Wednesday, August 28, 2019

पड्या -२

              "आठ रुपये मिळतील का?  सुट्टे नसतील तर दहा पण चालतील. आयला नेमका काल पास काढायचा राहिला अन पाकिटात दोन पाचचं नाणं ठेवलं होतं. कुठं पडलं कोणास ठाऊक" - सायंकाळी कॉलेज संपल्यावर फ्रेश होऊन होस्टेलच्या रूमवर नुकताच येत होतो तर दारातच पड्या भेटला. "नाही रे. माझ्याकडे नाहीत. कडकी चालू आहे. अजून बँकेत पैसे आले नाहीत" असे काहीबाही सांगून मी पड्याला कटवला. हॉस्टेलवर राहिला लागल्यावर ज्या अनेक दुनियादारी च्या गोष्टी तुम्ही शिकता त्यातली सर्वात महत्वाची म्हणजे आपले पैसे जपून ठेवणे. अर्थात अडी-अडचणीवेळी मित्रच उदार होऊन मित्रांची मदत करतात हा भाग वेगळा. परंतु पड्याला कटविण्यामागचा हेतू फक्त पैसे वाचविण्याचा नव्हता. शिवाय माझी मनी ऑर्डर आठवड्यापूर्वीच आली होती. त्यामुळे तूर्त तरी कडकी नव्हती . तो मेस मध्ये फुकटचे जेवून गेल्याचा माझ्या मनात राग होता. त्या दिवसानंतर मी त्याला फार जवळ केले नव्हते. येता जाता स्मितहास्य एवढेच. तो राग निवळायच्या आताच हा बहाद्दर परत दहा रुपये मागायला दारात ! "ओक्के" म्हणत पड्या निघून गेला. रात्री मलाच माझे वाईट वाटले. खरेच हा पैसे विसरला असेल तर ? मान्य कि मेस मध्ये फुकट जेवला. परंतु बोलावलं तर मीच होतं ना ? कसा गेला असेल घरी? कि थांबला असेल होस्टेलवर कोणाच्यातरी खोलीत ? घरी कळविले असेल का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन गेले . कॉलेज सुरु होऊन दोन एक महिने झाले होते. त्यामुळे मन अजून कोवळे होते. निगरगट्ट झाले नव्हते. शिवाय मी खोटे बोलल्यामुळे अपराधीपणाची भावना मनात होती. कितीही आव आणला तरी माणूस मूळ स्वभावापासून फारकत घेऊन फार काळ नाही राहू शकत. या अपराधीपणाच्या भावनेमुळेच कदाचित दुसऱ्या दिवशी मी पड्याला शॉर्ट ब्रेक वेळी चहाचे आमंत्रण दिले. तो रागावला आहे का हे हि पडताळून पहायचे होते. लगेच तयार झाला. " अण्णा एक फुल -दो मे देना ". ऑर्डर त्यानेच दिली आणि पैसे ही. "अरे हं - तुझी कडकी चालू आहे ना ? हे घे म्हणत पन्नास ची नोट माझ्या हातात सरकावली. मला अजूनच ओशाळल्यासारखे झाले. माझे रिडींग चुकले होते तर. चहा दरम्यान पड्याबद्दल आणखी माहिती मिळाली. मूळचा सांगली जिल्ह्यातील विट्याचा. अकरावीपासून सांगलीत शिकायला. बुधगावला आत्याकडे राहतो. हा आणि आप्पा ( अरुण पाटील ) दोघे विट्याचे. अप्पाने होस्टेलला रहायचे ठरविले आणि पड्यापण नॉन रेसिडेंट होस्टेलवासी झाला. सकाळी कॉलेजला बस ने येणार. आणि संध्याकाळी उशिरा बुधगव ला परत. असा याचा दिनक्रम . शनिवारी विट्याला घरी. बोलण्याने गैरसमज दूर झाले आणि आमची मैत्री झाली-म्हणजे माझ्या दृष्टीने. पड्या तर आधीच हक्काने जेवायला आला होता माझ्यासोबत! शिवाय माझ्या बाबांचे मूळ गाव विटा तालुक्यातील. त्यामुळे का कोण जाणे पड्याबद्दल आणखीच थोडी आपुलकी वाटली. दसरा रविवारी होता. पड्या आग्रहाने घरी घेऊन गेला. श्रीखंड, पुरी बटाट्याची भाजी , भजी ,मसालेभात असे भरलेले ताट पाहून मी भारावलो. होस्टेलवासीयांना घरचे जेवण मिळाल्यावर जो आनंद होतो तो आजकालच्या लहान मुलांना पिझ्झा मिळाल्यापेक्षा कैक पटींनी अधिक असतो. यावेळी दुप्पट जेवणाची पाळी माझी होती.
                जुनिअर कॉलेजातील पुर्वश्रमीची दुश्मनी, मुलीच्या प्रेमापोटी स्पर्धा किंवा चोरीचा आरोप असली काही करणे सोडली तर इंजिनिअरिंग कॉलेजात दुश्मन कोणीच नसते. होस्टेलवरतर नाहीच नाही. सगळेच मित्र असतात. रूम पार्टनर, गावाकडचे मित्र ,वर्गातील मित्र, खास मित्र, कट्ट्यावरचे मित्र ,पैसेवाले मित्र ,निवडक मैत्रीणी,असाइनमेंट वाले मित्र. प्रॉक्सी लावणारे मित्र अशी मित्रांची विविध वर्तुळं असतात. जो तो आपापल्या वर्तुळात फिक्स असतो. न्यूटन च्या नियमाप्रमाणे काही बाह्यघटनेमुळे वर्तुळं बदलली तरच. पड्या माझ्या अशाच एका वर्तुळाचा भाग झाला. तो इलेक्ट्रॉनिक्सचा आणि मी कॉम्प्युटर्स. त्यामुळे वर्ग एक नव्हता. परंतु तो वारंवार होस्टेलवर येत असल्याकारणाने भेट व्हायचचीच. मैत्री झाली असली तरी खरे सांगायचे झाले तर पड्या मला विचित्रच वाटत-नव्हे तो होताच. त्याला काही गंभीरताच नव्हती. मनात आले तर हा लेक्चरला दांडी मारणार. तेवढेच नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा बुडवणार. कधी कॉलेज ला येणारच नाही तर कधी माझ्या किंवा अण्णाच्या रूमवर बसून रात्री उशिरापर्यंत असाइनमेंट संपवूनच घरी जाणार. मनाचा राजा. बरं निष्काळजी किंवा विसराळू म्हणाल  तर , माझ्या अप्लाइड मेकॅनिक्स च्या नोट्स हरविल्या तर आठवणीने दुसऱ्या दिवशी गावातून आणून मला दिल्या. परंतु स्वतः ड्रॉईंग शीट विसरणार हमखास. पी एल सुरु झाली तसा पड्या होस्टेलवरच पडीक असायचा. का कोणास ठाऊक. कदाचित घरी काही अभ्यास करीत नाही म्हणून घरचे जबरदस्तीने स्टडी लायब्ररीत पाठवीत असतील. परंतु काही उपयोग झाला नाही. हा पठ्ठया चार वेळा कॅन्टीन ला जाणार, क्रिकेट खेळणार,गाणी ऐकणार, मॅच बघणार टीव्हीवर आणि हे सगळे करून मनात आले तर अभ्यास. बाकीचे विद्यार्थी टेन्शन मध्ये असताना हा मात्र मनमौजीपणे वागणार. जणू याला परीक्षेचा नियम लागूच नाही. आणि कधी मूड आला तर नाईट मारून एखादे पुस्तक संपवून टाकणार. आम्ही बाकीचे मित्र त्याला 'टॉम मूडी' चिडवायला लागलो. पहिल्या सहामाही परीक्षेचा निकाल लागला. मी तर सुटलो.आश्चर्याची गोष्ट म्हणजे पड्याचा निकाल पण काही वाईट नव्हता.मेकॅनिक्स, ड्रॉईंग , गणित असे महत्वाचे विषय याने प्रथम-द्वितीय श्रेणीत सोडविले होते. पण मामेभावाच्या लग्नाला जायच्या नादात पठ्या सिव्हिल ची ओरलच विसरला होता. ती राहिली. पड्या हुशार होता तर. म्हणावा तर निष्काळजी पण नव्हता. परंतु बाकीच्यांसारखे टेन्शन घेऊन जगणारा नव्हता. मनात येईल तसे करणार. आऊट कास्ट नव्हता अगर आऊटस्टँडिंग पण नव्हता - रँचो सारखा. वर वर पाहिले तर अगदी चार चौघांसारखा. पण खोलवर पाहिले तर एक स्वछंदी पक्षी होता.आपल्या पंखांची क्षमता माहित असल्यामुळे आतातायीपणा टाळणारा परंतु जे जमेल त्यात मनमुराद आनंद लुटणारा.
                कॉलेजातील पुढील ३ वर्षे आमची मैत्री अबाधित राहिली. फार घनिष्ठ नाही. पण भेटणे व्हायचे.पड्याच्या घरी अनेकदा जाणे झाले. काकुंशी चांगलीच ओळख झाली. त्यांनाही याच्या मनमौजी स्वभावाची काळजी वाटत. "हुषार आहे. समजूतदार आहे. पण लहरी आहे. पुढे जाऊन कसे होणार काय माहित" असे त्या नेहेमी बोलून दाखवत. होस्टेलवर असला कि मुक्काम बऱ्याचदा माझ्या खोलीवर असत. स्वतः अभ्यास करीत नसला तरी दुसऱ्यांना अक्कल शिकविणे किंवा टिंगल करणे असले त्याच्या स्वभावात नव्हते. आपण कधी सिरीयस होण्याबद्दल लेक्चर दिले तर शांतपणे ऐकून घेणार. परत -ये रे माझ्या मागल्या. त्याला ना काल केलेल्या (अथवा न केलेल्या) गोष्टींबद्दल भीती होती ना उद्याची काळजी. फार काही तत्वज्ञान वगैरे पाळत नव्हता. चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेत पिणे एवढेच त्याला माहित होते. परंतु परीक्षा, फर्स्ट क्लास ,ऑल क्लिअर ,कॅम्पस ,जी आर ई  असल्या जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रित असल्यामुळे पड्या समजून घ्यायला ना कोणाला सवड होती ना इच्छा. शेवटच्या वर्षी काहींना कॅम्पस जॉब मिळाला तर काही मुकले. पड्या दोन कंपनींना कॅम्पस करिता पात्र झाला. बॉर्डर चित्रपट पाहून यायला उशीर झाला ( कॉलेज बुडवून गेला होता ) म्हणून एक इंटरव्यू हुकला आणि दुसऱ्यात मुंबईच्या कंपनीला म्हणाला कि तुमची पुण्यात शाखा असेल तर येतो नाही तर नाय ! कॉलेज संपले आणि मित्रांचा संपर्कही तुटला. आयुष्यभर संपर्कात राहण्याच्या आणाभाका वर्षभरात विरल्या. आमच्या पिढीसाठी २०१० पर्यंतचा काळ हा 'डार्क एजेस ' होता. नंतर फेसबुक आले आणि चित्र बदलले. त्याआधी नाही म्हणायला काही लोक ऑर्कुटवर होते. परंतु तुरळकच. याहू ग्रुप नावाचा प्रकार पण अस्तित्वात होता. परंतु  अति फॉर्वर्डस मुळे तोही निष्काम झाला. माझा कॉलेज संपल्यावर एखाद डिड वर्ष पड्या आणि त्याच्या घरच्यांशी मोघम संपर्क होता. एकदा सांगलीला गेलो असता त्याला भेटायलाही गेलो होतो. तेंव्हा पड्या 'सी डॅक' च्या परीक्षेची तयारी करीत होता. तेंव्हा जी भेट झाली त्यानंतर आज थेट  अमेरिकेत भेटलो होतो पड्याला.
क्रमश:

Tuesday, August 20, 2019

पड्या -१


       रोज सकाळी चहा, अल्पोपहार घेऊन ऑफिसला जाणे आणि पुन्हा पंधरा मिनिटांनी अनावश्यकरीत्या कॉफी पिणे हा आमचा दिनक्रम. सकाळी कॉफी पिण्याची हि वायफळ सवय मला हिंजेवाडी पासून लागली. हिंजेवाडीला ऑफिसला जायचो तेंव्हा घरून ऑफिसला पोहोचेपर्यंत हमखास चहाची तलप यायची.आजकाल म्हणे घरून न्याहरी करून निघाले कि हिंजेवाडीला ऑफिस गाठेपर्यंत जेवायची इच्छा होते. सुदैवाने हिंजवडी इतक्या भयानक रहदारीला सामोरे जाण्याची वेळ नाही येत सध्या आमच्यावर .परंतु सकाळी गरम पेय घेण्याची सवय मात्र कायम राहिली.चहाची जागा कॉफीने घेतली इतकेच. सकाळची कॉफी सोडावी असे अनेकदा ठरवितो. परंतु आमच्या स्वभावाचे जडत्व आडवे येते नेहेमी. असो तर एके सकाळी कॉफीचे पैसे देण्याच्या (आमच्याकडे फुकट नाही मिळत) रांगेत उभा असताना "ए भावड्या " असा मागून आवाज आल्याचा भास झाला.तो '' होता कि नाही या बाबतीत थोडा शशांक होतो मी. परंतु मुळात ती हाकच एक भास होता असे समजून मी रांगेत पुढे सरकलो. अमेरिकेतील फॉर्च्युन १०० कंपनी च्या उपाहारगृहात तुम्हाला अनुक्रमे तेलगू , इंग्रजी,हिंदी या भाषा ऐकायला मिळतील. कधी क्वचित स्पॅनिश,गुजराती किंवा तमिळ ऐकायला येण्याची शक्यता आहे. पण मराठी? नाही म्हणायला मराठीजन बरेच आहेत ऑफिसात. पण म्हणतात ना "व्हेन इन मुंबई स्पिक भय्या हिंदी", तेच अनुसरुन मराठी लोक गुडी पाडवा आणि गणपती हे दिवस सोडल्यास एकमेकांशीपण इंग्रजीत बोलतात.आणि अगदी कधी मराठीत बोलण्याचा आवाज ऐकू आलाच तर "काय म्हणताय ", "झाले का जेवण" ,"एवढ्या लवकर घरी " असले ठरलेले शब्द कानी पडतात. अगदीच झालेच तर "मम्मी तू नको इतकी कामं करत जाऊस. सांग तिला- बाई लाव म्हणावं " असे माय लेकींचे फोनवरचे संभाषण लिफ्ट मध्ये कानी पडते. अर्थात लेक लिफ्ट मध्ये असते आणि माय भारतात  मोठ्या आवाजात भावड्या वगैरे म्हणजे माझा कल्पनाविलास असणार निश्चित.
                कॉफीचे पैसे देऊन बाहेर पडतो तोच  " ओ गोसुशेठ " अशी हाक पुन्हा कानी पडली. या अमृतवाणीचा करता नाही तरी करविता मीच होतो तर. मागे वळून पाहिले आणि तो '' मुळात नव्हताच हि खात्री पटली. एरव्ही मला अशी मोठ्याने मारलेली हाक ऐकून मी थोडा गोंधळलो असतो कदाचित. परंतु मोठा आवाज सोडला तर कोणाला काही कळणार नाही या विचाराने मला निर्धास्त केले. काही लोक हे 'काळ प्रूफ' असतात. कितीही वर्षे झाली तरी त्यांचे दिसणे ,आकलन, कर्तृत्व अगदी तस्सेच असते. उदाहरणार्थ सैफ , राहुल (हो तोच तो गांधी ), सचिन - पिळगावकर,तेंडुलकर नव्हे. माझ्या समोर उभी असलेली व्यक्ती पण त्याच 'लीग' मधील होती. वीस वर्षानंतर पण 'पड्या' ला मी पाहता क्षणीच ओळखले. आणि " काय रे चमनप्राश खातो का लै ? चमनगोटा झालाय वर " या भंगार विनोदाने त्याच्या 'लीग' ची खात्री पटली. सहा-आठ चमचे साखर( मी मोजणे थांबविले ) आणि किमान अर्धा पाऊण कप 'क्रीम' घालून पड्या ने कॉफी घेतली आणि आम्ही गप्पा मारायला बसलो. हर्ष ,आश्चर्य , तू इकडे कसा -मी इकडे कसा अशी प्राथमिक विचारपूस करून झाल्यावर मी मिटिंग आहे म्हणून जायला उठलो तर "थांब रे ! काय करतो मिटिंग ला जाऊन " म्हणत मला बसवून घेतले. " तुला नाही का साल्या काही मिटिंग वगैरे" मी तूर्त सुटका करून घेण्याच्या इराद्याने विचारले. "आहे ना. तिकडेच जाणार होतो. पण तू दिसला आणि विचार बदलला". पड्या अजिबात बदलला नव्हता तर. महत्वाची मिटिंग असल्याकारणाने मी त्याचा विरोध न जुमानता उठलो. दुसऱ्या दिवशी लंच ला भेटायचे ठरले आमचे.
                'पड्या' माझा कॉलेजचा बॅचमेट. त्याची आणि माझी भेट साधारण पहिल्या सेमिस्टरच्या सुरुवातीस झाली. आमच्या हॉस्टेल समोरच्या कच्च्या रस्त्यावर काही मुले नेहेमी दोन दगडं स्टंप लावून क्रिकेट खेळायची. जेंव्हा पहाल तेंव्हा हे त्या क्रिकेट 'पीच' वर पडीक असत. खास करून हा 'पड्या'. कॉलेज नुकतेच सुरु झाल्याकारणाने कोण कुठल्या वर्गात हे नीटसे माहित नव्हते. मुळात हि मुले फर्स्ट इयरची नसतील या अशांकने आणि 'रॅगिंग' च्या भीतीने मी फारसे विचारायच्या भानगडीत पडलो नाही. परंतु जुजबी तोंड ओळख झाली होती. माझी खोली समोरच असल्याकारणाने त्यांचा आरडा ओरडा ऐकू येई. त्यातल्या एकाचे नाव 'पड्या' असल्याचे कळले. आमच्या कॉलेजात प्रद्युम्न ,आशुतोष, अरुण अशी सरळ सोपी नवे क्वचितच ऐकायला मिळायची.' रां*च्या ' हे  सगळ्यांचे 'जेनेरिक' नाव सोडल्यास, खेड्या ,भोळ्या, गोश्या ,अण्णा ,नाना, पंड्या अशी 'टोपण नावे' असत. काही जण आपली पूर्वाश्रमीची टोपणनावे 'कॅरी फॉरवर्ड' करीत तर काहींचे -मुख्यत्वे बाहेरून आलेल्यांचे , कॉलेजात आल्यावर बारसे घालण्यात येई. मुंबईकर मात्र आपली 'माँटी,' बंटी',' सॅमी','घोडा' अशी संदर्भहीन टोपणनावे घेऊन येत. त्याचे नाव घोडा का हा विचार करण्यात आमची चार वर्षे निघून जात. कदाचित तोच उद्देश असावा. असो. तर या क्रिकेटर मुलांशी ओळख करण्याचा धाडसी निर्णय मी एके दिवशी घेतला. त्या निमित्ताने आपल्याला पण थोडं क्रिकेट खेळता येईल असा उद्देश. सायंकाळी मेस ला जेवायला जातांना सहज 'चला जेवायला' म्हणून हाक दिली. पड्या लगेच बॅट टाकून माझ्या सोबत यायला तयार झाला. जेवायला माझ्या शेजारीच बसला. मला थोडे आश्चर्य वाटले. कारण सहसा जो तो आपल्या रूममेट्स सोबत किंवा मित्रांसोबत बसत असे. वाढपी ताट घेऊन आला तर माझ्याकडे बोट दाखवून 'एक गेस्ट'  म्हणत पड्या ने ते ताट स्वतः कडे ओढून घेतले. गेस्ट ? माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. मनात इतक्या इतक्या शिव्या दिल्या या पड्या ला. "अरे आपली धड ओळख तरी आहे का ? आणि तू सरळ गेस्ट ?". पण स्वतःच मोठ्या तोंडाने 'चला जेवायला " म्हणत आमंत्रण दिले होते. शिवाय हा 'फर्स्ट इयर' चा नसेल हि भीती होतीच.त्यामुळे गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु अशा कोणाच्याही हाकेवर सहजरित्या जेवायला येणारे बहाद्दर या जगात आहेत हे बघून आश्चर्य वाटले. माझ्या साधारण डिड ते पाऊणे दोन पट जेवून पड्या उठला. अनोळखी मुलाला जेवायला घालून सात रुपयांचे नुकसान झाले या दुःखामुळे आणि रागामुळे मी अगदीच जुजबी बोललो जेवतांना. हात धुवून पड्या ने गेस्ट रजिस्टर मध्ये नोंदणी केली आणि मला याची प्राथमिक माहिती मिळाली
परीक्षित देशपांडे, प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स,  राहणार बुधगाव सांगली .
लोकल मुलाने अगदीच तुरळक ओळखीच्या कोणाबरोबर काहीही कारण नसताना कॉलेज च्या मेस मध्ये जेवण्याचा अकल्पनीय प्रकार घडला होता. त्याचा करविता होतो मी आणि करता - परीक्षित देशपांडे उर्फ पड्या.
क्रमश :

टीप :या आणि संबंधित लेखांतील उल्लेख  काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही व्यक्ती अथवा घटनांशी संबंध नाही 

Saturday, August 3, 2019

प्रवास भाग ४


               "आप कहाँ रहते है? वो प्लेसन्ट हिल अपार्टमेंट मे क्या?. हम लॉन्ग हिल रोड पर रहते है. मेरे बेटे का ४ बेडरूम का घर है. घर मे एकूण ११ कमरे है. आप के बेटे का व्हिसा आया क्या ? होगा होगा -भगवान के आशीर्वाद से उसका भी सभ अच्छा होगा ". जुलै च्या एका सायंकाळी आजोबा कोणाशीतरी मराठमोळ्या हिंदीत गप्पा मारित बसलेले असतात. संध्याकाळ म्हणजे ८. ३० वाजून गेलेले असतात. परंतु अजूनही उजेड असतो. बागेत लहान मुले खेळत असतात. त्यांच्या आया गप्पा मारत -कदाचित तुझी सासू जास्त चांगली कि माझी हे ठरवत. आजींचा एक वेगळा ग्रुप -कदाचित तुझा जावई जास्त हेकट कि माझा हे ठरवत आणि पप्पा लोक्स तिकडे टेनिस किंवा तत्सम काहीतरी खेळत किंवा आपल्या बॉस बद्दल गप्पा मारत उभे असतात . प्रथमदर्शनी पुणे ,नोएडा किंवा बेंगळुरू च्या कुठल्याशा उपनगराचे वाटणारे हे दृश्य असते अमेरिकेतील एका छोटयाशा शहरातील एका सार्वजनिक बागेचे. उन्हाळा म्हंटल्यावर दिवस मोठा ,मुलांना सुट्या आणि एकंदरीतच उल्हासदायक वातावरण. आजी आजोबांचा एक मस्त ग्रुप जमलेला असतो. रोज फिरायला जाणे ,बागेत गप्पा झाडत बसणे. कधीतरी -कोणाचा मुलगा किंवा मुलगी गाडीतून सोडत असेल तर डिनरला जाणे , कधी बस किंवा मेट्रो ने सहज म्हणून फिरायला जाणे असली मौज मजा चालू असते . येऊन दोन चार महिने झाल्यामुळे थोडा आत्मविश्वास येतो. आपण हरविणार नाही याची खात्री पटते. आणि हरवलो तर पत्ता सांगून परत घरी येऊ हा विश्वास .मुलांनी 'प्रीपेड' फोन घेऊन दिलेला असतोच .
                भारतातून येताना हाफ शर्ट आणि शिवलेली पॅन्ट असला पेहेराव केलेले आजोबा एव्हाना टी शर्ट आणि शॉर्ट घालायला लागेलेले असतात. पंजाबी ड्रेस म्हणजे आपल्या आधुनिकतेचा परमोच्च बिंदू मानणाऱ्या आजी सुनेच्या आग्रहाखातर जीन्स 'ट्राय' करतात. अगदी लॉन्ग स्कर्ट सुद्धा ! परंतु हे बदल फक्त पेहरावातील नसतात तर विचारांचे सुद्धा असतात. गेल्या तीन चार महिन्यात त्यांनी अमेरिकेतील समाजाचा अभ्यास केलेला असतो. आपल्याच वयाचे एरिक आणि जॉईस कसे एकटे राहतात , सारखे हिंडत असतात आणि नातवांबरोबर वेळ घालवण्यात आनंद मिळूनही त्यात अडकून न राहणे पसंद करतात. डी सी ला भेटलेले ते जोडपे  ८० वर्षांचे होते. परंतु नॉर्वेहुन फिरायला आले होते. का तर म्हणे एकदा तरी अमेरिका पहायचीच!  सर्वात कहर म्हणजे शेजारी राहणारा जो .पासष्टाव्या वर्षी हाल्फ मॅरेथॉन पळतोय पठ्ठया ! या आणि असल्या अनुभवांचा परिणाम आजी आजोबांच्यावर नकळतपणे होतोच. या उलट आपण कसे रिटायर होताच 'सिनियर सिटीझन' झालो आणि नातू होताच त्याला सांभाळणे आणि खेळवणे यात  सर्वस्वी वाहून घेतले याची जाणीव व्हायला लागते. आपण केले ते चुकीचे नाहीच परंतु आयुष्याच्या या पाडावावर पण बरेच काही करण्यासारखे आहे याची जाणीव होते. थोडक्यात - 'Age is just a number'  हि जाणीव होते आणि नकळत बदल व्हायला लागतात . आता उशीर झालाय- पास्ताच करू. मी भाज्या चिरून देते. ९. १५ ला घरी आल्यावर आजी सुनेला सांगत असतात . करायला सोपी म्हणून खिचडीची जागा अलगदरीत्या पास्त्याने घेतलेली असते ! या सगळ्याबरोबरच आपल्या मुलांच्या इथल्या एकंदरीत राहणीमानाचा पण त्यांना चांगला अंदाज आलेला असतो. व्हिसा आणि ग्रीनकार्ड च्या खाचा खुणा समजतात. आपली मुले इकडे नक्की काय काम करतात याचा अंदाज येतो. आपली सामाजिक गरज भागविण्याकरिता मुलांनी जो 'ग्रुप 'बनविलेला असतो त्यात आजी आजोबा सहज मिसळून जातात.
                श्रावणमासी अमेरिकेत 'हर्ष मानसी' नसता कडक उन्हाळा असतो. परंतु नाग नसलेल्या प्रदेशात नागपंचमी साजरी होतेच आणि नजीकच्या 'इस्कॉन' मंदिरात कृष्णजन्माष्टमी जोरदार साजरी होते. फ्रिज मध्ये बटर आहे हे माहित असलेला नातू ,आजीकडून दहीहंडीची गोष्ट ऐकल्यावर थोडा गोंधळतो खरा. पण 'ओल्ड टाइम्स ' ला काही वेगळे नियम असावेत म्हणून सोडून देतो. एखादा वीकएंड पकडून सत्यनारायणाची पूजा घातली जाते. अर्थातच ऑनलाईन. १५ ऑगस्ट रोजी स्टेट हाऊस समोरच्या झेंडा वंदनाला हजेरी लावल्यामुळे अगदी 'भारतात असल्यासारखे वाटते'. परंतु त्याच बरोबर आपल्या नातवाला भारताच्या स्वान्त्र्य संघर्षाबद्दल काहीच माहित नाही हे पाहून आजोबांना थोडे दुःख होतेच. 'कॅच अपकरण्याच्या उद्देशातून ते एकाच दिवसात राणी लक्ष्मीबाई पासून सावरकरांपर्यंत सगळे किस्से सांगून टाकतात.एव्हाना शाळा सुरु होण्याचे पडघाम वाजलेले असतात. शाळेकडून नवीन वर्गासंदर्भात माहिती आणि लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची यादी आलेली असते. नातवांना पुस्तकेच नाहीत हा मात्र आजी-आजोबांना मोठा धक्का असतो. "बाबांच्या एक डझन वह्यांना कव्हर घालत होते मी " हा आजीचा ठरलेला किस्सा नातवाला ऐकवला जातो. असेच एका रात्री जेवण झाल्यावर आजोबा "तात्याकाकांचे मोतीबिंदू चे ऑपेरेशन होणार होते -झाले का माहीत नाही " किंवा "साराची (भारतातील दुसरी नात) चाचणी परीक्षा सुरु होईल पुढील आठवड्यात " असला काहीतरी विषय काढतात. आपली परतीची वेळ जवळ आली याची ती जाणीव असते.
                नातवाची शाळा सुरु होते. गणपती येतात.अमेरिकेत राहून गणेश चतुर्थी  किती चांगल्या रीतीने साजरी करतात याचे आजी आजोबांना कौतुक वाटतेच .अर्थात आतापर्यंत ती सवय झालेली असते. काही आजी आजोबा गणपतीसाठी म्हणून परततात तर काही थांबतात. परंतु एव्हाना आलेले सवंगडी हळू हळू परतायला लागलेले असतात. आजी आजोबा पण आपली तयारी सुरु करतात. पुढचे दोन वीकएंड शॉपिंग साठी आरक्षित ठेवण्यात येतात. " काय करायचंय ते घेऊन ? आज काल सगळं मिळतं आपल्याकडे". " असू  दे हो ! अमेरिकेतून आणले याचे कौतुक " असले संवाद मॉल्स मधून ऐकू येतात. भारतातल्या नातवांसाठी भरभरून खरेदी केली जाते. इतर आप्तेष्टांसाठी छोटे मोठे उपहार. स्वतःसाठी मात्र काही घेण्यास धजावत नाहीत.ती वृत्ती काही बदललेली नसते. मग मुलं जबरदस्तीच –फिट-बिट किंवा एखादी पर्स वगैरे घेऊन देतात आपल्या आई बाबांना. बॅगा भरल्या जातात. दोन वेळा वजन केले जाते. ग्रँड पॅरेंटस जाणार म्हणून नातू पण थोडा रडवेला होतो. गेले चार पाच महिने मायेची उब त्याने उपभोगलेली असते. इतक्यात रात्री जोरदार पाऊस पडतो. अचानक वातावरण थंड होते. आता अशीच थंडी वाढणार. पाच महिन्यांपूर्वी पालवी फुटलेली झाडे आता रंग सोडायला सुरुवात करणार. मग पानगळ आणि मग एक मोठ्ठा अंधार.
                विमान सुटण्याची वेळ दुपारची असते. परंतु सकाळीच निघणे भाग असते. बॅगा गाडी मध्ये टाकल्या जातात. देवाचा आशीर्वाद घेऊन ,आई बाबा /आजी आजोबांच्या पाया पडून मंडळी प्रस्थान करतात. दाटून सगळ्यांनाच आलेले असते. शांतता भंग व्हावी म्हणून मुलगा विषय काढतो . " चेकअप वेळेवर करत जावा. पैश्याचा विचार करू नका . काय करायचंय साठवून ?" . “तू पण काळजी घे रे पोरा. तुझ्या बॉस ला सांग -कशाला उगाच रात्रीचे कॉल ठेवतो म्हणून ? तब्बेत महत्वाची " आजी न राहावून आपल्या मुला बद्दलची  काळजी व्यक्त करतेच. "अनय - आता तू 'इंडिया ' ला कधी येणार ?"  प्रश्न अनय ला विचारलेला असतो परंतु रोख त्याच्या आईबाबांकडे असतो. विमानतळावर पोहोचल्यावर चेकइन पटकन उरकते. घरून आणलेले थालीपीठ सगळे मिळून खातात. निघायची वेळ येते. सुनेला अश्रू अनावर होतात. "काही चुकले असेल तर क्षमा करा " म्हणत ती सासूला मिठी मारते . " हे काय वेडे " म्हणत सासू पण तिला कवेत घेते. सासू ला हे नवीन नसते. पंचवीस तीस वर्षांपूर्वी ती या प्रसंगातून गेलेली असते. फक्त तेंव्हा ती  बस स्थानकावर सासूला सोडायला आलेली असते आणि लाल पांढऱ्या विमानाच्या जागी लाल पिवळी 'एस टी ' असते. भावनांना जनरेशन गॅप नसतो. अशातच मुलाची आणि बापाची नजरानजर होते.बापाच्या डोळ्यातून घळा घळा वाहणारे अदृश्य अश्रू मुलाला दिसतात. प्रत्येक थेंब एकंच प्रश्न विचारत असतो "पोरा -येशील ना रे ". मुलाला अर्थ कळलेला असतो. आत्ता बाबांचे बोट पकडून त्यांच्यासोबत जावे असे वाटत असूनही तो हतबल असतो.या क्षणी काळ पण थांबलेला असतो -कारण प्रश्नाचे उत्तर त्याचेकडे पण नसते. काळजी घ्या ","फोन करा पोहोचल्यावर असले काहीतरी बोलून प्रसंग हलका केला जातो आणि आजी आजोबा सेक्युरिटी चेक कडे प्रस्थान करतात.
या पूर्वी कितीही वेळा अमेरिकेला आले असले तरी हा प्रवास जड जाणार हे निश्चित असते.

समाप्त