Thursday, November 3, 2022

पराचा कावळा

            आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपला म्हणजे एकंदरीत समाजाचा. तर एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाली - आता ती कशी झाली हे विचारायचं नसतं . म्हणजे एखादा मुंसिपल्टीतला नगरसेवक पण होऊ शकतो किंवा निस्वार्थ सेवा करणारा कोणी सद्गृहस्थ. सेलिब्रिटी होण्याचा आणि कर्तृत्वाचा किंवा उपलब्धि यांचा संबंध बराच आधी संपला आहे. बरं कोणाचं नशीब केंव्हा उजाडेल( किंवा गंडेल) सांगता येत नसतं. मग कोणी बदाम विकणारा पण रातोरात सेलिब्रिटी होऊन जातो. कोणी हाऊ डेर यू असे काहीतरी म्हणून रातोरात सेलिब्रिटी होऊन जातात. नाही - सेलिब्रिटी होण्यात काहीच गैर नाही. रातोरात होण्यात पण काही प्रोब्लेम नाही. पण मग त्याची सर्व बाजूंनी छाननी सुरू होते. मग एखाद्या रॉबिन उथप्पाची ब्रायन लारा सोबत तुलना सुरू होते. कोणा काल परवा माहीत झालेल्या गायिकेचा स्वर सम्राज्ञी सोबत तुलना. ती गोष्ट त्या नवीन सेलिब्रिटी साठी ही अवघड असते आणि तुलना होणाऱ्या महारथी साठी त्याहून अवघड. परंतु आपल्याला काय त्याचे. बरं हे तर झाले कार्यक्षेत्रातील प्रॉब्लेम. सेलिब्रिटींना आपण सगळ्याच मापदंडांवर मोजत असतो. म्हणजे विराटने बॉलिवूडचे चित्रपट का आपटत आहेत याची कारणमीमांसा करून उत्तर देणे अपेक्षित असते. कोणा चित्रपट अभिनेत्याने भारतातील ढासळलेला सामाजिक सलोखा यावर भाष्य करणे अपेक्षित असते. तर अर्ध्या वयाच्या स्त्रिबरोबर विवाह करणाऱ्या एखाद्या राजकीय नेत्याने स्त्री सबलीकरण यावा भाष्य करावे ही अपेक्षा. बरं या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली करेक्ट असाव्यात बरं का? नाहीतर मग जो अगडबंब माजतो काही विचारू नका. या सगळ्यात भर म्हणून काही( आज काल बरेचसे) सेलिब्रिटी प्रसद्धीसाठी हे स्वतःच मुद्दामून उलट सुलट बोलतात. नव्हे आज काल हेच पेव जास्त फुटले आहे. नाहीतर त्यांना कोण विचारणार. हो ना? मग आपले जेवढे वय सुद्धा नाही, त्यापेक्षा कैक वर्षे जास्त कर्यासाधना असलेल्या व्यक्तीबद्दल उठसूट कोणीही बोलत सुटतो. 

           या सगळ्याची दुसरी बाजू म्हणजे तडक भडक बातम्यांसाठी हापापलेले पत्रकार.त्यांचाही दोष नाही म्हणा. गल्ली बोळात सुरू झालेल्या सर्व प्रकारच्या वृत्त वाहिन्या, पोर्टल्स यांना खाद्य कोण देणार.एखादा गरीब कामगार जसा रोज पोटाची खळगी भरण्याकरिता काम शोधत हिंडतो तसे हे बातम्या शोधत हिंडतात. रागही येतो पण किवपण कराविशी वाटते. अणि या सगळ्यांचे बाप म्हणजे सोशल मीडिया आणि काही संघटनांचे, राजकीय पक्षांचे मीडिया सेल्स. कुठली बातमी उचलून मोठी करायची आणि त्याचा कसा उपयोग करून घायचा हाच यांचा धंदा. नव्हे तसे करणारे कारखाने निर्माण झालेत आजकाल. बातमी खरी खोटी याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. एकदा लोकांच्या मनात इच्छित छबी बिंबावली की झाले काम. मग आज खलनायक ठरविलेल्या व्यक्तीच्या गळ्यात उद्या हेच लोक पुष्पहार का घालेना. कोणी विचारायचं नसतं. अणि विचारणार तरी कोण?  अशा वातावरणात जी बातमी बाहेर येते तीचे तथ्य तपासून पाहायची कोणाचीही इच्छा नसते. वाचली बातमी..आवडली तर लाईक नाही तर इग्नोर.

          असे नसते तर नव्वद वर्षाच्या एका व्यक्तीने केलेल्या टिप्पणी ( भले अयोग्य किंवा काळानुरूप नसेल)  बद्दल एवढे काहूर माजले नसते. अगदी असे धरून चालले की ती टिप्पणी हेतुपरस्पर केली. तरी बाहेरच आली नसती तर हेतू असफल झाला असता. तसेही त्यांनी स्त्रियांविषयी केलेल्या विधानाने कोणता मूलभूत फरक पडणार आहे किंवा आजवर पडलाय?शिवाय जसा बिंदी लावायची की नाही हे ठरविण्याचा अधिकार व्यक्तींना आहे तसाच कोणाशी बोलावे किंवा नाही हा अधिकार दुसऱ्यांनाही असतो. सप्टेंबर मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला गेले होते. एक पत्रकार त्यांची मुलाखत घेऊ इच्छित होती. अध्यक्षांनी त्या महिलेने डोके झाकावे आणि तसे केले तरच मुलाखतीला येईन अशी अट घातली. कदाचित त्यांच्या देशात जे चाललंय त्यामुळे त्यांनी असा पवित्रा घेतला. त्या पत्रकाराने नकार दिला. मुलाखत रद्द झाली. विषय संपला. दोघांचे आपापले विचार आणि आपले धोरण सोडायला नकार दिला.        

          आपल्याभोवती कायम घटना घडत असतात. त्या आहे तशा छापणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. किंबहुना त्या घटनेचे समाजावरील परिणाम समजून त्याघटनेला योग्य स्वरूप देणे ही खरी पत्रकारिता. काय छापावे या पेक्षा काय छापू नये याचे भान आणि संयम ठेवणे यात खरी कसरत असते. त्याच प्रमाणे किंबहुना जास्त प्रमाणात ..काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हे भान समाजात असणे पण गरजेचे आहे. परंतु इतर अनेक गोष्टी प्रमाणे इथे ही आपला कॉमन सेन्स मार खातो.  तसे नसते तर पराचा कावळा झालाच नसता.

        असो. दोन दिवस बातम्या येत राहतील. त्यानंतर संबंधित सेलिब्रिटी सकट सगळे आपापल्या कामाला लागतील... नेहेमीप्रमाणे. 

सुशांत गोसावी