Tuesday, May 19, 2020

कोरोना -श्रद्धा आणि अंधश्रद्धा

               काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मुलगा ४ वर्षांचा होता आणि त्याला भयंकर खोकला झाला. डॉक्टर च्या २ फेऱ्या झाल्या तरी कमी होईना. शेवटी डॉक्टरने न्यूमोनिया टेस्ट्स करायला सांगितल्या - एक्स रे आणि रक्त चाचणी. आता पर्यंत डॉक्टर सांगतील त्या लशी आम्ही देत आलो होतो. उगाच गूगल करून त्याचे तोटे फायदे ,साईड इफेक्ट्स वगैरे बघण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. परंतु मुलाला न्यूनोमिया च्या एक नाही तर ३ लशी दिल्याचे मला चांगलेच आठवते. बरं त्या पण याच डॉक्टर कडे. म्हणून सहजच त्यांना प्रश्न विचारला कि आपण तर लस दिली होतो - त्या पण तीन ? तर म्हणाले कि तरीही न्यूमोनिया होऊ शकतो. कुठल्याही लसीचा सक्सेस रेट हा ८५-९५ टक्के असतो. मनात विचार आला - अहो नव्वद टक्के सक्सेस रेट चांगला आहे. पण मला एकच मुलगा आहे ! जर त्या महागड्या लशी देऊन त्याला न्यूमोनिया होणार असेल आणि लस देताना हे माहित नसेल तर लस देणे म्हणजे अंधश्रद्धाच म्हणायला हवी ना ? सुदैवाने ( लसीमुळे किंवा दैवामुळे ) टेस्ट नेगेटिव्ह आल्या आणि विषय तिथेच थांबला. पुढे अमेरिकेत गेल्यावर फ्लू च्या लशी प्रत्येक वर्षी घेण्याची प्रथा आहे. हो प्रथाच म्हणायचे त्याला ! २०१८-१९ च्या फ्लू सिझन मध्ये तब्बल चौतीस हजार जणांना फ्लूमुळे आपला प्राण गमवावा लागला होता. त्यातील किती जणांनी लस घेतली हे माहित नाही. परंतु मुद्दा असा कि लस उपलब्ध असून सुद्धा इतक्या जणांना प्राण गमवावा लागला. अर्थात यात बऱ्याच आणखी भानगडी असतील. परंतु कागदी 'डेटा' हेच सांगतो कि चौतीस हजार जणांनी फ्लूमुळे प्राण गमावला. आता या लशीला विज्ञान म्हणायचे कि श्रद्धा कि अंधश्रद्धा ? बाय द वे ,मी हि लस घेण्याच्या भानगडीत कधी पडलो नाही. आणि सुदैवाने ( हो दैवाने ) फ्लू झाला नाही.
            कोरोनाचे थैमान सुरु झाल्यापासून त्याला रोखण्यासाठी अथवा इलाज करण्यासाठी अनेक उपाय सुचविले जात आहेत. त्यासाठी अनेक सर्वे केले जातात आणि रोज नवनवीन विश्लेषण समोर येत आहेत. आधुनिक वैदकीय प्रणालीबद्दल सांगायचे झाल्यास हैड्रोक्लोरॉक्सिन हे मलेरिया चे औषध,एड्स वरची औषधे इत्यादींचा प्रगोय होतोय. त्याच बरोबर चक्क व्हिटॅमिन ड चे सर्व्ह पण आशादायक परिणाम देत आहेत ! म्हणजे कोरोनाग्रस्तांना भर उन्हात ठेवा आता ! एका सर्वेक्षणात तर असे समोर आले कि धूम्रपान करण्याऱ्यांचे प्रमाण कोरोनाग्रस्तांमध्ये तुलनेने कमी आढळते ! आपल्याकडचे बोलायचे झाले तर- कोरोनाचा उपद्रव सुरु झाल्यापासून अनेक थिअऱ्या समोर आल्या. आपल्याकडे उष्णता असल्यामुळे होणारच नाही , भारतीयांना 'बी सी जी' लस दिल्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल ,हर्ड इम्म्युनिटी, थाळी घंटानाद केल्यामुळे सूक्ष्म लहिरींनी कोरोना पळून जाईल(!!) , करोडोंनी प्रार्थना केल्यामुळे जी  'पॉसिटीव्ह एनर्जी ' निर्माण होते त्यामुळे पळून जाईल ,लसूण,आले खाल्ल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल, शाकाहारींना होणारच नाही इत्यादी अनेक 'उपाय' आणि कल्पना समोर आल्या. काही भ्रामक तर काही सत्याच्या थोड्या जवळ. परंतु पूर्ण सत्य असे काहीच नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेचा (अथवा अंधश्रद्धेचा ) भाग. इतकेच काय ? तर - दारू पिल्यामुळे कोरोना मारून जातो हा शोधही कोणा शहाण्याने लावला ! दारू दुकानांसमोर म्हणूनच रांगा लागल्या होत्या बहुतेक! अर्थात 'जनरल इम्म्युनिटी' वाढविणारे अनेक उपाय पण सांगितले जातात- प्राणायाम करणे , फळे खास करून व्हिटॅमिन क -युक्त खाणे , व्यायाम इत्यादी. सध्या 'आरसेनिक अल्बम ३०' या होमिओपॅथिक औषधाचे खूळ सुरु आहे. हे घेण्याने कोरोना होणारच नाही असे सिद्ध झाले आहे का ? तर निश्चित नाही. आणि आधुनिक वैदकीय शास्त्र याला कधीच मान्यता देणार नाही. म्हणजे हे औषध घेऊन जरी तुम्हाला कोरोना अथवा सर्दी खोकला -ताप नाही आला तरी तो या औषधामुळे हे ते कधीच मान्य करणार नाहीत.
             मग प्रश्न असा निर्माण होतो कि या उपायांबद्दलचे तथ्य काय ? तर उत्तर आहे -सध्यातरी काहीच नाही. या कल्पना आहेत. श्रद्धा -कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणतील. म्हणून उपाय करणे थांबवायचे का ? अर्थातच नाही. उद्या जरी लस आली तरी त्याचा सक्सेस रेट किती ? आणि कोण ठरवणार ? आणि तो या तथाकथित अंधश्रद्धांच्या तुलनेत कुठे बसणार ? समजा जरी लसीने सुयोग्य असे परिणाम दिले तरी ती यायला आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचायला किमान ८-१० महिने अवकाश आहे. या दरम्यान जितके स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे तितकेच मानसिक सुद्धा. आणि कुठलाही उपाय( प्रयोग) तुम्हाला इजा ना पोहोचवता आणि आर्थिक नुकसान न पोचवता होत असेल आणि त्याने तुम्हाला मनःशांति मिळत असेल तर करायला काहीच हरकत नाही. 'यु नेव्हर नो' ! वास्तव -श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा फार पुसत असतात ! अर्थात हे सर्व करीत असतांना ,आपण हे  केले आणि ते केले म्हणून आपल्याला कोरोना होणारच नाही या भ्रमात राहणे मात्र धोक्याचे ठरेल . त्यामुळे, खबरदारी घ्या , सरकारने नियम दिलेत त्याप्रमाणे बाहेर पडा ( कधी कधी जरूर पडा - गुड फॉर युअर मेंटल हेल्थ ) आणि आपल्याला रास्त वाटतील असे उपाय करीत रहा. विजय निश्चित आहे.
टिप : लेखक वैदकीय शास्त्रातील पदवीधर नाही. त्यामुळे शंका असल्यास आप-आपल्या वैदू,हकीम,डॉक्टर अथवा टीव्ही चॅनेल वाल्यांना विचारावे.

Sunday, May 3, 2020

गर्वहरण


"पाच-सात टक्के मूर्खांमुळे बाकी नव्वद टक्के लोकांना त्रास सहन करावा लागतोय" -परवा एक मित्र उद्वेगाने आपली भावना व्यक्त करीत होता.अगदी बरोबर बोललास मित्रा -मी पण अनुमोदन दिलं त्याला. खरंच माझीही भावना काही प्रमाणात तशीच झाली होती. चाळीस दिवसांच्या लॉकडाउन मध्ये सकारात्मक राहणे महाकठीण. म्हणजे दिवसाच्या ८०-९० टक्के वेळा आपण जरी सकारात्मक रहायचे म्हंटले तरी काही प्रमाणात तोल ढासळतोच. आणि मग 'त्या' पाच-दहा टक्के लोकांवर राग निघतो. अनेकांशी फोनवर बोलताना त्याच भावना व्यक्त होत आहेत सध्या. बरं सगळ्यांच्या बोलण्यात पाच-दहा टक्के असे येत असले तरीही त्या पाच -दहा टक्क्यांची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. कोणी विशिष्ट धर्माला संबोधून बोलत असतात तर कोणी एका सामाजिक वर्गाला. कोणाच्या बोलण्यात भाजी,मांस घेण्यासाठी गर्दी करणार्यांबद्दल द्वेष असतो तर बाकीचे परप्रांतीयांबद्दल राग व्यक्त करतात. या सगळ्यात प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करणे ओघाने आलेच. एकंदरित काय ?तर आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाचा दोष (चीन सह) कोणाच्या तरी माथी मारायचा आणि मन शांत करायचे प्रयत्न.
बरं, या नव्वद टक्के 'लॉक डाउन' पाळणाऱ्या तताकथित वर्गाच्यापण बऱ्याच पोटजाती असतात. "तुला सांगतो मी २२ मार्च पासून घर बाहेर पाऊल ठेवलेले नाही " असा एक कर्मठ वर्ग असतो . मग त्या खालोखाल " आम्ही आपल्या लगबगीने दोन चकरा मारतो खाली. तेवढ्यात वॉचमन येतोच शिट्ट्या मारत .किती घरी बसणार.  शेवटी हेअल्थ इज अल्सो इम्पॉर्टन्ट ना ? " म्हणत छोट्या 'चोऱ्या ' करणारे असतात  किंवा "आठवड्यातून दोन एक वेळा जातो बाहेर. खाणार काय नाहीतर ?" म्हणत  'कायद्यात' राहून गैर फायदा घेणारे सुद्धा असतात. कारणे काढून ट्रान्सीट पास मिळवणारे, झुगाड करून दारूची व्यवस्था करणारे , पोलिसांबरोबर सेटिंग लावणारे हे सगळे सुद्धा या नव्वद टक्क्यांमधले सुशिक्षित बरं का ! एक ओळखीच्या सांगत होत्या- मी रोज भाजी किंवा सामान आल्यावर नीट धुवून घेते आणि मगच ते रचून ठेवते. त्यात माझा रोजचा अर्धा पाऊण तास जातो. परंतु तुमच्या तीन माणसांच्या कुटुंबाला रोज मागवण्यासारखे एवढे असते तरी काय ? तुम्ही सामान भले धुवून घेत असाल ,परंतु तो आणणारा माणूस गेट उघडून लिफ्टने आलेला असतो आणि तेवढे संसर्ग पसरविण्यासाठी पुरेसे नाही का ? असले प्रश्न या नव्वद टक्के वाल्यांना कोणी विचारायचे नसतात. कारण गुन्हेगार नेहेमी ते पाच-सात टक्के वाले. आणि सगळ्यांच्या दृष्टीने ते स्वतः नव्वद टक्क्यांत मोडतात हे विशेष . दोष कायम  'त्या' ज्ञात अथवा अज्ञात पाच सात टक्केवाल्यांचा आणि  दुर्दैवाने कोरोनाचा फैलाव बहुतांश प्रमाणात समाजातील दुबळ्यावर्गांवर जास्त होतोय म्हणून या नव्वद -दहा  थिअरी ला बळ मिळत चाललंय.
असो. तर दोन एक दिवस असाच 'डाउन' होतो. मनातल्या मनात मी पण त्या 'पाच -सात' टक्केवाल्यांना शिव्या घालत होतो. रोजप्रमाणे  टीव्ही वर रामायण ( उत्तर रामायण ) चालले होते आणि अयोध्येतील सर्व धुरंधरांचा पराभव झाल्यावर स्वतः श्री राम त्या कुमारांशी युद्ध करण्यास येतात असा प्रसंग होता. सीता पवित्र आहे हे माहित असून सुद्धा तुम्ही तीचा त्याग का केला ? असा प्रश्न कुश (आपला स्वप्नील हो ) रामचंद्रांना विचारतो. "राजधर्म पाळण्यासाठी" -श्री राम उत्तरतात. मनात विचार आला- रामाचे 'देवपण' बाजूला ठेवू. एक मनुष्य म्हणून ते त्याकाळी सुद्धा यशाच्या अत्युच्य शिखरावर पोहोचले होते. एका परिटाच्या बोलण्यावरून जिच्यासाठी परमप्रतापी रावणाशी युद्ध केले ,तिचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. त्या परिटाचा बंदोबस्त करून असल्या वाचाळ गप्पांचा ते सहजरित्या समाचार घेऊ शकत होते. बरं रामायणाला इतिहास म्हणून बघता एक उच्च कोटीचे साहित्य म्हणून जरी पहायचे म्हटले तरी ,सीता त्याग करवून त्यातील नायकाची ( रामाची ) प्रतिमा कोठेच उजळली नाही. किंबहूत किंचित मलिनच झाली. एक काव्य म्हणून अथवा इतिहास म्हणून उत्तर रामायण ही एक शोकांतिकाच आहे. मग असे असतांना देखील श्री रामाने ( किंवा कवीने )तो निर्णय का घेतला ? तर राजधर्मासाठी. तो धर्म योग्य होता कि अयोग्य हा विषय तूर्त बाजूला ठेवू. परंतु धर्माचरणासाठी केलेला त्याग रामाला ना त्त्या काळी जनतेची सहानभूती देऊ शकला ना नंतरच्या काळात निंदेपासून वाचवू शकला . योग्य अथवा अयोग्य - श्री रामाने परिणामांची चिंता करता आणि येणाऱ्या पिढ्या आपल्याला कसे स्मरातील  याची तमा बाळगता ,आपल्या प्रियतमेचा त्याग केला हेच खरे.
२०११ च्या विश्वचषक सामन्यात सचिन पंचांच्या निर्णयाची वाट बघता चालत सुटला. ४५० सामन्यानंतर त्याला अजून सिद्ध करण्यासारखे काहीच राहिले नव्हते. परंतु त्याचे नैतिक अधिष्ठान त्याच्या कर्तृत्वापेक्षा श्रेष्ठ होते आणि त्यामुळे तो क्षणार्धात निर्णय घेऊ शकला. अजचेच पहा ना ? कर्नल आशुतोष शर्मा - २१ राष्ट्रीय रायफल्स चे कंमान्डींग ऑफिसर. हजारोंचा फौजफाटा. अतिरेकी किती - दोन,चार ,पाच फार फार तर. त्या पलीकडे यांची मजल नसते. (कदाचित) काहीच गरज नव्हती स्वतः समोरून लढण्याची. एक नाही तर दोन चार दिवसात घेरा घालून मारलेच असते. शिवाय एक सोडून दोन वेळा सेवा मेडल बहाल करण्यात आले होते त्यांना. अजून काय सिद्ध करायचे होते ? परंतु कर्तव्य आड आले. स्वतः पेक्षा सैन्य आणि सैन्यापेक्षा राष्ट्र महत्वाचे ही सैन्य अधिकाऱ्याला दिलेली शिकवण प्रत्यक्ष उतरविण्याचा निर्णय क्षणात घेऊन मोकळे झाले असतील ते. परिणामांची तमा अर्थातच बाळगता.
हा लेख लिहायला घेतला तेंव्हा शीर्षक ठरले नव्हते. परंतु धर्म,नीति आणि कर्तव्य परमोच्च मानून परिणामांची पर्वा करता कर्म करणाऱ्या या महामानवांची कथा स्मरून माझे नव्वद टक्के असल्याबद्दलचे गर्वहरण निश्चित झाले .आणि पाच सात टक्के वाल्यांबद्दलचा राग पण विरला.आपल्या सुदैवाने आपल्याला सुबत्ता ,बुद्धी आणि संस्कार मिळाले आहेत. त्यांचा योग्य तो उपयोग करण्याची हीच संधी आहे. जगात सगळेच एवढे सुदैवी नसतात. कोरोनाचे थैमान आज ना उद्या संपेल हे निश्चित. दरम्यान मनात आणि समाजात विद्वेष पसरवता आणि दुसऱ्यांची निंदानालस्ती करता आपण आपापल्या परीने लॉक डाउनचे पालन सुरु ठेवू . तेच आपले राष्ट्रीय (आणि वैश्विक ) कर्तव्य समजावे. बाकी निभावून घ्यायला प्रभू राम आहेतच !