Saturday, April 18, 2020

मूर्ख

            जुलै २००७- डॅलस ,टेक्सास  येथे रोजप्रमाणे हापिसात काम करीत असतांना अचानक मला एक घोळका आमच्या मजल्यावरच्या कॅफेटेरियात जातांना दिसला. दुपारचे चार वाजत आले होते. जेवायची वेळ केंव्हाच टळून गेली होती. बरं वाढदिवस साजरा करतायत म्हंटलं तरी एवढी लोकं ? यांचा उत्साह असा कि जणू स्वतःचाच वाढदिवस साजरा करायला निघालेत! इकडे तिकडे पहिले तर माझे सहकारी आणि टीम मधील इतर पण त्या घोळक्यात हळूच सामील झालेले. राहिलो होतो ते फक्त मी आणि बॉस. त्याला काही घेणं देणं नव्हतं आणि मला काय चाललंय काही कळत नव्हतं. तसेही इकडतिकडच्या बातम्या गोळा करणे, गॉसिपिंग वगैरे गोष्टी आपल्याला झेपत नाहीत. म्हणजे सपशेल नापास. आपलं काम भलं आणि आपण भलं  हा आमचा स्वभाव( जमत नसल्यामुळे उगाच - आपल्याला नाही आवडत वगैरेचा आव आणायचा ). दोवालांच्या टीम मध्ये असतो तर त्यांनी एका महिन्यात घरी पाठविले असते. तर ही काय भानगड आहे हे कळेना. रहावुन मी पण त्या घोळक्याच्या दिशेने चालत सुटलो. कॅफेटेरियात पोहोचलो तर अतुल बर्वे  नामक आमचे क्लायंट मॅनेजर नवं बाळंतिणी प्रमाणे हातात काहीतरी घेऊन गोंजारत होते आणि सगळी जनता वेडी पिशी होऊन त्या 'अर्भका' ला न्याहाळत होती. विचारणा केली (करावीच लागली ) तर कळले कि बर्वे साहेबांनी आय फोन का काय ते पाच सहा तास रांगेत उभे राहून विकत घेतला होता आणि उत्साहाने तो हापिसात दाखवायला आणला होता. आमच्या त्या क्लायंट ऑफिसातील तो पहिला आय फोन ! लाँच झाल्यावर लगेच आणि तेही टेक्सास सारख्या खेड्यात ( नो ऑफेन्स मेन्ट ) तो आला याचे विशेष कौतुक होते सगळ्यांना. हे सगळे पाहून मला हसावे की रडावे कळेना ! तसेही तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आमचा शेवटून दुसरा वगैरे नंबर लागेल ( दोवालांनी हाकलण्याचे हे पण एक कारण निश्चित असते -ती वेळ आली असती तर). आमच्या कॅन्टीन मधील पोऱ्याजवळ मोबाईल पाहिल्यावर मला ओशाळल्यासारखे झाले आणि पहिला मोबाईल विकत घेण्याचा निर्णय घेतला होता . कितीतरी वर्षे नोकिया ३३१०,३३१५ वगैरे वर आमचा गुजारा चालला होता. त्यातील सॉलिटियर आणि स्नेक गेम आमच्या मनोरंजनापुरते पुरेशे होते. या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार म्हणजे आम्हाला " मय कहाँ हूँ " टाईप अनुभव देणारा होता .त्या पार्टीतून परततांना एकाने विचारले - "तुला माहित नव्हते आय फोन 'लाँच' झाला ?". नाही म्हणून मोघम उत्तर दिले. च्यामायला आय फोन कशाला खातात हे माहित नव्हते .तो लाँच वगैरे तर दूरची बात ! नंतर चौकशी केली या आय फोन बद्दल. त्यात घड्याळ ,गाणी ,टच स्क्रीन वगैरे बरेच काही असल्याचे मला सांगण्यात आले. खरं सांगतो -त्याची किंमत सहाशे डॉलर आहे या व्यतिरिक्त बाकी काहीही कळले नाही. अतुल बर्वेंना अति पैसेवाला मूर्ख ठरवत मी मोकळा झालो.
त्या घटनेला १३ वर्षे पूर्ण होतील. दरम्यान आय फोनच्या दहा बारा पिढ्या होऊन गेल्यात. त्यांची इतरही औरस आणि अनौरस अपत्ये, चुलते ,पुतणे ,भाचे इत्यादी मंडळी आज जगावर राज्य करीत आहेत.स्टिव्ह जॉब्स ने आचमन करत सोडलेल्या त्या चार थेंबांचे आज महासागरात रूपांतर झाले आहे. टेक्सास हापिसातील त्या घटनेमुळे ( किंवा झालेल्या फजेतीमुळे म्हणा ) आणि आपल्याला तसले काही नको या अतिआत्मविश्वासामुळे आम्ही कित्येक वर्षे स्मार्ट फोन घेण्याचे टाळले.हे सगळे आठविण्याचे कारण म्हणजे - सध्या लॉकडाउन दरम्यान स्मार्टफोन्सचा प्रचंड उपयोग होतोय. माहिती संपादन असू कि मनोरंजन ,विरंगुळा असू अगर आप्तेष्टांशी संपर्कात राहणे असू अथवा मुलांचे ' -शिक्षण' असू  - स्मार्ट फोन आणि त्या प्रजातीतील प्रत्येक जण अगदी हनुमानासारखा आपल्या मदतीला धावून येतोय . कोरोना बद्दल माहिती देणाराही तोच आणि त्यापासून विचार विचलित करण्यास मदत करणाराही तोच ! रहावुन म्हणावेसे वाटते -"हाऊ रॉंग आय वॉज ". मूर्ख जॉब्स किंवा बर्वे नव्हते तर मी होतो. नाही म्हणायला स्मार्टफोन्स चे दुष्परिणाम पण आहेतच. परंतु टीव्ही लाही  "इडियट बॉक्स " म्हणून हिणवले जायचेच की . नव्वद च्या दशकात खासगी दूरचित्रवाहिन्या आल्या खास करून परदेशी (एम -टीव्ही ,एफ -टीव्ही  वगैरे ) तेंव्हाही गदारोळ माजला होताच. एवढे कशाला? १८६० च्या दशकात नाशिकरांनी ( तेथील अति शहाण्या मंडळींनी) रेल्वेला विरोध केला. म्हणून स्थानक गावापासून १० मैल दूर उभारण्यात आले. त्याची किंमत आजही भोगतोय .
आलेले बदल पारखून आत्मसात करणे गरजेचे असते. मग ते तंत्रज्ञानातील असोत किंवा आयुष्यातील.बरोबर ना ? कोरोना ने अनेक बदल घडविलेत. पश्च्यातच्या काळात वैश्विक बदल पहायला मिळतील. या आणि आधीच्या पिढ्यांनी कधी विचारही केला नसेल असे. काही चांगल्या गोष्टी घेऊन येतील ,काही नावडत्या. यावेळी मात्र मूर्ख बनायचे नाही असे मी ठरविले आहे.

सुशांत गोसावी

Sunday, April 12, 2020

नशीब

         तेरे नसीब में मै हुं के नहीं ,मेरे नशीब मे तू हय के नाही - हे गाणे ऐकतांना मला नेहेमी खुळेपणा वाटायचा. म्हणजे ,जे अनपेक्षित होतं ते तर नशिबाने दिले असे म्हणतात ना ? उद्धवजींना विचारा हवे तर. आणि खोटं वाटत असेल तर फडणवीसांना ! असो -कोणाचं नशीब कुठल्या परिस्थिती कसे उजळेल काही सांगता येत नाही राव. आता हेच बघा ना- कुठलं काय ते हैड्रोक्लोरोपीन -आज पर्यंत दोन चार डॉक्टर आणि फार्मसी कंपनी वाले सोडले तर कोणाला माहितही नव्हते ! माहित असायचे काही कारणच नाही म्हणा. सामान्यांना सोडा ,एम आर लोकांना तरी त्या मलेरियाच्या गोळ्यांत काय रसायन आहे हे माहित असेल कि नाही शंका आहे. कोणी तरी (अर्थातच पाश्चात्य देशात - आपल्याकडे लावला असता तर त्याला येड्यात काढले असते ना !) हा शोध लावला कि ते औषध कोरोना वर प्रभावी आहे आणि हैड्रोक्लोरोपीन ला  इंडिया -बी टीम च्या ट्वेल्व्हथ मॅन पदावरून थेट इंडियन टीम च्या ओपनिंग वर आणून ठेवले ! कारण का ? तर जगातल्या एकूण उत्पादनापैकी ७० टक्के भारतात होते. आता मुळात हे औषध वापरले जाते मलेरिया च्या उपचारासाठी. याचा अर्थ आपल्याकडे मलेरियाचे इतके रुग्ण असतात. ही अर्थातच देशासाठी भाषणावह बाब नाही. परंतु जसे गणपती विसर्जनावेळी नदीकाठी ,काडेपेटी सापडत नसतांना एखादा बिडी सिगारेट ओढणारा  खिशातून काढतो आणि आपला ( तत्कालीन का होईना) भाव वाढवतो तसे काहीसे झाले आहे. हैड्रोक्लोरोपीन ची मागणी वाढल्यामुळे औषध कंपन्यांचे शेअर भाव वधारणारच . सोबतच मोदींचे पण वधारले आणि देशाचा मान वाढला असे म्हणतात. पुढे कोरोना चे सावट संपल्यावर हेच आपले 'मित्र राष्ट्र'', मैत्री  विसरून सुग्रीवासारखे चैन विलासात रमून जाऊ नयेत म्हणजे मिळवले
सुग्रीवावरून आठवले - खऱ्या अर्थाने नशिबाचा कायापालट झाला आहे तो दूरदर्शनचा. कुठे कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या जुन्या मालिकांच्या सीड्या लावायला सुरुवात केली आणि इतर सर्व वाहिन्यांना ( आणि  मालिकांतील वहिन्यांना पण ) धुवून टाकले. हे म्हणजे पूर्वी  'व्ही एस एन एल ' , ' एन जी सी'  किंवा 'टी सी एस' चे लिस्टिंग झाले कि ते बाकीच्या सगळ्यांना धूळ चारत तशी गत झाली. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे जिओ. परंतु सध्या टाटांचा उदो उदो होतोय सोशल मीडिया वर म्हणून म्हंटलं 'टी सी एस'  चे नाव घेऊ. इतके दिवस  निन्जा हातोडी आणि राधिका मसालेवाले यांच्या तावडीत असलेला तो दूरदर्शन संच पण मोकळा श्वास घेत असेल सध्या. आतापर्यंत आजी आजोबा आणि मुलं हीच त्या टीव्ही चे मेजॉरिटी शेअर होल्डर होते. आई बाबांची किंमत नगण्य होती- मॅच ,निवडणुका असले मोजके प्रसंग सोडले तर. आता आई बापच उत्साहाने पाहतायेत दूरदर्शन आणि आपल्या मुलांना पण प्रोत्साहित करत आहेत. बघ आमच्या वेळी किनई कसल्या मज्जेदार सिरिअल्स असायच्या असे काही तरी सांगून मुलांना भुरळ घालतात. मुलांना आवडल्या तर उगाच यांची कॉलर ताठ. नाही तर " आज कालच्या पिढी ला टीव्ही वाल्यांनी पूर्णतः बिघडविले आहे म्हणून मोकळे. बाकी रामायण-महाभारतातील 'स्पेशल इफेक्टस' अगदीच सुमार दर्जाचे आहेत मात्र. म्हणजे त्या मालिकांनी जेवढी प्रसिद्धी मिळवली त्या मानाने. नाही तर यांच्या पेक्षा टुकार दाक्षिणात्य चित्रपटातले इफेक्टस असत.  स्टार वॉर्स पहायची सवय असलेले आमचे चिरंजीव तर ते स्पेशल इफेक्टस बघून हसतात. परंतु - डोन्ट लूक फॉर इफेक्ट्स ,फॉलो  कन्टेन्ट म्हणत मी त्याला गप्प करतो. सध्यापुरता तरी.  बाकी या मालिका प्रदर्शित झाल्या तेंव्हा एक तर काँग्रेस ( आणि जनता दल वगैरे नावाची खिचडी ) हिंदूवादी होते किंवा दूरदर्शन केंद्रात कोणी तरी प्रखर हिंदूवादी होता ज्याने या मालिका निर्मित होऊ दिल्या- आणि या हेराचा ( किंवा चोराचा ) पत्ता वर्षानुवर्षे केंद्र सरकार ला लागला नाही. दोन्ही पैकी एक काहीतरी खरे असणार . नाहीतर असल्या 'कॉम्युनल' मालिका आजच्या काळात बनविणे शक्यच नाही. 
असो -जे काय खरे आहे ते मोदी शोधून काढतीलाच.
तोपर्यंत आपण घरीच राहू आणि  रामदास बाबा कि जय म्हणत  'गो कोरोना' चा जप करू.