बिस्कीट. हा किस्सा ऐकला कि आमचे ऊर अभिमानाने भरून येते. डबा नेत असल्यामुळे नव्हे तर एवढ्या बालवयात केवढे ते शिक्षणाचे आकर्षण आणि प्रेम ! कधी कधी तर आम्हाला हे पोते -पाटी पुराण खरे आहे कि नाही याचीच शंका येते. परंतु थोरे संत ऋषी महर्षी बालवयात समाधीस्त होत, गीतापठण करीत , श्लोक म्हणत असे किस्से आम्ही ऐकून आहोत. त्यामुळे आपण किमान पाटी -खडू आणि क्रिम बिस्किटांचा डबा घेऊन कोणाच्या घरी जात असू यावर विश्वास बसण्यास निश्चित वाव आहे. असो तर अगदीच बालवयात आमची डब्याशी गट्टी जमली ती क्रीम बिस्किटांमुळे. पुढे खरोखरची शाळा सुरु झाल्यावर या डब्याने खूप साथ दिली. सुरुवातीचे काही दिवस आम्ही डबा खाण्यापुरतेच काय ते रडायचे थांबत असे आमच्या बाईंनी आईला सांगताना आम्ही स्वतः ऐकले आहे. बालवाडीत शाळा आवडण्याची मुख्य कारणे म्हणजे वाळूत खेळायला मिळत आणि मग डबा खायचा. परंतु त्या दोन्हीमध्ये बाई हात धुवायची जबरदस्ती करीत. या असहिष्णुतेचा आम्ही आजही निषेध करतो. बालवाडीत बिस्कीट ,घरच्या शंकरपाळ्या आणि क्वचित केक वगैरे असलाच आमचा डबा. नाही आवडला तर नवल ! जसे जसे पुढच्या इयत्तेत जात गेलो तसे डब्याचे स्वरूप पण बदलत गेले. गोळ्या बिस्किटांची जागा जाम ब्रेड ,जाम पोळी ने घेतली आणि त्यापुढे पोहे उपमा ,शिरा, फोडणीची पोळी इत्यादी. किंबहुना या जिन्नसांनी आमचे डबेविश्व व्यापून टाकले होते एके काळी. कधितरी कंटाळा येत परंतु मातोश्री गोड बोलून (आणि दुसऱ्यादिवशी डब्यात गोड भरून ) समजूत काढीत. याच बालवयात -सुमारे दुसरी-तिसरीत असतांना नियतीने आमची परीक्षा घ्यायचे ठरविले. आमचे एक घनिष्ट मित्र मधल्या सुट्टीत वर्गमित्रांचे डबे उचकून खात असत हे आम्ही शिताफीने शोधून काढले. पकडल्यावर बाईंना सांगू नये याखातर चोरलेले डबे आमच्यासोबत वाटून खाण्याची 'ऑफर' देण्यात आली. परंतु आम्ही तत्वनिष्ठ असल्याकारणाने ती धुडकावून लावली. नव्हे ,त्याकाळी 'ई डी '  आज इतकी प्रभावी असती तर या मित्राची चौकशी करण्याची आज्ञा आम्ही नक्कीच केली असती. परंतु त्याच्या भविष्याकडे पहात आम्ही त्याला क्षमा करण्याचे ठरविले आणि एका कॅडबरीच्या शिक्षेवर त्याला सोडून देण्यात आले.
                बालवाडीत डबा हे शाळेत जाण्याचे मुख्य आकर्षण होते. प्राथमिक शाळेत बहुतांश वेळा दिलेला डबा आवडत. परंतु हळू हळू डब्याचे स्वरूप बदलत गेले आणि आणि आमचे प्रेम ओसरत गेले. गोळ्या बिस्कीट, ब्रेड ,शिरा उप्पीट ने सुरु झालेला आमचा डबा प्रवास माध्यमिक शाळेपर्यंत गवारीची भाजी आणि पोळीपर्यंत येऊन पोहोचला होता. गवारीची भाजी ? कम ऑन ! डब्यामुळे ( आणि हार्मोन्स मुळेही कदाचित ) आई चा खूप राग यायला लागला. डब्याऐवजी शाळेजवळच्या दुकानातून क्रीमरोल खाणे आवडायला लागले. डबा नको म्हणून आईशी भांडणे होत. अर्थात कोण जिंकत हे वेगळे सांगायला नको. या सगळ्यामुळे डबा या संकल्पनेविषयी एक चीड निर्माण झाली. "काय डबडा चित्रपट आहे " किंवा " डब्बा ऐसपैस " ," लाल डब्बा " , "डब्बा गाडी ", "वरचा मजला डबा आहे " असे डब्याला  हीन लेखण्याची सुरुवात पौंगडावस्थेतील विरोधामुळेच झाली असावी कदाचित असा आमचा कयास आहे. कोबी ,गवार ,दोडका क्वचित प्रसंगी बटाटा अशा जिन्नसांशी आमचा सामना सुरु झाला .जणू नियती आम्हाला संदेश देत होती - वेलकम टू रिअल वर्ल्ड ! अर्थात यात आणखी एक संदेश दडलेला होता जो आम्हाला बऱ्याच वर्षांनी अवगत झाला -ये तो सिर्फ झांकी है -लगीन अभी बाकी है ! याही दरम्यान क्वचितप्रसंगी डब्याची आणि आमची गट्टी जमत. शाळेच्या सहलीदरम्यान,बागेत डबे घेऊन जातांना , मित्रांसोबत अंगणात आंगत -पंगत करतांना आणि विशेषतः मैत्रणीसोबत बसून डबा खात असतांना( त्यादिवशी कारले पण गोड लागे ).
                जसे जसे मोठे होत गेलो तसा डब्याशी संबंध कमी होत गेला. उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असतांना डबा हि अतिशय "डाउन मार्केट " गोष्ट झाली होती. पुढे महाविद्यालतात पण डब्याशी विशेष संबंध नसे. कधी एखाद्या स्थानिक मित्राने आग्रहाने खायला घातले तर किंवा आमची मेस बंद असेल तर कोणाचातरी डबा मागविण्यात येई. अर्थात या दरम्यान घरच्या खाण्याची आणि जेवण्याची किंमतपण कळली होती. त्यामुळे कधी कोणी मित्र आमच्या गावी गेला तर आई 'डबा' पाठवीत. आम्ही होस्टेलवर येईपर्यंत मित्र फस्त करून टाकीत. नोकरी लागल्यावर बॅचलर असतांना डबा लावण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला परंतु कामाच्या अनियमित वेळांमुळे ( आणि आमच्या वेंधळेपणामुळे ) सगळे प्रयत्न फसले. या दरम्यान डब्याबद्दल पुनः आकर्षण निर्माण होयला लागले होते. ऑफिस मधील नवविवाहित मित्र घरून डबा घेऊन येत आणि आग्रहाने खायला घालीत. आम्हाला पण घरचा डबा मिळावा म्हणून एकदा सहज पत्र्यामारुतीकडे प्रार्थना केली आणि त्यांनी लगेच ऐकली पण ! स्वतः ब्रह्मचारी राहून दुसऱ्यांना अडकविणे हे मारुतीरायांना चांगले जमते.
                आम्ही चतुर्भुज झालो आणि एका अपूर्ण अध्यायाला पुन्हा सुरुवात झाली ! हनिमून वरून आल्यावर पहिल्याच दिवशी बायकोने विचारले -डब्यात काय देऊ ? तेंव्हापासून आमचे डबेपुराण अखंड १४ वर्ष सुरु आहे . प्राथमिक शाळेत असतांना डब्याशी झालेली आमची युती आजतागात टिकून आहे. कुठल्याही युतीमध्ये येतात तसे चढउतार आमच्यातही आले. परंतु कधी प्रेमामुळे तर कधी गरजेमुळे ते अडथळे पार केले. आता आम्ही कोबी,पडवळ ,गवार इत्यादी भाज्यांविषयी निरस्थ  झालोय. डबा हि वाद घालण्याची गोष्ट नव्हे तर जसा दिलाय तसा मुकाट्याने खाण्याची गोष्ट आहे हे आम्ही शिकलोय . त्यामुळे  चिरंजीव जेव्हा सकाळी विचारतात "आज डब्यात काय आहे " तेंव्हा मी मनातल्या मनात स्मितहास्य करीत म्हणतो- बेटा डबेरी दुनियामे आपका स्वागत है !

समाप्त

Sunday, October 6, 2019

डबेपुराण -२

                 आमच्या 'डबेबुडवीमुळे' घरात कधी कधी कटु प्रसंगांना सामोरे जावे लागते खरे, परंतु डबेसंस्कृतीचे जतन करायचे म्हंटल्यावर अशा अडचणी येणारच याची आम्हाला कल्पना आहे. अर्थात इतर अनेक गोष्टींप्रमाणे हि संस्कृती प्रामुख्याने भारतात किंवा दक्षिण आशियाई मूळच्या लोकांमध्ये टिकून आहे. इतर ठिकाणी दुर्दैवाने तिचा ऱ्हास झालेला दिसतो. अमेरिकी लोकांनी तर डबेबुडवी मुळे डोकेदुखी ही समस्याच नाहीशी करून टाकली आहे. ते डबाच नेत नाहीत. म्हणजे ना रहेगा डबा ना होंगे झगडे म्हणत बाकीच्या गोष्टींवर भांडायला हे रिकामे ! असो- तर ज्या संस्कृतीचे आपण इतक्या हिरहिरीने रक्षण करतो असे म्हणतोय तीच्या मुळाशी जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. विषय अत्यंत क्लिष्ट असा आहे. इतिहासात धर्म,अर्थ ,काम ,मोक्ष, अस्त्र ,शस्त्र ,शास्त्र, पाककला इत्यादी  संदर्भात अनेक ग्रंथ आणि महाकाव्ये आहेत .परंतु डबा या विषयावर अगदी नगण्य स्वरुपात माहिती उपलब्ध आहे. हडप्पा किंवा मोहंजोदाडो येथे उत्खादानात सगळ्या गोष्टी मिळाल्या परंतु डबा काही गावला नाही. वेद पुराणांमध्येही डबेसंस्कृतीबद्दल काही ठोस माहिती आढळत नाही. शिवाय अति प्राचीन काळी लोक 'सिम्पल लिव्हिन्ग' वर विश्वास ठेवत असल्यामुळे दूध ,दही ,लोणी ताक असाच त्यांचा आहार असावा. त्याअनुषंगाने डब्यापेक्षा सोबत गायच घेऊन जाणे सोयीचे पडत असावे कदाचित असा आमचा कयास आहे. पुढे रामायणातपण डब्याचा उल्लेख नाही. पुत्रकामेष्टी यज्ञावेळी वशिष्ठांनी पायसम सोबत आणले कि तिथेच बनविले हा पुढील संशोधनाचा विषय असू शकतो. परंतु वशिष्ठांनी तीन कप्प्याच्या डब्यातून पायसम आणले असा स्पष्ट उल्लेख कुठल्याही रामायणात आढळत नाही. भरतभेटी च्या प्रसंगावेळीही रडारड ,गळाभेट, प्रभू रामचंद्रांचे जोडे भरत घेऊन जातो इत्यादी घटनांचे विस्तृत वर्णन आहे. परंतु आयोध्येतून भरताने, वांग्याचे भरीत आणि भाकरी चा डबा आणला आणि तो सगळ्यांनी मिळून खाल्ला असा उल्लेख कोठेही नाही. शबरी पण बोरं घेऊन जाण्याऐवजी प्रभू रामचंद्र येण्याची वाट बघत राहिली. यावरून तिला डब्याबद्दल माहिती नसावी असेच दिसते. मारुती अशोकवनातील फळे खात असल्यामुळे त्याला पकडून रावणापुढे हजर करण्यात आले. म्हणजे मारुतीला वानरसेनेने डबा भरून दिला नव्हता हे सिद्ध होते. एकूण काय तर हाती असलेल्या माहिती-पुराव्यानुसार रामायणकाळी डबा संस्कृती अस्तित्वात नव्हती असेच दिसते. पुष्पक विमान आणि ब्रह्मास्त्र निर्माण करणाऱ्या लोकांना डब्याचे ज्ञान अवगत नसावे हे आश्चर्यजनकच म्हणावे लगेल.
                महाभारताच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा डबासंस्कृती फार प्रगत नसावी. नाहीतर कृष्ण आणि त्याचे मित्र घरोघरी लोण्याची चोरी करीत फिरले नसते.यशोदेने भाकरी आणि वर मस्त लोणी असा डबा भरून दिला नसता का कान्ह्याला ?  भारतीय इतिहासात डबा किंवा तत्सम संस्कृतीविषयी पहिला संदर्भ आढळतो तो सुदाम्याच्या पोह्यांच्या स्वरुपात. सुद्यमाने पोहे डब्यात आणले असे कोठेही लिहिले नसले तरी एक नाशवंत पदार्थ शिदोरीच्या स्वरुपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हि कृती 'डब्याच्या व्याख्येत बसत असल्यामुळे सुदामा हा डबेसंस्कृतीचा आद्यगुरू ठरला ! अर्थात आपल्या मागण्या मान्य करण्याहेतू समोरच्याला खायला घालून तृप्त करणे याचीही सुरुवात सुदामा प्रकरणातून झाली असण्याची शक्यता आहे. पुढे कुंतीने आणि तत्पश्चात द्रौपदीने आहे ते वाटून खाण्याचे धडे दिले आणि डबे संस्कृती बहरण्यास हातभार लावला. बौद्धकालीन इतिहासात भिक्कू भिक्षा मागून आपल्या विहारात घेऊन जात व अंगत पंगत करीत खात. या काळात डबेसंस्कृती हि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये पसरली. हा प्राचीन भारतातील डबे संस्कृतीचा सुवर्णकाळ म्हणता येईल ! पुढील काळात मात्र डबा या विषयावर फारसे संशोधन किंवा विकास झाल्याचे दिसत नाही. गुप्त, पल्लव काळात प्रवासासाठी शिदोरी घेऊन जाण्याखेरीस दुसरा कुठला उपयोग झाल्याचे दिसत नाही. अर्थात जैन व्यापाऱ्यांनी डबेसंस्कृती च्या वृद्धीस बराच हातभार लावला.
                पुढे मुसलमान राज्यकर्त्यांनी 'एकत्र बसून खाणे' या संस्कृती चे अनुसरण केले. रोजा सोडतांना याची प्रामुख्याने जाणीव होते. परंतु डबा किंवा शिदोरी संस्कृतीबद्दल मुसलमान राज्यकर्त्यांची उदासीनताच दिसून येते. मध्ययुगात व्यापारी आणि दुपारच्या जेवणासाठी शिदोरी घेऊन जाणारा शेतकरी हेच काय ते डब्याचे तारणहार राहिले. बरं या दरम्यान जगभरात काय चित्र होते ? अलक्षेन्द्र आल्यामुळे भारतीय आणि ग्रीक संस्कृती एकमेकांच्या खूप जवळ आल्या. याच दरम्यान डबेसंस्कृती युरोपात गेली असण्याची शक्यता आहे. येसू ख्रिस्त म्हणे काश्मिरात येऊन शिकून गेला. त्याने डबा हि संकल्पना मध्यपूर्वेत रुजवली असे म्हणण्यास खूप वाव आहे. ख्रिस्ती इतिहासात डबा समदृश्य गोष्टींचा उल्लेख आढळतो. लास्ट सपर वेळी सगळे डबा घेऊन आले होते का हाटेलात बसले होते हे काही आम्हास उमगले नाही अजून. असो तर भारतात निर्मलेल्या डबा या संकल्पनेचा ग्रीक काळात आणि पुढे येशू ख्रिस्तांमुळे पश्चिमेत प्रसार झाला आणि तिथेच त्याची वृद्धीही झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या चीन मध्ये डबेसंस्कृती फार बहरली नाही. कदाचित " समोर जे जिवंत दिसेल ते मारून खाणे ' या त्यांच्या स्थायी संस्कृतीपुढे डबा फिका पडला असावा. या दोन प्राचीन संस्कृतीचा मेळ आजही आपल्याला दक्षिणपूर्व आशियात बघायला मिळतो. सिंगापुरात लोक चपात्या डब्यात घेऊन जातात आणि भाजी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये मागवतात !
                अनेक शतके जुलमी राजवटीखाली दबलेल्या डब्याचा तारणहार ठरले ते म्हणजे इंग्रज! आधुनिक भारतात खऱ्याअर्थाने डबेसंस्कृती रुजली म्हणजे ब्रिटिश काळी. सायबाला प्रवास करायचा असायचा. आणि तिखट जेवण काही झेपायचे नाही! त्यामुळे इंग्रज डबा घेऊन जायचे. अलुमिनियम, पितळ असल्या धातूचे डबे घेऊन जाण्याची प्रथा तेंव्हापासून पडली. पुढे इंग्रज अधिकारी कार्यालयातपण डबे घेऊन जायला लागले. हळू हळू भारतीय चाकरमान्यांनी त्याचे अनुसरण करण्यास सुरुवात केली आणि चार कप्प्यांच्या स्टिलच्या डब्यांचा उदय झाला ! ब्रिटिश काळात मुंबई , कलकत्ता येथील सरकारी दप्तरी दिसणारा हा डबा हळू हळू संपुर्ण भारतात पसरला आणि खूप कमी वेळात जन सामान्यांच्या आयुष्याचा एक अभिन्न अंग बनला. सरकारी कार्यालयांबरोबरच शाळा,इस्पितळे, खासगी व्यवसाय, बांधकाम क्षेत्र, कारखाने अशा सर्व ठिकाणी डबे दिमाखाने मिरवू लागले. डबे इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांच्या उदय झाला आणि हळू हळू एक संस्था बनली. या सर्व काळात डब्यांच्या स्वरपटपण बदल होत गेला. इंग्रजांकडून वारसा हक्काने घेतलेल्या चार कप्प्यांच्या डब्याची काटछाट होऊन तीन कप्प्यांचे झाले. मग दोन कप्प्यांचे. मग सेलो चे डबे आले. आज काल मिक्रोवेव्ह च्या डब्यांचा सुळसुळाट आहे.
आजही जेंव्हा मी डबा घेऊन ऑफिसला जायला निघतो तेंव्हा कधी कधी मला द्वारकेकडे पोह्याची शिदोरी घेऊन निघालेल्या सुदाम्याची आठवण येते आणि मी नतमस्तक होतो. तो नसता तर आज आम्हाला ब्रेड चे तुकडे तोडावे लागले असते दुपारच्या जेवणात!

क्रमश:

Sunday, September 29, 2019

डबेपुराण - भाग १


                डबा उर्फ टिफिन उर्फ लंच बॉक्स या विषयावर  "स्टॅनली का डब्बा " किंवा "लंच बॉक्स " सारख्या आणि इतर अजरामर कलाकृती बनल्या आहेत. शिवाय मुंबईचे डबेवाले जगप्रसिद्ध. इंग्लंच्या राजकुमाराच्या लग्नाला जाऊन आलेले. आता तर कोणी किशोरवयीन मुलगा या डबेवाल्यांच्यामार्फत कुरिअर कंपनी चालवितो म्हणे. खूप प्रसिद्ध आहे तो. अशा कारणांमुळे या विषयात हात घालण्याचे धाडसच होत नव्हते मुळी.परंतु बच्चन साहेब म्हणालेच आहेत ना ? “आप बडे हुए तो क्या हुआ? हम तो छोटे नाहीं हो जाते ". डबेरी दुनियेत आपला पण खारीचा वाटा म्हणत घेतली उडी !
____________________________________________________________________________

                "आज मला डबा नको - जमेल तेवढ्या स्पष्ट (परंतु थरथरत्या) आवाजात मी ओरडलो आणि पटकन टॉवेल घेऊन अंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरलो. शिरलो काय? पळालोच म्हणा. ते चित्रपटात युद्धाच्या सीन मध्ये दाखवितात ना? - नायक गोळ्या मारतो आणि दगडाचा आडोसा घेऊन दडून बसतो. मग पुन्हा गोळीबार -तसे . फरक एवढाच- याप्रसंगी आमच्यातला नायक फक्त एकदाच थरथरत गोळीबार करू शकणार होता.कारणही तसेच होते. सकाळी उठलो तेच मुळी फोडणीच्या आवाजाने. वासावरून, आज भेंडी आहे हे ओळखले आम्ही लगेच. अर्थात भेंडीचे आणि आमचे तसे काही वाकडे नाही. सख्य पण नाही. भारताचे आणि एखाद्या बेलारूस किंवा निकारागुआ चे संबंध असावेत तसे. परंतु आज दुपारी आम्ही भेंडीची भाजी आणि पोळीचा आस्वाद घेतोय अशा स्वप्नविलासात असतांना मध्येच रेड्ड्याचा हसरा चेहेरा समोर आला आणि आमच्या तोंडचा घास निसटला. आज रेड्ड्याचे फेरवेल आहे हे आठवले आणि मी टरकलो. निरोपसमारंभ म्हणजे हमखास पिझ्झा असणार. पिझ्झा या प्रकाराचा आम्ही सार्वजिनिकरीत्या वाईट खाद्य म्हणून वेळोवेळी निषेध करीत असतो. किंबहुना आजकालच्या काळात आपण एक सजग नागरिक आणि सुजाण पालक आहे हे सिद्ध करण्याकरिता आम्हाला तसे करावेच लागते. परंतु मनापासून आवडतो मात्र. हे म्हणजे मुलांना 'स्क्रीन टाइम" कमी करण्याचा सल्ला देऊन रात्री वेब सिरीज पहात बसण्यासारखा प्रकार आहे हे आम्ही जाणतो. परंतु साक्षात ऋषी विश्वामित्र मेनकेच्या रुपाला भाळले होते. इथे तर साधी मैद्याची कडकणी आहे! त्यामुळे पिझ्झा सोडून भेंडी खाण्याचा प्रश्नच नव्हता. उठल्यापासून हिला कसे सांगावे हा प्रश्न भेडसावत होता. एव्हाना भेंडी झाली होती आणि पोळ्या लाटणे सुरु झाले होते. तेवढ्यात मी "डबा नको " म्हणून ओरडलो आणि बाथरूम मध्ये पळालो. अंघोळीचा आडोसा घेऊन पुढील पाच-दहा मिनिटे चौकशीला सामोरे जावे लागणार नाही असा अंदाज होता. परंतु साफ चुकला. आमच्या 'हिने'  - उरी चित्रपटातील "यह नया हिंदुस्थान है. यह घर मे घुसता भी है और मारता भी " हा डायलॉग खूपच सिरिअसली घेतला आणि थेट दार वाजवत बाथरूम मध्ये घुसली. अर्थात हे सगळे चिरंजीव शाळेत गेल्यानंतर घडत असल्यामुळे अनर्थ टळला.
ाय म्हणालास? डबा नको ?"
                "हो अगं -त्या रेड्ड्याचा आज फेरवेल आहे. मीच नसलो तर चांगले नाही ना दिसणार?  गेल्यावेळेस सरिताच्या सेंडऑफला पण नव्हतो मी " असे काहीतरी बडबडत मी सफाई देण्याचा प्रयत्न केला. काहीच न बोलता हि निघून गेली. जाताना दार ओढून घेतले. परंतु ते दार आपटण्याच्या आवाजाने मला योग्य तो संदेश दिला. हा प्रसंग आमच्या इतक्या वर्षाच्या संसारात अनेकदा येऊन गेला होता. पूर्वी असे काही झाले कि- "आधी सांगता येत नाही का ? इथे लोकं काय नोकर आहेत का ? लक्षात कसे रहात नाही ? आम्ही लवकर उठून यांच्या तब्बेतीची काळजी म्हणून डबा बनवायचा आणि हे आयत्या वेळी सांगणार " असे राग ऐकू यायचे घरी. सोबत " त्या महेशला ब्लड प्रेशर च्या गोळ्या लागल्या. सारखा बाहेर खात असतो . तुम्ही आता तरी सुधरा " वगैरे जीवनावश्यक सल्लेही मिळत. बरं  "लोक काय नोकर आहेत काय "? या प्रश्नात फक्त स्वतःचे कष्ट नव्हे तर प्रसंगी सासू ,आई ,कामवाल्या मावशी ,पोळीवाल्या काकू अशा समस्त स्त्रीवर्गाचे कष्ट समाविष्ट असत. थोडक्यात डबा कोणीही केला असला तरी आम्हाला असे ऐकावेच लागत. आमच्या लग्नानंतर आईला जाम खुश बघितलेले जे प्रसंग आमच्या स्मरणात आहेत-त्यात "डबा नेणार नाही म्हणूनचे बोलणे खाणे " हा अग्रणीय आहे. दोघी मिळून जाम बडवत आम्हाला.  बरं - आठवणीने आदल्या रात्री सांगितले तर आमचे अक्खे लिपिड प्रोफाइल आमच्यासमोर वाचले जात. शिवाय वेगवेगळ्या आहारतज्ञांचे असंख्यवेळा पाहिलेले व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावे लागत ते वेगळेच. आजकाल फक्त दीक्षितांवर भागते हे बरे.  म्हणजे आधी सांगितले तरी पंचाईत आणि नाही तर महापंचाईत असे हे न सुटणारे कोडे आहे. आजकाल तर कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त प्रभाव कसा पाडता येईल हे हिला चांगलेच कळून चुकले आहे. बाथरूम चे दार आपटणे हे त्याचेच उदाहरण होते. शेवटी मांडवली म्हणून न्याहरी ला ओट्स ऐवजी भेंडीची भाजी आणि पोळी खाण्याचे आम्ही कबूल केले आणि प्रसंग निवळला. एकूण काय तर 'डबा ' - आणि खास करून न नेलेला डबा हा आमच्यातील  वादाचा एक प्रमुख मुद्दा बनून आहे. ऐनवेळी डबा नेणे रद्द केल्याने स्त्रीवर्गाची होणारी पीडा प्रत्यक्ष जाणून घेण्याहेतू 'ब्राह्मोस मिसाईल' सारखे जॉईंट उत्पादन करण्याचा प्रस्ताव आम्ही बरेच दिवस हिच्या समोर ठेवू इच्छितो. म्हणजे भाजी धुवून देणे , प्रसंगी मायक्रोवेव्ह मध्ये उकडणे. पोळी साठी पीठ मोजून काढून देणे. अगदीच जमलेच तर आदल्या दिवशीचा डबा घासणे असली कठीण कामे घेऊन इतर सोपी सोपी कामे हिच्या हवाले करण्याचा आमचा विचार आहे. परंतु अजून तरी हिम्मत झालेली नाही ! बघू पुढे होते का ते !

क्रमश :

Saturday, September 7, 2019

पड्या -३


              "ब्रॉकोली आवडत नाही का रे?”- पड्याला काट्याने ब्रॉकोली बाजूला सारताना बघत न रहावुन मी विचारले.एव्हाना मी माझी डिश संपवून बसलो होतो. आपले जेवण झाल्यावर दुसऱ्याचे संपण्याची वाट पाहणे जाम जीवावर येते माझ्या. आणि त्यात समोरचा असा ताटातल्या जिन्नसांशी खेळत बसला तर राग येतोच येतो. परंतु समोर 'पड्या' होता. यांच्यासमोर रंगविणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. ठरल्या प्रमाणे पड्या आणि मी लंचला भेटलो होतो. जवळ आहे,पार्किंग मुबलक आहे म्हणून आम्ही एका मेक्सिकन रेस्टॉरंटची निवड केली. शिवाय पड्याला मी बोललो नाही पण दोन वाजताची मिटिंग होती आणि तिला उपस्थित रहाणेहेतू मी जवळच्या रेस्टॉरंटचा सल्ला दिला होता. पड्याला भेटण्यास मी कालपासून उत्सुक होतोच.तो सध्या काय करतो हा प्रश्न माझ्यासाठी कुठल्याही "ती सध्या काय करते" पेक्षा गहन झाला होता. कॉलेज नंतर या कलंदराचे पुढे आयुष्यात काय झाले हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती.बघता बघता जेवण झाले,गप्पा झाल्या आणि पड्याचा ब्रोकोलखेळ बघत बसलो होतो. शेवटी एकदाचे त्याने त्या बाजूला सारलेल्या ब्रॉकोलीच्या तुकड्यांवर चीझक्रीम ओतले आणि एक एक करून तोंडात टाकले. असा बेत होता तर ! पड्याने आणि मी एकच डिश मागवली होती. आणि संपवली होती. खाण्याच्या पद्धतीत मात्र फरक होता. त्याने वेळ घेतला परंतु आस्वाद घेत मनासारखा जेवला आणि मी चार चौघांसारखे पोटात ढकलले. किंबहुना जे जसे खातोय त्याला आस्वाद घेणे असे समजू लागलो होतो.अर्थात या नादात माझी दोन वाजताची मीटिंग बुडाली. बिल देऊन बाहेर पडलो .पड्या दोन दिवसांनी भारतात जाणार होता. त्याला सदिच्छा दिल्या आणि मी आपल्या डेस्क पाशी जाण्यास वळलो . परत कधी भेट होणार माहित नव्हते. त्या एका क्षणाला मला गहिवरून आले आणि मी पड्याच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडू लागलो. सीवन यांना विक्रम गेल्याचे जितके दुःख होत असेल तितकेच मला पड्या पुन्हा भेटणार नाही याचे होत होते. वास्तविक गेले वीस एक वर्ष माझा आणि त्याचा काहीएक संबंध नव्हता. एवढेच काय,मला क्वचितच त्याची आठवण येत.तरीही माझे अश्रू अनावर झाले होते. बरं महाविद्यालयातील जुन्या आठवणींवरून 'सेंटी' झालोय असे म्हणाल तर इतर बरेच मित्र गेले अनेक वर्ष भेटत आले होते. 'पुरानी जीन्स' म्हणत आम्ही त्या आठवणींना उजाळा देत, त्या क्षणापुरते नॉस्टॅल्जीक होत आणि पुन्हा आपआपल्या आयुष्यात रमून जात. आज मात्र काहीतरी वेगळेच घडत होते.
                पड्याची अगदी संक्षिप्त कहाणी म्हणजे -बहुतांच्या अपेक्षेप्रमाणे त्याला काही कॅम्पस जॉब मिळाला नव्हता. बरं याच्यासारखे आणखी बरेच होते. पण त्यांनी निकाल लागताच मुंबई/पुणे गाठले. काहींनी जमेल तिकडे आपापले 'रेझ्युमे' धाडले. पड्याने पहिले सहा महिने तर शिक्षण संपल्यानंतरचा विश्राम करण्यात घालविले .दरम्यान याच्या बाबांनी पन्नास एक मित्रांना नोकरीसाठी गळ घातली होती.काहीही उपयोग झाला नाही. काम चांगले नाही म्हणून चक्क जातच नसे मुलाखतीला. शेवटी घरी बसून कंटाळला तर 'कुलकर्णी असोसिएट्स' नावाची सांगलीतील अज्ञात कंपनी गाठली. तिथे नेटवर्क इंजिनिअर म्हणून महिना ५०० रुपयावर रुजू झाला. काही दिवसात त्याला लक्षात आले कि संगणकांवर फडके मारणे,विंडो इन्स्टॉल करणे आणि लॅन केबल दुरुस्त करणे या व्यतिरिक्त त्याला दुसरे काहीही काम नव्हते. कंटाळून ऍपटेक मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाला. तिथे कोणीतरी सी –डॅक च्या कोर्से ची माहिती दिली आणि साहेबांची तयारी सुरु झाली. सी -डॅक ची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि बेंगळुरू येथे कोर्सेसाठी रुजू झाला. कोर्सदरम्यान शीतलशी खास मैत्री झाली. शीतल त्याच्याच वर्गातील एक अतिशय अभ्यासू,सरळ आणि 'बिलो रडार' मुलगी. आपले लेक्चर ,प्रॅक्टिकल ,अभ्यास ,असाइनमेंट या पलीकडे ती काहीही पहात नसत.गोलमाल(जुना) मधील राम प्रसाद शर्माचे फिमेल व्हर्जन म्हणा. पड्या दिवसातून जेवढा वेळ कॅन्टीनला घालवीत तितका कदाचित शीतल आठवड्यातपण घालवत नसेल. फायनल इयरला एक दोन वेळा मी दोघांना बोलताना पाहिले होते. परंतु काही वेगळे वाटले नाही. आणि तेंव्हा नसेलही कदाचित. पुढे बेंगळुरू ला दोघांची गट्टी जमली आणि लग्न करायचे ठरले. परीक्षित राजे लगेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार. शीतलला हा कसा आवडला हे मोठे कोडे होते. पण काय ना - दिल आया गधे पे तो  (कुठल्याही हिरोचे नाव घाला -तसेही आपल्याला कोणीच आवडत नाही ) क्या चीझ है ? दरम्यान शीतलला पटणी मध्ये जॉब मिळाला होता. तीच्या बाबांनी मुलाला नोकरी पाहिजे अशी अट घातली ( शीतल आणि पड्याच्या  बाबांचा तो डाव होता). दोन आठवड्यात पुण्यातील एका कंपनीत नेटवर्क इंजिनिअर म्हणून रुजू पठ्ठ्या ! अर्थात ती पण नोकरी लग्न झाल्यावर काही महिन्यात गेली. पुढे अशाच नोकऱ्या मिळत गेल्या आणि पड्या सोडत गेला. किंवा असं म्हणा -पड्या नोकऱ्या सोडत गेला आणि तरीही त्याला मिळत गेल्या. दोन पान भर यादी होती त्याने काम केलेल्या कंपन्यांची. मला दाखवली तर मी हबकलोच. पुण्यातील एकही संगणकक्षेत्रातील छोटी अथवा मोठी कंपनी याने सोडली नव्हती धरायची -आणि सोडायची. आय टी क्षेत्र त्याकाळी 'बुमिंग' होते .त्यामुळे नोकऱ्या मिळत. शिवाय पड्या हुशार होताच. परंतु मनमौजी कारभार. बऱ्याचशा यानेच सोडल्या. काही ठिकाणी डच्चू मिळाला. दरम्यान शीतल संसाराचे एक टोक धरून होती . पटणी , पुढे कॅप जेमिनी पुढे अशीच एक मोठी आय टी कंपनी अशी तिची प्रगती सुरु होती. या सगळ्यात 'सुजय' चा पण जन्म झाला होता. सहा वर्षांपूर्वी शीतलला अमेरिकेत संधी मिळाली आणि सगळे इकडे स्थायिक झाले. पड्या डिपेंडेंट व्हिसा घेऊन नोकरी करू लागला. इथे पण त्याने तीन एक कंपन्या बदलल्या होत्या. शीतल मात्र फिनिक्स ला स्थायिक झाली आणि पड्या नोकरी मिळेल तिथे हिंडायचा. या सर्व काळात -काही दिवस अपवाद सोडले तर पड्या घरी बसून खातोय असे मात्र झाले नाही. तेवढा सुज्ञ तो निश्चित होता. दोन तीन दिवसांपूर्वीच आमच्या इथे रुजू झाला होता. इतक्यात बाबा आजारी असल्याची बातमी कळली आणि भारताची वारी करणे भाग पडले.
                त्या संध्याकाळी हिला पड्या पुराण ऐकविले. "धड नोकरी करता येत नाही. बायको मुलाचा सांभाळ करता येत नाही. तरी बरं ती बायको नोकरी आणि संसार सांभाळून आहे. त्यात तूला रडण्यासारखे काय झाले? " असा सरळ साधा निष्कर्ष काढून हि मोकळी झाली. मी पड्याचे एवढे कौतुक का करतोय हेच तिला कळत नव्हते. चूक काहीच नव्हते. दहा पैकी नऊ जणांनी असाच निष्कर्ष काढला असता. परंतु असा निष्कर्ष काढणाऱ्यांनी त्या प्रवासाचे शेवट -'फलित' पाहून आपला निष्कर्ष काढला होता. तो प्रवास कसा होता याचे कोणाला काहीच नव्हते. आज मला भेटलेला पड्या अगदी वीस वर्षांपूर्वीची प्रतिकृती होता. वयाने आणि काळाने जे काही बदल केले तेवढेच. तसाच बिंदास -बेफिकीर. आयुष्याच्या बोज्याने दबलेला नव्हता अगर उगाच जवाबदारीचा बागुलबुवा नव्हता. स्वछंद पक्षी -वीस वर्षांपूर्वी होता तसाच. ना कालची भीती -ना उद्या ची काळजी. वास्तविक आयुष्यात तो रोल मॉडेल निश्चित नसणार कारण प्रस्थापित जगात तो यशस्वी 'दिसणार' नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याचदा आपण नदीचा उलटा प्रवाह पोहून जात होतो तर पड्या मिळेल त्या नदीच्या प्रवाहाप्रमणे अलगद पुढे जात होता. त्याला 'डेस्टिनेशन' नव्हतेच मुळात. त्यामुळे जे काय ते प्रवासच  होते त्यांच्यादृष्टीने. आपण सगळेच मनाप्रमाणे वागून आनंदी राहण्याच्या वल्गना करीत आयुष्य घालवितो. संपूर्ण आयुष्य 'पड्या' च राहण्याची भाषा बोलतो  परंतु कार्यकर्तव्यभावमुळे म्हणा किंवा इतर बोज्यांमुळे तसे कधीच रहात नाही. पड्या मात्र जागचा हालला नव्हता. हिच काय ती त्याची 'चूक'
समाप्त


Wednesday, August 28, 2019

पड्या -२

              "आठ रुपये मिळतील का?  सुट्टे नसतील तर दहा पण चालतील. आयला नेमका काल पास काढायचा राहिला अन पाकिटात दोन पाचचं नाणं ठेवलं होतं. कुठं पडलं कोणास ठाऊक" - सायंकाळी कॉलेज संपल्यावर फ्रेश होऊन होस्टेलच्या रूमवर नुकताच येत होतो तर दारातच पड्या भेटला. "नाही रे. माझ्याकडे नाहीत. कडकी चालू आहे. अजून बँकेत पैसे आले नाहीत" असे काहीबाही सांगून मी पड्याला कटवला. हॉस्टेलवर राहिला लागल्यावर ज्या अनेक दुनियादारी च्या गोष्टी तुम्ही शिकता त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे आपले पैसे जपून ठेवणे. अर्थात अडी-अडचणीवेळी मित्रच उदार होऊन मित्रांची मदत करतात हा भाग वेगळा. परंतु पड्याला कटविण्यामागचा हेतू फक्त पैसे वाचविण्याचा नव्हता. शिवाय माझी मनी ऑर्डर आठवड्यापूर्वीच आली होती. त्यामुळे तूर्त तरी कडकी नव्हती . तो मेस मध्ये फुकटचे जेवून गेल्याचा माझ्या मनात राग होता. त्या दिवसानंतर मी त्याला फार जवळ केले नव्हते. येता जाता स्मितहास्य एवढेच. तो राग निवळायच्या आताच हा बहाद्दर परत दहा रुपये मागायला दारात ! "ओक्के" म्हणत पड्या निघून गेला. रात्री मलाच माझे वाईट वाटले. खरेच हा पैसे विसरला असेल तर ? मान्य कि मेस मध्ये फुकट जेवला. परंतु बोलावलं तर मीच होतं ना ? कसा गेला असेल घरी? कि थांबला असेल होस्टेलवर कोणाच्यातरी खोलीत ? घरी कळविले असेल का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन गेले . कॉलेज सुरु होऊन दोन एक महिने झाले होते. त्यामुळे मन अजून कोवळे होते. निगरगट्ट झाले नव्हते. शिवाय मी खोटे बोलल्यामुळे अपराधीपणाची भावना मनात होती. कितीही आव आणला तरी माणूस मूळ स्वभावापासून फारकत घेऊन फार काळ नाही राहू शकत. या अपराधीपणाच्या भावनेमुळेच कदाचित दुसऱ्या दिवशी मी पड्याला शॉर्ट ब्रेक वेळी चहाचे आमंत्रण दिले. तो रागावला आहे का हे हि पडताळून पहायचे होते. लगेच तयार झाला. " अण्णा एक फुल -दो मे देना ". ऑर्डर त्यानेच दिली आणि पैसे ही. "अरे हं - तुझी कडकी चालू आहे ना ? हे घे म्हणत पन्नास ची नोट माझ्या हातात सरकावली. मला अजूनच ओशाळल्यासारखे झाले. माझे रिडींग चुकले होते तर. चहा दरम्यान पड्याबद्दल आणखी माहिती मिळाली. मूळचा सांगली जिल्ह्यातील विट्याचा. अकरावीपासून सांगलीत शिकायला. बुधगावला आत्याकडे राहतो. हा आणि आप्पा ( अरुण पाटील ) दोघे विट्याचे. अप्पाने होस्टेलला रहायचे ठरविले आणि पड्यापण नॉन रेसिडेंट होस्टेलवासी झाला. सकाळी कॉलेजला बस ने येणार. आणि संध्याकाळी उशिरा बुधगव ला परत. असा याचा दिनक्रम . शनिवारी विट्याला घरी. बोलण्याने गैरसमज दूर झाले आणि आमची मैत्री झाली-म्हणजे माझ्या दृष्टीने. पड्या तर आधीच हक्काने जेवायला आला होता माझ्यासोबत! शिवाय माझ्या बाबांचे मूळ गाव विटा तालुक्यातील. त्यामुळे का कोण जाणे पड्याबद्दल आणखीच थोडी आपुलकी वाटली. दसरा रविवारी होता. पड्या आग्रहाने घरी घेऊन गेला. श्रीखंड, पुरी बटाट्याची भाजी , भजी ,मसालेभात असे भरलेले ताट पाहून मी भारावलो. होस्टेलवासीयांना घरचे जेवण मिळाल्यावर जो आनंद होतो तो आजकालच्या लहान मुलांना पिझ्झा मिळाल्यापेक्षा कैक पटींनी अधिक असतो. यावेळी दुप्पट जेवणाची पाळी माझी होती.
                जुनिअर कॉलेजातील पुर्वश्रमीची दुश्मनी, मुलीच्या प्रेमापोटी स्पर्धा किंवा चोरीचा आरोप असली काही करणे सोडली तर इंजिनिअरिंग कॉलेजात दुश्मन कोणीच नसते. होस्टेलवरतर नाहीच नाही. सगळेच मित्र असतात. रूम पार्टनर, गावाकडचे मित्र ,वर्गातील मित्र, खास मित्र, कट्ट्यावरचे मित्र ,पैसेवाले मित्र ,निवडक मैत्रीणी,असाइनमेंट वाले मित्र. प्रॉक्सी लावणारे मित्र अशी मित्रांची विविध वर्तुळं असतात. जो तो आपापल्या वर्तुळात फिक्स असतो. न्यूटन च्या नियमाप्रमाणे काही बाह्यघटनेमुळे वर्तुळं बदलली तरच. पड्या माझ्या अशाच एका वर्तुळाचा भाग झाला. तो इलेक्ट्रॉनिक्सचा आणि मी कॉम्प्युटर्स. त्यामुळे वर्ग एक नव्हता. परंतु तो वारंवार होस्टेलवर येत असल्याकारणाने भेट व्हायचचीच. मैत्री झाली असली तरी खरे सांगायचे झाले तर पड्या मला विचित्रच वाटत-नव्हे तो होताच. त्याला काही गंभीरताच नव्हती. मनात आले तर हा लेक्चरला दांडी मारणार. तेवढेच नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा बुडवणार. कधी कॉलेज ला येणारच नाही तर कधी माझ्या किंवा अण्णाच्या रूमवर बसून रात्री उशिरापर्यंत असाइनमेंट संपवूनच घरी जाणार. मनाचा राजा. बरं निष्काळजी किंवा विसराळू म्हणाल  तर , माझ्या अप्लाइड मेकॅनिक्स च्या नोट्स हरविल्या तर आठवणीने दुसऱ्या दिवशी गावातून आणून मला दिल्या. परंतु स्वतः ड्रॉईंग शीट विसरणार हमखास. पी एल सुरु झाली तसा पड्या होस्टेलवरच पडीक असायचा. का कोणास ठाऊक. कदाचित घरी काही अभ्यास करीत नाही म्हणून घरचे जबरदस्तीने स्टडी लायब्ररीत पाठवीत असतील. परंतु काही उपयोग झाला नाही. हा पठ्ठया चार वेळा कॅन्टीन ला जाणार, क्रिकेट खेळणार,गाणी ऐकणार, मॅच बघणार टीव्हीवर आणि हे सगळे करून मनात आले तर अभ्यास. बाकीचे विद्यार्थी टेन्शन मध्ये असताना हा मात्र मनमौजीपणे वागणार. जणू याला परीक्षेचा नियम लागूच नाही. आणि कधी मूड आला तर नाईट मारून एखादे पुस्तक संपवून टाकणार. आम्ही बाकीचे मित्र त्याला 'टॉम मूडी' चिडवायला लागलो. पहिल्या सहामाही परीक्षेचा निकाल लागला. मी तर सुटलो.आश्चर्याची गोष्ट म्हणजे पड्याचा निकाल पण काही वाईट नव्हता.मेकॅनिक्स, ड्रॉईंग , गणित असे महत्वाचे विषय याने प्रथम-द्वितीय श्रेणीत सोडविले होते. पण मामेभावाच्या लग्नाला जायच्या नादात पठ्या सिव्हिल ची ओरलच विसरला होता. ती राहिली. पड्या हुशार होता तर. म्हणावा तर निष्काळजी पण नव्हता. परंतु बाकीच्यांसारखे टेन्शन घेऊन जगणारा नव्हता. मनात येईल तसे करणार. आऊट कास्ट नव्हता अगर आऊटस्टँडिंग पण नव्हता - रँचो सारखा. वर वर पाहिले तर अगदी चार चौघांसारखा. पण खोलवर पाहिले तर एक स्वछंदी पक्षी होता.आपल्या पंखांची क्षमता माहित असल्यामुळे आतातायीपणा टाळणारा परंतु जे जमेल त्यात मनमुराद आनंद लुटणारा.
                कॉलेजातील पुढील ३ वर्षे आमची मैत्री अबाधित राहिली. फार घनिष्ठ नाही. पण भेटणे व्हायचे.पड्याच्या घरी अनेकदा जाणे झाले. काकुंशी चांगलीच ओळख झाली. त्यांनाही याच्या मनमौजी स्वभावाची काळजी वाटत. "हुषार आहे. समजूतदार आहे. पण लहरी आहे. पुढे जाऊन कसे होणार काय माहित" असे त्या नेहेमी बोलून दाखवत. होस्टेलवर असला कि मुक्काम बऱ्याचदा माझ्या खोलीवर असत. स्वतः अभ्यास करीत नसला तरी दुसऱ्यांना अक्कल शिकविणे किंवा टिंगल करणे असले त्याच्या स्वभावात नव्हते. आपण कधी सिरीयस होण्याबद्दल लेक्चर दिले तर शांतपणे ऐकून घेणार. परत -ये रे माझ्या मागल्या. त्याला ना काल केलेल्या (अथवा न केलेल्या) गोष्टींबद्दल भीती होती ना उद्याची काळजी. फार काही तत्वज्ञान वगैरे पाळत नव्हता. चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेत पिणे एवढेच त्याला माहित होते. परंतु परीक्षा, फर्स्ट क्लास ,ऑल क्लिअर ,कॅम्पस ,जी आर ई  असल्या जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रित असल्यामुळे पड्या समजून घ्यायला ना कोणाला सवड होती ना इच्छा. शेवटच्या वर्षी काहींना कॅम्पस जॉब मिळाला तर काही मुकले. पड्या दोन कंपनींना कॅम्पस करिता पात्र झाला. बॉर्डर चित्रपट पाहून यायला उशीर झाला ( कॉलेज बुडवून गेला होता ) म्हणून एक इंटरव्यू हुकला आणि दुसऱ्यात मुंबईच्या कंपनीला म्हणाला कि तुमची पुण्यात शाखा असेल तर येतो नाही तर नाय ! कॉलेज संपले आणि मित्रांचा संपर्कही तुटला. आयुष्यभर संपर्कात राहण्याच्या आणाभाका वर्षभरात विरल्या. आमच्या पिढीसाठी २०१० पर्यंतचा काळ हा 'डार्क एजेस ' होता. नंतर फेसबुक आले आणि चित्र बदलले. त्याआधी नाही म्हणायला काही लोक ऑर्कुटवर होते. परंतु तुरळकच. याहू ग्रुप नावाचा प्रकार पण अस्तित्वात होता. परंतु  अति फॉर्वर्डस मुळे तोही निष्काम झाला. माझा कॉलेज संपल्यावर एखाद डिड वर्ष पड्या आणि त्याच्या घरच्यांशी मोघम संपर्क होता. एकदा सांगलीला गेलो असता त्याला भेटायलाही गेलो होतो. तेंव्हा पड्या 'सी डॅक' च्या परीक्षेची तयारी करीत होता. तेंव्हा जी भेट झाली त्यानंतर आज थेट  अमेरिकेत भेटलो होतो पड्याला.
क्रमश:

Tuesday, August 20, 2019

पड्या -१


       रोज सकाळी चहा, अल्पोपहार घेऊन ऑफिसला जाणे आणि पुन्हा पंधरा मिनिटांनी अनावश्यकरीत्या कॉफी पिणे हा आमचा दिनक्रम. सकाळी कॉफी पिण्याची हि वायफळ सवय मला हिंजेवाडी पासून लागली. हिंजेवाडीला ऑफिसला जायचो तेंव्हा घरून ऑफिसला पोहोचेपर्यंत हमखास चहाची तलप यायची.आजकाल म्हणे घरून न्याहरी करून निघाले कि हिंजेवाडीला ऑफिस गाठेपर्यंत जेवायची इच्छा होते. सुदैवाने हिंजवडी इतक्या भयानक रहदारीला सामोरे जाण्याची वेळ नाही येत सध्या आमच्यावर .परंतु सकाळी गरम पेय घेण्याची सवय मात्र कायम राहिली.चहाची जागा कॉफीने घेतली इतकेच. सकाळची कॉफी सोडावी असे अनेकदा ठरवितो. परंतु आमच्या स्वभावाचे जडत्व आडवे येते नेहेमी. असो तर एके सकाळी कॉफीचे पैसे देण्याच्या (आमच्याकडे फुकट नाही मिळत) रांगेत उभा असताना "ए भावड्या " असा मागून आवाज आल्याचा भास झाला.तो '' होता कि नाही या बाबतीत थोडा शशांक होतो मी. परंतु मुळात ती हाकच एक भास होता असे समजून मी रांगेत पुढे सरकलो. अमेरिकेतील फॉर्च्युन १०० कंपनी च्या उपाहारगृहात तुम्हाला अनुक्रमे तेलगू , इंग्रजी,हिंदी या भाषा ऐकायला मिळतील. कधी क्वचित स्पॅनिश,गुजराती किंवा तमिळ ऐकायला येण्याची शक्यता आहे. पण मराठी? नाही म्हणायला मराठीजन बरेच आहेत ऑफिसात. पण म्हणतात ना "व्हेन इन मुंबई स्पिक भय्या हिंदी", तेच अनुसरुन मराठी लोक गुडी पाडवा आणि गणपती हे दिवस सोडल्यास एकमेकांशीपण इंग्रजीत बोलतात.आणि अगदी कधी मराठीत बोलण्याचा आवाज ऐकू आलाच तर "काय म्हणताय ", "झाले का जेवण" ,"एवढ्या लवकर घरी " असले ठरलेले शब्द कानी पडतात. अगदीच झालेच तर "मम्मी तू नको इतकी कामं करत जाऊस. सांग तिला- बाई लाव म्हणावं " असे माय लेकींचे फोनवरचे संभाषण लिफ्ट मध्ये कानी पडते. अर्थात लेक लिफ्ट मध्ये असते आणि माय भारतात  मोठ्या आवाजात भावड्या वगैरे म्हणजे माझा कल्पनाविलास असणार निश्चित.
                कॉफीचे पैसे देऊन बाहेर पडतो तोच  " ओ गोसुशेठ " अशी हाक पुन्हा कानी पडली. या अमृतवाणीचा करता नाही तरी करविता मीच होतो तर. मागे वळून पाहिले आणि तो '' मुळात नव्हताच हि खात्री पटली. एरव्ही मला अशी मोठ्याने मारलेली हाक ऐकून मी थोडा गोंधळलो असतो कदाचित. परंतु मोठा आवाज सोडला तर कोणाला काही कळणार नाही या विचाराने मला निर्धास्त केले. काही लोक हे 'काळ प्रूफ' असतात. कितीही वर्षे झाली तरी त्यांचे दिसणे ,आकलन, कर्तृत्व अगदी तस्सेच असते. उदाहरणार्थ सैफ , राहुल (हो तोच तो गांधी ), सचिन - पिळगावकर,तेंडुलकर नव्हे. माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती पण त्याच 'लीग' मधील होती. वीस वर्षानंतर पण 'पड्या' ला मी पाहता क्षणीच ओळखले. आणि " काय रे चमनप्राश खातो का लै ? चमनगोटा झालाय वर " या भंगार विनोदाने त्याच्या 'लीग' ची खात्री पटली. सहा-आठ चमचे साखर( मी मोजणे थांबविले ) आणि किमान अर्धा पाऊण कप 'क्रीम' घालून पड्या ने कॉफी घेतली आणि आम्ही गप्पा मारायला बसलो. हर्ष ,आश्चर्य , तू इकडे कसा -मी इकडे कसा अशी प्राथमिक विचारपूस करून झाल्यावर मी मिटिंग आहे म्हणून जायला उठलो तर "थांब रे ! काय करतो मिटिंग ला जाऊन " म्हणत मला बसवून घेतले. " तुला नाही का साल्या काही मिटिंग वगैरे" मी तूर्त सुटका करून घेण्याच्या इराद्याने विचारले. "आहे ना. तिकडेच जाणार होतो. पण तू दिसला आणि विचार बदलला". पड्या अजिबात बदलला नव्हता तर. महत्वाची मिटिंग असल्याकारणाने मी त्याचा विरोध न जुमानता उठलो. दुसऱ्या दिवशी लंच ला भेटायचे ठरले आमचे.
                'पड्या' माझा कॉलेजचा बॅचमेट. त्याची आणि माझी भेट साधारण पहिल्या सेमिस्टरच्या सुरुवातीस झाली. आमच्या हॉस्टेल समोरच्या कच्च्या रस्त्यावर काही मुले नेहेमी दोन दगडं स्टंप लावून क्रिकेट खेळायची. जेंव्हा पहाल तेंव्हा हे त्या क्रिकेट 'पीच' वर पडीक असत. खास करून हा 'पड्या'. कॉलेज नुकतेच सुरु झाल्याकारणाने कोण कुठल्या वर्गात हे नीटसे माहित नव्हते. मुळात हि मुले फर्स्ट इयरची नसतील या अशांकने आणि 'रॅगिंग' च्या भीतीने मी फारसे विचारायच्या भानगडीत पडलो नाही. परंतु जुजबी तोंड ओळख झाली होती. माझी खोली समोरच असल्याकारणाने त्यांचा आरडा ओरडा ऐकू येई. त्यातल्या एकाचे नाव 'पड्या' असल्याचे कळले. आमच्या कॉलेजात प्रद्युम्न ,आशुतोष, अरुण अशी सरळ सोपी नवे क्वचितच ऐकायला मिळायची.' रां*च्या ' हे  सगळ्यांचे 'जेनेरिक' नाव सोडल्यास, खेड्या ,भोळ्या, गोश्या ,अण्णा ,नाना, पंड्या अशी 'टोपण नावे' असत. काही जण आपली पूर्वाश्रमीची टोपणनावे 'कॅरी फॉरवर्ड' करीत तर काहींचे -मुख्यत्वे बाहेरून आलेल्यांचे , कॉलेजात आल्यावर बारसे घालण्यात येई. मुंबईकर मात्र आपली 'माँटी,' बंटी',' सॅमी','घोडा' अशी संदर्भहीन टोपणनावे घेऊन येत. त्याचे नाव घोडा का हा विचार करण्यात आमची चार वर्षे निघून जात. कदाचित तोच उद्देश असावा. असो. तर या क्रिकेटर मुलांशी ओळख करण्याचा धाडसी निर्णय मी एके दिवशी घेतला. त्या निमित्ताने आपल्याला पण थोडं क्रिकेट खेळता येईल असा उद्देश. सायंकाळी मेस ला जेवायला जातांना सहज 'चला जेवायला' म्हणून हाक दिली. पड्या लगेच बॅट टाकून माझ्या सोबत यायला तयार झाला. जेवायला माझ्या शेजारीच बसला. मला थोडे आश्चर्य वाटले. कारण सहसा जो तो आपल्या रूममेट्स सोबत किंवा मित्रांसोबत बसत असे. वाढपी ताट घेऊन आला तर माझ्याकडे बोट दाखवून 'एक गेस्ट'  म्हणत पड्या ने ते ताट स्वतः कडे ओढून घेतले. गेस्ट ? माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. मनात इतक्या इतक्या शिव्या दिल्या या पड्या ला. "अरे आपली धड ओळख तरी आहे का ? आणि तू सरळ गेस्ट ?". पण स्वतःच मोठ्या तोंडाने 'चला जेवायला " म्हणत आमंत्रण दिले होते. शिवाय हा 'फर्स्ट इयर' चा नसेल हि भीती होतीच.त्यामुळे गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु अशा कोणाच्याही हाकेवर सहजरित्या जेवायला येणारे बहाद्दर या जगात आहेत हे बघून आश्चर्य वाटले. माझ्या साधारण डिड ते पाऊणे दोन पट जेवून पड्या उठला. अनोळखी मुलाला जेवायला घालून सात रुपयांचे नुकसान झाले या दुःखामुळे आणि रागामुळे मी अगदीच जुजबी बोललो जेवतांना. हात धुवून पड्या ने गेस्ट रजिस्टर मध्ये नोंदणी केली आणि मला याची प्राथमिक माहिती मिळाली
परीक्षित देशपांडे, प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स,  राहणार बुधगाव सांगली .
लोकल मुलाने अगदीच तुरळक ओळखीच्या कोणाबरोबर काहीही कारण नसताना कॉलेज च्या मेस मध्ये जेवण्याचा अकल्पनीय प्रकार घडला होता. त्याचा करविता होतो मी आणि करता - परीक्षित देशपांडे उर्फ पड्या.
क्रमश :

टीप :या आणि संबंधित लेखांतील उल्लेख  काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही व्यक्ती अथवा घटनांशी संबंध नाही