Saturday, February 13, 2021

फसलेली धर्मनिरपेक्षता -भाग १

           अठरा -वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. बऱ्याचशा राजकीय तज्ज्ञांना आठवणार पण नाही. ज्यांना आठवत असेल ते ही सोयीस्कररित्या डोळझाक करीत असतील. सोशल मेडियावरचे तथाकथित  "तज्ज्ञ " तर अस्थित्वातही नव्हते. सोशल मीडियाच नव्हती! म्हणजे अगदी नव्हती असे नाही. जे होते त्यातही तथाकथित तज्ज्ञ घाण करीतच होते ! परंतु आज इतकी प्रभावी नव्हती.  बरं गोधराकांड होण्याआधीची ही गोष्ट बरं का ! हे विशेष नमुद करतोय.  केंद्रात वाजपेयीजींचे सरकार होते. एक -दोन -तीन प्रयत्नांनंतर कुठे ते बहुमतातले सरकार स्थापन करू शकले होते. तेही स्थिर असे नव्हतेच. कधी समता कधी ममता आणि कधी जयललिता फणा वर काढीत. आणि मग प्रमोद महाजन त्या नागिणीला शांत करायला जात. परंतु सरकार काम करीत होते. कार्यक्षम होते किंवा नाही हा ज्याचा त्याचा दृष्टीकोण झाला. परंतु काम चालले होते. आधीच्या काँग्रेस आणि त्यानंतरच्या  खिचडी सरकारच्या ज्या काही चांगल्या योजना होत्या त्या सरकारने तशाच सुरु ठेवल्या होत्या. खासगीकरण आणि जागतिकीकरणाला आधीच्या सरकारांप्रमाणेच आणि राष्ट्रनीतीला अनुसरुन चालना देत होते. प्रसंगी संघ किंवा संलग्न संस्थांचा विरोध झुडकारून! त्या व्यतिरिक्तही सरकारने बऱ्याच चांगल्या योजना हाती घेतल्या होत्या. महत्वाच्या राष्ट्रीय मार्गांचे चौपदरीकरण वेगाने सुरु होते.सेवा आणि निर्मिती क्षेत्रातही बरीच प्रगती पहायला मिळत होती.  भारताने १९९८ मध्ये अणुचाचण्या केल्या आणि देशावर अनेक आर्थिक आणि इतर निर्बंध लादले गेले. परंतु त्यांनाही पुरून उरत भारताच्या प्रगतीचा जोर सुरूच होता. असे कुठलेही क्षेत्र नव्हते जिथे अदोगती होत होती.अर्थात कुठल्याही सरकारमध्ये असतात तसे गुणदोष या सरकारमध्येही होतेच.

या सगळ्यात विरोधक काय करीत होते?विरोधक म्हणजे फक्त विरोधी पक्ष नाही बरं का ? विरोधी पक्ष ही एक चांगली संकल्पना आहे. आणि ते संकल्पनेपुरतेच ठीक आहेत ! आम्ही विचारसरणी बद्दल बोलतोय. डावे किंवा आज काल फेक्युलर का काय म्हणतात तेच ते.  तर देशात कशी अशांतता पसरली आहे, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे , फॅसिस्ट संघवाले आता देशावर आणीबाणी लादणार.पंतप्रधांना कसे नागपूरहून आदेश येतात याचे चविष्ट वर्णन .धार्मिक सहिष्णुता भंग होत चालली आहे याबद्दल रडारड . कुठले छोटेसे प्रकरण उकरून काढणे आणि अल्पसंख्याकांवर कसा अत्याचार होतोय या बद्दल काहुर माजविणे असले उद्योग चालू होते. जवळपास सर्वच्या सर्व मीडिया आणि विरोधी पक्ष याच उद्योगात जुंपली होती. रोजच्या रोज असल्याच बातम्या येत. डोके फिरून जायचे. बरं उजव्यांची तेंव्हा मीडिया उद्योगात एवढी पकड नव्हती . त्यामुळे यांना विरोध करणारे असे फार नव्हते. दिवंगत वर्षा भोसले होत्या (आशा भोसलेंची मुलगी). ती जाम फाडून खायची यांना. वृत्तपत्रांवर आणि मीडियावर लोकांचा त्याकाळी बऱ्यापैकी विश्वास होता. त्यामुळे असल्या बातम्यांमुळे  मन उद्विग्न होत . एका क्षणी तर असं वाटायला लागलं की नको त्या वाईट बातम्या. सरकार गेलं तरी बेहेत्तर ! आणि सरकार खरोखर गेलेच. ते त्यांच्या चुकीच्या प्रचारतंत्राने( इंडिया शायनिंग ) की धोरणांमुळे किंवा अनेक लोक विरोधकांच्या दुष्प्रचाराला कंटाळले होते म्हणून ते माहित नाही. पुढे गोध्राकांडानंतर सुद्धा यांनी हेच तंत्र अवलंबिले. मोदी चुकीचे कि बरोबर यात आम्ही पडतच नाही आहोत. परंतु स्वतंत्र भारतात कुठल्याही नेत्याचा माध्यमांद्वारे खटला चालला नसेल जेवढा मोदींचा चालला.कुठल्याही नेत्याला केंद्रीय सुरक्षा पथकांचा सासीमारा सोसावा लागला नसेल इतका त्यांच्या मागे लावण्यात आला. १० वर्षे काँग्रेसचे सरकार असून सुद्धा काहीही सिद्ध करू शकले नाहीत हे विशेष.

आज वीस वर्षांनंतर काय स्थिती आहे ? आपल्या सुदैवाने आणि काहींच्या दुर्दैवाने भारत आजही अखंड आहे- आणि राहणार. भारतात आजही अल्पसंख्याक गुण्यागोविंदाने नांदतायत. वीसवर्षांत त्यांची लोकसंख्या वाढलीच आहे ( असो-तो मुद्दा नाही). फॅसिस्ट राजवट अल्पसंख्याकांचा छळ करील वगैरे भ्रामक कल्पना सत्यात कधी उतरल्या नाहीत.ज्या वाजपेयींच्या नावाने गरळ ओकली ,ज्यांचे सरकार एका मताने पाडले त्यांच्यावर याच लोकांकडून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. वाजपयी कसे सर्वसमावेशक होते म्हणे. ज्या अडवाणींना 'हॉक' म्हणून हिणवलं, ते यांना सौम्य वाटायला लागले! ज्या मोदींना शिव्या शाप दिला ते एकदा नव्हे तर दोनदा निवडून आले. ते ही प्रचंड बहुमताने.पिढी दर पिढी भाजपाचे नेतृत्व अधिक कर्मठ ,अधिक "उजवे " होत चालले आहे. दोन तृतीयांश च्या जवळपास बहुमत मिळून सुद्धा जर विरोधक आणि फेक्युलर फॅसिस्ट म्हणून हिणवणार असतील तर आणखी काय होणार? मोदींच्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा "अल्पसंख्याक खतरे मे है " ," संघ का अजेंडा है" वगैरे आरोळ्या सुरु झाल्याच होत्या. इकडचे तिकडचे चार गुन्हे उचलून कसा अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे आणि त्याला केंद्र सरकार जवाबदार आहे हे दाखवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. अजूनही होतायत. पन्नास शंभर वर्षांपूर्वीचे काहीतरी संदर्भ काढायचे आणि फॅसिस्ट म्हणून हिणवायचे असे उद्योग अविरत सुरु आहेत . परंतु आता उजवी मीडिया पण "पॉवरफुल" झाली आहे. त्यामुळे मीडिया चांगलीच वॉर रंगते !जनसंघाचे नवीन रूप म्हणून १९८४ मध्ये भाजप अस्तित्वात आली आणि १९८५ ची सार्वत्रिक निवडणूक त्यांनी लढवली. जागा आणि . टक्के मते मिळविणाऱ्या या पक्षाचा प्रगतीचा आलेख वरच चाललाय. २००९ चा अपवाद सोडता त्यांच्या मतदान टक्केवारीत लक्षणीय अशी घट कधीच झालेली नाही. बरं ३५ वर्षांत भाजपा फक्त १३ वर्षे सत्तेत होता हे विशेष.

हे सगळे काय दर्शवते? तर जनतेचा आणि खास करून हिंदूंचा क्रमाक्रमाने वाढत चाललेला विश्वास. आणि तो का ? हिंदू असहिष्णू आहे म्हणून ? का कोण तो बावळट म्हणाला त्या प्रमाणे सडला आहे म्हणून ? तसे असते तर भारतात रक्ताच्या नद्या वाहिल्या असत्या! किमान-असे बोलण्यासाठी विरोधकच अस्तित्वात नसते ( - वर्षे पुरेसे असतात !) . त्याचे कारण एकच - सामान्य नागरिक टीव्ही वरची बाष्कळ चर्चा बघतो, फेसबुक, ट्विटर वरचा मोदी -भाजप -संघ विरुद्धचा काहूर बघतो आणि " हे खरे नाही.मला दिसतंय " म्हणत खदखदत राहतो. ती खदखद बाहेर निघती निवडणुकांवेळी. गम्मत म्हणजे चुकीच्या धोरणांमुळे किंवा निर्णयांमुळे क्वचित बॅकफूटवर जाऊ पाहणाऱ्या सरकारला असल्या बाष्कळ दुष्प्रचारामुळे संजीवनी मिळते ! मोदी असल्या संधीचा उपयोग करून घेण्यात माहीर आहेतच! काँग्रेस जी आज सेकुलर वगैरे असल्याचा कांगावा करत आहे , त्यांना हे लक्षातच येत नाही आहे कि १९९६ पर्यंत त्यांनी जी सत्ता उपभोगली त्याचे कारण लोक त्यांना प्रामुख्याने हिंदूंचा पक्ष गणित होते. पर्याय मिळताच लोक भाजपा कडे वळले ! भारतात हिंदू बहुसंख्य असल्यामुळे हिंदू जे ठरवतील तेच सरकार येणार हे तर उघड सत्य आहे. मग इतके ओपन सिक्रेट असतांना विरोधकांना योग्य रणनीती का आखता येत नाही ?त्याचे कारण सरळ आहे -रणनीती आखायला आपली समस्या काय आहे हे मुळात समजायला हवे ना ? संघावर आणि भाजपावर फॅसिस्ट वगैरे असल्याचे हल्ले करण्यात जुंपलेल्या विरोधकांना हे लक्षात येत नाही कि त्यांनी डागलेल्या १० गोळ्यांपैयी ६-७ या सामान्य हिंदूंचे हृदय छेदतात !! आणि परिणाम निवडणुकीत दिसतात ! थोडक्यात -त्यांना हिंदूंची मानसिकताच कळलेली नाही! आणि पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेचे  चष्मे लावून भारतीय समाजाकडे बघणार्यांना ती कधी कळणार पण नाही

हिंदूंच्या मानसिकतेविषयी पुढील भागात सविस्तर लिहिणार आहे

क्रमश:

सुशांत गोसावी