Sunday, June 21, 2020

जो शाहिद हुए हैं उनकी ...

          गलवानची चकमक भयानकच होती. चीनच्या अमानुष हल्ल्यात आपले वीस वीर धारातीर्थी पडले. कई अनेक जखमी झाले असतील. पाकिस्तानी अतिरेक्यांनाही लाजवेल अशा निर्दय पद्धतीने आपल्या सैनिकांना मारण्यात आले.दगड,लोखंडी खिळे असलेले दांडके असल्या अमानवी गोष्टींचा वापर करण्यात आला . या वरून चीन किती नीच विचार करू शकतो हेच दिसून येते. अर्थात सेनापती पडल्यावर आपलेही वीर पेटले. चीन्यांना त्यांच्याच भाषेत ,किंबहुना अधिकच क्रूरतेने उत्तर दिले. चीनी सैनीकांची धड आणि मुंडके वेगळे होते आणि ते ओळखणेही अवघड होते असे म्हणतात.अर्थात या सगळ्यात आपले वीस मेले तर त्यांचे पस्तीस-चाळीस मेले वगैरे बातांना काही अर्थ नसतो. जे झाले त्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांचा काहीही दोष नव्हता. आपल्या तर नव्हताच नव्हता. सैनिक म्हणून युद्धभूमीवर त्यांना वीरमरण शोभले असते. दगड-काठ्यांनी नव्हे. सैनिकांच्या आप्तजनांच्या भावनांचा विचार करून जीव हळहळत आहे प्रत्येक देशवासियाचा. चीनने तर अधिकृत आकडेवारीच घोषित केलेली नाही.चुकून गोळ्या झाडल्या जाऊन युद्धाला सुरुवात होऊ नये म्हणून कधीकाळी बंदुका बाळगण्याचा नियम केला होता. परंतु असे ना तसे जर सैनिक मारलेच जात असतील तर बंदुकांचा वापर केलेला योग्य. दरम्यान राहुल गांधींची बाष्कळ प्रश्नमंजुषा सुरूच आहे. बरेच लोक त्याला देशद्रोही वगैरे म्हणतात. परंतु मला तो देशद्रोही नाही वाटत. मूलतः देशप्रेम किंवा देशद्रोह करण्याची त्याची क्षमताच नाही. किंवा असे समजा -देशप्रेम त्याला उपजातच अवगत नाही आणि देशद्रोह करण्याची त्याची कुवत नाही. त्यामुळे त्याच्या विचारांना आपण नेपाळच्या नवीन नकाशाएवढीच किंमत देऊ.
चीन हे असे का करतोय याला अनेक तर्क आहेत. कोण म्हणतंय आपण सीमाभागात अतिवेगवान पद्धतीने रस्तेबांधणी केली म्हणून खवळलाय चीन, तर कोण म्हणतंय भारताने अमेरिका आणि इतर पश्चिमी राष्ट्रांशी चीनची कोरोना संदर्भात कोंडी करण्यासाठी हातमिळवणी केली म्हणून चीन खवळलाय. काहींच्या मते भारताला शह देऊन व्हिएतनाम ,मलेशिया ,तैवान इत्यादी छोट्या राष्ट्रांना इशारा देण्याचे चीन चे मनसुबे आहेत. कोरोना आणि तत्पश्चात आलेल्या मंदीमुळे चीनमधील बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अंतर्गत कलह टाळण्यासाठी लोकांचे मन वेगळीकडे वळवण्याची झी यांची चाल आहे -असा ही एक विचार प्रवाह आहे. सध्याच्या सिमेवरील परिस्थितीला यातील कुठले कारण अथवा कारणे जवाबदार आहेत ते आपल्या सामरिक तज्ज्ञांना माहीतच असणार आणि त्याप्रमाणे रणनीती आखली जात आहे. परंतु कारणे काहीही असोत,या ना त्या कारणामुळे चीन दरवर्षी खोड्या काढतोच. किंबहुना गलवानमधील चकमकीमुळे चीन कुठल्या थराला जाऊ शकतो हे दिसून आले आहे.एकार्थी बरेच झाले. चीनने कितीही आव आणला तरी तो आपला मित्र नाही हे माहीतच होते आता सिद्ध झाले . गलवान घटनेचा आपल्या सामरिक रणनीतीवर दूरागामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
                चीनशी सीमा तंटा सोडविण्याबरोबरच व्यापारी संबंध वाढवावे ,चीन आपला शत्रू नाही वगैरे फालतु कल्पनांना तडा गेला आहे. तरीही काही निर्लज्ज अजून चीनची बाजू घेतातच. किंवा चीनबद्दल मौन धारण करून ,मोदींवर निशाणा साधतायत. १९६२ चे युद्ध नेहेरूंमुळे झाले,चीनची काहीच चूक नव्हती असे म्हणणारे कम्युनिस्ट आजही बरळ ओकतायत. दुर्दैव असे कि त्या नेहेरुंचे वंशज आणि त्यांची पार्टीच आज या निर्लज्ज खेळात सामील झाली आहे. बरं मोदींवर टीका करणे चूक आहे का ?निश्चित नाही. सरकारला जाब अवश्य विचारावा- नाही विचारावाच ,असे आम्ही म्हणतो.संसदीय समिती नेमावी का ? नेमली तरीही चाले. परंतु अरे मूर्खांनो सध्या या सगळ्याची वेळ आहे का ? युद्ध अजून सुरु आहे. हजारो सैनिक डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतायत. गलवानच्या वीरपत्नींच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा पुसले गेले नाहीत तर यांचे गलिच्छ राजकारण सुरु.आपली काही भूमी चिन्यांच्या ताब्यात आहे असे म्हंटले जाते. सरकारने आणि सैन्य अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे त्याचे खंडन केले तरीही. असेलही कदाचित. परंतु युद्ध अजून संपलेले नाही. मोदी ती भूमी निश्चित परत घेणार. किंवा कुठल्यातरी प्रकारे चीनला त्याची प्रचंड किंमत मोजायला भाग पाडणार. याचे कारण जेवढे राष्ट्रप्रेम तेवढेच व्यावहारिक राजनीती सुद्धा आहे. मोदींनी चीनला भूमी आंदण दिली हे इतिहासात नोंद झाले तर मोदींची आणि त्यांच्या पक्षाची जी नाचक्की होईल ती भरून काढणे अशक्य असेल. आणि या पुढे नेहेरुंना दोषी ठरविण्याचे धंदे बंद करावे लागतील. म्हणूनच म्हणतो- थोडा सब्र करो ! पिक्चर अभी बाकी है !
राहता राहिला प्रश्न चीनी  वस्तूंवर बहिष्काराचा. परवा एक मित्र या संकल्पनेची यथेच्छ टवाळी करत होता. खरे सांगायचे झाले तर २०१७ साली डोलकाम च्या वेळेला आम्ही पण या कल्पनेची अप्रतेक्षरित्या टिंगल केली होती. परंतु तेंव्हाच्या आणि आताच्या परिस्थतीत जमीन आस्मानाचा फरक आहे.चीनचा भारताबरोबरील व्यापार तुलनात्मक दृष्ट्या नगण्य आहे हे मान्य. त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या कदाचित फार नुकसान होणारही नाही. परंतु सव्वाशे वर्षांपूर्वी जेंव्हा भारतीयांनी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकला आणि कपडे जाळले तेंव्हाचा ब्रिटन तर आजच्या चीनपक्षा कैकपटींनी बलवान आणि समृद्ध होता. तरीही त्या चळवळीचे दूरागामी परिणाम झालेच ना ? एव्हढेच कशाला तीनशे किलोमीटर चालत जाऊन मूठभर मीठ उचलून गांधीजी काय ब्रिटिश साम्राज्याचे घंटा बिघडवू शकणार होते ? परंतु "रेस्ट ऍज दे से -इझ हिस्टरी ". चीनी वस्तूंवर बहिष्कार ही एक जनभावना आहे. तीचे जणचळवळीत रूपांतर झाले तर दूरगामी परिणाम होतील. ब्लॅक लाइव्हस मॅटर ही चळवळ कशी उत्स्फुर्तरित्या पसरली? ( त्यातील हिंसा ,राजकारण आणि षडयंत्र या गोष्टी तूर्त बाजूला ठेवू ). आज जगातील बहुतांश देश हे कोरोनामुळे चीनवर नाराज आहेत. उघडपणे बोलत नसले तरीही. चीनच्या मुजोर आर्थिक आणि सैन्य शक्ती प्रदर्शनामुळे दक्षिणपूर्व आशियातील बहुतेक देश हे कमी अधिक प्रमाणात बंडाच्या पवित्र्यात आहेत. आणि सध्याच्या सीमावादामुळे ते भारताकडे अशेभूत पणे पाहतायत. बेल्ट रोड प्रकरणात अडकलेले आफ्रिका ,युरोप आणि अशिया खंडातील बहुतेक देश या जाचातून मुक्त होण्यास उत्सुक आहेत. त्यांना गरज आहे ती एका ठिणगीची. चीन शक्तिशाली आहे त्यामुळे या देशांची सरकारे कदाचित उघडपणे विरुद्ध पवित्रा घेणार नाहीत. परंतु भारतीयांनी जर उदाहरण घालून दिले तर या देशांतील नागरिक निःश्चित्पणे त्यात सामील होतील आणि त्याला सरकारांचाही अप्रत्येक्ष पाठिंबा असेल. आणि अशा चळवळीचा झटका चीनला बसणार हे निश्चित.  सोनम वांगचुक म्हणतो तसे ही लढाई " बुलेट आणि वॅलेट " दोन्ही मोर्च्यांवर लढावी लागणार आहे. आता कोणी ( असतात हो असले ) म्हणेल सोनम काय अर्थतज्ज्ञ आहे का ? मग तसे पाहायचे गेले तर गांधी कुठले अर्थतज्ज्ञ होते आणि कलाम कुठले तत्वज्ञानी?
लतादीदींचे " मेरे वतन के लोगों " ऐकून आज जरा जास्तच रडायला येतंय. परंतु या पुढे " संगीन पे धर कर माथा सो गये अमर बलिदानी" ही वेळ येऊ द्यायची नाही हा निश्चय पण मनात धृढ करतोय. आणि या वेळी ते आपल्या पण हातात आहे. आहेच !

सुशांत गोसावी