Monday, February 13, 2023

यह पब्लिक है -

लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट पडल्यावर जी चूक बॉयकॉट वाल्यांनी केली होती - म्हणजे आपण  फुंकर मारली म्हणून वादळ आलं - हे समजण्याची , तीच चूक , नव्हे तीच्या तिप्पट चूक फेकुलर करतायत. इथे मुद्दामून मी बॉयकॉट विरोधक हा शब्द नाही वापरला. कारण बॉयकॉटचा विरोध करणारे सामान्यजन पुष्कळ आहेत. जसा बॉयकॉटचे समर्थन करणारा प्रत्येकजण हा काय संघी नाही तसेच त्याचा विरोध करणारा प्रत्येकजण या संघ विरोधकही नाही. मुळात संघ बॉयकॉट समर्थक आहे असे कुठेही संकेत नाहीत ! असा एक फार मोठा समाज आहे जो परिस्थितीचे योग्य ते आकलन करून निर्णय घेतो. अशा समाजाला गटांमध्ये विभाजित करणे ही फार मोठी व्यासायिक चूक असते. ती राजकीय चूक सुद्धा असेल. परंतु त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी. तूर्त आपण मला बोलायचंय त्या मूळ मुद्द्याकडे वाळू

  हिंदी चित्रपट सृष्टीत बऱ्याच समस्या आहेत. म्हणजे  वशीलेवजी (nepotism) , काही बड्या लोकांची मक्तेदारी, सर्जनशीलतेचा अभाव, अभिनयातील तोच तोच पणा ,प्रेक्षकांशी दुरावत चाललेले नाते आणि विशेषकरून किंवा आधी नमूद केलेल्या कारणांमुळे ढासळत चाललेला चित्रपटांचा दर्जा. या सगळ्यांची परिणीती ही चित्रपट व्यासायिकदृष्ट्या पडण्यात होत गेली. हा काय एका रात्रीत घडलेला बदल नव्हता. परंतु वर्षानुवर्षे प्रक्रिया सुरु होती .या सगळ्यात धर्माचा किंवा राजकीय विचारसरणीचा तसा संबंध नव्हता किंबहुना असायला नको होता. परंतु पाच सात वर्षांपूर्वीपर्यंत ज्या लोकांची मक्तेदारी होती ते एका विशिष्ट समुदायाचे होते-कदाचित योगायोगाने असेल किंवा वशीलेबाजी मुळे असेल किंवा मग -काही म्हणतात त्याप्रमाणे एक पद्धतशीर कटाचा भागही असू शकतो .अशी परिस्थिती होती कि फक्त नावावर चित्रपट काहीशे कोटींचा व्यवसाय करीत. त्यामुळे मग अशा लोकांना एक घमेंड चढला. चित्रपटांचा दर्जा ढासळला हे सांगायला नको. आणि परिणीती चित्रपट दणदणीत अपटण्यात झाली.वास्तविक हिंदी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांनी आपली मक्तेदारी स्थापित केली आहे. दर काही वर्षांनी नवीन पात्र येतात आधीचे प्रभावहीन होतात. एक पिढी अस्ताकडे जाते. नवीन पिढीचा उदय होतो .काही वर्षांपूर्वी ती खान लोकांची आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी होती. नव्वदीच्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीवर खान मंडळींचा उदय झाला आणि दरारा वाढू लागला. पुढील दोन दशकांत त्यांनी अनभिषिक्त अधिपत्य निर्माण केले. दाऊद आणि  गुन्हेगारी विश्वाच्या बेड्यांतून मुक्त होऊ पाहणारी चित्रपटसृष्टी आणि कॉर्पोरेट मंडळींची गुंतवणूक या मधल्याकाळात ज्या काही बड्या निर्माते कलाकार मंडळींनी आपली सत्ताकेंद्रे निर्माण केली त्यात खान मंडळी अग्रेसर होती .

प्रामुख्याने या कारणामुळे या प्रकरणाला एक वैचारिक आणि धार्मिक रंग दिला गेला. योगायोगाने किंवा भारतात नवीन राजकीय वारे वाहू लागल्यामुळे असेल कदाचित - ' राष्ट्रवादी ' ( काकांचा काहीही संबंध नाही हे लक्षात घ्या) चित्रपटांचा सुळसुळाट सुरू झाला. सुरुवातीचे प्रचंड गाजले. मग बॉलिवूडच्या परंपरेनुसार जो तो अशाच कथानकावर चित्रपट काढत सुटला. मग निकृष्ट चित्रपट सुद्धा गल्ला भरू लागले. आणि याच दरम्यान प्रामुख्याने टुकार चित्रपट ( काही अपवाद सोडता) बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने काही अप्रतिम चित्रपट निर्माण केले. तर बॉलिवूडच्या बड्यांच्या मक्तेदारीला आणि टुकार चित्रपटांना कंटाळलेला प्रेक्षकवर्ग, राष्ट्रीय विचार असलेले( किंवा तसे भासाविणारे) नवीन चित्रपट यांची निर्मिती आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे चांगले प्रदर्शन या सर्वांमुळे एक भेद निर्माण झाला. त्यात Covid मुळे चित्रपटगृहे बंद असणे, चांगल्या इंग्रजी चित्रपटांची प्रादेशिक भाषांतरे उपलब्ध होणे, टी टी चा वाढता प्रभाव या सगळ्यांची भर पडली.राजकीय वातावरण तापलेले असतेच . मग या भेदाचा आणि चित्रपटांच्या निर्माते, कलाकार यांचा वापर राजकीय अजेंडा साठी सुरू झालासर्वच बाजूंनी.

या प्रकरणाला काही अस्सल राजकीय आणि आर्थिक कारणे सुद्धा आहेत. एवढी प्रभावशाली चित्रपटसृष्टी मुंबईतून का व्यवसाय करते ? हिंदी चित्रपटांची निर्मिती मुंबईतून का होते ? हा प्रश्न विचारणारा एक वर्ग कायम होताच. हिंदी चित्रपटसृष्टीला एका उत्तरेकडच्या राज्यात हलविण्याचे प्रयत्न गेले दोन दशके होत आहेत. पार मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होते तेंव्हापासूनहा व्यवसाय इतरत्र हलवायचा तर - एकतर आहे तसा हलविणे किंवा आहे तो उधळवून नवीन चित्रपटसृष्टीची निर्मिती करणे - असे दोन पर्याय होते अशा शक्तींकडे. त्यांनी दोन्ही दृष्टीने प्रयत्न सुरु केले . शिवाय मुंबईचे आर्थिक प्राबल्य कमी करण्यासाठीही एक वर्ग झटतोय अनेक वर्षेहिंदी चित्रपटसृष्टी ही मुंबईच्या अनेक आर्थिक आणि सांस्कृतिक बलस्थानांपैकी एक . तीला धक्का दिला तर मुंबईचे अपरिमित नुकसान होईल . त्यामुळे प्रस्थापित हिंदी चित्रपटसृष्टी - म्हणजे बॉलीवूड ला खाली खेचायला बघणारे किंवा तशी मनीषा असणारे अनेक होतेच. हे सगळे होत असतानाच सोशल मीडियाचा प्रभाव वाढत होता . एका क्षणात काहीही बातमी जगाच्या कान्याकोपऱ्यात पोचवली जाऊ शकते हे लोक आश्चर्याने बघत होते. या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा जसा चांगल्यासाठी वापर झाला तसा काही हितसंबंध जपण्यासाठी अथवा बिघडण्यासाठी होऊ लागला.  बहुसंख्यिक लोक जर एखाद्या विचारा विरोधात असतील - मग तो विचार किंवा ती विचारधारा खरोखर अस्तित्वात असो किंवा कोणी आभास निर्माण केला असो  - तर त्या विचारला - कधी तर उत्पादनांना विरोध करण्याची पद्धत सुरु झाली - ज्याला आपण कॅन्सल कल्चर  किंवा बॉयकॉट कल्चर म्हणून ओळखतो . लोकांना आपली ताकद नव्यानेच कळली होती. मग तिचा अमर्याद वापर सुरु झाला. काही चांगले घडले - बरेच वाईट. असो- तर या कॅन्सल कल्चरने प्रचलित चित्रपट पाडण्यात कॅटलीस्ट ची भूमिका बजावली.

दरम्यान काळ पुढे  सरकला होता - राष्ट्रवादावर आधारित चित्रपटांचा सुळसुळाट होत चालला होता. त्यातील बहुतेक सुमार दर्जाचे होते आणि तोच तोच पणा होता. काही तर सरळ सरळ प्रोपागंडा सिनेमे होते आणि ते उघड उघड दिसत होते. लोक कंटाळले - शेवटी ते पैसे मोजत होते. त्यांना काहीतरी वेगळे हवे होते - बऱ्याच वर्षांनी शाहरुख चा चित्रपट येत होता . तो ही स्पाय युनिव्हर्स या विषयावर. लोकांनी हे गर्दी केली. चित्रपट व्यासायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी झाला. या यशाला बॉयकॉट वाल्यांचा पराभव असे रूप देण्यात आले. मुळात ज्या विचाराचा चित्रपटांच्या यशापयशावर अगदी मर्यादित परिणाम होता त्याला एक भयानक राक्षस दर्शवून त्याच्या विरुद्धच्या विजयाचे पोवाडे गायले जाऊ लागले. फेक्युलरांना तर तौबा आनंद झाला! आता जणू मोदींपासून संघापासून सगळे पराजित झालेत - नफरत कि हार मोहोब्बत कि जीत वगैरे गुणगान सुरु झाले.  परंतु एक लक्षात घ्या - हिंदी चित्रपट पडायला वर नमूद केलेली कारणे प्रामुख्याने जवाबदार होती. कॅन्सल किंवा बॉयकॉट कल्चर ही योगायोगाने त्या वेळेत सुरु असलेली  एक सामाजिक चळवळ होती. एका चित्रपटाच्या चालण्याने जर लोक -खास करून चित्रपट अभिनेते आणि निर्माते मूळ कारणांकडे डोळझाक करून या असल्या कॅन्सल बीन्सल गोष्टींकडे गांभीर्याने बघू लागले तर पुढील चित्रपटांची गत अजून वाईट झाल्याशिवाय राहणार नाही.

शेवटी काय ? यह पब्लिक है ...ये सब जाणती है - होय ना ?

सुशांत गोसावी 

१३-०२-२०२३