Sunday, July 28, 2019

प्रवास -भाग ३


               "अजोबा हे सन स्क्रीन लावा म्हणजे सन चा त्रास होणार नाही. आणि हे इन्सेक्ट रिपेलंट पण लावा".अनय आपल्या आजोबाना सांगत असतो. अर्थातच आजी आजोबा आपल्याकडे पहिल्यांदा आलेत म्हणजे त्यांना इथले काहीच माहीत नसणार या निरागस भावनेने. आपल्या आजोबांनी खान्देशात वरणगावला पंचवीस सर्वेयर ची नोकरी केलेली असते हे त्याला अर्थातच माहित नसते. रणरणत्या उन्हात हातरुमाल घामाने चिंब होई. तो चिंब रुमाल हेच काय ते त्यांचे उन्हापासून संरक्षण! वीसएक वर्षांपूर्वी तेच आजोबा "आमच्या वेळी कि नाही एवढं ऊन होतं! मग तरी ही आम्ही चालायचो उन्हात" वगैरे गोष्टी सांगत असते कदाचित त्या नातवाला. परंतु आता आजोबा वयोपरत्वे अजूनच 'मॅच्युअर' झाले असतात. त्या काळातील उदाहरणे या पिढीला आणि ते ही परराष्ट्रात देऊन काहीही उपयोग नाही हे त्यांना ठाऊक असते.नातवाच्या प्रेमापोटी ते मुकाट्याने सांगेल तसे करतात आणि बूट घालून बाहेर पडतात. आज वीकएंडला सगळ्यांचा नजीकच्या 'स्टेट पार्क ' ला डबे घेऊन जायचा बेत असतो. सोबत आणखी एक दोन मित्र मैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय. थोडं हायकिंग ,धबधब्या जवळ लहान मुलांना थोडी मजा ,जेवण खाण, चहा आणि घरी परत -असा नेटका बेत. अगदी भूक लागलीच तर येतांना डंकिन किंवा सबवे ला थांबणे.अर्थात आजी आजोबांना नवीन काहीच नसते. त्यांच्या मुलांना पण.लहानपणी सिंहगड,दुर्गा टेकडी किंवा पांडवलेणी असल्या ठिकाणी खूप सहली केलेल्या असतात. कदाचित तोच वारसा ही मुलं आपल्या पुढच्या पिढीला देत असतात.
                आजी आजोबा अमेरिकेत येऊन महिना डिड महिना उलटलेला असतो. आले तेंव्हा गुलाबी थंडी होती. आता थोडा उन्हाळा जाणवायला लागतो. काही दिवसांत आजी आजोबांची एक दिनचर्या तयार होते. सकाळी उठून फिरायला जाणे, अंघोळ ,देवपूजा , मग कागदी वर्तमानपत्राअभावी 'ई -सकाळ' किंवा ई -लोकसत्ता' वाचणे, भारतात दुसऱ्या मुला /मुलीला किंवा इतर आप्तेष्टांना फोन करून खुशाली जाणून घेणे, आपण काय काय केले हे कौतुकाने सांगणे ,अमेरिकेतील मुलीने किंवा सुनेने नवीनच सुरु करून दिलेल्या 'फेसबुक' वर काय काय दिसते /कळते ते कुतुहुलाने पाहणे. मग नातवंशी खेळणे ,दुपारी वामकुक्षी आणि संध्याकाळी पुन्हा फिरणे,नवीन ओळख झालेल्या इतर आजी आजोबांशी गप्पा मारणे. एकूण काय? आजी आजोबा 'सेटल' झालेले असतात. वीकएंड ला छोट्या सहली , 'ग्रोसरी' आणि शॉपिंग असला कार्यक्रम. वरकरणी 'सगळे भारतासारखे'  दिसत असले तरी त्या भाजी च्या दुकानातील स्वच्छता, १५ दिवस वगैरे टिकणारे दूध , 'इंडियन स्टोर' मध्ये भारतात कधीही न पाहिलेले जिन्नस, दुकानांची भव्यता, विविध प्रकारची उपहारगृहे या गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. आजी आजोबांना एकंदरीत अमेरिकेतील राहणीमानाचा अंदाज येतो. चांगल्या गोष्टी कळतात आणि वाईटाचा पण अंदाज येतो. घरातही नव्याचे नऊ दिवस संपून कधी छोटे मोठे तणावाचे प्रसंग निर्माण होतात. आपल्या तिघा/चौघांच्या संसाराची सवय असलेल्या मुलांना आई-वडील/सासू सासऱ्यांसोबत ऍडजस्ट होणे थोडे अवघड जातेच. आयुष्याचा एक दृष्टिकोन असलेल्या आजी आजोबांनाही काही गोष्टी न राहून बोलाव्या वाटतातच .
 "अनय ला सारखा पिझ्झा नका देत जाऊ .चांगलं नाही ते ", “ुठे सारखा देतोय. तुम्ही नसता इकडे. वर्षभर तो हेल्थी गोष्टी खातो. आता उगाच सुट्टी आहे म्हणून" 
 ुला म्हंटलं होतं खिचडी टाक .पुरली असती सगळ्यांना .तशीही कुठे भूक होती फार? तर तुम्ही बाहेरून जेवण मागवलं .आता काय ? खा शिळे ".ालतंय अमेरिकेत खातात. इथे फ्रिज मध्ये राहते दोन तीन दिवस ", “तरी काय? शिळे ते शिळेच"
बiबा तुम्ही तांबे काकांना बोलले होते का आम्ही न्यू जर्सी ला येणार म्हणून? आता ते अग्रहः करताहेत. उगाच नक्की नसतांना कशाला सांगायचं कोणाला ?" , “मला काय माहिती इतके अवघड असेल? कोणी तरी म्हंटले २ तासांवर आहे. म्हणजे पुणे साताऱ्यासारखे. मी म्हणालो नक्की येऊ ".
                असले छोटे मोठे विसंवाद होतातच. परंतु हि पहिली वेळ नसते. आणि शेवटची नाहीच ! मतभेदांमुळे मनभेद होऊ नयेत याची सगळेच काळजी घेतात आणि प्रसंग निभावून नेतात. या सगळ्यात सर्वात मोठी गोची होतात ती मात्र 'अनय' ची ! आता पर्यंत टीव्ही पाहण्याचे सर्वतोपरी अधिकार असलेल्या अनय ला नाईलाजाने आजी साठी वाट करून द्यावी लागते. स्पॉन्जबॉब कॅप्टन अमेरिका ,पोकेमॉन,स्टार वॉर यांची जागा माझ्या नवऱ्याची बायको , जीव रंगला वगैरे मालिका घेतात. "Wasn't that Radhika saying the same stuff last time we went to India ? Do these guys keep on repeating the same stuff again and again?" म्हणत अनय आपला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. त्याला बिचाऱ्याला काही तरी अमिश दाखवून शांत केले जाते. राधिका चालू राहते
                याच दरम्यान मुलं/मुली लांबच्या ' ट्रिप' चे नियोजन करण्यास सुरुवात करतात. उत्तरपूर्व अमेरिकेत राहणारे सहसा चार धामच्या सहलीची योजना आखतात. नायगरा फॉल्स , न्यू यॉर्क शहर , वॉशिंग्टन डी .सी  हे तीन धाम निश्चित असतात. चौथे धाम हे राहण्याच्या ठिकाणानुसार बदलते. बोस्टन, वर्जिनिया बीच , शार्लेट ,फिलाडेल्फिया ,हर्शे ची चॉकलेट फॅक्टरी ,फ्लोरिडा या पैकी कुठले हि स्थळ निवडण्यात येते. सुट्यांचे नियोजन केले जाते. वीकएंड ला जोडून ट्रिप प्लॅन केल्या जातात. विमानांची तिकिटे आरक्षित करणे,रेंटल कर बुक करणे , हॉटेल्स बुक करणे हे सगळे झाले कि कुठल्या ठिकाणी काय काय पाहायचे याचे नियोजन होते . रिपीट जर्नी वाल्यांचे हे सगळे पाहून झालेले असते. त्यामुळे त्यांच्यासाठी  'वेस्ट कोस्ट' किंवा 'मिड वेस्ट' ची योजना आखली जाते. किंवा एखाद्या राष्ट्रीय उद्यानात 'कॅम्पिंग' ची. आजी आजोबा अर्थातच उत्साहित असतात. परंतु " फार खर्च करू नका रे " असा सल्ला पण देतात. घरात राहून टीव्ही पाहण्यावर निर्बंध आलेला नातू पण या सहलींसाठी मग उत्साही असतो.
                ट्रिप साठी मोघम खरेदी केली जाते, चिवडा, शंकरपाळ्या असले ड्युरेबल पदार्थ बनवले जातात. अर्थात हि परंपरा सासू सुना दोघीही मोडीत नाहीत. प्रवासादिवशी मेथीचे पराठे , लाल भोपळ्याच्या घाऱ्या घेऊन मंडळी सकाळी सकाळी 'गणपती बाप्पा मोरया ' म्हणत प्रवास सुरु करतात. रस्त्यात पाण्याच्या बाटल्या आणि डंकिन ची डोनट्स  उचलेले जाता. स्टॅचू ऑफ लिबर्टी पाहण्याचे आजोबांचे स्वप्न आज पूर्ण होते. सोबतच एम्पायर इस्टेट वरून न्यू यॉर्क पाहण्याचे. टाइम्स स्क्वेयर ला काय विशेष हे मात्र दोघांना कळत नाही. नायगरा फॉल्स तर अद्भुत आनंद देतो. तो महाकाय जगविख्यात धबधबा जमेल तेवढा डोळ्यांत सामावून घेण्याचा प्रयास आजी आजोबा करीत असतात. इतके वर्ष ज्याला आपण 'व्हाईट हाऊस ' समजत होतो ते 'कॅपिटॉल हिल " आहे हे समजल्यावर थोडे  दुःख होतेच. परंतु अमेरिकेची राजधानी पाहिल्याचे समाधान पण. वॉशिंग्टन चा प्रसिद्ध मॉल परिसर फिरून फिरून पाय दुखायला लागतात. अर्थात पर्यटन म्हणजे चालणे आलेच. अगदी खान्देश विदर्भासारखी नसली तरी इथल्या उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी असल्याचे त्यांना जाणवते. त्यामुळे , नाव नवीन ठिकाणे पाहण्याचे औत्सुख्य आणि वयपरत्वे आणि उन्हाळ्यामुळे येणारा थकवा यांचा मध्य साधत ती सहल पूर्ण होते.मुलांनी फिरवून आणल्यामुळे आजी आजोबांना कृतज्ञ वाटते. रात्री आई मुलांजवळ जाते. "गाडी चालवून दमले असाल ना रे "? किंवा तू झोप ! सकाळ लवकर उठून सगळा सवयंपाक केला आहेस ! शिवाय ट्रिप मधली धावपळ! असले मायेचे शब्द उच्चरत डोक्यावरून हात फिरवते. ती माया ट्रिप पुरती मर्यादित नसते. जे पेरलंय ते चांगलं उगवलंय याची ती पावती असते आणि या पुढे असेच आनंदी रहा -हा आशीर्वाद
क्रमश:

Wednesday, July 24, 2019

प्रवास -भाग २

                “अहो! प्रवीण येईल ना वेळेवर घ्यायला? नाही म्हणजे तुम्ही वेळ बरोबर सांगितली आहे ना त्याला ?" दबक्या आवाजात आजी विचारतात. गेल्या अनेक तासांची 'विमान' शांतता भंग करायला तो आवाज पुरेसा असतो. "हो गं ! सांगितलंय सगळं व्यवस्थित .आणि तो काय आता कुकूल बाळ आहे का ? तू शांतपणे झोप". झोप मोड झाल्याची नाराजी स्पष्ट करीत आजोबा किंचित मोठ्या आवाजात उत्तरतात. आवाज आणखी वाढायला नको म्हणून आजी संभाषण तिथेच थांबवितात आणि टीव्ही वर काय बघायला मिळतंय ते शोधू लागतात.अमेरिकेत मुला/मुलीकडे निघालेल्या आजी आजोबांचे विमान टेक ऑफ करून तब्बल सात तास झालेले असतात. मधल्या काळात अवेळी जेवणा खाण्याचे प्रयत्न , विमानातील स्वच्छतागृह वापरण्याचा प्रयास, समोरील स्क्रीनवरील पर्याय तपासणे हे प्रयोग करून झालेले असतात. अजून बराच प्रवास बाकी असतो. मुला/मुली ने सगळे पर्याय पालथे घालून शेवटी एअर इंडिया चे बुकिंग केलेले असते.सगळे जण नावे ठेवतात परंतु शेवटी एअर इंडियाचेच बुकिंग का करतात याची प्रचिती त्यांनाही येते. अर्थात त्यामुळे आजी आजोबांना ऍडजस्ट होण्यास फार वेळ लागत नाही. शिवाय बोर्डिंग पूर्वी आपल्यावरख्याच इतर २-४ जोडप्यांची ओळख झाल्यामुळे ताण थोडा कमी झालेला असतो. खाणे पिणे , शेजारच्यांशी थोड्या गप्पा आणि झोप हे सगळे उरकल्यावर आता मात्र पुढचा प्रवास थोडा रटाळ वाटायला लागतो. खऱ्या अर्थाने अमेरिकेत पोहोचायची ओढ लागते. एखाद जुना चित्रपट बघत, समोरच्या स्क्रिनवर आपण कसे अफगाणिस्तान ,उजबेकिस्तान , ग्रीनलँड ,कॅनडा करीत न्यू यॉर्क जवळ येतोय हे बघण्यात वेळ घालवतात,नातवाला भेटल्यावर कशी गंमत येईल या स्वप्नविलासात रमतात आणि एक छोटीशी डुलकी काढतात. डोळा उघडतो तर विमान खाली उतरत असते. चित्रपटात दाखवितात तसे लँडिंग करताना 'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' बघण्यास उत्सुक असलेल्या आजोबांना तो खरंच दिसला कि नाही हे कळतच नाही. अर्थात आपला मुलगा तो स्टॅच्यु प्रत्यक्ष पहायला घेऊन जाईल याची खात्री असते.
                इमिग्रेशन चे सोपस्कार पूर्ण करीत ते कस्टम कडे वाटचाल करतात. "डू यू हॅव एनी थिंग टू डिकलेयर " या प्रश्नाचे उत्तर देतांना आजोबा थोडे चाचपडतात.पण आधीच मुलाने पठविल्याप्रमाणे  'नो ' असे देतात आणि कस्टम ऑफिसर स्मितहास्य करीत एक डोळा मिचकावित त्यांना सोडून देतो.पन्नास किलो सोने स्मगल केल्याच्या अविर्भावात दोघे अत्यानंदित होतात आणि चिवडा,चकली ,मेतकूट इत्यादीत बहुमूल्य गोष्टी सुटल्याचा निःश्वास सोडतात. विमानतळावर मुलगी,जावई नातवंड सगळेच स्वागतास हजर असतात. गळाभेटी होतात, प्रवास सुखरूप झाल्याची चौकशी होते आणि आजी आजोबांचा अमेरिका दौरा खऱ्या अर्थाने सुरु होतो. विमानतळावरून घरचा प्रवास रस्ते आणि सृष्टीसौंदर्य न्याहाळण्यात जातो. झोप आलेली असते पण जे दिसेल ते आजी आजोबा आपल्या डोळ्यात साठवून घेत असतात. आतापर्यंत फार फार तर चित्रपटात दिसलेल्या गोष्टी ते प्रत्यक्ष बघत असतात. शिवाय नातवंडं अति उत्साहित असल्यामुळे नको नको त्या गोष्टी सांगून भेडसावून सोडतात. "तन्वी जरा शांत बसा. आजी आजोबा लांबच्या प्रवासावरून आलेत त्यांना आराम करू द्या " या आई च्या दटावण्याला लगेच आजी चा मलम असतोच " राहू दे ग. आम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार ? हो ना पिलू ?". विमानतळावरून घरच्या प्रवासात हमखास चर्चा होते ती परदेशातील स्वच्छतेची, भव्य रस्त्यांची आणि आपल्याकडे काय करायला पाहिजे याची.सोबतच आणि साहजिकच 'मोदी' या विषयात पण हात घातला जातो. परंतु तो पर्यंत एक्सिट घेऊन गाडी आपल्या शहरात वळलेली असते आणि आणि विषय तिथेच थांबतो . या सगळ्यात 'रिटर्न जर्नी ' वाल्यांचा किस्साच वेगळा असतो. आपला जन्मच इथला या अविर्भावात ते वावरत असतात. गाडीत बसताच ते लगेच त्यांच्या अमेरिकेतील सवंगड्यांबद्दल चौकशी करायला लागतात. कोण आले -कोण नाही याचा अंदाज घेतला जातो. नातवंडांकडे त्याच्या मित्र मैत्रीणींबद्दल चौकशी होते. परंतु एव्हाना नातवंडं मोठी झालेली असतात आणि त्याचे मित्र-मैत्रीण सुद्धा बदललेले असतात. आपण नेहेमी येतो परंतु रोज इथे रहात नाही. मधल्या काळात इथलं पण विश्व बदलते याची हलकी का होईना पण जाणीव त्यांना होते.
                आल्यावर दोन तीन दिवस 'जेट लॅग' मध्ये जातात.आपली मुले -सुना जेंव्हा भारतात येतात तेंव्हा त्यांची काय गत होते हे आजी आजोबांना अनुभवायला मिळते. "तुम्ही कसे रे एक-दोन आठवड्याकरिता येता आणि जाता?" असे कौतुकोदगार पण ऐकायला मिळतात. हळू हळू गाडी रुळावर येते. दिवस दिवस वाटतो आणि रात्री झोप लागते. एव्हाना नातवंडाने आपल्या सगळ्या मित्रांची ओळख करून ,सगळी खेळणी दाखवून , कराटे चे नवीन शिकलेले डाव , नवीन ऐकलेल्या भुताच्या किंवा एलियन च्या गोष्टी सांगून भांबावून सोडलेले असते. आजी आजोबा शांत पणे या नवीन विश्वाच्या चाली रीती समजावून घेत असतात. आपण इथले नाही पण होऊयात -हा आत्मविश्वास एकमेकांना देत बदल आत्मसात करीत असतात. साधारण चौथ्या दिवशी आजी "काही मदत हवी का ?" म्हणून स्वयंपाकघरात प्रवेश करतात आणि आजोबा फिरायला म्हणून बाहेर पडतात. संध्याकाळी सगळे एकत्र जेवायला बसतात आणि पहिला घास घेताच प्रवीण उदगारतो - " पडवळाची भाजी छानच झाली आहे! आई ने केली वाटते ". त्या माऊली ला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. आपल्या आई च्या हातचे जेवल्याचा आनंद आणि मुलाला इतक्या वर्षानंतर खाऊ घातल्याचे समाधान दोघांच्याही चेहेऱ्यावर ओसंडून वहात असते.
या क्षणाची तो कितीतरी वर्ष वाट बघत असतो. 'आय टीत जॉब मिळाल्याबरोबर मी पण आई बाबांना परदेशात घेऊन जाणार" या दुरापास्त वाटणाऱ्या स्वप्नाची पूर्ती झालेली असते.
क्रमश:

Monday, July 22, 2019

प्रवास - भाग १


               "अनय ची कॅप आणली का? त्या ग्रे सॅक मध्ये होती" .एके दुपारी न्यू यॉर्क च्या गजबजलेल्या सेंट्रल पार्ककडे जात असताना मागून आवाज आला. सहज वळून पाहिले तर बाबांचे बोट धरून टोपी न घातलेला 'अनय ', मागे टोपी -गॉगल घातलेली त्याची आई, स्ट्रॉलरमध्ये अनायचा भाऊ (किंवा बहिण) आणि त्यांच्या मागून टी शर्ट आणि जीन्स घातलेले एक सत्तर वर्षांचे गृहस्थ. सोबत पंजाबी ड्रेस ,व्हिक्टोरिया हॅट आणि गॉगल घातलेल्या त्यांच्या सौ असा काफिला येताना दिसला. ते वयस्कर जोडपे अर्थातच अनय चे इकडचे किंवा तिकडचे आजी आजोबा होते. ओळख करवून घेतली तर कळले कि करंजकर कुटुंबीय मूळचे नगरचे. मुलगा समीर ओहायो ला असतो. आजी आजोबा त्याच्याकडे आले होते. न्यू यॉर्क किंवा अन्य कुठल्याही पर्यटन स्थळी असले दृश्य नवीन नाही. मराठी माणूस भेटणे हे अप्रूप राहिलेले नाही. " अरे दीड वाजता चे आपले बुकिंग आहे  लवकर चला"  किंवा  " अरे अनिरुद्ध आई चे पाय दुखतायेत. जरा बसून घेऊ. सबवे बघ कुठे आहे का " , " बाबा ते विमान येऊन या बिल्डिंग ला धडकलं तर हि पडली कशी नाही " ? असे एक ना अनेक आवाज येता जाता ऐकू येत असतात. त्यात विशेष लक्षात राहतात ते म्हणजे नवरा-बायको , आई-वडील किंवा सासू-सासरे आणि नातवंडं  असे 'कंप्लिट पॅकेज'.
                उत्तर अमेरिकेत मे महिन्याच्या मध्यास थंडी ओसरायला सुरुवात होते आणि गेली अनेक महिने 'हायबरनेशन" मध्ये असलेले मनुष्य आणि इतर प्राणी सक्रिय होतात. हिम वर्षांव होणे थांबले ,बर्फ वितळला आणि खारुताई झाडावर दिसायला लागली कि समजायचं कि "मौसम बदल रहा है ". काहीच दिवसात रुक्ष दिसणाऱ्या झाडांना पालवी फुटते आणि सगळीकडे हिरवळच हिरवळ दिसते. बालकवी इकडे जन्मले असते तर त्यांनी " स्प्रिंग" वर एखादी अजरामर कविता निश्चित केली असती. आपल्याकडे जसे जून उजाडला कि रेनकोट ,छत्र्या बाहेर काढल्या जातात. किंवा दिवाळी संपली कि लोकरी चे कपडे काढून ऊन दिले जाते, तसेच इकडे पण झाडांना पालवी फुटली कि लोक उन्हाळ्याच्या आगमनाच्या तयारीला लागतात. आणि उन्हाळ्याबरोबरच चाहूल लागते ती आजी -आजोबांच्या येण्याची. आम्ही तर मे ते सेप्टेंबर हा 'दादा-दादी ' किंवा 'नाना-नानी ' सिझन असेच गमतीने म्हणतो.  मे -जून दरम्यान अनेक जण आपल्या आई-वडिलांना इकडे बोलावून घेतात. कोणी पहिल्यांदा येणार असते तर काही रतीब घातल्यासारखे दर वर्षी येतात. काही मुली/सुनेच्या बाळंतपणासाठी तर कोणी उन्हाळ्याच्या सुट्टीत नातवांना सांभाळायला. काही जण सहज विरंगुळा म्हणून  तर काही जण इच्छा नसताना देखील मुलं-नातवांच्या ओढीने येतात ." तेवढे अलास्का फिरायचे राहिले आहे .यंदा जायचे म्हणतो "- गेल्या वर्षी एक आजोबा सांगत होते मला.
                या सगळ्याची सुरुवात मात्र बऱ्याच आधी झालेली असते. मुलगा किंवा मुलगी अमेरिकेत स्थिरावले कि ते आई वडिलांच्या अमेरिकावारी ची तयारी सुरु करतात. कागदपत्रांची जुळवाजुळव, एखाद्या एजन्ट ला गाठणे , स्टॅम्पिंग ची तारीख मिळवणे इत्यादी गोष्टी झाल्या कि धाक-धुक लागते ती व्हिसा मिळतो का याची. व्हिसा मिळताच विमानाचे तिकीट बुक केले जाते. तिकडे आई वडील पण तयारी ला लागतात. कपडे शिवून /विकत घेणे, मोठ्या बॅगा विकत घेणे असल्या प्राथमिक गोष्टी सुरु होतात. व्हिसा मिळण्यापूर्वी अगदी खासगी असलेली ही बातमी नंतर सार्वजनिक होते. "हात मोजे घेऊन जा - तिथला उन्हाळा तो कुठला ? आपल्याला थंडीच वाजते " किंवा " खाण्या-पिण्यचे काही घेऊन जाऊ नका. कस्टम वाले फेकून देतात .शिवाय तिकडे सगळे मिळतेच " , " बाळाला घुटीचे सामान आणि सान तेवढी घेऊन जा " असे आवश्यक आणि अनावश्यक सल्ले दिले जातात. इकडे मुलाने आणि सुनेने काय आणा आणि काय आणू नये याची विस्तारित यादी पाठविलेली असते. आजीबाई अमेरिकेत जायचे म्हणून खास पंजाबी ड्रेस शिवायला टाकतात. आजोबा पण कधी नव्हे ते 'प्युमा' चे बूट घेतात .थोडा गोंधळ होईल असते दिसताच -"चार वेळा जाऊन आलेल्या " कोणा शेजाऱ्याची मदत घेतली जाते.
                प्रवासाचा दिवस जवळ येतो. आई उत्साहीत असते. बाबा थोडे नर्वस. बॅगा भरलेल्या असतात , चिवडा, चकली ,मेतकुट , भाजण्याचे पीठ, गुलकंद,मोरावळा यांचे सीलबंद पॅकिंग झालेले असते. तरीही - फेकून देतात कि काय हि धाकधूक असतेच. डॉक्टरांकडे जाऊन चेकअप ,आगाऊ औषधे इ औपचार उरकले जातात. मुलगा ( किंवा जावई ) मुंबई ला पोहोचल्यापासून कसे काय करायचे याची इतंभूत सूचना लिहून पाठवितो. जायचा दिवस उजाडतो – पाहुणे-रावळे , मित्र मंडळी जमतात. कोणी परदेशातील आपल्या भाच्या/पुतण्यांसाठी भेटवस्तू देतात तर कोणी नुसतेच आशीर्वाद. सल्ले देणाऱ्यांची तर अजिबात उणीव नसते. "बिंदास रहायचे -खायचे प्यायचे मजा करायची " , " जातोस आहेस तर नातवंडांना मराठी शिकव -आपली मातृभाषा आहे " असे प्रोत्सहनात्मक सल्ले मिळतातच सोबतच " चला आता चार-पाच महिने केशव ला घरचं चांगलं -चुंगलं खायला मिळेल " असे खोचक संवादही ऐकायला मिळतात. आजी आजोबा मात्र भयंकर भांबवलेले असतात. आपण काही विसरलो तर नाही ना ? पासपोर्ट , पत्ता , फोन नंबर , डॉलर  इ गोष्टी घेतल्या याची चार चार वेळा खात्री केली जाते. अमेरिकेत वैदकीय खर्च खूप महाग आहेत. आपल्याला काही होणार तर नाही ना ? ही धाकधूक कायम असतेच.
                बघता बघता तो क्षण उजाडतो. पुढच्या मागच्या दारांना कुलुपं लावून , नळ ,गॅस बंद आहेत याची खात्री करून, लाईट चा मुख्य स्विच बंद करून मंडळी विमानतळाकडे प्रस्थान करतात. विमानतळावर पोहोचताच गोष्टी इतक्या झपाट्याने घडतात कि दोघांनाही कळत नाही. बघता बघता सोडायला आलेल्या पाहुण्यांना निरोप दिला जातो. मुलाने अमेरिकेहून " चेक इन " केले असते .त्यामुळे ती प्रक्रिया पण पटकन उरकते. थोड्याच वेळात आजी आजोबा विमानाची वाट पाहत बसलेले असतात. आता मात्र वेळ जाता जात नाही. "कॉफी मिळते का बघू " म्हणत आजोबा उठतात. एवढीशी कॉफी शंभर रुपयाला”? असे म्हणत आयुष्यात 'सी सी डी ' कडे कधीही ना फिरकलेले दोघे ती महागडी कॉफी घेतात मात्र. आज बऱ्याच दिवसांनी उसंत मिळालेली असते. खरे तर बऱ्याच वर्षांनी. आपल्या "प्रवीण " किंवा "वीणा " चे आयुष्य मार्गी लागावे म्हणून दोघांनी आयुष्य खर्ची केलेले असते. आपल्या इच्छा आकांशांना बगल देत मुलांच्या शिक्षणासाठी पै पै एकत्र करण्यात त्यांच्ये तारुण्य वार्धक्यात कधी परिवर्तित झाले हे त्यांचे त्यांनाच कळलेले नसते. इंजिनिअरिंग झाल्यावर आपल्या "प्रवीण " किंवा "वीणाला " पुण्य-मुंबईत एक चांगली नोकरी ,एक चांगले स्थळ , एक फ्लॅट आणि एक गोंडस नातू असे स्वप्न बघितलेले ते दोघे आज स्वप्नातही कल्पना न केलेल्या प्रवासाला निघालेले असतात ....
क्रमश :

Tuesday, July 9, 2019

दुर्बिण


"बाबा मला बड्डे ला दुर्बिण पाहिजे" - एके दिवस सकाळी सकाळी चिरंजीवांनी फर्मान काढले. आमच्या लहानपणी प्रत्येक वर्षी कालिकेच्या जत्रेत बाबा मला खेळण्यातील दुर्बिण घेऊन द्यायचे. दुर्बिण आणि डमरू -ठरलेले आयटम. ते आठवले आणि मी लगेच आनंदाने होकार देऊन टाकला.थोड्या वेळाने (त्याने गूगलवर माहिती दाखविल्यावर) याची दुर्बिण म्हणजे 'टेलिस्कोप' हा बोध झाला.बरं खेळण्यातील नव्हे तर खरा-खुरा ! किंमत पाहून मात्र डोळे पांढरे झाले. वास्तवतः गेले दोन एक वर्ष याचा वाढदिवस जवळ आला की आमच्या पोटात गोळा येतो. आता काय मागतो या भीतीने. शालेय परीक्षांत बऱ्यापैकी प्रगती दाखविल्यामुळे एक बाप म्हणून त्याचे कौतुक करावेसे वाटते खरे. परंतु  हल्ली त्याच्या मागण्या बऱ्याच महागड्या होत चालल्या होत्या. म्हणजे बघा -निवडणुकीत लहान पक्ष भा ज पा च्या  प्रचारात धडाडीने सहभागी होतात.आपली पूर्ण ताकद लावतात. परंतु नंतर काय मागतील या भीतीने अमित शहांच्या पोटात असाच गोळा येत असणार ! असो तर ती अति महागडी दुर्बिण घेऊन देणे किंवा परावृत्त करणे हे दोनच पर्याय होते. त्यासाठी व्यूहरचना करू लागलो

                याला मुळात दुर्बिण हवीच कशाला असा आमचा पहिला युक्तिवाद.आमच्या शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकात गॅलेलिओ चे टेलिस्कोप सोबतचे चित्र होते. तोच काय तो आमचा त्या यंत्राशी संबंध. तेवढ्यावर आम्ही बोर्डात भूगोलात पैकी च्या पैकी गुण मिळवले(इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्राचे वेगवेगळे गुण कळवीत नसल्याकारणाने आमच्या या दाव्याला खोटे ठरिवले जाऊच शकत नाही .शिवाय आमच्या १० वीची गुणपत्रिका आम्हालाच सापडत नाही -हा भाग वेगळा). तर अभ्यासाकरिता पुस्तक पुरे असे आमचे ठाम मत होते. अगदी फारच आवड आहे असे म्हंटले तरी त्यासाठी असली महागडी उपकरणे हवीत कशाला ? त्या वॉटसन ने वाफेच्या शक्तीचा शोध चहा च्या किटलीवर लावला. त्याने थोडीच रेल्वेचे इंजिन मागितले होते बड्डे ला ?  न्यूटन ने गुरुत्वाकर्षणाचा शोध केम्ब्रिज विद्यापीठात लावला. तिथलेच ते सफरचंदाचे झाड. महागडे सफरचंद आणून घरी फर्शीवर टाकणे परवडणारे होत काय त्याच्या पिताश्रींना ? आणि गॅलेलिओ-कोपर्निकस च्या आधी कुठे होती असली थेरं ? ऍरिस्टोटल वगैरेंनी तर असेच उघड्या डोंळ्यानी आकाशाकडे बघून आपले सिद्धांत मांडले( ठोकून दिले) होते. इतकेच कशाला ? भारतात तर -दुर्बिण सोडा ,साध्या काचेचाही शोध लागला नसतांना पूर्वीच्या तत्त्वज्ञांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगितलेच, वर बाकी ग्रहांचाही शोध लावला.( विमानाचा ,अणु -रेणू इत्यादींचा पण शोध लावला तो वेगळा ). असो- तर  भूगोलात निष्णात होण्याकरिता आणि अगदी ते 'सायंटिफिक टेम्परामेंट' का काय ते विकसित करायला त्या महागड्या दुर्बिणची अजिबात गरज नाही या निष्कर्षाला आम्ही पोहोचलो.
                विज्ञानापलीकडे पहायचे झाले तर आपल्याकडे चंद्र,सूर्य तारे यांच्या संदर्भातील साहित्याचा समृद्ध वारसा आहे. अगदी चांदोबा-चांदोबा भागलास का पासून पासून 'चंदा मामा सो गये सूरज चाचू जागे'  पर्यंत प्रत्येक वयोगटाला साजेसे असे गीतप्रकर आहेत. एवढेच काय आपण चंद्राला कधी साक्षीदार बनवितो तर कधी 'रूक जाना तू ठहर जा रे चंदा ' म्हणत आदेश पण देतो. मराठी हिंदी चित्रपटातील चंद्र आणि सितारे यांवर आधारित गीत एकत्रित केले तर ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी छोटी पडायची. हे कमी म्हणून कि काय अनेक रहस्य कथा आहेत ,पुराणकथा आहेत ,बुध -शुक्र -गुरूच्या गोष्टी आहे. एवढे सगळे असतांना त्या दुर्बिणीच्या छिद्रातून जेमतेम दिसणारे ग्रह तारे का बघायचे ? शिवाय गणपतीने श्राप दिल्यामुळे चंद्र तास नाराज असणार. उगाच कशाला छेडायचं त्याला ? आधीच आर्मस्ट्राँग वगैरेंनी पायदळी तुडवून अपमान केलाय.
        तर या सर्व तर्कांसकट मी चिरंजिवांशी दोन-हात करायला सज्ज झालो. रविवारी उठला तर निराळाच सूर होता. मी बोलण्याआधीच म्हणाला - " You know I was asking for the telescope?" म्हंटलं त्याचे काय ? 
"मला नकोय तो "! मी उडालोच! हे म्हणजे १२ आमदारांनी काँग्रेस- जे डी यु ला सोडचिट्ठी देऊन सुद्धा येदुरीअप्पांनी साळसूदपणे "आम्ही सरकार नाही बनविणार " म्हंटल्यासारखे होते ! मला तसा आनंदच व्हायला हवा होता. परंतु आपले तर्क न ऐकता त्याने माघार घेतली हे काही रुचे ना . दोन दिवस जी तयारी करीत होतो ते सगळे वाया जाणार होते. म्हणून उगाच त्याला डिवचायला म्हणालो - का रे ? घे ना ? तुला आवडते ना ? दुधाचा कप घटा -घटा पीत म्हणाला- मला आवडते. I certainly would like it. But it’s very expensive. Probably not worth it! थोडक्यात माझी ऐपत नाही आणि मी नाही म्हणणार हे त्याने ओळखले होते. ते काही ही असो. मुलगा भूगोलासोबत थोडे अर्थशास्त्र पण शिकत होता. बिना दुर्बिणचे तो लांब चे पहायला लागला होता याचा आनंद झाला.
वाढदिवसाला त्याच्या आवडीचे (आणि माझ्या बजेटमधले ) खेळणे घेतले. शिवाय जवळच येल विद्यापीठ आहे . तिथल्या ऑब्सर्व्हेटोरी ला घेऊन जाण्याचे ठरले आहे. त्याच्यापेक्षा जास्त आतुरतेने मी वाट पाहतोय. ते काय प्रकार आहे हे तरी कळेल !