Saturday, May 13, 2023

ओव्हर बट नॉट आऊट

                 पूर्वी जेंव्हा भारताची मॅच असायची तेंव्हा सचिनची विकेट पडली की टीव्ही बंद करायचो. दुसरी बॅटिंग असेल तर हमखास करायचो. कारण आता भारत हरणार याची खात्री असायची. क्वचित काही मॅचेस अशा ही असायच्या जेंव्हा सचिन पण पहायची गरज नव्हती पडत. म्हणजे साक्षात देव पण आपल्याला या पराभवापासून वाचवू नाही शकणार ही खात्री होती. कर्नाटकाची मॅच पण तशीच होती. एरव्ही निवडणुकीचे निकाल म्हंटल्यावर मी आधीच टीव्ही वर हक्क सांगितला असतो. मग भारतीय वेळेनुसार अगदी पाऊणे आठ पासूनच बातम्या बघायला सुरुवात करायची- आधीच्या बातम्यांना 'पोस्टल बॉलॉट ' म्हणून धुडकारून लावायचे मग हळू हळू कल स्पष्ट व्हायला लगे . साधारण दुपारी दोन अडीच पर्यंत चित्र पूर्णपणे स्पष्ट होतं . मग झोपायचे .  यावेळी टीव्ही लावलाच नाही. निकालाची खात्री होती. झोपून घेतलं . उठलो तेंव्हा एवढीच उत्कंठा होती की भाजपा किती आपटला. काँग्रेस निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेघ होती. प्रश्न एवढाच होता कि सरकार देवेगौडांची पार्टी सोबत घेऊन बनवणार कि एकटे. म्हणजे भाजप हरल्यामुळे किंवा काँग्रेस जिंकल्यामुळे आम्ही काही निराश वगैरे झालो नाही बरं का !  परंतु वर दिलेल्या सचिनच्या उदाहरणाप्रमाणे ज्या निवडणुकीत मोदी पण भाजपाला वाचवू शकणार नाहीत हे दिसतंय त्याचा निकाल अजून काय वेगळा लागणार ? हे अभिप्रेत होते.

या निकालाची कारणमीमांसा करण्यात फार वेळ घालवण्यात अर्थ नाही. भाजप बाबतीत -स्थानिक मुद्दे ,बंडखोरी, अँटी इन्कमबंसी  हे तर झालेच .त्यासोबत एवढेच सांगेन कि भाजपच्या प्रचारतंत्रात तोच तोच पणा आलाय. निवडणुकीदरम्यान काही भावनिक आणि धार्मिक  मुद्दे उपस्थित करणे , मोदींच्या प्रचंड सभा आणि रोड शो , लागलेच तर कुठलासा वादग्रस्त चित्रपट त्यादरम्यान प्रदर्शित करवून घेणे इत्यादी गोष्टी आता नेहेमीच्या झाल्यात. पूर्वी आठवतंय - एखादा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यातील अभिनेता किंवा अभिनेत्री कुठल्यातरी वादात अडकायचे. वयक्तिक किंवा राजकीय/सामाजिक इत्यादी. प्रसिद्धी आपसूक मिळायची आणि चित्रपटाला भरगोस फायदा व्हायचा. पुढे जसे प्रेक्षक हुशार झाले तशी ही 'ट्रिक' चालेनाशी झाली आणि चित्रपट डब्यात जायला लागले . तीच  गत भाजपची होत चालली आहे. किंबहुना करोडो रुपये खर्चून आयोजित केलेल्या मोदींच्या त्या महाकाय सभा आणि रोड शोचा पक्षाला किती फायदा होतोय याचा त्यांनी विचार करायला हवा. भाजपाच्या अति आक्रमक प्रचाराचा त्यांना फायदा कमी आणि तोटाच जास्त होतोय असे दिसते आहे. एक गुजरात सोडले तर इतर ठिकाणी हेच दृश्य आहे. तर भाजपच्या रणनीतीकरांना एकच संदेश - बी क्रिएटिव्ह.

या निकालाचे खास  वैशिष्टय म्हणजे - हा कौल जेवढा भाजपाविरोधात होता तेवढाच काँग्रेसच्या बाजूने होता. आणि हे बरेच वर्षांनी अनुभवायला मिळाले. २०१४ नंतर भाजपचा अनेक राज्यस्तरीय निवडणुकीत पराभव झाला आहे. जेथे जेथे काँग्रेस विरुद्ध थेट लढत होती तेथे भाजपच्या परंपरागत मतदाराने साथ सोडली नाही. म्हणून मत टक्का शाबूत राहिला. विरोधक एकटवल्यामुळे म्हणा किंवा कोणा एका घटकाने एकमुठी मतदान केल्यामुळे भाजपचा पराजय झालेला दिसतो. कर्नाटकात पहायचे झाले तर बेंगळुरू, दक्षिण कर्नाटक असे एक  दोन अपवाद वगळता सर्वत्र काँग्रेस ने भाजपाला मात दिली आहे . काँग्रेसची मतांची  टक्केवारी सुमारे टक्क्यांनी वाढली आहे. भाजपाची एक ते डिड टक्क्यांनी कमी झाली आहे. जनता दलाची मते आणि जागा पण काँग्रेस ने खाल्ल्या. याचाच अर्थ कि काँग्रेसला मतदान केलेला वर्ग हा फक्त भाजपाला वैतागलेला नव्हता तर काँग्रेसकडे आशेने बघणाराही एक छोटा का होईना वर्ग निर्माण होऊ पाहतोय. हा बदल भारत जोडो यात्रेमुळे झाला कि अन्य कशामुळे झाला, तो पुढे कायम राहील कि एकवेळचा चमत्कार होता या गोष्टींबद्दल आत्ता काही निश्चित सांगता नाही येणार. परंतु वाळवंटात अंकुर फुटलाय हे निश्चित. आणि ही काँग्रेससाठी आनंदाची तर भाजपसाठी धोक्याची घंटा असली पाहिजे .

 या निवडणूक निकालांचे दूरगामी परिणाम होतात का हे प्रामुख्याने विविध घटक त्या निकालाचे कसे विश्लेषण करतात आणि काय पाऊले उचलतात यावर अवलंबून आहे. काँग्रेसचे शशी थरूर यांनी आत्ताच - बेफिकीर राहून चालणार नाही हा इशारा दिला आहेच. मोदींची जादू कमी होत चालली आहे असा  एक निष्कर्ष काढला जाऊ लागला आहे. त्यात थोडेफार तथ्य जरी असले तरी एक लक्षात घेतले पाहिजे कि फक्त मोदींच्या नावावर आणि जीवावर निवडणूक लढवणाऱ्यातली भाजप नाही. त्यांचा कोठे कसा वापर करून घ्यायचा हे पक्ष ठरवतो . भाजप वरकरणी जरी मोदींवर अवलूंबून आहे अशी वाटत असली तरी  तयारीच्या दृष्टीने बघायचे झाले तर ती नव्वदीच्या दशकातील भारतीय क्रिकेट टीम नाही जी सचिन वर अवलूंबून राहते - ती ऑस्ट्रेलिया आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ,बूथनिहाय विश्लेषण होणार - कुठे चुकलो , काय अंदाज चुकीचे ठरले हे अगदी बारकाईने पहिले जाणार आणि चुका दुरुस्त केल्या जाणार हे निश्चित. कारण मोदी हे जाणतात कि आधी  'सत्ता है तो मोदी है'  येतं आणि मग मोदी है तो मुमकिन है हे येतं ! विरोधकांचे म्हणाल तर त्यांच्या एकजुटीचे प्रयत्न गेल्या कर्नाटक निवडणुकीपासून सुरु आहेत. अर्थात गेल्या काही राज्यस्तरीय आणि पोट निवडणुकांमध्ये त्याचे महत्व बऱ्याच पक्षांना कळून चुकलंय. त्यामुळे यावेळी सगळे जरा 'सिरीयस' आहेत असा भास होतोय. परंत सरतेशेवटी कोण कोणाला किती जागा सोडतो यावर विरोधकांच्या एकजुटीचा डोलारा उभा राहणार आहे . पाया गंडला तर तो उभा राहण्या आधीच कोसळणार . आणि भाजपला हे नेमके माहिती आहे. नव्हे - तेच त्यांच्या यशाचे गमक आहे. शिवाय या यशामुळे काँग्रेसला थोडे अजून मांस चढणार हे निश्चित .त्यामुळे दिल्ली बहोत दूर है असेच म्हणावे लागेल सध्या तरी

येत्या वर्षभरात अजून पाच -सहा  राज्यांच्या निवडणुका होणे आहेत . जवळपास सर्व राज्यांमध्ये भाजप एकतर सत्तेवर आहे किंवा येऊ इच्छिते . त्यामुळे घमासान होणार हे निश्चित . काहीही झाले तरी तुम्ही शांत रहा - निवडणूकाच  आहेत . युद्ध नाही.

 

सुशांत गोसावी

No comments:

Post a Comment