Sunday, March 29, 2020

करोनायण

            तळ हातांना  'कर्ण कमळ ' का म्हणतात हा आम्हाला बरेच दिवस पडलेला प्रश्न 'करोना ' ने अखेर सोडवला. हात धुवून धुवून अगदी कमळासारखे मऊसर झाले आहेत ! 'इन फॅक्ट ' बरेच दिवस ज्याला हातावरचा तीळ समजत होतो आणि आपल्या भाग्यात अमाप धनलाभ आहे  म्हणून आनंदित होतो तो फक्त एक 'डाग' होता आणि धुवून अखेर गेला हे पाहून अपार दुःख झाले. राहिली कसर सेन्सेक्स ने पूर्ण केली. असो . तर तीन चार आठवड्यात विश्व अगदी 'करोनामय ' झाले आहे. काही दिवसांपूर्वी जिकडे तिकडे 'मास्कधारी' लोक दिसायचे. आता लॉकडाऊन मुळे लोकच दिसेनासे झालेत. बातम्या लावून पोलीस कसे लोकांना थांबवुन रट्टे देतायत ते पहायचे आणि असुरी आनंद घ्यायचा -ही वेळ आली आहे. तरी बरे उत्तर अमेरिकेत हिवाळ्यात फार काही वेगळी परिस्थिती नसते. त्यामुळे सवय आहे आम्हाला. म्हणजे लॉकडाऊन चा पूर्वानुभव फक्त ओमार अब्दुल्ला यांनाच आहे असे नाही. आम्ही पण पूर्ण तयारीनिशी आलो आहोत!
लॉकडाऊनमुळे भारताचे आणि जगाचे अपरिमित नुकसान झाले आहे आणि होत आहे हे खरेच आहे .परंतु त्यातही आशेचे किरण शोधणाऱ्याला ते सापडतेच ! एरव्ही आम्ही व्यायाम करण्याची कारणे शोधत असतो. आता तर आयतेच कारण चालून आले आहे ! बाथरूम ,स्वयंपाकघर ,बिछाना आणि टीव्ही पहायचा तर लिविंग -हाच काय तो व्यायाम. एका मित्राने सूर्यनमस्कार सुचवले. परंतु आम्ही उठतो तेंव्हा सूर्य डोक्यावर असतो ( म्हणजे असावा -पाहायला कोण गेलंय एवढ्यात ) म्हणून आम्ही हाणून पाडला. बाकी 'प्लॅन्क', 'पुश अप ' वगैरे लहान मुलांचे व्यायाम म्हणत आम्ही खोडून काढले. बरं तेकिरण' हुडकणारे फक्त आम्ही नाही बरं ! अनेक आहेतसध्या फेसबुक ,व्हाट्सएप  वगैरेंचा धंदा जोरात चाललाय म्हणे. सर्व्हर्स तीन -चार पटींनी 'स्केल अप' केलेत अशी आतली खबर आहेपोलिसांवर सध्या खूप ताण आहे हे खरे. परंतु त्यात पण मिळेल तिथे येथेच्छ हाथ ( किंवा दंडा म्हणा ) साफ करायला मिळतोय ! टीव्ही वाल्यांची पण चंगळ झाली आहे. रोज सकाळ पासून हे जगातल्या प्रत्येक नवीन करोना केस चे वृत्तांकन सुरु करतात ते अगदी आपण झोपायला गेल्यावरच थांबते -आपल्यासाठीकरोनाची बाधा होण्यापेक्षा या वृत्तांकनानेच जेष्ठ नागरिकांच्या मनात धडकी भरते. दूरदर्शन नामक वाहिनी अजून अस्तित्वात आहे हे परवाच कळले. त्यांनी तर रामायण ,महाभारत वगैरेंचा धडाकाच लावला आहे. मुलगा विचारत होता -हे कुठल्या भाषेत आहे. त्याला म्हंटले हिंदी . नशीब त्याला हिंदी येत नाही म्हणून .नाहीतर तो अर्थ विचारत बसला असता. रामायणातील हिंदी -खास करून गाणे आपल्याला तरी काय घंटा कळतात ? लहानपणी रामायण फार हळू आणि 'बोर' वाटायचे. परंतु चारच भागात दशरथाचे लग्न होऊन ,मुलं होऊन ,गुरुकुलात शिक्षण घेऊन ,रामाने ताटकेचा वध करून,सीतेचे स्वयंवर पण झाले ! एवढ्यावेळात तर आमचा बबड्या बाथरूम मधुनपण बाहेर येत नाही ! दूरदर्शनचे उदाहरण घेऊन बाकी वाहिन्यांनीपण जुन्या मालिकांचा सपाटा लावलाय. असेच सुरु राहिले तर कदाचित लोकच लॉकडाऊन आणखी वाढवण्याची मागणी करतील ! - स्टोकहोम सिन्ड्रोम का काय म्हणतात ना- तसे व्हायचे .
परंतु एकंदरीत या करोनाच्या संकटामुळे तत् पाश्च्यात्तचे  विश्व् वेगळे असणार हे निश्चित आहे. आपल्याला 'वर्क फ्रॉम होम' का नाही म्हणून इवळणारे या पुढे नावही काढणार नाहीत ! म्हणजे कंपन्या मागे लागतील आणि कर्मचारी नको म्हणतील अशी परिस्थिती होणार आहे ! नवऱ्यांना आता भांडी घासणे ,फरशी पुसणे ही कामे आयुष्यभर करावी लागणार असे दिसतंय. कामवाल्या बाईशी सुट्टी घेण्यावरून कधी गृहिणीचा वाद झाला तर  'हाईत कि सायब ' म्हणायला त्या रिकाम्या ! तीन आठवडे आपण 'रेस्टॉरंट' मध्ये जेवण करता जिवंत राहू शकतो हा साक्षात्कार पण बरेच जणांना होणार आहे ! 'फॉर चेंज' , काही दिवस का होईना मुले मोबाईल ऐवजी मैदानी खेळ खेळण्यात दंग होतील. हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत हे दुर्दैव आहे परंतु ज्यांच्या खात्यात पैसे आहेत त्यांना - इतक्या कमी पैशात पण घर चालू शकते हे जाणून आनंद होईल ! 'म्हणूनच आम्ही म्हणत होतो -बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवायचे' म्हणत आजीची कॉलर ( किंवा पदर) आता कायम ताठ राहणार ! आर्थिक मंदीचा परिणाम जाणवणार हे खरे आहे -परंतु अन्न वस्त्र आणि निवारा -या आणि फक्त याच आपल्या मूलभूत गरजा आहेत , हा नागरिक शास्त्रात घेतलेला धडा प्रत्येक्ष अनुभवामुळे चांगला लक्षात राहील . निदान या पिढच्या तरी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - जेंव्हा लागते ना -तेंव्हा तुम्ही रिपब्लिकन आहात कि डेमोक्रॅट , मोदीवादी आहात कि विरोधी,उच्चब्रू आहात कि गरीब , अति हुशार आहात कि हुशार  ( म्हणजे मानव प्रजाती मूलतः हुशारच -हो ना ? ) , कुठल्या देवाला मानता अथवा मानत नाही , यातल्या कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही हे साऱ्यांच्या लक्षात येईल - नव्हे यावेच अशी आमची मनोमन इच्छा आहे.
दरम्यान  कावळा ,बुलबुल ,कबुतर,चिमण्या ( अजून नामशेष झाल्या नसतील तर ) ,कुत्रे , मांजरे , ससे ,घुशी, सर्प , इतर जंगली प्राणी, डॉल्फिन वगैरे आनंदाने गात असतील - "कैसा मजा आया "

बाकी
काय ? बचेंगे तो और भी लिखांगे !

सुशांत