Sunday, October 20, 2019

डबेपुराण -भाग ३

             आमचा डब्याशी तसा  बराच जुना संबंध. यूं समझो होश सांभाळतेही डबा लेके जाना सिख गये ! आम्ही दोन -तीन वर्षांचे असताना म्हणे पोत्यात पाटी आणि खडू घेऊन शेजारच्या धावडा काकूंकडे अभ्यासाला जायचो. तेंव्हा शाळेत जातो याचे कौतुक म्हणून आई डबा द्यायची - एक क्रिम बिस्कीट. हा किस्सा ऐकला कि आमचे ऊर अभिमानाने भरून येते. डबा नेत असल्यामुळे नव्हे तर एवढ्या बालवयात केवढे ते शिक्षणाचे आकर्षण आणि प्रेम ! कधी कधी तर आम्हाला हे पोते -पाटी पुराण खरे आहे कि नाही याचीच शंका येते. परंतु थोरे संत ऋषी महर्षी बालवयात समाधीस्त होत, गीतापठण करीत , श्लोक म्हणत असे किस्से आम्ही ऐकून आहोत. त्यामुळे आपण किमान पाटी -खडू आणि क्रिम बिस्किटांचा डबा घेऊन कोणाच्या घरी जात असू यावर विश्वास बसण्यास निश्चित वाव आहे. असो तर अगदीच बालवयात आमची डब्याशी गट्टी जमली ती क्रीम बिस्किटांमुळे. पुढे खरोखरची शाळा सुरु झाल्यावर या डब्याने खूप साथ दिली. सुरुवातीचे काही दिवस आम्ही डबा खाण्यापुरतेच काय ते रडायचे थांबत असे आमच्या बाईंनी आईला सांगताना आम्ही स्वतः ऐकले आहे. बालवाडीत शाळा आवडण्याची मुख्य कारणे म्हणजे वाळूत खेळायला मिळत आणि मग डबा खायचा. परंतु त्या दोन्हीमध्ये बाई हात धुवायची जबरदस्ती करीत. या असहिष्णुतेचा आम्ही आजही निषेध करतो. बालवाडीत बिस्कीट ,घरच्या शंकरपाळ्या आणि क्वचित केक वगैरे असलाच आमचा डबा. नाही आवडला तर नवल ! जसे जसे पुढच्या इयत्तेत जात गेलो तसे डब्याचे स्वरूप पण बदलत गेले. गोळ्या बिस्किटांची जागा जाम ब्रेड ,जाम पोळी ने घेतली आणि त्यापुढे पोहे उपमा ,शिरा, फोडणीची पोळी इत्यादी. किंबहुना या जिन्नसांनी आमचे डबेविश्व व्यापून टाकले होते एके काळी. कधितरी कंटाळा येत परंतु मातोश्री गोड बोलून (आणि दुसऱ्यादिवशी डब्यात गोड भरून ) समजूत काढीत. याच बालवयात -सुमारे दुसरी-तिसरीत असतांना नियतीने आमची परीक्षा घ्यायचे ठरविले. आमचे एक घनिष्ट मित्र मधल्या सुट्टीत वर्गमित्रांचे डबे उचकून खात असत हे आम्ही शिताफीने शोधून काढले. पकडल्यावर बाईंना सांगू नये याखातर चोरलेले डबे आमच्यासोबत वाटून खाण्याची 'ऑफर' देण्यात आली. परंतु आम्ही तत्वनिष्ठ असल्याकारणाने ती धुडकावून लावली. नव्हे ,त्याकाळी 'ई डी '  आज इतकी प्रभावी असती तर या मित्राची चौकशी करण्याची आज्ञा आम्ही नक्कीच केली असती. परंतु त्याच्या भविष्याकडे पहात आम्ही त्याला क्षमा करण्याचे ठरविले आणि एका कॅडबरीच्या शिक्षेवर त्याला सोडून देण्यात आले.
                बालवाडीत डबा हे शाळेत जाण्याचे मुख्य आकर्षण होते. प्राथमिक शाळेत बहुतांश वेळा दिलेला डबा आवडत. परंतु हळू हळू डब्याचे स्वरूप बदलत गेले आणि आणि आमचे प्रेम ओसरत गेले. गोळ्या बिस्कीट, ब्रेड ,शिरा उप्पीट ने सुरु झालेला आमचा डबा प्रवास माध्यमिक शाळेपर्यंत गवारीची भाजी आणि पोळीपर्यंत येऊन पोहोचला होता. गवारीची भाजी ? कम ऑन ! डब्यामुळे ( आणि हार्मोन्स मुळेही कदाचित ) आई चा खूप राग यायला लागला. डब्याऐवजी शाळेजवळच्या दुकानातून क्रीमरोल खाणे आवडायला लागले. डबा नको म्हणून आईशी भांडणे होत. अर्थात कोण जिंकत हे वेगळे सांगायला नको. या सगळ्यामुळे डबा या संकल्पनेविषयी एक चीड निर्माण झाली. "काय डबडा चित्रपट आहे " किंवा " डब्बा ऐसपैस " ," लाल डब्बा " , "डब्बा गाडी ", "वरचा मजला डबा आहे " असे डब्याला  हीन लेखण्याची सुरुवात पौंगडावस्थेतील विरोधामुळेच झाली असावी कदाचित असा आमचा कयास आहे. कोबी ,गवार ,दोडका क्वचित प्रसंगी बटाटा अशा जिन्नसांशी आमचा सामना सुरु झाला .जणू नियती आम्हाला संदेश देत होती - वेलकम टू रिअल वर्ल्ड ! अर्थात यात आणखी एक संदेश दडलेला होता जो आम्हाला बऱ्याच वर्षांनी अवगत झाला -ये तो सिर्फ झांकी है -लगीन अभी बाकी है ! याही दरम्यान क्वचितप्रसंगी डब्याची आणि आमची गट्टी जमत. शाळेच्या सहलीदरम्यान,बागेत डबे घेऊन जातांना , मित्रांसोबत अंगणात आंगत -पंगत करतांना आणि विशेषतः मैत्रणीसोबत बसून डबा खात असतांना( त्यादिवशी कारले पण गोड लागे ).
                जसे जसे मोठे होत गेलो तसा डब्याशी संबंध कमी होत गेला. उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असतांना डबा हि अतिशय "डाउन मार्केट " गोष्ट झाली होती. पुढे महाविद्यालतात पण डब्याशी विशेष संबंध नसे. कधी एखाद्या स्थानिक मित्राने आग्रहाने खायला घातले तर किंवा आमची मेस बंद असेल तर कोणाचातरी डबा मागविण्यात येई. अर्थात या दरम्यान घरच्या खाण्याची आणि जेवण्याची किंमतपण कळली होती. त्यामुळे कधी कोणी मित्र आमच्या गावी गेला तर आई 'डबा' पाठवीत. आम्ही होस्टेलवर येईपर्यंत मित्र फस्त करून टाकीत. नोकरी लागल्यावर बॅचलर असतांना डबा लावण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला परंतु कामाच्या अनियमित वेळांमुळे ( आणि आमच्या वेंधळेपणामुळे ) सगळे प्रयत्न फसले. या दरम्यान डब्याबद्दल पुनः आकर्षण निर्माण होयला लागले होते. ऑफिस मधील नवविवाहित मित्र घरून डबा घेऊन येत आणि आग्रहाने खायला घालीत. आम्हाला पण घरचा डबा मिळावा म्हणून एकदा सहज पत्र्यामारुतीकडे प्रार्थना केली आणि त्यांनी लगेच ऐकली पण ! स्वतः ब्रह्मचारी राहून दुसऱ्यांना अडकविणे हे मारुतीरायांना चांगले जमते.
                आम्ही चतुर्भुज झालो आणि एका अपूर्ण अध्यायाला पुन्हा सुरुवात झाली ! हनिमून वरून आल्यावर पहिल्याच दिवशी बायकोने विचारले -डब्यात काय देऊ ? तेंव्हापासून आमचे डबेपुराण अखंड १४ वर्ष सुरु आहे . प्राथमिक शाळेत असतांना डब्याशी झालेली आमची युती आजतागात टिकून आहे. कुठल्याही युतीमध्ये येतात तसे चढउतार आमच्यातही आले. परंतु कधी प्रेमामुळे तर कधी गरजेमुळे ते अडथळे पार केले. आता आम्ही कोबी,पडवळ ,गवार इत्यादी भाज्यांविषयी निरस्थ  झालोय. डबा हि वाद घालण्याची गोष्ट नव्हे तर जसा दिलाय तसा मुकाट्याने खाण्याची गोष्ट आहे हे आम्ही शिकलोय . त्यामुळे  चिरंजीव जेव्हा सकाळी विचारतात "आज डब्यात काय आहे " तेंव्हा मी मनातल्या मनात स्मितहास्य करीत म्हणतो- बेटा डबेरी दुनियामे आपका स्वागत है !

समाप्त

Sunday, October 6, 2019

डबेपुराण -२

                 आमच्या 'डबेबुडवीमुळे' घरात कधी कधी कटु प्रसंगांना सामोरे जावे लागते खरे, परंतु डबेसंस्कृतीचे जतन करायचे म्हंटल्यावर अशा अडचणी येणारच याची आम्हाला कल्पना आहे. अर्थात इतर अनेक गोष्टींप्रमाणे हि संस्कृती प्रामुख्याने भारतात किंवा दक्षिण आशियाई मूळच्या लोकांमध्ये टिकून आहे. इतर ठिकाणी दुर्दैवाने तिचा ऱ्हास झालेला दिसतो. अमेरिकी लोकांनी तर डबेबुडवी मुळे डोकेदुखी ही समस्याच नाहीशी करून टाकली आहे. ते डबाच नेत नाहीत. म्हणजे ना रहेगा डबा ना होंगे झगडे म्हणत बाकीच्या गोष्टींवर भांडायला हे रिकामे ! असो- तर ज्या संस्कृतीचे आपण इतक्या हिरहिरीने रक्षण करतो असे म्हणतोय तीच्या मुळाशी जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. विषय अत्यंत क्लिष्ट असा आहे. इतिहासात धर्म,अर्थ ,काम ,मोक्ष, अस्त्र ,शस्त्र ,शास्त्र, पाककला इत्यादी  संदर्भात अनेक ग्रंथ आणि महाकाव्ये आहेत .परंतु डबा या विषयावर अगदी नगण्य स्वरुपात माहिती उपलब्ध आहे. हडप्पा किंवा मोहंजोदाडो येथे उत्खादानात सगळ्या गोष्टी मिळाल्या परंतु डबा काही गावला नाही. वेद पुराणांमध्येही डबेसंस्कृतीबद्दल काही ठोस माहिती आढळत नाही. शिवाय अति प्राचीन काळी लोक 'सिम्पल लिव्हिन्ग' वर विश्वास ठेवत असल्यामुळे दूध ,दही ,लोणी ताक असाच त्यांचा आहार असावा. त्याअनुषंगाने डब्यापेक्षा सोबत गायच घेऊन जाणे सोयीचे पडत असावे कदाचित असा आमचा कयास आहे. पुढे रामायणातपण डब्याचा उल्लेख नाही. पुत्रकामेष्टी यज्ञावेळी वशिष्ठांनी पायसम सोबत आणले कि तिथेच बनविले हा पुढील संशोधनाचा विषय असू शकतो. परंतु वशिष्ठांनी तीन कप्प्याच्या डब्यातून पायसम आणले असा स्पष्ट उल्लेख कुठल्याही रामायणात आढळत नाही. भरतभेटी च्या प्रसंगावेळीही रडारड ,गळाभेट, प्रभू रामचंद्रांचे जोडे भरत घेऊन जातो इत्यादी घटनांचे विस्तृत वर्णन आहे. परंतु आयोध्येतून भरताने, वांग्याचे भरीत आणि भाकरी चा डबा आणला आणि तो सगळ्यांनी मिळून खाल्ला असा उल्लेख कोठेही नाही. शबरी पण बोरं घेऊन जाण्याऐवजी प्रभू रामचंद्र येण्याची वाट बघत राहिली. यावरून तिला डब्याबद्दल माहिती नसावी असेच दिसते. मारुती अशोकवनातील फळे खात असल्यामुळे त्याला पकडून रावणापुढे हजर करण्यात आले. म्हणजे मारुतीला वानरसेनेने डबा भरून दिला नव्हता हे सिद्ध होते. एकूण काय तर हाती असलेल्या माहिती-पुराव्यानुसार रामायणकाळी डबा संस्कृती अस्तित्वात नव्हती असेच दिसते. पुष्पक विमान आणि ब्रह्मास्त्र निर्माण करणाऱ्या लोकांना डब्याचे ज्ञान अवगत नसावे हे आश्चर्यजनकच म्हणावे लगेल.
                महाभारताच्या सुरुवातीच्या काळातसुद्धा डबासंस्कृती फार प्रगत नसावी. नाहीतर कृष्ण आणि त्याचे मित्र घरोघरी लोण्याची चोरी करीत फिरले नसते.यशोदेने भाकरी आणि वर मस्त लोणी असा डबा भरून दिला नसता का कान्ह्याला ?  भारतीय इतिहासात डबा किंवा तत्सम संस्कृतीविषयी पहिला संदर्भ आढळतो तो सुदाम्याच्या पोह्यांच्या स्वरुपात. सुद्यमाने पोहे डब्यात आणले असे कोठेही लिहिले नसले तरी एक नाशवंत पदार्थ शिदोरीच्या स्वरुपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे हि कृती 'डब्याच्या व्याख्येत बसत असल्यामुळे सुदामा हा डबेसंस्कृतीचा आद्यगुरू ठरला ! अर्थात आपल्या मागण्या मान्य करण्याहेतू समोरच्याला खायला घालून तृप्त करणे याचीही सुरुवात सुदामा प्रकरणातून झाली असण्याची शक्यता आहे. पुढे कुंतीने आणि तत्पश्चात द्रौपदीने आहे ते वाटून खाण्याचे धडे दिले आणि डबे संस्कृती बहरण्यास हातभार लावला. बौद्धकालीन इतिहासात भिक्कू भिक्षा मागून आपल्या विहारात घेऊन जात व अंगत पंगत करीत खात. या काळात डबेसंस्कृती हि खऱ्या अर्थाने लोकांमध्ये पसरली. हा प्राचीन भारतातील डबे संस्कृतीचा सुवर्णकाळ म्हणता येईल ! पुढील काळात मात्र डबा या विषयावर फारसे संशोधन किंवा विकास झाल्याचे दिसत नाही. गुप्त, पल्लव काळात प्रवासासाठी शिदोरी घेऊन जाण्याखेरीस दुसरा कुठला उपयोग झाल्याचे दिसत नाही. अर्थात जैन व्यापाऱ्यांनी डबेसंस्कृती च्या वृद्धीस बराच हातभार लावला.
                पुढे मुसलमान राज्यकर्त्यांनी 'एकत्र बसून खाणे' या संस्कृती चे अनुसरण केले. रोजा सोडतांना याची प्रामुख्याने जाणीव होते. परंतु डबा किंवा शिदोरी संस्कृतीबद्दल मुसलमान राज्यकर्त्यांची उदासीनताच दिसून येते. मध्ययुगात व्यापारी आणि दुपारच्या जेवणासाठी शिदोरी घेऊन जाणारा शेतकरी हेच काय ते डब्याचे तारणहार राहिले. बरं या दरम्यान जगभरात काय चित्र होते ? अलक्षेन्द्र आल्यामुळे भारतीय आणि ग्रीक संस्कृती एकमेकांच्या खूप जवळ आल्या. याच दरम्यान डबेसंस्कृती युरोपात गेली असण्याची शक्यता आहे. येसू ख्रिस्त म्हणे काश्मिरात येऊन शिकून गेला. त्याने डबा हि संकल्पना मध्यपूर्वेत रुजवली असे म्हणण्यास खूप वाव आहे. ख्रिस्ती इतिहासात डबा समदृश्य गोष्टींचा उल्लेख आढळतो. लास्ट सपर वेळी सगळे डबा घेऊन आले होते का हाटेलात बसले होते हे काही आम्हास उमगले नाही अजून. असो तर भारतात निर्मलेल्या डबा या संकल्पनेचा ग्रीक काळात आणि पुढे येशू ख्रिस्तांमुळे पश्चिमेत प्रसार झाला आणि तिथेच त्याची वृद्धीही झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताइतकीच प्राचीन संस्कृती असलेल्या चीन मध्ये डबेसंस्कृती फार बहरली नाही. कदाचित " समोर जे जिवंत दिसेल ते मारून खाणे ' या त्यांच्या स्थायी संस्कृतीपुढे डबा फिका पडला असावा. या दोन प्राचीन संस्कृतीचा मेळ आजही आपल्याला दक्षिणपूर्व आशियात बघायला मिळतो. सिंगापुरात लोक चपात्या डब्यात घेऊन जातात आणि भाजी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये मागवतात !
                अनेक शतके जुलमी राजवटीखाली दबलेल्या डब्याचा तारणहार ठरले ते म्हणजे इंग्रज! आधुनिक भारतात खऱ्याअर्थाने डबेसंस्कृती रुजली म्हणजे ब्रिटिश काळी. सायबाला प्रवास करायचा असायचा. आणि तिखट जेवण काही झेपायचे नाही! त्यामुळे इंग्रज डबा घेऊन जायचे. अलुमिनियम, पितळ असल्या धातूचे डबे घेऊन जाण्याची प्रथा तेंव्हापासून पडली. पुढे इंग्रज अधिकारी कार्यालयातपण डबे घेऊन जायला लागले. हळू हळू भारतीय चाकरमान्यांनी त्याचे अनुसरण करण्यास सुरुवात केली आणि चार कप्प्यांच्या स्टिलच्या डब्यांचा उदय झाला ! ब्रिटिश काळात मुंबई , कलकत्ता येथील सरकारी दप्तरी दिसणारा हा डबा हळू हळू संपुर्ण भारतात पसरला आणि खूप कमी वेळात जन सामान्यांच्या आयुष्याचा एक अभिन्न अंग बनला. सरकारी कार्यालयांबरोबरच शाळा,इस्पितळे, खासगी व्यवसाय, बांधकाम क्षेत्र, कारखाने अशा सर्व ठिकाणी डबे दिमाखाने मिरवू लागले. डबे इच्छितस्थळी पोहोचवण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांच्या उदय झाला आणि हळू हळू एक संस्था बनली. या सर्व काळात डब्यांच्या स्वरपटपण बदल होत गेला. इंग्रजांकडून वारसा हक्काने घेतलेल्या चार कप्प्यांच्या डब्याची काटछाट होऊन तीन कप्प्यांचे झाले. मग दोन कप्प्यांचे. मग सेलो चे डबे आले. आज काल मिक्रोवेव्ह च्या डब्यांचा सुळसुळाट आहे.
आजही जेंव्हा मी डबा घेऊन ऑफिसला जायला निघतो तेंव्हा कधी कधी मला द्वारकेकडे पोह्याची शिदोरी घेऊन निघालेल्या सुदाम्याची आठवण येते आणि मी नतमस्तक होतो. तो नसता तर आज आम्हाला ब्रेड चे तुकडे तोडावे लागले असते दुपारच्या जेवणात!

क्रमश: