Sunday, May 2, 2021

उतावीळ नवरे

               जगात उतावीळ नवऱ्यांची कमी नसते.आता बघा ना- बंगाल निवडणुकीआधी सोशल मीडियावर मोदी -शहांच्या सभांची जी चित्रणे पसरवली जात होती त्यावरूनतर तृणमूलच्या अर्ध्या उमेदवारांचे डिपॉसिट जप्त होईल असा ग्रह बरेच जण करून बसले होते. आता फक्त मुख्यमंत्री निवडायचा ( म्हणजे मोदी -शहांनी ) आणि सत्ता आपलीच अशाच अविर्भावात होते. आता "सत्ता आपलीच" मध्ये 'आपण' ची व्याख्या म्हणजे एक गंमतच आहे. महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातील इळपुंजे गावातील कुक्कुटपालन केंद्रात कंत्राट पद्धतीने काम करणारा  गणू कोथमिरे, शेकडो मैल लांब कोलकोत्यात कोणी घोष किंवा चॅटर्जी मुख्यमंत्री होणार म्हणून नाचत सुटतो. का ? तर भाजपा सत्तेत आली आणि हा गणू लहानपणी तीन महिने शाखेत गेला होता एवढाच काय तो त्यांचा संबंध ! असोकोणी कशामुळे खुश व्हायचे हा ज्याचा त्याचा निर्णय. परंतु निकाल मात्र बरोबर उलटे लागलेत. निवडणुकीआधी २०० चा टप्पा पार करणार असे शहा विश्वासाने सांगत होते. अर्थात आपल्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे मनोबल वाढविणे हे त्यांचे कामच आहे. आपली खरी मजल कुठपर्यंत जाईल याचा त्या धूर्त राजकारण्याला अंदाज असणारच निश्चित. परंतु वाढवून अंदाज सांगणे, संभांचे मॉर्फ केलेले अतिरंजित छायाचित्रे प्रदर्शित करणे हे सगळे आधुनिक डावपेच वापरले गेले. गैर काहीच नाही. एवढेच कि त्या जाळ्यात काही समर्थकच अडकले आणि आता सत्ता आपलीच असा ग्रह करून बसले. मोदी-शहांनी अगदी व्यावसायिक ( प्रोफेशनल ) रित्या डावपेच आखले,पूर्ण सामर्थ्य पणाला लावले , कष्ट घेतले आणि सत्ता खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एका सच्च्या राजकारण्याला साजेल असा.निवडणुका झाल्यावर आपल्या पुढच्या उद्योगाला रिकामे. उगाच का आणि कसे -हे रतीब घालायला वेळ पण नाही आणि तूर्त गरज पण नाही. अर्थात मुळात मोदींनी इतकी शक्ती निवडणूकांमागे लावायला हवी होती का ? हा प्रश्न उरतोच. दरम्यानच्या काळात कोरोनाने रौद्र रूप धारण केले .परंतु तो वेगळा विषय आहे. या लेखामध्ये तरी आम्ही त्यात जाऊ इच्छित नाही. थोडक्यात आता बंगाल मध्ये भगवा फडकणार म्हणून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या नवरदेवांचा पोपट झाला. भाजपने  शंभरचा आकडा ओलांडला तर आपण हा व्यवसाय सोडून देऊ असे जेंव्हा प्रशांत किशोर म्हणाले होते तेंव्हा अनेकांनी ( कदाचित शहांच्या २०० वर विश्वास ठेवून ) त्याची येथेच्छ टवाळी केली होती. शेवटी किशोर यांनी आपल्या व्यवसायाला राम राम ठोकलाच. परंतु तृणमूलला दोनशे च्या पार नेऊन !

              निवडणुकांचे निकाल पूर्णपणे जाहीरही झाले  नाहीत तर काहीजण मोदींना सत्तेवरून दूर करण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. गम्मत म्हणजे स्वतःच्या पक्षाने भोपळाही फोडला नसला तरी भाजपच्या पराभवाचा आनंद साजरा केला जात आहे. सांगलीतील हातकणंगल्याचा सदा पाटील "आता मोदीचा काय खरा नाय " म्हणून डरकाळी फोडतो. का तर कोण काळी साहेबांनी चालता चालता " काय बरा  हाय ना " असं विचारलं होतं म्हणे ! दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणत गल्ली मोहोल्ल्या बाहेर किंमत नसलेले नेते आणि पक्ष सुद्धा मोमोता दीदींना अभिनंदनाचे संदेश पाठवत आहेत.भाजपच्या अधिसत्तेला सुरुंग लागले , मोदींना आता अवघड जाणार , २०२४ मध्ये मोदी विरुद्ध ममता ? असले संदेश सोशल मीडियावर येऊ लागले आहेत. परंतु या अति उत्साहींना कळत नाही. मुळात मोदी आणि मोमोतांना पुढील वर्षेतरी वैर ठेवण्याचे काहीच कारण नाही. आणि दोघेही अगदी व्यवहारी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी हातमिळवणी केली तरी आश्चर्य वाटायला नको ! मोदींविरुद्ध मोट बांधायची म्हंटली तर दीदी येतील पण. परंतु इतर पक्ष त्यांचे नेतृत्व स्वीकारणार का ? इथेच तर घोडे पेण खातंय ना ! नाही म्हणायला विरोधकांच्यात - राजकारणी आहेत जे भाजपेतर पक्षांचे नेतृत्व करू शकतात. परंतु ते सर्वमान्य नसणार. आणि निवडणुकांत सातत्याने भोपळे ना फोडण्याचे विक्रम करणाऱ्या पक्षाला आयते नेतृत्व अपेक्षित असणार. दरम्यान मोदी-शहांना हा पराभव थोडा क्लेशदायक असला तरीही मैदानात लढण्याची सवय आहे त्यांना. मुख्य म्हणजे काय-कुठे चुका झाल्या हे हेरून त्या सुधारायची इच्छा आणि पद्धत आहे.त्याचे कारण असे कि ते या अनुभवातून अनेकदा गेलेत आणि शिकत आलेत .उगाच नाही जगातला सर्वात मोठा पक्ष चालवत ते ! शिवाय विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मतदानात फरक असतो. हा जसा दीदींच्या पथ्यावर पडला तास तो लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करणार. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे - मोदी नाही तर कोण ? हा प्रश्न. आजही निवडणुका घेतल्या तरी भाजपा दुसऱ्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुप्पट ते अडीचपट जागा मिळवू शकतो. ती त्यांची ताकद आहे.आणि ती जिद्दीने आणि कष्टाने मिळवली आहे. उगाच चार ट्विट केल्याने ती नाहीशी होणार नाही. परंतु काही उतावीळ नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच असतात ...त्यांना कोण काय सांगणार ?

सुशांत गोसावी