Saturday, January 16, 2021

तात्यापुराण भाग १ -उदयास्त

             तात्या गेले. म्हणजे गेल्यात जमा आहेत. अर्थात त्यांचा विघ्नसंतोषी स्वभाव पाहता शेवटच्या काही तासांतही ते काहीतरी (स्वतःसाठी) विध्वंसक करू शकतात .परंतु त्यांच्या वागण्यावरून किंवा देहबोलीवरून शक्यता कमी वाटते . तात्या जाणार हे विधान दोन महिन्यांपूर्वी पण करता आले असते. परंतु ते काहीतरी भानगड करणार याचा अंदाज जवळपास सगळ्यांनाच होता. आणि तसेच झाले. त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये जो राडा घातला त्यामुळे जो अभूतपूर्व ( म्हणजे सुमारे दोन शतकानंतर ) प्रसंग उद्भवला आणि अमेरिकेची जी नाचक्की झाली ती विसरायला बराच काळ जाईल. अमेरिकन जनता ,प्रशाससकीय व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा ही गोष्ट लवकर विसरणार नाहीत. आणि विसरू ही नये. अर्थात अमेरीकेत लोकशाहीची मुळे भक्कम आहेत.याआधीपण तो देश बिकट राजकीय प्रसंगातून अनेकदा गेला आहे. त्यामुळे असले प्रसंग निभावून नेण्याची मूलभूत क्षमता तिथल्या व्यवस्थेत आहे. असले चार तात्या आले तरी काही बिघडवू शकणार नाहीत. परंतु असले तात्या मुळात येऊच नयेत याची व्यवस्था किंवा उपाययोजना करता येईल का ? ते पहायला हवे.

दैव देते आणि कर्म नेते -याचे उत्तम उदाहरण म्हणजे तात्या. अर्थात राष्ट्रपतीपद हे काही त्यांना कोणी आंदण दिले नाही- कि आई ने सांगितले बस गादीवर म्हणून बसले. पेशाने व्यावसायिक असलेल्या, रंगेल जीवन जगणाऱ्या आणि रिऍलिटी शो मुळे (किमान अमेरिकेत ) प्रसिद्ध असलेल्या तात्यांनी त्यांच्या या गुणांचा ( असेट्स ) पुरेपूर फायदा करून घेतला. त्यांचे दुर्गुण (लायबलिटिस ) देशाला आणि जगाला नंतर कळले हा भाग वेगळा! अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोन्ही पक्षांचे आपापले खंदे समर्थक आहेत आणि उन्नीस -बीस च्या फरकाने दोन्ही पक्ष  निवडणुका जिंकत असतात. बऱ्याचदा आळी -पाळी ने. अर्थात काही राज्य ही रिपब्लिकन पक्षाचे स्थायी गढ मानले जातात तर काही डेमोक्रॅटिक पक्षाचे. सांगायचे असे कि जेंव्हा तात्या राष्ट्रपतीपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेद्वार झाले तेंव्हा त्यांना हा सगळा पाठिंबा वारसाहक्काने मिळाला. परंतु या बरोबरच तात्यांनी एक कल्पक गोष्ट केली.ती काय ? हे समजण्यासाठी आपल्याला काही दशके मागे जावे लागेल.

९० च्या दशकांपर्यंत अमेरिका ही एक आर्थिक,राजकीय, सैनिकी आणि सामरिक महासत्ता होती. किंबहुना ५०-९० ही दशके अमेरिकेचा सुवर्णकाळ मनाला जातो.डोन्ट गेट मीरॉंग - आजही अमेरिका एक महासत्ताच आहे आणि नजीकच्या काळात तरी राहील असे वाटतंय. परंतु फरक असा कि नव्वदी पर्यंत या सुबत्तेचा थेट फायदा तेथील सामान्य जनतेला होत. दोन्ही कोस्ट ( म्हणजे न्यू यॉर्क , बोस्टन  किंवा कॅलिफोर्निया ,सिएटल ) सोडले तर एक बराच मोठा मध्यमवर्ग अमेरिकेतील इतर राज्यांत एक समृद्धीचे नसले तरी संपन्न जीवन जगत होता. मुलांना मोफत शिक्षण , कॉलेजात नाही गेले तरी पोट भरेल अशा  नोकऱ्या  किंवा उत्पन्नाचे स्रोत पुरेसे उपलब्ध होते. कारखाने होते,शेतमालाला चांगला भाव होता. एकंदरीत मज्जानु लाईफ होती. परंतु जागतिकरणाच्या फरफट्यात हा वर्ग बाधित होऊ लागला. कारखाने देशाबाहेर स्थलांतरित होऊ लागले. शेतीच्या धंद्यात उद्योगपती उतरले आणि छोट्या-मध्यम शेतकऱ्यांची दैना झाली. त्यात परदेशातून अधिकृत किंवा अनधिकृतरित्या आलेल्या कामगारांमुळे नोकऱ्या मिळणे अवघड झाले. आपले आई -वडील किंवा आजी आजोबा जे जीवन जगत होते ते ही नव्वदी नंतरच्या पिढीला जगणे अवघड झाले. देशातील मूठभर लोक अति श्रीमंत होत गेले आणि जागतिकारणामुळे प्रभावित झालेल्यांची बिकट अवस्था झाली. आणि हा असंतोष अनेक वर्षे त्यांच्या मनात खदखदत होता. त्यात्यांनी हे अचूक हेरले आणि आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला. मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) या घोशवाक्याने अमेरिका ढवळून निघाली. नोकऱ्यांसाठी झगडावे लागणाऱ्या शहरी भागातील सुशिक्षितांची आणि परदेशीयांमुळे 'अमेरिकत्व' नष्ट होतंय असे मानणाऱ्या काहींची साथ मिळाली आणि तात्या निवडून आले ! हा एक्का हुकुमी होता !

असे असले तरी आम्ही -दैव देतं असे का म्हणतोय ? तर असल्या किचकट निवडणुकीत एकच मुद्दा तुम्हाला जिंकवू शकत नाही. वेळ ( टायमिंग ) महत्वाची असते. विरोधक कोण, त्यांचा जनमतावरील प्रभाव किती , मागून राजकारण करून तुम्हाला खाली खेचणारे किती?, ऐनवेळी बाहेर येणारे स्कँडल अशा इतर अनेक गोष्टी वारे फिरवू शकतात. तर तात्यांच्या निवडून येण्यात जितका वाटा MAGA चा आहे त्याहून अधिक या इतर गोष्टींचा आहे. ओबामांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळानंतर काही प्रमाणात असंतोष होताच. त्यात हिलरी क्लिंटन या अनेकदृष्टीने वादग्रस्त ठरत होत्या.रिपब्लिकन पक्षाकडे दुसरा कोणी खंदा उमेदवार पण नव्हता ! या सगळ्यात तात्यांची लॉटरी लागली!

निवडून येताच तात्यांनी राडा घालायला सुरुवात केली. त्यांचे वादग्रस्त निर्णय,विचित्र विधाने आणि येता जाता मंत्र्यांना बडतर्फ करणे यामुळे जनता त्रस्त झाली  आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हाहाकार माजला. परंतु या सगळ्यात त्यांच्या काही वादग्रस्त निर्णयांमुळे त्यांनी एका विशिष्ट वर्गवारील आपला प्रभाव टिकवून ठेवला. मी सोडून सगळे -खासकरून डेमोक्रॅट्स हा देश विकायला निघाले आहेत हा त्यांचा युक्तिवाद असंतुष्ट वर्गाला भावाला आणि ते तात्यांचे डाय हार्ड फॅन्स बनून राहिले! आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुतांश देश तात्यांमुळे त्रस्त असले तरी काही मोजक्यांना त्यांचा फायदा झाला. किंवा करून घेता आला असे म्हणू ! भारत आणि मोदी - हे त्यातील एक. या विषयावर सविस्तर लिहिणारच आहे पुढील भागात. त्रयस्थ दृष्टीने पहायचे झाले तर तात्यांचा कार्यकाळ हा प्रामुख्याने स्वकेंद्रित कृत्यांनी गाजला.  MAGA ची जागा  आय मी मयसेल्फ ने केंव्हा घेतली कळलंच नाही बरेच जणांना. कळलं तेंव्हा बराच उशीर झाला होता. परंतु पुन्हा ऊन पुन्हा पाऊस -पुन्हा पालवी फुटते तसे पुन्हा निवडणुका आल्या आणि यावेळी अमेरिकन जनतेने ठामपणे निर्णय दिला JAGA ( जा घरी). परंतु स्वतःच्या विश्वात रममाण असलेले तात्या ऐकतील तर ते तात्या कसले? अनपेक्षितरित्या सत्तेवर आलेल्या तात्यांना तेवढ्याच मानहानीकारकरित्या पायउतार व्हावे लागणार. आणि याला सर्वस्वी तेच जवाबदार असतील. कर्म ....दुसरे काय ?