Saturday, September 26, 2020

घसरलेला चित्रपट

            सुशांत सिंग मृत्यू च्या चौकशीचे प्रकरण एखाद्या मसाला बॉलीवूड चित्रपटापेक्षाही नाट्यमय होत चालले आहे. जसे मसाला चित्रपटात प्रेम ,बदला ,हिंसा ,सेक्स ,विनोद ,अमली पदार्थ किंवा तस्करी असे विविध घटक असतात तसेच या चौकशी चे ही झाले आहे. सुरुवातीला नैराश्यामुळे आत्महत्या म्हणून सुरु झालेल्या या प्रकरणात पुढे नेपोटिसम मुळे नैराश्य आले आणि म्हणून आत्महत्या असा शोध लागला  - आणि पर्यायाने बॉलीवूडच्या प्रस्थपतींना दोषी ठरविले गेले , नंतर ही आत्महत्या नव्हे तर खून आहे हा 'शोध' लागला आणि त्यासाठी त्याच्या कथित गर्लफ्रेंडला दोषी ठरविले गेले. तीचे अन्य कोणाशी असलेले 'संबंध' बाहेर आले. या प्रकरणाला मध्येच राजकीय रंग आला आणि कोणा राजकीय नेत्याचा संबंध असल्याचेही बोलले जाऊ लागले.बरं हे सगळे बिहार निवडणुकांमुळे चालले आहे असा ही आरोप करण्यात आला. मधल्यामध्ये सुशांतच्या कुटुंबातील कथित भानगडी पण चव्हाट्यावर आणण्यात आल्या. सी बी आय चौकशी बद्दल तर इतके नाट्य रंगले कि जणू परदेशी एफ बी आय ला चौकशीला बोलावतायत कि काय असा प्रश्न पडेल. आणि ती मान्य झाल्यावर अनेकांना असा आनंद झाला कि जणू दोन दिवसात मुख्य आरोपी पकडला जाईल आणि खटला चालेल.मधल्या मध्ये दूरचित्रवाणी कर्मचाऱ्यांची कथित मारहाण पण झाली. परंतु इतके सारे झाल्यावरही सुशांतचा मृत्यू कसा झाला हे मात्र कोडेच राहिले.

बर हा तर चित्रपटाचा पूर्वार्ध होता. इथपर्यंत चित्रपट निदान कथेला धरून होता. सगळ्या गोष्टी सुशांतच्या मृत्यूशी संबंधित होत्या. उत्तरार्धात चित्रपट वाईट घसरला. कोणाला मुंबईत असुरक्षित वाटू लागले तर कोणाला अचानक आपल्या कर्तव्याची जाण येऊन रातोरात अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. एका चित्रपट अभिनेत्याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणाने 'देश प्रेमी आणि देश द्रोही ' असे वळण केंव्हा घेतले ( किंवा देण्यात आले ) हे कोणालाच कळले नाही .हे म्हणजे जाना था जपान पाहूंच गये चीन ,तशातले झाले. लोकही येड्यासारखे बघतायत आणि चर्चा करतायत. या पुढे  तर चित्रपटाने वेगळेच वळण घेतले आहे. मुख्य मुद्दा राहिला बाजूला आणि देशप्रेम वगैरे पण अलगदरित्या गेले खड्ड्यात. काय तर म्हणे बॉलीवूडमधील आमली पदार्थांचे सेवन आणि त्यात कोण कोण सामील आहे. सुशांत कथितरित्या आमली पदार्थांचे सेवन करीत आणि त्याची मैत्रीण ते कथित रित्या पुरवतअसल्यामुळे हा अँगल येणे एक प्रकारे सहाजिक आहे. परंतु त्याचा मृत्यूशी काय संबंध ? आणि असला तर त्यादृष्टी ने तपस करा. कोण कोण ड्रग्स घेतात हे रोज हेड लाईन म्हणून छापून येते आहे.  कोणाला पडली आहे ? बेकायदा ,अनैतिक ,अनधिकृत आणि त्याज्य गोष्टी बॉलीवूडमध्ये नव्या नाहीत. पिढ्यानपिढ्या त्या चालत आलेल्या आहेत . इतरत्र समाजातही त्या चालतातच. ड्रग्स घेणे हे काही गेल्या दोन-चार वर्षांचे प्रकरण निश्चित नाही. ते बेकायदा असेल तर त्याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी जरूर करा. परंतु एवढा बागुलबुवा  कशाला ? काल पुण्यातील हिंजेवाडीत कित्येक किलो गांजा जप्त झाला. ते ही तितकेच बेकायदा आहे ! किती चर्चा झाली त्याची ?

आता या सगळ्यातील आमचा आक्षेप काय ? तर - मृत्यूतील चौकशी मागील कथित राजकारण जे असेल ते असेल. आम्हाला काही घेणे देणे नाही . याचा अर्थ कळत नाही असे निश्चित नाही बरं का!  यह पब्लिक है यह सब जानती है! परंतु या चित्रपटाला जे वेगळे वळण दिले जातंय आणि त्याचा समाजावर जो संभावित परिणाम होणार- ते आमच्या चिंतेचे कारण आहे. जे काही ड्रग्स बद्दलचे whatsapp  मेसेज लीक होतायत ते कोण करतंय ? का करतंय ? आरोपी तर निश्चित करणार नाहीत होय ना ? मग जाणून बुजून एवढी चर्चा का रंगवली जाती आहे ? काय साध्य होणार त्यातून ? चौकशी गोपनीयरित्याही करता येते. मग एवढा तमाशा कशाला ? जे नट नट्या  यात कथितरित्या गुंतलेले आहेत , ते अनेक युवक -युवतींच्या  गळ्यातील ताईत आहेत. ते वयाचं तसे असते. आता आपला आवडता नट किंवा नटी ड्रग्स घेतात हे कळल्यावर या फॅन्सचा हिरमोड होईल आणि ते यांना फॉलो करणे सोडतील अशी अपेक्षा आहे . तसे झाले तर उत्तमच. परंतु आपल्या आवडत्या नट -नात्यांमुळे हे तरुण ड्रग्सकडे आकर्षित झाले तर ? कोण जवाबदार राहणार ? बॉलीवूड साफ करण्याच्या नाटकापायी आपण त्यातील घाण समाजात पसरवत आहोत याची जाणीव आहे का कर्त्यांना ?  कीआपल्या क्षणिक राजकारणासाठी आणि चॅनेल्सच्या प्रसिद्धीसाठी आपण समाजाचे किती मोठे नुकसान करतोय,किती तरुणांच्या जीवाशी खेळतोय याची फिकिरीच नाही या निर्लज्जनां ? घरातील सगळीच घाण चव्हाट्यावर आणून जगाला दाखवायची नसते. बरेचदा ती पुडीत बांधून गुपचूप कचरा कुंडीत टाकून यायची असते. कोणालातरी सद्बुद्धी सुचेल आणि हे लवकरच थांबेल ही अपेक्षा करूया.

आणि एवढे सगळे करूनही " सुशांत सिंग को किसने मारा " या चित्रपटाचा अंत कधीही बाहेर येणार नाही याची आम्हाला खात्री आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

Friday, September 18, 2020

पळीव प्राणी भाग २-सर्वज्ञानी

             कधी कधी एखाद्या पार्टीत किंवा समारंभात जाण्याचा योग्य येतो (गरज पडते म्हणा हवे तर) जेथे आपल्या फारसे कोणी परिचित नसतात. केवळ उत्सवमूर्तींच्या किंवा त्यांच्या कोणी आप्तेष्टांच्या आग्रहाखातर आपल्याला जाणे भाग असते. आपण जातो, भेटण्याची औपचारिकता पूर्ण करतो, स्टार्टर्स अथवा शीतपेय घेतो आणि इकडे तिकडे नजर टाकतो. बरेच जण छोटे छोटे घोळके करून गप्पा झोडत असतात. जर कोणी ओळखीचा दिसला तर आपण हळूच त्यांच्यात सामील होतो. पुरुषांबद्दल बोलायचे झाले तर विषय निरस असतात. राजकारण खासकरून मोदी ,क्रिकेट,शेअर मार्केट(कोणाला काहीही कळत नसले आणि प्रत्येक  जण घाट्यात असला तरीही). घोळक्यातील बहुतांश जर आय टी तले असतील तर ते आपापले रडगाणे गात असतात. हळू हळू इतर क्षेत्रातील मंडळी काढता पाय घेतात. ह्यांचे नेहेमीचेच रडगाणे म्हणत ! बायकांचे काय विषय असतात याची नक्की कल्पना नाही ( म्हणजे आम्ही उगाच चोमडेगिरी करायला किंवा हळूच कान देऊन ऐकायला जात नाही). परंतु साडी चांगली आहे, कुठून घेतली,मी इथून तिथून घेते, किंवा  एखाद्या रेसिपी बद्दल बोलणे, लग्न असेल तर विरोधी पक्षाची (यात विरोध या शब्दाचा सरळ अर्थ घेणे ) माहिती काढणे किंवा गॉसिप करणे, शॉपिंग बद्दल माहितीआदान-प्रदान करणे असे काहीतरी उपयुक्त संभाषण चालत असावे असा आमचा कयास आहे . चार बायका मिळून मोदींना शिव्या घालतायत किंवा उदो उदो करतायत अथवा शेअर मार्केट बद्दल बोलतायत किंवा  चार आय टी वाल्या ( पुरुषांपेक्षा कितीतरी खडतर जीवन असेल तरीही ) उगाच प्रोजेक्ट बद्दल बरळ ओकत बसल्यात असे आमच्या तरी निदर्शनात नाही आले अजून. सो मच फॉर जेंडर एक्वालिटी ! अर्थात उपयुक्तता आणि वेळ यांचा ग्राफ मांडायचे झाल्यास बायकांचे विषय हे उपयुक्तेतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान असतात ( त्याचा रोजच्या जीवनात काहीतरी उपयोग होतो) आणि ही माहिती अतिशय कमी वेळात संकलित केली जाते. पुरुषांचे बरोबर उलटे असते!

असो तर अशाच घोळक्यात एखादा विषय चर्चेत असतो,आपण उत्सुकतेने ऐकत असतो आणि तिकडून हेल्लो XXX म्हणून हाक येते. XXX हा नेमका आपल्याच घोळक्यात उभा असतो आणि ती भारदस्त आणि कित्येक वेळा सूट वगैरे घातलेली व्यक्ती आपल्याच कळपाच्या दिशेने चालत येतांना आपल्याला दिसते. पुढील चार ते पाच मिनिटात ती व्यक्ती संपूर्ण संभाषणाचा ताबा घेते . "काय डिस्कशन चाललंय बॉस" म्हणत एक तर स्वतः सहभागी होते किंवा "कितने साल बाद मिल रहा है बॉस" म्हणत आहे त्या विषयाला खुंटा लावून नवीन विषय सुरु करते.यांचा आवाज भारदस्त आणि मोठा (लाऊड ) असतो. सभागृहातील किमान अर्धे लोक कोण हा? या नजरेने पहात असतात. परंतु त्यांना याची पर्वा नसते. " सेव्हन ऑर ऐट ? डॉट कॉम बबल आधी आपण भेटलो होतो नाही ? त्यानंतर तुझा ले ऑफ झाला ?" असे तो अर्ध्या सभागृहाला ऐकू जाईल या आवाजात XXX ला सांगत असतो. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला ओळख दाखविली असे XXX ला होते. पुढे  त्या घोळक्यात अनेक विषय चर्चीले जातात परंतु बोलणारा केवळ आणि केवळ एकच असतो. काही निरागस जण उत्सुकतेने ते सर्व बोलणे ऐकत असतात.काही तर याला केवढे माहिती आणि एवढे कसे माहिती या कुतूहलापोटी तोंडात बोट घालतात. परंतु या XXX च्या मित्राचे अविरत बोलणे सुरूच असते. दरम्यान XXX ने सुमडीत काढता पाय घेतलेला असतो. आणखी एक दोन जण मागे सरकत सरकत हळूच मागे वळून मागच्या घोळक्यात सामील होतात. उरतात ते तोंडात बोटं घातलेले दोघे तिघे. घरी जाई पर्यंत त्या तिघांना , "आपण झक मारली आणि मनुष्यकुळात जन्म घेतला. आपल्याला काहीच माहिती नाही " असा न्यूनगंड आल्याशिवाय रहात नाही. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी हा अनुभव आलेला असतो. अशी व्यक्ती कधी (देव ना करो ) भेटल्यास, आपण "सर्वज्ञानी" माणसाच्या सानिध्यात आहोत असे समजावे.

या सर्वज्ञानी मंडळींचे काही विशिष्ट गुण असतात. सर्वात महत्वाचा म्हणजे यांना सगळ्यातलं सगळं कळतं -निदान तशा अविर्भावात ते जगत असतात. क्रिकेट ,किंवा मोदी तर यांच्या हातावरचा मळ. मोदींची पुढची रणनीती हे तुम्हाला इतक्या विश्वासाने सांगतील की जणू आताच मोदी आणि शहांबरोबर गुफ्तागु करून आलेत. स्टॉक मार्केट मध्ये वॉरेन बफे कुठे चुकतोय आणि तो काही वर्षांनंतर आपटेल हे भाकीत ते अगदी नॉस्टरडॅमस च्या अविर्भावात करतात. हे तर झाले यांचे रोजचे विषय. झिम्बाब्वेच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी काय करावे या पासून ते नव्याने व्यालेल्या गाईची निगा कशी राखावी इथपर्यंत सर्व विषय ते तितक्याच सहजतेने हाताळतात . सल्ला विचारल्यास तर दुग्धशर्करा योग ! समारंभातील शेवटचा माणूस जेवून घरी जाईपर्यंत तुम्हाला सल्ला ऐकावाच लागतो! बऱ्याचदा ही मंडळी एखाद्या कंपनीत किंचित वरच्या पदावर असते किंवा एखादा व्यवसाय करीत असते . आपल्या उपलब्धतेचा आणि कर्तृत्वाचा त्यांना  सार्थ अभिमान असतो आणि त्या अनुषंगाने  जगाला ज्ञान वाटणे हे आपले परम कर्तव्य आहे असा त्यांचा समज असतो. सर्वज्ञानी मंडळी बऱ्याचदा उंचपुरे आणि स्मार्ट असतात. चांगले चुंगले कपडे घालणे , जमेल तितक्या महागड्या वस्तू आणि गाड्या बाळगणे, भारदस्त आवाजाने लोकांना आपल्याकडे क्षणात आकर्षित करणे , एखाद्याने मतभिन्नता दाखविली किंवा विरोध केला तर अतिशय तुच्छ नजरेने पाहणे आणि तुसडे पणे बोलणे हे यांचे सर्वसामान्य गुण. बरं एवढ्यावर थांबतील ते सर्वज्ञानी कुठले ? आपल्याशी बोलून झाल्यावर यांचा मोर्चा स्त्रीवर्गाकडे वळतो. एखादा भंगार पी जे मारून ते बायकांना हसते करतात आणि मग दुपटी , टोप्या कुठे मिळतात, गाजर हलव्याची रेसिपी मधुराची चांगली कि संजीव कपूरची , क्लायंट मिटींग्स ला चुडीदार घालावे कि सूट इत्यादी विषयांवर आपले ज्ञान पाजळतात. बरं सर्वज्ञानी क्लब हा मेल डॉमिनेटेड आहे अजून तरी. सर्वज्ञानी स्त्रियाही असतील कदाचित परंतु आमच्या निदेर्शनात नाहीत आल्या अजून.दरम्यान या सर्वज्ञानी मंडळींच्या 'सौ' बऱ्याचदा शांत आणि "डाउन टू अर्थ " असतात आणि कोपऱ्यात कुठेतरी मुलाला घेऊन एखादीशी गप्पा मारत बसलेल्या असतात.

या आणि कमी अधिक प्रमाणात तत्सम गुणांच्या अनेक सर्वज्ञानींशी आमची आतापर्यंत गाठ पडली आहे.  जनरेटर बंद पडल्यास तो कसा सुरु करावा , महाराष्ट्रातील प्रत्येक महामार्गावरील प्रसिद्ध धाबे , विविध पिकांना लागणारे प्रति एकरी पाणी , आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ने पुढे काय संकट ओढवणार ,सायरस मिस्त्रींनीं काय चूक केली , चप्पल लागत असल्यास ( ती घालणे बंद करायचे सोडून) काय करावे ?  या आणि इतर अनेक विषयांवर आमच्या ज्ञानात निरर्थक भर पडली आहे. बरं आम्ही पण काही कच्चे गुरु चे चेले नाही ! मोदींनंतर योगी कि शहा ? अजून पाच वर्षांनी एलोन मस्क जास्त श्रीमंत असेल कि जेफ बेझो ?, कोहली कि रोहित  असे पेचात टाकणारे प्रश्न आम्ही घेऊन गेलोत . परंतु सर्वज्ञानी मंडळी आम्हाला पुरून उरलेत. एकदा काय अपवाद. सुशांत सिंग राजपूत बद्दल चर्चा शिगेला पोहोचली असतांना मी प्रश्न टाकला - मला पाइल्स चा त्रास होतोय. तुम्हाला काही अनुभव ? आम्ही गॅलरीत उभा असतो तर याने निश्चित मला खाली टाकला असता. परंतु त्याने तुच्छ नजरेने माझ्याकडे पाहिले आणि तेवढ्यापुरते  का होईना बोलायचे बंद झाला ! पाइल्स चे खोटे कारण सांगून मी हसे करून घेतले खरे .परंतु एकदातरी एका सर्वज्ञान्याला शांत केल्याचे समाधान !

आताशा कोणी भेटला कि मी तडक "भूक लागली " म्हणत बुफेच्या रांगेकडे धाव घेतो !

 सुशांत गोसावी