Sunday, August 23, 2020

भाषण

                सातवीत किंवा आठवीत शिकत असतानाची गोष्ट.सालाबादप्रमाणे शाळेत मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता- इंग्रजीच्या दास्यात माझी मराठी. आमची इंग्रजी माध्यमाची शाळा. मराठी तृतीय भाषा. आता इंग्रजी शाळेत असा विषय म्हणजे चीन ने "लोकशाही सबलीकरण आणि मानवाधिकार " वगैरे विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यासारखे आहे. किंवा 'अमीर चिकन' वाल्यांनी आपल्या जाहिरातीमध्ये "मांसाहार हृदयासाठी घातक" वगैरे  टॅग लाईन जोडल्यासारखे आहे. असो. ते दिवस वेगळे होते. त्यामुळे एका खेड्यातल्या कोणत्या इंग्रजी शाळेत असली स्पर्धा आहे आणि तीचा असा गमतीशीर विषय आहे हे राष्ट्रीय चॅनेल्सवर अथवा वर्तमानपत्रात येण्याआधी ती स्पर्धाही झाली,आम्हाला बक्षीस सुद्धा मिळाले आणि शाळाही सुरु राहिली! पर्यायांच्या अभावामुळे असेल किंवा आमच्यावर लहानपणीपासूनच असलेल्या अति विश्वासामुळे असेल ,पालकांनी आम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे पसंद केले. त्याकाळी असला काही निर्णय घेणे आणि तोही एका सर्वसामान्य नोकरदार मराठी माणसाने म्हणजे मोठी गोष्ट होती.शाळेत घालतांना " आपल्या मुलांना इंग्रजी शाळा झेपत नाहीत" असे एक नातेवाईक म्हंटल्याचे आम्हाला सांगण्यात येते.परंतु "बहती लहेरों के साथ हर कोई तैर लेता है. असली इन्सान .... " हा गुलाम चित्रपटातला डायलॉग आम्ही पंधरा वीस वर्ष आधीच ऐकल्या मुळे असंख्य अडचणींवर मात करून आम्ही दहावी ,बारावी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालो आणि एकदाचे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंग्रजीतून पुढील शिक्षण घेण्याकरिता प्रवेश घेतला. शालेय शिक्षणादरम्यान सगळेच पाठ करीत असल्यामुळे आता घंटा काही लक्षात नाही हा भाग वेगळा! माझ्या मराठी माध्यमातून शिकलेल्या मित्रांना सहज म्हणून विचारले तर त्यांना सुद्धा 'घंटाच' लक्षात आहे !

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना मोठी गम्मत होती. सरकारी महाविद्यालय असल्यामुळे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मुलं येत. अगदी भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यातून म्हंटलं तरी हरकत नाही. असे होते ज्यांना बिल क्लिंटन ,मोनिका लेव्हीन्स्की असे तुरळक शब्द सोडले तर इंग्रजीचा गंधही नव्हता आणि वेस्टमिनिस्टर इंग्लंडहुन वरून 'व्हाया' माटुंगा,बांद्रा,डोंबिविली थेट आमच्या कॉलेजात आलेले इंग्रजसुद्धा होते.या सगळ्यांत "थोदा थोदा मराठी" किंवा " You come. I under stand tree" असे 'मधले' पण होते! परंतु देव सगळं व्यवस्थित करतो म्हणतात ना ? मास्तर लोक इंग्रजाळलेल्या मराठीत शिकवत . किंवा मराठमोळ्या इंग्रजीत म्हणा . त्यामुळे ज्यांना इंग्रजी कळत नव्हते त्यांना मास्तर सांगेल ते कळत आणि ज्यांना मास्तरांचे कळत नव्हते ते पुस्तकातून वाचत. असे करीत करीत बहुतांश सगळे उत्तीर्ण झाले आणि आपापल्या मार्गाला लागले. इंग्रजी कच्चे असलेल्यांना सुरुवातीला थोडा त्रास निश्चित झाला. पक्के इंग्रजीवाले चमकले-पहिल्या दहा षटकांतील सेहवाग च्या फलंदाजीप्रमाणे. परंतु आज सुमारे दशकांनंतर मागे वळून पहिले तर मराठी माध्यमात शिकलेले अनेक सवंगडी भारत,अमेरिका,इंग्लंड,जर्मनी येथील प्रतिष्ठित कंपन्यांत उच्चपदस्थ आहेत.द्रविडप्रमाणे त्यांनी इंनिंग्स ची सुरुवात सावध केली परंतु नंतर मोठी खेळी खेळतायत . काही इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांनीपण निश्चित प्रगती केली आहे. परंतु त्यातील काही नुसते पाट्या टाकत बसलेत( आमच्याप्रमाणे हे जोडणार होतो.पण स्वतःचा अवमान किती करावा -होय ना ?) .थोडक्यात काय ?शालेय शिक्षण कोणत्या भाषेत घेतले याचा त्यांच्या उर्वरित आयुष्यात विशेष असा प्रभाव पडला नाही. आपल्या जीद्द आणि चिकाटीमुळे जो तो घडला आणि आभावामुळे स्थूल राहिला.

आता हे सगळे सांगण्यामागचे प्रयोजन काय ? तर अनेक आहेत. सध्या "मुलांना मातृभाषेतून शिकवा.इंग्रजी शाळांचा ,विशेषतः खासगी शाळांचा विरोध" ही कल्पना जोर पकडत आहे. त्यात गैर काहीच नाही. शिक्षण तज्ज्ञांनी अभ्यास करूनच तसे निरीक्षण मांडले आहे. नवीन शैक्षणिक धोरणातपण प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतूनच व्हावे असे म्हंटले आहे. शिवाय खासगी इंग्रजी शाळांच्या बेलगाम कारभाराला वैतागलेले क्वचितच पालक असतील. परंतु ही कल्पना खरोखर सर्वसमावेशक आणि परिपूर्ण आहे का ?बेंगळुरू मध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी बाप आणि पंजाबी आई अशा दाम्पत्यांनी मुलांना कन्नड भाषेत शिकविणे कितपत व्यवहारी आहे? हे झाले टोकाचे उदाहरण.परंतु शहरी भागांत "मातृभाषा" ही कल्पनाच धूसर होताना दिसते. आपल्या घरातही फक्त इंग्रजी किंवा हिंदी बोलणारे बरेच आहेत. अशा पाल्यांना मराठी किंवा गुजराथी शाळेत टाकून काय फायदा होणार ? आज टीव्ही आणि खास करून  टी टी मुळे मुले अनेक भाषांना आणि त्या अनुषंगाने संस्कृतींना सामोरे जातात. - वर्षांची चिमुरडी मुले हिंदीत बोलतात. आपण "काय डुक्कर पाहतायत " म्हणून हिणवत असलो तरी पेपा पीग आनंदाने पाहतात. मग अशा मुलांची शालेय भाषा नेमकी कोणती असावी असाही प्रश्न पडतो. ही सगळी उदाहरणे सर्वांना लागू नाहीत हे निश्चित. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या बहुतांश गावांत किंवा छोट्या शहरांत आजही स्थानिक भाषेचे प्राबल्य आहे. आणि ती आनंदाची बाब आहे. परंतु त्याच प्रमाणे नवे शैक्षणिक धोरण निदान भाषासक्ती पुरते बोलायचे झाले तर सर्वसमावेशक नाही हे ही तितकेच खरे. बरं या सगळ्यात भाषा संवर्धन आणि भाषाभिमान हे ही मुद्दे येतात. आता संवर्धनाचे बोलायचे झाले तर- त्या शालेय वक्तृत्त्व स्पर्धेत भाग घेतांना आम्हालाही "आता मराठी दोन -पाच वर्षांत संपते कि काय " अशी भीती वाटू लागली होती. नशीब तेंव्हा चॅनेल्स नव्हते नाहीतर लोकांनी मराठीची पुस्तके बँकेच्या लॉकर्स मध्ये ठेवली असती-दुर्मिळ ठेवा म्हणून. परंतु ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादाने मराठी आजही ताठ मानेने जगती आहे. गूगल ,फेसबुक सारखी माध्यमे मराठी भाषेत लिखाणाची सोय करतात यातच सगळे आले ( काय काय रटाळ लिहिले जाते हा भाग वेगळा).

तीसेक वर्षांपूर्वी - जर्मनी ,जपान सारखे प्रगत देश हे शिक्षण मातृभाषेतून असल्यामुळे प्रगत आहेत असा समज होता. गंमत म्हणजे भारतीयांनी इंग्रेजी भाषेवर प्रभुत्व मिळवून आय टी सारख्या क्षेत्रात नाव कमविले आहे. आणि ते सुद्धा आपल्या मातृभाषेला सोबत घेऊन. त्यामुळे व्यवहारीभाषा ही मातृभाषेपेक्षा वेगळी असू शकते.आज इंग्रजी आहे ,उद्या कदाचित मँड्रिन असेल किंवा हिंदी,संस्कृत -यु नेव्हर नो. याचा अर्थ एवढाच कि ती आपल्याला आत्मसात करावीच लागणार. सगळे व्यवहार आपल्याच भाषेतून करणार असा अट्टाहास धरून चालणार नाही.जर्मनी,जपान ,चीन हे देश प्रगत आहेत हे त्यांच्या तंत्रकौशल्यामुळे,उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे. फक्त भाषेमुळे नव्हे. किंबहुना त्यांच्या प्रगतीमुळे आपण त्या भाषांचा आदर करतो. नाहीतर उर्दूला कोण विचारतंय ? ( हा रोख पाकिस्तानवर आहे. उगाच त्या इंदोरी का कोण त्याला मध्ये आणू नका . मे ही रेस्ट इन पीस फॉरेव्हर). आणि इथेच मुद्दा येतो परिपूर्णतेचा. भाषा कुठलीही असो. मुळात आपली शिक्षणपद्धती योग्य आणि परिपूर्ण आहे का ?हे तपासून पहायला हवे. एक वयक्तिक उदाहरण देतो- अमेरिकेत वास्तव्यास असल्याकारणाने आमच्या चिरंजिवांचे प्राथमिक शिक्षण हे तिथेच झाले. इंग्रजी माध्यमात आणि ते ही सरकारी शाळेत हे अनुषंगाने आलेच. इथे ऍडमिशन घेण्याची वेळ अली तर त्याने एक अट घातली -ज्या शाळेचे वाचनालय मला आवडेल तेथे मी जाणार.आम्ही - शाळा पालथ्या घातल्यापरंतु त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर आमच्या अमेरिकेतील शाळेच्या एक दशांश क्षेत्रफळाएवढे पण वाचनालय कुठे नव्हते. म्हणजे अमेरिकेतील एका प्राथमिक शाळेतील वाचनालयाच्या एक दशांश क्षेत्रफळाएव्हढे वाचनालय आपल्या बारावीपर्यंतच्या लाखो फी घेणाऱ्या नावाजलेल्या शाळांचे नाही! या आपल्या खासगी प्रतिष्ठित शाळांतील सुविधा! खरं सांगतो -वाचनामुळे मुलांच्या प्रगतीचा आलेख कसा वाढतो हे या डोळ्यांनी पाहिला आहे. आणि इतर अनेक जण या विचाराचे अनुमोदन करतील. अमर्याद वाचन हा मुलांचा प्राथमिक अधिकार असला पाहिजे.मग तो कुठल्याही भाषेत असो  इथे मुलांना प्रोग्रामिंग शिकवतात. वाचायला नाही. डोन्ट गेट मी रॉंग- अमेरिकेची फुशारकी मारणे किंवा दोन देशांची तुलना करणे हा हेतू अजिबात नाही. अमेरिकेत अनेक गंभीर शालेय समस्या आहेत. परंतु पायभूत सुविधा उत्तम आहेत. दुसरा मुद्दा शिक्षण पद्ध्तीचा आणि मूल्यमापनाचा. मला सगळं कळतंय तरी तुम्ही माझे उत्तर चुकीचे का ठरविता ? असे माझा मुलगा गेल्या आठवड्यात विचारत होता. इथे घोकंपट्टीने गुण मिळतात हे त्याला कसे समजाविणार ? शिक्षकच पाठ्यपुस्तकातील ओळी छापून मागत असतील आणि तोच जर मूल्यांकनाचा पाया असेल तर मुले कल्पना तरी काय करणार ?त्या थ्री इडियट्स चित्रपटातील 'मशीन ' च्या डेफिनेशन प्रमाणे. आणि उपयोगच होत नाही म्हंटल्यावर मुले  री ओढत सगळ्यांप्रमाणे चार ओळी पाठ करून छापणार. जास्त त्रास कशाला ? शिक्षक खुश ,आई वडील खुश. और क्या मंगता ? एक जण विचारत होता -कुठल्या बोर्डात शिकतो मुलगा ? म्हंटलं इथल्या सगळ्या म्हशी एकाच कुरणावर चरतात. कुठल्या डेरीतून दूध घेतो याला काही अर्थ नाही !

सरते शेवटी मुद्दा येतो पालकांच्या भूमिकेचा. आपला मुलगा काय शिकतो या पेक्षा त्याला गुण किती मिळतात यावर लक्ष देणारी ही पिढी. सहावीपासून आय आय टी ची तयारी करायला खासगी शिकविण्या. मुलांना गाढव बनविण्यात जास्त मोठा हात हा शाळेचा कि पालकांचा हा मोठा प्रश्न आहे! शाळेच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर आहे. रोज शाळा संपली कि आय बाप  "आज होमवर्क काय दिला " म्हणून विचारात असतात. अगदी रोज. आणि बरेच ! आता सातवी -आठवी च्या मुलांना जर आपला गृहपाठ लक्षात ठेवण्याची किंवा टिपून ठेवण्याची परिपक्वता नसेल तर बाकी काहीही शिकून काय उपयोग? बरं ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली ? सध्या कोरोनामुळे शाळा घरातच भरतात. चाचणी परीक्षेवेळी मुलांजवळ बसून उत्तरे पुरविणारे पालकही पाहिलेत. या वयात मुलांना अपयशी होऊ नाही दिले तर ते पचविण्याची क्षमता येणार कुठून ? शिक्षणाचा मूळ हेतू हा ज्ञानार्जन असावा. मूल्यांकन हे फक्त मार्गदर्शनापुरते मर्यादित असावे. परंतु एकूण शैक्षणिक व्यवस्थाच जर भरकटलेली असेल तर हे कोणासमोर ऐकवणार ? आइन्स्टाइन म्हणाला होता ना ( खरंच तो म्हणाला होता का माहित नाही ) - Education is not the learning of facts but training of mind to think. दुर्दैवाने रॅट रेस मध्ये स्वतः भरडले जाऊन सुद्धा आपल्या मुलांना त्यात 'आणखी प्रबळ' करण्यासाठी जुंपलेली आपली पिढी आणि त्याचा फायदा घेणारे शिक्षण व्यासायिक या चक्रव्यूहात मुले अडकली आहेत. या सगळ्या गोष्टी दृष्टीआड करून फक्त भाषेचा कास धरणे म्हणजे मोरी ला बोळा लावून दरवाजे उघडे ठेवण्यासारखे आहे.

 टीप : सदर लेखक हा पन्नास गुणांसाठी मराठी तृतीय भाषा घेऊन एस एस सी उत्तीर्ण झाला आहे.