Monday, July 27, 2020

सत्यवचन

 टीप - हा राजकीय लेख आहे.
मागील लेखात जे  मी म्हणालो ( दोन भयंकर प्रश्न ) ते आज राहुल गांधी स्वतःच बोलले. म्हणे 'करियर' बुडाले तरी बेहेत्तर पण 'खरे' बोलणे सोडणार नाही. त्यांचे एक वेळ ठीक आहे हो . पण पक्षाचे काय ? हे म्हणजे 'हम तो डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे ' अशातला प्रकार आहे. राहुल गांधींनी कुठले राजकारण कसे करायचे हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्यात काँग्रेसची फरफट कशाला ? असंख्य काँग्रेस जण आपले सरकार येण्यासाठी झटतायत. आणि का झटू नये ? जसे फायदा होणे हा धंद्याचा मूलभूत सिद्धांत आहे तसेच निवडणुका जिंकून आपले सरकार येणे आणि आपली नीती राबविणे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा अधिकार आहे आणि कर्तव्य सुद्धा . आपल्याकडे "काँग्रेस मुक्त भारत " च्या आरोळ्या ठोकणारे बरेच आहेत. आणि ती कल्पना सत्यात आल्याने भारताची भरभराट होईल -आपल्या सगळ्या समस्या सुटतील असे समजणारे तर त्याहून अधिक. त्या हिशोबाने अगदी शून्य नाही पण काँग्रेसचे फक्त ४०-५० खासदार असतांना आपली बऱ्यापैकी प्रगती व्हायला पाहिजे होती-नाही का ? पण तो वेगळा विषय आहे.
काँग्रेस मुक्त भारत झाला तरी काही हरकत नाही हो.परंतु एक लक्षात ठेवा- बावन्न खासदार असूनही आज काँग्रेसच लोकसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. आणि भारतात सध्यातरी भाजप आणि काँग्रेस सोडले तर देशव्यापी असा दुसरा कुठलाही पक्ष नाही. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले 'राष्ट्रीय पक्ष' बरेच आहेत. परंतु त्यांची आपल्या राज्यापलीकडे पोच नाही किंवा अगदी नगण्य आहे . विविध राज्यातील लोकसभेच्या जागा पाहता आणि संभावित पक्षीय बलाबलाचा अंदाज घेता - काँग्रेस सोडली तर फक्त उत्तर प्रदेश (८५  जागा ), महाराष्ट्र ( ४८ जागा ) आणि पश्चिम बंगाल ( ४२ जागा) इथूनच प्रबळ दावेदार पुढे येऊ शकतात. त्यात महाराष्ट्रात कमीत कमी चौकोनी लढाई होत असते. आपले दादरवाले झोपलेले असतात ना? त्यामुळे अगदी मोठी उडी मारली तरी भाजप -काँग्रेस सोडल्यास तिसऱ्या पक्षाला फार फार तर २५-३० जागा मिळतील. तीच गत उत्तर प्रदेशाची - योगींची किमया ,भाजपचा प्रभाव ओसरला असे समजले तरी दुसरा कुठलाही पक्ष ५०-५५ जागांपेक्षा जास्त मिळवू शकत नाही. पश्चिम बंगाल मध्ये भाजप जोर पकडतोय. शिवाय कम्युनिस्ट कदाचित पुन्हा डोके वर काढतीलाच. अशा परिस्थितीत तृणुमुल ला ३० जागा मिळाल्या तरी विजयच समजायचा. म्हणजे पुढील काळात भाजपचे सरकार आले तर विरोधात असणारा सर्वात मोठा पक्ष ( काँग्रेस मुक्त झाल्यास ) हा ४०-६० खासदार असलेला असेल ( गेले वर्ष तीच गत आहे म्हणा). आणि जर समजा भाजप सरकार स्थापन करू नाही शकला तर पुन्हा ५० जागा असलेला पक्ष त्या तथाकथित आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असेल. ५० खासदार असलेल्या पक्षाचा नेता २७२ खादारांचे 'समर्थन' दाखवून सरकार बनविणार. या आधीपण आपण असली खिचिडी सरकारं अनुभवली आहेत. किती टिकली माहीतच आहे. बरं तेंव्हा तर सर्वात मोठ्या पक्षाला निश्चितच शंभरापेक्षा जास्त जागा होत्या. तरीही दोन वर्षांच्या वर कुठलेही सरकार टिकले नाही.
देशाच्या प्रगतीसाठी एक स्थिर सरकार असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच लोकशाही प्रबळ करण्याकरिता एक सशक्त आणि सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. एकहाती सत्ता कधीच चांगली नाही . मग ते मोदी असोत कि आणखी कोणी. ती एक म्हण आहे ना -"Power Corrupts. And absolute power corrupts absolutely". इथे करप्शन चा अर्थ हा फक्त भ्रष्टाचार असा घेता अनिर्बंध कारभार असा घ्यावा. उदाहरणे बरीच आहेत. पुतीन घ्या किंवा तुर्कीस्तानचे एरोगन घ्या . मतितार्थ असा कि एकहाती सत्ता आणि ती पण सक्षम विरोधी पक्षा आभावी देशासाठी आणि लोकशाही साठी महाघातक ठरत असते. मग यातून मार्ग काय ? अगदी असे समजले कि भारतातील १०-१५ पक्षांनी स्वतःला  एका मोठ्या पक्षात 'विलीन' केले तरीही नेत्यांचे वयक्तिक हेवेदावे हे राहणारच. म्हणजे विरोधात असले तर फोडणे शक्य आणि सरकारात असले तर स्थिरतेला धोका. तत्वांवर आणि समान विचारधारेवर आधारित एका नवीन पक्षाची स्थापना हा मार्ग असू शकतो. परंतु त्याला भयंकर संयम लागतो. क्षणिक फायद्याचा विचार केला तर फार पल्ला गाठणे कठीण जाते. आम आदमी पक्षासारखे . आणि समजा जरी असा पक्ष उदयास आला तरी राष्ट्रीय स्थरावर प्राबल्य मिळवायला त्यांना १५-२० वर्ष लागतील. भाजप हा संयमी आणि कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. आणि त्यांना एक नैतिक अधिष्ठान आहे ( तुम्ही माना अगर नका मानू ). त्यामुळे त्यांच्यात मोठी फूट पडेल आणि तो फुटीर गट फार काळ तग धरेल असे वाटत नाही. मग पर्याय काय उरतो ? तर काँग्रेसचे पुनरुत्थान किंवा सक्षमीकरण. गांधीरहित काँग्रेस कदचित टिकेल किंवा टिकणारही नाही. बरं तो गांधीरहित असेल किंवा असावा असेही नाही . परंतु काँग्रेस पुन्हा 'रुळावर'यायला वाव जरूर आहे. आणि राहुल गांधी ती रुळेच  एक एक करून उखडून टाकतायत. का तर 'मी म्हणतो ते आणि तेच खरे" या अहंकाराकरिता. उरलेल्या काँग्रेसजनांनी एकत्र येऊन उठाव करण्याची हीच ती वेळ आहे. नाही तर राहुल जाईल निघून कंबोडियात आणि बाकीचे बसतील टाळ पिटत. स्वतःकरिता ,देशाकरिता आणि लोकशाहीकरिता हे काँग्रेसजनांनो वेळीच जागे व्हा !काँग्रेससातील 'आत्मा' आणि स्वाभिमान गेले अनेक वर्षात पद्धतशीरपणे संपविण्यात आला आहे हे  आम्ही जाणून आहोत . तरीही  आम्हाला वाटते म्हणून लिहिले. बाकी तुम्ही ,तुमचा पक्ष आणि तुमचे नशीब ...
             राहता राहिला प्रश्न " सत्याचा" .  तर राहुल 'सत्य  सांगतच नाही आहेत . ते त्यांच्या दृष्टिकोनातून 'वास्तव' सांगतायत. आणि वास्तवाला अनेक बाजू असतात. आणि ते बदलते. राजकारणात त्यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात. There is difference between Truth and reality. Truth is absolute and perennial. Reality has multiple faces and is ever changing.

Saturday, July 18, 2020

दोन (भयंकर ) प्रश्न


परवाची गोष्ट. आता तुम्ही म्हणाल ,हा नेहेमी 'परवाच्या' गोष्टी का सांगतो बरे ? तर कारण सरळ आहे ( हॅ , आपण नाही घाबरत सत्य सांगायला !) फार खोल इतिहासाच्या गोष्टी सांगायच्या म्हंटले तर तेवढा अभ्यास नाही आणि उद्याच्या गोष्टी सांगायची दूरदृष्टी आणि कुवत नाही. त्यामुळे काल-परवाच्या गोष्टींवर भगताय तोवर भागवायचे ! तर नुकताच बाहेरून आलो होतो. आजकाल बाहेरून आलो कि आम्हाला 'कोरोना तर घेऊन नाही ना आलो ?' अशी भीती असते. त्यात लॉकडाऊन जेवढा कडक , कोरोना झालाय ही भीती तेवढीच जास्त ! म्हणजे एखाद्या  भुताच्या चित्रपटात खुट्ट अंधार ,धो धो पडणारा पाऊस , किर्रर्र किर्रर्र वाजणारा दरवाजा जसे 'माहौल ' बनवतात तसेच काहीतरी लॉकडाऊन कोरोनाच्याबाबतीत करतो असे आम्हाला वाटते.  भूत असण्याचा त्या पावसाशी किंवा दरवाजाशी काहीही संबंध नसतो पण उगाच भीती निर्माण होते. तसेच - रस्त्यावर लोक जितके कमी , घरी आल्यावर आपण तेवढेच जास्त घाबरतो ! असो - तर बाहेरून आल्यावर हात-पाय वगैरे स्वच्छ धुतले (आम्ही कोरोनाला तेवढीच किंमत देतो. अंघोळ वगैरे म्हणजे सलमानचा चित्रपट मुलतीप्लेक्समध्ये जाऊन पाहण्यासारखे आहे ). टीव्हीवर राहुलच्या (आपला गांधींचा हो - महाजन ला कोण विचारात नाही आणि द्रविड बाप आहे -त्याची काय टवाळी करतोय आम्ही ) कुठल्यातरी नवीन 'ट्विट' वरून चर्चा चालू होती - निर्बुद्ध ट्विट आणि निर्बुद्ध चर्चा -दोन्ही नेहेमीप्रमाणे. आणि त्यावेळी मनात दोन भयावहः विचार एकत्र आले -आपल्याला उद्या कोरोना झाला तर? राहुल गांधी उद्या देशाचा पंतप्रधान झाला तर ?
अर्थातच दोन्ही विचार भयंकर होते. परंतु नाकारण्यासारखे नव्हते .म्हणजे  शक्यतांचा विचार केला -आणि अगदी गणिती फॉर्मुले वगैरे लावले तरीही दोन्हीची 'स्टॅटिस्टिकल'  शक्यता होती. रात्रभर झोप नाही लागली. नक्की कुठली धास्ती जास्त घेतली होती हे अजून ठरायचं आहे. दुसऱ्या दिवशी उठून ठरवलं - ते काहीं नाही . भिडायचे आणि आपल्या भीतीवर मात करायची. कोरोना सोप्पे होते. वाचन केले. जपान पासून उगांडापर्यंतचे 'जाणकार' जे जे सांगतायत ते सगळे करायचे ठरविले. आपले रामदेव बाबा पण आलेच हो त्यात ! त्यामुळे उठून गरम पाण्याच्या गुळण्या, वाफ घेणे ,दूध हळद , जलनेती , भस्त्रिका प्राणायाम, , , ,  जीवनसत्वाच्या गोळ्या , अमृतवेल ,अश्वगंधा-गुळवेल ,आर्सेनिक अल्बम असे आणि इतर उपाय एका दिवसात उरकून आम्ही -आपल्याला पुढील हजार वर्ष काही कोरोना होत नाही या विश्वासाने निश्चिन्त झालो. भीती ही मनातून सुरु होते आणि मनातच संपते. उपाय हे आपल्या अंतर्मनात डोकाविण्याचा मार्ग असतो. अशाप्रकारे कोरोनावर 'मात' केल्यावर आम्ही दुसऱ्या संकटाशी सामना( म्हणजे द्वंद्व. नाहीतर भलताच 'सामना' समजून बसाल . ते सध्या फक्त मुलाखती घेतात. शस्त्र टाकलीत त्यांनी ) करायला मोकळे झालो.
राहुल गांधी पंतप्रधान झाले तर काय? या प्रश्नाचे बहुतेक जण (अगदी कट्टर मोदी विरोधकही ) निसंदिग्धपणे उत्तर देतील - ते शक्यच नाही. जाणकार ,विश्लेषक (आजकाल हे पीक खूप जोरात आहे ) आणि सामान्य जण -सगळ्यांचे याबाबतीत एकमत नसले तरी बहुमत निश्चित आहे. परंतु आम्हाला तो 'चान्स' घ्यायचा नव्हता. मणी शंकर अय्यर यांचे उदाहरण होतेच डोळ्यासमोर ! त्यामुळे राहुल पंतप्रधान होणे शक्य नाही हे पुराव्यानिशी सिद्ध करायचे आम्ही ठरविले .आता सिद्धांत मांडायचा तर थोडा अभ्यास तर हवा ना ? म्हणून इतिहास धुंडाळून काढला . वाईट वाटले हो ! बालवयात अज्जी ची हत्या झाली. कुमार वयात वडिलांची (या वाक्यात कोणताही विनोद शोधू नये अगर आमचा काही कुटील हेतू सुद्धा नाही. दोन्ही घटना देशाच्या आणि गांधी कुटुंबाच्या दृष्टीने दुर्दैवी होत्या). बिन बापाची पोरं- एकटी अबला आई सांभाळत होती . तिकडे नरसिम्ह मामाने छळ सुरु केला. त्यातून आई सावरली पण धंदा (राजकारणाचा) चालविण्याच्या व्यापात पोरांकडे दुर्लक्ष झाले. ते पास झाले -नापास झाले -कशा कशा कडे लक्ष नाही बघा. बरं बहीण पण स्वार्थी निघाली. स्वतः चे तेवढे 'सेटिंग' करून लग्न लावून घेतले. बिचाऱ्या भावाचे काय ? त्याला काय करावे  कोणी सांगत नव्हते आणि उमगत तर त्याहून नव्हते. मग काय? कुत्रा पाळणे , कुंगफू का काहीतरी शिकणे, हवापालटासाठी देशोदेशी भटकणे असले उद्योग केले त्या बिचाऱ्याने. बरं त्यात मन रमतंय असे वाटू लागताच आई चे  फर्मान - कौटुंबिक व्यवसायाकडे लक्ष घालण्याचे. आता तीची तरी काय चूक? अंबानींनी नाही का मुलांना धंद्यात उतरविले ? अमिताभचा मुलगा अभिनेताच झाला ना? परंतु राहुलचा मुकेश अंबानी होता रोहन गावस्कर झाला यात त्याची काय चूक हो ? नाही जमत एकेकाला.
असो तर घरगुती व्यवसाय हाती घ्यायचा कि नाही -असे क्या करे के ना करे बरेच दिवस चालले होते बिचाऱ्याचे. दोन चार निवडणुकांची सूत्र हाती घेऊन पहिली. परंतु यश काही हाती लागले नाही. तिकडे मनमोहन काका मात्र व्ययस्थित सी   ची जबाबदारी सांभाळत होते. परंतु आपला व्यवसाय आपणच सांभाळावा ही कुठल्याही व्यावसायिकाची इच्छा असणारच. तसेच काहीतरी मम्मा ला वाटत होते. परंतु मुलगा काही तयार होईना. इकडे वय उलटून चालले होते. मुलगी मिळेना .सगळीच पंचाईत. या पोराचे काही खरे नाही  म्हणत मम्मा वैफल्यग्रस्त झाली आणि तिकडे चमत्कार झाला. मोदी नामक राक्षस येऊन देशावर राज्य करू लागला. बरं नुसता राज्य नव्हता करत तर या माँ -बेटा ला चिडवून चिडवून हैराण करून सोडले त्याने. कहर म्हणजे तो राक्षस एकदा नव्हे तर तब्बल दोनदा निवडून आला .बिचाऱ्या राहुल ने आधी दुर्लक्ष केले मग सन्यास घ्यायचे ठरविले. परंतु आई सोडत नव्हती आणि मोदी जगू देत नव्हता. काय करावे कळेना.
एके दिवशी राहुलने "बस बहुत हो गया " म्हणत कौटुंबिक व्यायसायाकडे पूर्णवेळ लक्ष देण्याचे ठरविले. आता धंदा करण्याचे ठरविले खरे परंतु काय करावे याचा ना अनुभव ना कुशलता. मग काय ? मम्मा ने एक काम सोपविले - मोदी जे करेल त्याला विरोध करायचा. जास्त विचार करायचा नाही.तेंव्हा पासून राहुलचे -लगे राहो पप्पूभाई सुरु आहे. त्याच्या जीवनाचे ध्येय मोदींना विरोध करणे आहे. निवडणुका जिंकणे ,सत्ता उपभोगणे,पक्ष सांभाळणे,वाढविणे या गोष्टी त्याच्या दृष्टीने अर्थहीन आहेत . मोदींच्या प्रत्येक वक्तव्याचा किंवा कृतीचा उपहास करणे आणि विरोध करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय .तर हा सगळा इतिहास वाचून   ऐकून आम्ही राहुल ची बाजू नीटशी समजू शकलो. बिचाऱ्याला मोदीविरोधी करण्याला पर्याय नाही (आणि दुसरे काही येत पण नाही ). आता तुम्ही म्हणाल याचा -राहुल पंतप्रधान होणार याच्याशी काय संबंध ? तर ऐका - त्या राक्षसाच्या गोष्टीत त्याचा जीव पोपटात असतो. इथे पोपटाचा जीव राक्षसात आहे. त्यामुळे , मोदी असे तो पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत आणि मोदी गेल्यावर राहुलला करण्यासारखे काही राहणार नाही !आणि तोपर्यंत त्यांचा कौटुंबिक व्यवसाय बुडीत निघाला असे हे वेगळेच . अशा प्रकारे राहुल काही पंतप्रधान होणार नाही
हेन्स प्रुव्हड !
काल रात्री शांत झोप लागली. शेवटी भीती ही मनात उत्पन्न होते आणि मनातच नष्ट होते -नाही का ?