Thursday, November 3, 2022

पराचा कावळा

            आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपला म्हणजे एकंदरीत समाजाचा. तर एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाली - आता ती कशी झाली हे विचारायचं नसतं . म्हणजे एखादा मुंसिपल्टीतला नगरसेवक पण होऊ शकतो किंवा निस्वार्थ सेवा करणारा कोणी सद्गृहस्थ. सेलिब्रिटी होण्याचा आणि कर्तृत्वाचा किंवा उपलब्धि यांचा संबंध बराच आधी संपला आहे. बरं कोणाचं नशीब केंव्हा उजाडेल( किंवा गंडेल) सांगता येत नसतं. मग कोणी बदाम विकणारा पण रातोरात सेलिब्रिटी होऊन जातो. कोणी हाऊ डेर यू असे काहीतरी म्हणून रातोरात सेलिब्रिटी होऊन जातात. नाही - सेलिब्रिटी होण्यात काहीच गैर नाही. रातोरात होण्यात पण काही प्रोब्लेम नाही. पण मग त्याची सर्व बाजूंनी छाननी सुरू होते. मग एखाद्या रॉबिन उथप्पाची ब्रायन लारा सोबत तुलना सुरू होते. कोणा काल परवा माहीत झालेल्या गायिकेचा स्वर सम्राज्ञी सोबत तुलना. ती गोष्ट त्या नवीन सेलिब्रिटी साठी ही अवघड असते आणि तुलना होणाऱ्या महारथी साठी त्याहून अवघड. परंतु आपल्याला काय त्याचे. बरं हे तर झाले कार्यक्षेत्रातील प्रॉब्लेम. सेलिब्रिटींना आपण सगळ्याच मापदंडांवर मोजत असतो. म्हणजे विराटने बॉलिवूडचे चित्रपट का आपटत आहेत याची कारणमीमांसा करून उत्तर देणे अपेक्षित असते. कोणा चित्रपट अभिनेत्याने भारतातील ढासळलेला सामाजिक सलोखा यावर भाष्य करणे अपेक्षित असते. तर अर्ध्या वयाच्या स्त्रिबरोबर विवाह करणाऱ्या एखाद्या राजकीय नेत्याने स्त्री सबलीकरण यावा भाष्य करावे ही अपेक्षा. बरं या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली करेक्ट असाव्यात बरं का? नाहीतर मग जो अगडबंब माजतो काही विचारू नका. या सगळ्यात भर म्हणून काही( आज काल बरेचसे) सेलिब्रिटी प्रसद्धीसाठी हे स्वतःच मुद्दामून उलट सुलट बोलतात. नव्हे आज काल हेच पेव जास्त फुटले आहे. नाहीतर त्यांना कोण विचारणार. हो ना? मग आपले जेवढे वय सुद्धा नाही, त्यापेक्षा कैक वर्षे जास्त कर्यासाधना असलेल्या व्यक्तीबद्दल उठसूट कोणीही बोलत सुटतो. 

           या सगळ्याची दुसरी बाजू म्हणजे तडक भडक बातम्यांसाठी हापापलेले पत्रकार.त्यांचाही दोष नाही म्हणा. गल्ली बोळात सुरू झालेल्या सर्व प्रकारच्या वृत्त वाहिन्या, पोर्टल्स यांना खाद्य कोण देणार.एखादा गरीब कामगार जसा रोज पोटाची खळगी भरण्याकरिता काम शोधत हिंडतो तसे हे बातम्या शोधत हिंडतात. रागही येतो पण किवपण कराविशी वाटते. अणि या सगळ्यांचे बाप म्हणजे सोशल मीडिया आणि काही संघटनांचे, राजकीय पक्षांचे मीडिया सेल्स. कुठली बातमी उचलून मोठी करायची आणि त्याचा कसा उपयोग करून घायचा हाच यांचा धंदा. नव्हे तसे करणारे कारखाने निर्माण झालेत आजकाल. बातमी खरी खोटी याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं. एकदा लोकांच्या मनात इच्छित छबी बिंबावली की झाले काम. मग आज खलनायक ठरविलेल्या व्यक्तीच्या गळ्यात उद्या हेच लोक पुष्पहार का घालेना. कोणी विचारायचं नसतं. अणि विचारणार तरी कोण?  अशा वातावरणात जी बातमी बाहेर येते तीचे तथ्य तपासून पाहायची कोणाचीही इच्छा नसते. वाचली बातमी..आवडली तर लाईक नाही तर इग्नोर.

          असे नसते तर नव्वद वर्षाच्या एका व्यक्तीने केलेल्या टिप्पणी ( भले अयोग्य किंवा काळानुरूप नसेल)  बद्दल एवढे काहूर माजले नसते. अगदी असे धरून चालले की ती टिप्पणी हेतुपरस्पर केली. तरी बाहेरच आली नसती तर हेतू असफल झाला असता. तसेही त्यांनी स्त्रियांविषयी केलेल्या विधानाने कोणता मूलभूत फरक पडणार आहे किंवा आजवर पडलाय?शिवाय जसा बिंदी लावायची की नाही हे ठरविण्याचा अधिकार व्यक्तींना आहे तसाच कोणाशी बोलावे किंवा नाही हा अधिकार दुसऱ्यांनाही असतो. सप्टेंबर मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला गेले होते. एक पत्रकार त्यांची मुलाखत घेऊ इच्छित होती. अध्यक्षांनी त्या महिलेने डोके झाकावे आणि तसे केले तरच मुलाखतीला येईन अशी अट घातली. कदाचित त्यांच्या देशात जे चाललंय त्यामुळे त्यांनी असा पवित्रा घेतला. त्या पत्रकाराने नकार दिला. मुलाखत रद्द झाली. विषय संपला. दोघांचे आपापले विचार आणि आपले धोरण सोडायला नकार दिला.        

          आपल्याभोवती कायम घटना घडत असतात. त्या आहे तशा छापणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. किंबहुना त्या घटनेचे समाजावरील परिणाम समजून त्याघटनेला योग्य स्वरूप देणे ही खरी पत्रकारिता. काय छापावे या पेक्षा काय छापू नये याचे भान आणि संयम ठेवणे यात खरी कसरत असते. त्याच प्रमाणे किंबहुना जास्त प्रमाणात ..काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हे भान समाजात असणे पण गरजेचे आहे. परंतु इतर अनेक गोष्टी प्रमाणे इथे ही आपला कॉमन सेन्स मार खातो.  तसे नसते तर पराचा कावळा झालाच नसता.

        असो. दोन दिवस बातम्या येत राहतील. त्यानंतर संबंधित सेलिब्रिटी सकट सगळे आपापल्या कामाला लागतील... नेहेमीप्रमाणे. 

सुशांत गोसावी

Friday, October 7, 2022

दाढीपुरुष

             गेले काही दिवस आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझर वरून घमासान सुरु आहे. खरं सांगतो हा वाद झाला नसता तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आम्हाला कळलं असतं. आणि आमचे नशीब बलवत्तर असले तर चित्रपट येऊन पडून गेल्यावरही आम्हाला कळले नसते. परंतु राऊतांच्या आणि आमच्या नशिबात तेवढे सुख नव्हते. डेस्टिनी यू नो !  तर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. आय साऊंड स्टुपिड -पण टीझर आणि ट्रेलर मध्ये काय फरक असतो ते ही आम्हाला माहित नाही. पण चित्रपटाचं काहीतरी बाहेर आले हे कळले. लोकांनी बोंबाबोंब सुरु केली तेंव्हा तो टीझर पाहिला. लोकं उगाच ओरडतात राव. काय तर म्हणे रावणाला दाढी कशी ? आता रावण काय मोदी आहे का - कायम दाढी ठेवायला ? इथे वाचक वर्गाने सूक्ष्म भेद जाणून घ्यावा - आम्ही रावणाला मोदींची अलंकारिक उपमा देत आहोत. मोदींना रावणाची नव्हे ( नाहीतर आमचे जिणे अवघड व्हायचे !). रावण हा राहुल गांधींप्रमाणेही असू शकतो ना ? कधी दाढी कधी गुळगुळीत ! मुळात त्या काळात वस्तरा होता का ? न्हावी होते का ? असले तर कोणत्या दिवशी दाढी करायचे . टीझर चा दिवस हा दाढी करायला त्याज्य दिवस होता कि नाही ? आणि हो -एका तोंडाची केली आणि बाकी नऊ तोंडे तशीच ठेवली बिना दाढी करता तर काय म्हणाल - हे काही काही समझून ना घेता आरडा ओरड सुरु !

दुसरा आक्षेप काय तर रावणाच्या डोळ्यात काजळ -सुरमा कसा काय ? तो अगदी खिलजी सारखा दिसतो. इथेही  लोकांचे इतिहासाबद्दलचे घोर अज्ञान प्रकट होते. कसे ? सांगतो - तर दक्षिण भारतात काजळ घालण्याची प्रथा आहे बरोबर? आता ती श्रीलंकेत गेली असल्यास नवल नको वाटायला. काही अज्ञात इतिहासतज्ञांच्या मते रावणाच्या मृत्यूनंतर शूर्पणखेने मध्यपूर्वेत बस्तान बसविले आणि मोजक्या राक्षसांना घेऊन राज्यकारभार सुरु केला.  आता खुद्द राक्षस जमात श्रीलंकेहून मध्यपूर्वेस गेली तर काजळ घालण्याची परंपराही पाळली जाऊ शकते होय ना ? म्हणजे रावणाच्या डोळ्यात सुरमा घालणे हे दिग्दर्शकाने खिलजीवरून कॉपी नाही केले -तर खुद्द खिलजी सुरमा घालायला लागला याला रावण कारणीभूत आहे.समदते नाही लोग !  राहता राहिली गोष्ट रावण त्या ड्रॅगॉनवरून उडतोय याची. भाई - जर जटायू असू शकतो तर रावण चीनवरून ड्रॅगन नाही मागवू शकत ? कैलासावर गेलाच होता ना ? येता येता आला असेल ड्रॅगन घेऊन ! तुम्ही बघायला गेलात ?

लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती ? त्यांना  वाल्मिकींनी लिहिलंय तशीच पात्र हवीत. आता वाल्मिकी अंतर्यामी असावेत. परंतु म्हणून काय ते कोण केंव्हा दाढी करतो आणि काजळ घालतो हे लिहीत बसणार का? ही हॅड बेटर थिंग्स टू राईट  यू नो. रामाने वनवासाला जातांना कपड्यांचा त्याग केला. तो काय रेझर आणि आफ्टर शेव घेऊन जाणार का ? आणि समजा नेले जरी -तर काय रोज दाढी करणार का ? चायला वर्क फ्रॉम होम असतांना आम्हाला दिवसांनी करायला कंटाळा येतो. राम थोडी वनवासात रोज करत असणार ? तीच गत रावणाची. एवढे भीषण युद्ध सुरु असतांना तो काय रोज दाढी करत बसणार ?लोकांचा किती तो इंटॉलरन्स म्हणायचा ! सुदैवाने  बाकी वानरांबद्दल आणि राक्षसांबद्दल हा प्रॉब्लेम नव्हता.

असो. हे झाले वैचारिक वादविवाद. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. म्हणजे आमच्या आतली ! दिग्दर्शकाच्या आतली ओळखायला आमचा त्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. तर झाले असे कि - सैफला रावण करायचे हे राऊतांनी तान्हाजी नंतरच ठरविले होते. कदाचित त्यांच्या बजेट मध्ये तोच बसत असावा. त्यांना तर अजय आणि काजोलला राम -सीता कास्ट करायचे होते म्हणे. परंतु ते दशरथ आणि कौशल्याच्या रोलसाठीच  यौग्य होते. अर्थातच त्यांनी नकार दिला . आता गुळगुळीत दाढी केलेला सैफ रावण काय -मंदोदरी शोभला असता. म्हणून मग दाढी. आणि दिग्दर्शकाला वाटले कि काजळ घालून खिलजी लूक देऊन थोडा हिंदू समाजाची सहानभूती ( आणि पैसा ) मिळवता येईल. परंतु प्लॅन फसला. ते यांच्यावरच उलटले ! भरवशाच्या म्हशीला टोणगा अशातला प्रकार झाला. दिग्दर्शक किती प्रतिभावान आहे हे -जेंव्हा मरणासन्न तान्हाजी शिवरायांच्या मांडीवर प्राण त्यागतो हे दाखविले तेंव्हाच ओळखायला हवे होते. परंतु तेंव्हा 'बहेती गंगा 'मध्ये हात धुतले गेले आणि चित्रपटाने तीनशे कोटींची कमाई केली. परंतु रावण मुसलमान रूपात हे मात्र कुछ ज्यादाही हो गया. त्या क्रिएटिव्ह लिबर्टी ला काही हाड ?

पुढे काय होणार सांगतो - रावण दाढी करणार. रामही करणार -ओघाने आलेच. आणि आताच्या टीझरचे जे टुकार प्रसंग आहेत ते कुठल्यातरी गाण्यात किंवा स्वप्नात घडतायत असे प्रत्येक्ष चित्रपटात दाखवण्यात येईल. मग निर्माते दिग्दर्शक म्हणायला रिकामे - टीझर वरून चित्रपट ओळखू नये ! अहो पण आम्ही मरणासन्न तान्हाजी वरून ओळखलाय त्याचे काय ?

सुशांत गोसावी 

Thursday, October 6, 2022

भाषण मेळावा


काही वर्षांपूर्वी बरे होते राव. दसरा म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ ,शस्त्र पूजा, देव दर्शन ,दुपारी मस्त पैकी गोड धोड जेवून ताणून द्यायची, संध्याकाळी नवीन वस्त्र परिधान करून सोने वाटायला जायचे. सीमोल्लंघन करून दिवस संपवायचा. अगदी तुम्ही संघातले असाल तर प्रभातफेरी साठी जाणे व्हायचे. तुम्ही जर नवबौद्ध असाल तर धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करीत. जे काय ते घरगुती किंवा फार फार तर आपल्या निकटच्या समाजात. त्या दिवशी राजकारण चुलीत जायचं . दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांना सुट्टी असल्याकारणाने जे काय ते दोन दिवसानेच कळे . गेले काही वर्षे मग संघाच्या नागपुरातील विजयादशमी महोत्सवाचे दूरदर्शन वाहिन्यांवर थेट प्रेक्षपण होऊ लागले. मग लागोलाग शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे प्रेक्षपण होई. नाही म्हणायला दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या रावण दहन सोहोळ्याचेही प्रक्षेपण होत. परंतु त्यात फक्त पंतप्रधान बाण मारल्याचा अविर्भाव करीत. त्यामुळे कंटाळवाणे वाटत. आता तर कहरच झालाय. या वर्षी तब्बल चार पाच मेळाव्यांचे ( टेक्निकली तीन  मेळावे आणि दोन उत्सव ) थेट प्रेक्षपण झाले. अर्थात शिवसेनेचे एकाचे दोन झाले त्यामुळे भर पडली. असो तर आम्ही सर्व भाषणे ऐकली. अगदी कान देऊन ऐकली. का ? किडा दुसरे काय :). युट्युब वर उपलब्ध असल्याकारणाने ते केंव्हाही ऐकता येतात हा एक भाग झाला.आणि त्याद्वारे या नेत्यांचे निवडणुकांच्या पलीकडे विचार ऐकण्याची संधी मिळते ही भाबडी आशा .

शिंदे आणि उद्धव यांची भाषणे म्हणजे घरातील वाद चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार होता. हा त्याच्यावर आरोप आणि तो याच्यावर आरोप. तिसरे विशेष असे काही नव्हते.  गर्दी किती याला काही अर्थ नसतो. ती गोष्ट नेत्यांचे इगो ठेवायला बरी असते. वाजपयी म्हणून गेले त्याप्रमाणे बघणाऱ्यांची गर्दी तर नेहेमीच असते .त्यातील किती मत देतात ते महत्वाचे. त्यातल्या त्यात शिंदे ऐकायला सच्चे वाटले. त्यांच्यावर आणि इतर आमदारांवर झालेल्या अन्यायाबद्दल ते प्रामुख्याने बोलले. त्यांनी मंत्री म्हणून केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. माणूस जबरदस्त आहे. फडणवीस म्हणाले ते सत्यच आहे. ज्यांच्या बाजूने असे कार्यकर्ते असतात ते नशीबवान असतात. मग प्रसंगी  त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदयावर का समाधान मानावे लगे ना :). परंतु एक मात्र सत्य आहे - भाजपची साथ नसती आणि सरकार स्थापणार नसते तर यातील किती आमदार स्वतः हुन अन्याय होतोय म्हणून राजीनामा द्यायला तयार झाले असते ? उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे.

ठाकरेंचे भाषण उत्स्फुर्त होते. तसेच जमावाचा प्रतिसाद जास्त चांगला होता असे वाटले. सगळेच शिलेदार गेल्यामुळे संघटनेचे पुनःनिर्माण करण्याची त्यांना चांगली संधी आहे. त्याचे किती सोने करतात कि माती हे येत्या काळात कळेलच. ठाकरेंच्या भाषणात गद्दार हा शब्द इतक्यांदा आला कि त्याचेच एक पंधरा वीस मिनिटांचे भाषण तयार झाले असते. दुसरं काही नव्हतंच म्हणा. गद्दार एखाद दुसरा करतो. पन्नास लोकप्रतिनिधी-ते हि आमदार आणि खासदार असे का करतात याची समीक्षा केली असती तर ही वेळच आली नसती. मोदींना म्हणतायत पाकिस्तान काबीज काश्मीर भारतात आणा . अहो तुम्ही चाळीस आमदार सांभाळू शकला नाहीत ! ताईंचे तर काही विचारू नका. प्रत्येक वाक्यात - तो झालेला कथित अन्याय ठासून भरला होता. नाही म्हणायला तळागाळातील समाज त्यांच्या पाठीशी आहे हे दिसले. परंतु त्यांना मार्गदर्शन काय झाले? कशा प्रकारचे समाजप्रबोधन झाले ? तसले काही नाही. फक्त सत्ता नाही याचा क्लेश आणि लढण्याबद्दल आणि संघर्ष करण्याबद्दल घोषणाबाजी. पक्षांतर्गत राजकारणात कुरघोडी झाली हे जरी मान्य केले तरी ताईनी पुन्हा सत्ता मिळवण्याव्यतिरिक्त काय वेगळा संदेश दिला ? प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे नेहेमीचंच -सगळे आपल्या विरुद्ध. मग संघ काय मोदी काय आणि पवार काय. अर्थात त्यांचे राजकारण पुढे न्यायला त्यांना ते करावेच लागणार. दुसरे काही नाहीच ना ?

संघाचे नेहेमी प्रमाणे- साचेबद्ध . उगाच भाऊगर्दी नाही कि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न नाही . त्यांना तशी गरज नाही म्हणा. गीत , कवायती  इत्यादी. ते इतके साचेबद्ध होते कि प्रमुख पाहुण्या श्रीमती संतोष यादव यांनी भारत माता कि म्हंटलं तर जय करायलाही कोणी तयार नाही! तसा आदेश नव्हता ना ! परंतु या सगळ्यावर मात केली ती सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाने. मी ते एकदा ऐकले. समाधान झाले नाही म्हणून पुन्हा एकदा ऐकले.तुम्हाला खरं सांगतो - ऐकले नसेल तर ऐका. संघप्रमुख आवडत नसतील तर विडिओ ऐवजी ऑडिओ वर ऐका. त्यांचा आवाज आवडत नसेल तर कुठले तरी टूल वापरून आवाज मॉर्फ करून हव्या त्या नेत्या च्या आवाजात ऐका . परंतु ऐका जरूर . कोण बोलले त्या पेक्षा काय बोलले गेले हे महत्वाचे असे आम्ही नेहेमी म्हणत असतो. त्यातलाच हा प्रकार  समाज प्रबोधन कसे करावे. अशा प्रसंगांचा समाजात सुविचार पसरविण्यासाठी कसा वापर करावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भागवतांचे हे प्रबोधन. उथळ हिंदुत्व घेऊन मिरवणारे आणि त्या जोरावर प्रसिद्धी मिळवणारे बरेच आहेत आज. खास करून सोशल मीडिया च्या काळात. परंतु अविरतपणे समाजपरिवर्तनासाठी कशे झटावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संघ आणि संघाचे वैचारिक अधिष्ठान काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे भाषण जरूर एक. अधिक बोलण्याची माझी पात्रता नाही. परंतु एक सांगतो - कुठल्याही वैचारिक मर्यादा ठेवता तुम्ही हे भाषण ऐकलंत आणि नाही आवडलं तर जरूर सांगा!

 सुशांत गोसावी